श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ९  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

तस्मिन्ननन्यता तद्विरोधिषूदासीनता च ॥ ९ ॥

 अर्थ : आणि (निरोध म्हणजे) त्या भगवंताचे ठिकाणी अनन्यता आणि त्याच्या प्रतिकूल विषयाचे ठिकाणी उदासीनता ठेवणे.

 विवेचन: अनन्यता आणि उदासिनता या दोन शब्दाची योजना नारद महाराजांनी इथे केली आहे. एक शब्द नकारात्मक म्हणता येईल तर दुसरा सकारात्मक.

 भक्त भगवतांना असे म्हणतो की मला तुझ्याशिवाय अन्य कोणी नाही. एक तूच माझा आहेस, बाकी इथे कोणीही माझे नाही. ज्याप्रमाणे पतिव्रतेला फक्त आणि फक्त आपला नवरा पुरुष वाटतो आणि बाकीचे पुरुष तिला तिची लेकरे वाटतात, तशी *मनोभूमिका साधकाची असावी. इथे आपल्या इतिहासातील एक छान प्रसंग आठवतो. अनुसया मातेच्या कुटीत त्रिदेव भिक्षा मागायला जातात आणि थोडीशी विचित्र अट (निवस्त्र होऊन) 

ठेवून तिला भिक्षा वाढायला सांगतात. (अनुसया म्हणजे जिने असुयेवर विजय मिळविला आहे.) माता अनुसयेला फक्त आपले पती ऋषी अत्रि हेच पुरुष वाटत असतात आणि अन्य सर्व तिची बालके. तिची श्रद्धा आणि उपासना इतकी उच्चकोटीची असते की या त्रिदेवांना तान्हुले व्हावं लागते आणि मग माता त्यांना आपले अमृतमय स्तन्य पाजते…. !*

– – मला या प्रसंगात माता अनुसयेची अनन्य भक्तीचे दर्शन घडते… ! 

 मनुष्याचे मन फार चंचल आहे. त्याला जिकडे जाऊ नको म्हणून आपण सांगू, नेमके ते तिकडेच धाव घेते….. !

संत तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव पुढील अभंगात मांडतात… 

 सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥

म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु. ॥

काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चिंत्ता उपजतें ॥२॥

तुका म्हणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार ठाकीं ॥३॥

अर्थ: माझ्या मनाला मी चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते काही माझे ऐकत नाही या उलट हे चांडाळ मन माझ्या घाता वर टपलेले आहे. म्हणून मी या संसार डोहामध्ये तरेल की बुडेल हेच पाहत आहे कारण मनावर मी ताबा ठेवू शकेल एवढे तरी बळ अजून माझ्यात नाही. मी माझे पूर्व संचित पाहतो तर ते मला काही कळत नाही आणि विद्या ग्रहण करावे म्हटले तर माझी बुद्धी मंद आहे त्यामुळे या संसार डोहातून मी कसा तरुन जाईल याविषयी चिंता माझ्या मनामध्ये उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंगी असे बळ नाही की मी वेगाने हा संसार डोह पार करून तुझ्या ठिकाणी येऊन पोहोचेल

(संदर्भ: अभंग क्रमांक. १८४२, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

ज्या गोष्टी साधकाला, मनुष्याला मोहात पाडतात किंवा चित्त विचलित होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्याविषयी साधकाने उदासीन असावे असे नारद महाराज आपल्याला या सूत्रात सांगत आहेत.

भागवतांच्या सेवेत विघ्न आणणारे प्रत्येक वेळी बाहेरील लोकं असतात असे नाही तर आपल्या कुटुंबातील देखील असतात. आणि प्रामुख्याने आपणच आपले शत्रू असतो. आधी आपला आपल्यालाच विरोध असतो, मग आपल्या कुटुंबातील लोक आपल्याला विरोध करतात अशी आपण तक्रार करीत असतो.

काही उदा. पाहू.

रामायण आपल्याला सर्वांना माहित आहे. भरताने रामापासून दूर जावे म्हणून कैकयीने अनेक प्रयत्न करून पाहिले. थोडक्यात भरताला त्याच्या राम सेवेत त्यांच्या आईचा अडथळा होता, भरताने आईचा त्याग केला नाही तर तो तिच्या बाबतीत उदासीन राहिला.

संत तुकाराम महाराजांची पत्नी थोडी खाष्ट होती, पण त्यांनी आपल्या साधनेत काही खंड पडू दिला नाही. ते तिच्या बाबतीत उदासीन राहिले. जीवनाच्या अखेरच्या क्षणी वैकुंठाला जाताना, तिला येतेस का असे विचारायलाही विसरले नाहीत… !!

मानवी जीवनाला अनेक कंगोरे आहेत. मानवी जीवन दिसते तितके सरळ नाही. त्यामुळे व्यक्ती परत्वे प्रत्येकाच्या आयुष्यात नानाविध घटना घडत असतात, घडत असतील. अशावेळी साधकाने आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय (भगवतांची प्राप्ती) कायम लक्षात ठेवून तात्कालिक लाभहानीचा विचार न करता आपली साधना जोमाने सुरू ठेवावी. राम कृपा केल्याशिवाय रहाणार नाही असे सर्व संत सांगतात

– – आपण प्रयत्न करून पाहू. 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ९ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted