श्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेतील त्यांचा काव्यसंग्रह ‘गीतांजली’ १९१० साली प्रकाशित केला. या संग्रहात १५० हून अधिक कविता आहेत. या संग्रहातील ५३ व त्यांच्या ‘नैवेद्य’, ‘खेया’ अशा पूर्वप्रकाशित पुस्तकातून तसेच नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या पन्नास अशा एकूण निवडक १०३ कवितांचे स्वत: रविंद्रनाथांनी इंग्रजीत भाषांतर करून ‘गीतांजली’ ‘song offerings’ हे पुस्तक सन १९१२ मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकाला प्रसिद्ध इंग्रजी कवी W B Yeats यांची प्रस्तावना लाभली आहे. याच इंग्रजी काव्यसंग्रहाला सन १९१३ मधे नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
——————–
गीत : १०
Here is thy footstool and there rest thy feet where live the poorest, and lowliest, and lost.
When I try to bow to thee, my obeisance cannot reach down to the depth where thy feet rest among the poorest, and lowliest, and lost.
Pride can never approach to where thou walkest in the clothes of the humble among the poorest, and lowliest, and lost.
My heart can never find it’s way to where thou keepest company with the companionless among the poorest, the lowliest, and the lost.
————–
भावानुवाद : गीत १०
*
तू असशी तव भक्तांजवळी
जे असती तव पायांजवळी।
*
हाकेस त्यांच्या देशी उत्तर
मज भासे तव दर्शन दुस्तर।
वाकुनि करतो तुजला नमना
पाहू न शकतो तुझिया चरणा।
चरणांपाशी असती जमले
दीन, दुबळे, भरकटलेले॥
*
शाल पांघरून विनम्रतेची
सेवा करिसी त्या सर्वांची।
अहंकारी मी करित वल्गना
अधीर तरीही तुला भेटण्या।
तुझिया पाशी कसा येऊ रे
अडला नडला, शरण मी नच रे।
चरणांपाशी असती जमले
दीन, दुबळे, भरकटलेले॥
*
तुला भेटण्या आतुर अंतर
मार्ग शोधितो इथे निरंतर।
कसा मी येऊ जिथे तू असशी
शरणागतांसि मार्ग दाविसी।
उन्मत्ताला मार्ग न मिळतो
तुझियापाशी येऊ न शकतो।
चरणांपाशी असती जमले
दीन, दुबळे, भरकटलेले॥
*
षड्रिपूंचा त्याग करुनि
जावे शरण तयालागुनि।
अशाच भक्ता आश्रय देतो
त्यांच्यासाठी जन्मा येतो।
चरणांपाशी असेच जमती
दीन, दुबळे जे अहं त्यागती॥
*
भावानुवाद: © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
———
गीत : ११
Leave this chanting and singing and telling of beads! Whom dost thou worship in this lonely dark corner of a temple with doors all shut? Open thine eyes and see thy God is not before thee!
He is there where the tiller is tilling the hard ground and where the path-maker is breaking stones. He is with them in sun and in shower, and his garment is covered with dust. Put off thy holy mantle and even like him come down on the dusty soil!
Deliverance? Where is this deliverance to be found? Our master himself has joyfully taken upon him the bonds of creation; he is bound with us all for ever.
Come out of thy meditations and leave aside thy flowers and incense!
What harm is there if thy clothes become tattered and stained? Meet him and stand by him in toil and in sweat of thy brow.
——————
भावानुवाद: गीत ११
*
अंधाऱ्या गाभार्यात
देवळाच्या कोपर्यात
मंत्रपठण करीत
भक्तीगीते गात
जपमाळ ओढत
त्याची वाट बघत
उपासना करतोस का?
वेडा आहेस का?
उघड डोळे, बघ नीट
नाही विठ्ठल, नाही वीट
*
तो तर आहे तिथं
शेतकरी शेतात जिथं
मशागत करतोय,
रस्त्यात मजूर जिथं
दगड फोडतोय
देव आहे फक्त तिथं
भिजणाऱ्या पावसात
भाजणाऱ्या उन्हात
धुळीत, मातीत,
दगड धोंड्यात
*
शांतव नंदादीप
ये मातीच्या समीप
करिसी भक्ती
मागसी मुक्ती
बंधक जगती
देवही असती
निर्मिती, क्षती
करण्यासाठी
बंधन भक्तांप्रती
मोदे स्विकारती
*
नको प्रार्थना,
नको याचना,
नको फुले, नको धूप
नको पत्री, नको दीप
ये धुळीत तू ही,
मळोत वस्त्रे तुझी ही
त्याची सोबत कर
गरजूंना मदत कर
सुखदुःखाचा प्रहर
त्यांच्याच बरोबर
*
भावानुवाद: © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
———
गीत : १२
*
The time that my journey takes is long and the way of it is long.
I came out of the chariot of the first gleam of light, and pursued my voyage through the wildernesses of worlds leaving my track on many a star and planet.
It is the most distant course that comes nearest to thyself, and that training is the most intricate which leads to the utter simplicity of a tune.
The traveller has to knock at every alien door to come to his own, and one has to wander through all the outer worlds to reach the innermost shrine at the end.
My eyes strayed far and wide before I shut them and said “Here art thou! “
The question and the cry “Oh, where? ” melt into tears of a thousand streams and deluge the world with the flood of assurance “I am! “
————
भावानुवाद : गीत १२
*
हा मार्ग जो नेतो मला
तुझियापाशी, नंदनंदना
प्रवास तो अती दूरचा
संपता रस्ता संपेची ना॥
*
मी उषेच्या प्रथम किरणी
मार्गस्थ झालो, मधुसूदना
निर्मनुष्य, ओसाड प्रदेशी
लांघून जात तीनही भुवना॥
*
खडतर या अशा प्रवासी
तुजसाठी निघालो, जनार्दना
मार्गी जाता, ग्रहताऱ्यांवर
उमटत जाती पाऊलखुणा॥
*
वाट अनोखी अज्ञाताची
तुजकडे नेईल, मनमोहना
तुझीच शिकवण ध्यानी ठेवून
करीत जाईन मार्गक्रमणा॥
*
सूरतालाच्या गुंतागुंती
तूच शिकविसी, कमलनयना
शेवटी नंतर हाती येई
सुबोध, सरल ती स्वररचना॥
*
निजधामाचे द्वार शोधण्या
अनोळखी द्वारी, अजन्मा
तूच फिरविशी भुवनोभुवनी
मनमंदिरी तव अंती येण्या॥
*
भरकटलो मी अनेक वेळा
जाणवसी परी, कंसमर्दना
अंती माझ्या मिटल्या नयना
दिससी तू रे अंतश्चक्षुंना॥
*
कोठे अससी या प्रश्नाला
उत्तर देई अश्रूंचा पूर
हमी मिळतसे अस्तित्वाची
प्रतिध्वनित हो तुझेच उत्तर॥
*
– क्रमशः भाग चौथा
मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.
भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






