श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
लोकोऽपि तावदेव किंतु भोजनादिव्यापारस्त्वाशरीरधारणावधि ॥
अर्थ –
जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत सिद्धांनी आणि साधकांनी देह रक्षणासाठी भोजनादी क्रिया केल्या पाहिजेत आणि सर्वकाळ योग्य आचरण ठेवून लौकिक कर्माचे पालन केले पाहिजे.
विवरण :
परमार्थ मार्ग आचरणात आणताना साधकाला त्याच्या देहाला सोबत घेऊन, त्याचा आश्रय घेऊनच पुढील वाटचाल करावी लागते. सर्व संत देहबुद्धि ती आत्मबुद्धि करावी असे सांगतात. पण दुर्दैवाने काही साधक त्याचा त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावतात, आणि देहाला उगाचच कष्ट देतात, त्याची हेळसांड करताना आढळतात. मी देह नाही तर आत्मा आहे हे साधकाने कायम लक्षात ठेवावे आणि तसे आचरण करावे असे सर्व संत सांगतात. आपण एक उदा. पाहू. एका मनुष्याकडे एक वाहन आहे. त्याचा उपयोग करून तो मनुष्य त्याला आवश्यक असेल तिथे प्रवास करू शकतो. हा प्रवास करताना कोणी विचारले किंवा विचारले नाही तरी तो कधीही असे मानीत नाही की मी म्हणजे ते वाहन आहे. वाहन आणि तो स्वतः यातील भेद त्याच्या कायम लक्षात असतो, तो त्यानुरूप आचरण करीत असतो. इथे देह म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे, ते एक वाहन आहे हे साधकाने नित्य लक्षात ठेवले पाहिजे.
८४ लक्ष योनी फिरल्यावर मनुष्य देह मिळतो असे आपले शास्त्र सांगते. अर्थात आत्मा अमर आहे, तो अनेक योनी फिरत फिरत पूर्व सुकृतानुसार मनुष्य योनी प्राप्त करतो अर्थात तो सतत देह बदलत असतो. थोडक्यात देह हे एक आत्म्याच्या प्रवासाचे माध्यम/वाहन आहे, असे साधकाच्या मनात ठसले तर मग त्याची पुढची प्रगती विनासायास होण्याची शक्यता वाढू लागते. मी देह नाही तर प्राप्त देहाचा उपयोग करून, त्याच्या सहयोगाने मी अनंताचा प्रवास करण्यास सुरुवात केली आहे असे मनात पक्के झाले की साधक देहरूपी वाहनाची काळजी घेण्यास उद्युक्त होतो. प्रवासाला निघण्यापूर्वी मनुष्य आपल्या वाहनातील तेलपाणी तपासतो, त्याची योग्य ती तपासणी करून घेतो, आवश्यक ती दुरुस्ती करून घेत असतो. इतकेच नव्हे तर प्रवासात देखील तो त्या वाहनांची उचित काळजी घेत असतो, नाही का? त्यानुरूप साधकाने देहाला भगवतांच्या प्राप्तीसाठी त्यानेच दिलेले वाहन/माध्यम मानावे आणि त्याची आवश्यक ती निगा राखावी. प्रवासाअंती गंतव्य स्थान दिसू लागले की वाहन सोडून जाण्याची तयारी ठेवावी. गंमत म्हणून विचार करून पहा की प्रवास करायला नवीन एसटी बस मिळाली म्हणून कोणी गंतव्य स्थान सोडून नुसतीच त्या बसमधून कोणी ये जा करीत नाही….!
एखादा मनुष्य परमार्थ मार्गात अग्रेसर होऊ लागला म्हणून त्याने थेट संन्यासी होऊन जावे, अशी अपेक्षा करणे पूर्णपणे चुकीचे ठरू शकते. त्यातील एकेक पायऱ्या चढत चढत पुढचा प्रवास करायचा असतो. देह आहे, देहबुद्धि आहे तोवर त्या देहाची निगा राखण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणे क्रमप्राप्त आहेच आहे. जोपर्यंत साधकाचे प्रारब्ध शिल्लक आहे, तोपर्यंत देहधारण आहे, जोपर्यंत देहधारण आहे, तोपर्यंत देहशुद्धी, आहार, निद्रा, स्नान, वस्त्रधारण हे त्याला करावे लागणार. त्यासाठी त्याला घरदार, अन्नवस्त्र, धनधान्य इत्यादीची आवश्यकता राहणारच, म्हणजे माणसाला समाजात राहावे लागले की कांही प्राथमिक वस्तूची गरज ही राहणार. ती पूर्ण करण्यासाठी त्याला उद्योग, व्यवसाय काही तरी करावाच लागणार. अनेक भक्त हे असा आपला लौकिक व्यवहार सांभाळून भक्तीत रंगलेले होते असे दिसून येईल. श्री गोरोबा कुंभार, सावतामाळी, सेना न्हावी इत्यादी संतांनी अंतःकरणात अनन्य भक्तीचा उदय झाल्यानंतरही लौकिक व्यवहार सांभाळलेला दिसतो.
भक्ती करणे म्हणजे कामधंदा सोडून काही तरी लोकापेक्षा वेगळा, विचित्र किंवा विक्षिप्त आचार करणे नव्हे! संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
“मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे ।अलौकिक नोहावे । लोकाप्रती ।”
भगवंत म्हणतात कि मी स्वतः पूर्णकाम असूनही प्राणीमात्र माझ्याकडे बघून चालतात म्हणून मी सकाम पुरुषाप्रमाणे कर्माचरण करतो. भगवंत अर्जुनास उपदेश करतात की लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे, लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये.
श्रीज्ञानेश्वर माउली हे स्वतः जीवनमुक्त ज्ञानी पुरुष असूनही त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा प्रपंच का मांडला याचे उत्तर त्यांच्या या वरील उपदेशात दिसते.
संत तुकाराम महाराज इथे थोडे अधिक रोकडे सांगतात. पुढील अभंगात ते म्हणतात
“नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥२॥
नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥३॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥”*
साधकाने आपल्या देहाचा, आपल्या आयुष्यात येणाऱ्या, आलेल्या लोकांचा आणि जीवनात घडणाऱ्या घटनांचा, तसेच झालेल्या लाभ हानीचा उपयोग, विविध कौशल्ये वापरून आपल्या भगवंत प्राप्तीच्या ध्येयासाठी करून घ्यावा असे नारद महाराज सांगत असावेत.
श्रोता वक्ता | श्रीराम समर्थ ||
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. १३
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






