श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
आत्मरत्यविरोधेनेति शांडिल्यः ॥ १८ ॥
अर्थ : आत्मस्वरूपाविषयी प्रेमभाव निर्माण होऊन त्याला विरोध न होता उलट त्याचे पोषणच होऊन उत्तरोत्तर प्रेम वाढणे हेच भक्तीचे मुख्य लक्षण आहे असे शांडिल्य ऋषी सांगतात.
विवेचन : महर्षी व्यास व गर्ग यांनी केलेले भक्तिलक्षण सांगून श्रीनारद आता शांडिल्याचे भक्तिलक्षण सांगतात. शांडिल्य ऋषी महान आहेत. त्यांनी लिहिलेली भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनी प्रत्येक तत्त्ववेत्त्याची मते विचारात घेतात आणि त्यांचा उचित सन्मान करतात असे आपल्या लक्षात येईल.
सामान्य मनुष्य हा सामान्यपणे आपल्या देहाला खरे मानत असतो. देहाचे सुख आणि देहाचे दुःख त्याला खरे वाटते. त्यामुळे तो देहाच्या सुखदुःखात गुरफटलेला असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन शांडिल्य ऋषी सांगतात की देहाला सत्य न मानता, देहाच्या अंतर्यामी असलेल्या आत्म्याला खरे मानून (अर्थात तोच सत्य आहे) त्याच्यावर प्रेम करावे, त्याच्या ठिकाणी रत व्हावे असे सांगतात.
आत्मा निर्गुण आहे, तो आपल्याला दिसत नाही त्यामुळे तो आहे असे गृहीत धरूनच त्यावर प्रेम करावे लागते. पण सामान्य मनुष्य तसे करू शकतोच असे नाही. सामान्य मनुष्याला दृष्ट्यातले प्रतीक लागते.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान ।
गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥
लागला उशीर पतितपावना ।
विसरोनि वचना गेलासि या ॥२॥
जाळोनि संसार बैसलों अंगणीं ।
तुझे नाहीं मनीं मानसीं हें ॥३॥
तुका म्हणे नको रागेजु विठ्ठला ।
उठीं देई मला भेटी आतां ॥४॥
(संदर्भ: अभंग २४८, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
तुकाराम महाराजांसारखे संत या गोष्टी स्वतःसाठी लिहित नसावेत, तर ते आपल्यासारख्या सामान्य मनुष्यांसाठी लिहिलेले असावे.
एक कथा पाहू. एकदा जनक राजा आपल्या महालात झोपले होते. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नांत त्यांनी एक युद्ध केले. त्यात त्यांची हार झाली. शत्रू राजाने त्यांना पकडले आणि आता त्याचा शीरच्छेद करणार अशी वेळ आली. कधीही युद्ध न हरलेल्या जनक राजाला ते फार मानहानीकारक वाटले, त्याला भीती वाटली, दरदरून घाम फुटला…. तितक्यात काहीतरी आवाज आला आणि त्यांचे स्वप्न भंगल….
जाग आल्यावर पाहतात तर ते शयन गृहात होते…..
त्यांना प्रश्न पडला की स्वप्न खरे की मी मंचकावर शयन करीत आहे ते खरे?
दुसऱ्या दिवशी त्यांनी राजसभेत प्रश्न विचारला
अनेक विद्वान तिथे होते, त्यांनी आपापल्या परीनं उत्तरे दिली. पण राजाचे समाधान होईना
शेवटी तिथे अष्टावक्र ऋषी आले. ते म्हणाले की राजा तू मंचकावर झोपला होतास ते सुद्धा खरे नाही आणि स्वप्नांत युद्ध हरला ते सुद्धा खरे नाही
राजा म्हणाला, मग नक्की खरे काय आहे?
अष्टावक्र मुनी म्हणाले की या दोन्ही घटना घडत असताना त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहणारा जो तू (मी….! ) आहेस, तोच खरा आहे…….!
जो आपल्या प्रत्येक गोष्टीला साक्षीत्वाने पाहत असतो. तोच आत्मा आहे. त्याच्यावर प्रेम करणे, त्याच्या ठिकाणी रत होणे म्हणजे भक्ति असे शांडिल्य मुनी आपल्याला सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. १८
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







