श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ३५
असे हो जया अंतरी भाव जैसा|
वसे हो तयार अंतरी देव तैसा |
अनन्यास रक्षीतसे चापपाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३५|
अर्थ : आपल्या मनात परमेश्वराबद्दलचा जसा भाव असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वसतो म्हणजे त्याचे अस्तित्व जाणवते. अनन्यभावाने परमेश्वराला जो शरण जातो त्याचे रक्षण हा धनुर्धारी राम नक्कीच करतो. आपल्या भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही.
(अनन्य – एकनिष्ठ, चापपाणी – हाती धनुष्य धारण केलेला /भगवंत.)
विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे आपल्याला सांगतात. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वर कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते सांगतात. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो. परंतु त्याच्याबद्दलची आपली जाणीव किती तीव्र आहे यावर आपल्याला त्याची होणारी अनुभूती ठरते. भगवंताविषयीची भावना जर आपल्या अंतःकरणात तीव्र असेल तर तो प्रकट होण्यास वेळ लागत नाही.
या श्लोकात ‘भाव ‘ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसा भाव तसा देव किंवा देव भावाचा भुकेला असे आपण म्हणतो. कोणी भक्त स्वतःला परमेश्वराचा दास म्हणून घेतात समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत. ही दास्यभक्ती. काही भक्त परमेश्वराला आपला पती समजून त्याची पत्नी भावाने आराधना करतात अशा प्रकारच्या भक्तीला मधुरा भक्ती असे म्हटले जाते. काही भक्त परमेश्वराला आपली आई मानून त्याची भक्ती करतात. ही वात्सल्य भक्ती. तर काही परमेश्वराला आपला मित्र किंवा सखा मानून त्याची भक्ती करतात. ही झाली सख्ख्य भक्ती. असे भक्तीचे म्हणजेच भावाचे विविध प्रकार आहेत. आपली भक्ती ज्या प्रकारची असेल तशा स्वरूपात परमेश्वर आपल्याला दर्शन देतो. त्या अनादी अनंत आणि निर्गुण निराकाराला कोणत्याही रूपात प्रकट होण्यासाठी अडचण नाही.
शेगावीचे महान संत श्री गजानन महाराज यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिले होते. कोणाला त्यांनी समर्थ रामदासांच्या रूपात दर्शन दिले तर कोणाला विठ्ठलाच्या रूपात. परमेश्वराने सुद्धा आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे विविध रूपात दर्शन दिले आहे. अर्जुनाला तर त्याने विश्वरूप दर्शन सुद्धा घडवले. अडचण परमेश्वराकडून नाही. अडचण आपल्याकडून असते. आपल्या मनामध्ये तेवढा समर्पण भाव नसतो.
परमेश्वर कोणाचे रक्षण करतो या प्रश्नाचे उत्तर समर्थ श्लोकातील तिसऱ्या ओळीत देतात. ते म्हणतात, ” अनन्यास रक्षीतसे चापपाणी. ” अनन्य म्हणजे कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही, आश्रय नाही अशा प्रकारची भावना ज्याच्या मनामध्ये असते तो अनन्य भक्त ! अशा भक्तांचे तो धनुर्धारी राम रक्षण करतो.
आपली भक्ती ही सकाम भक्ती असते. आपण देवाची भक्ती केली म्हणजे देवाने आपले रक्षण करावे, आपल्याला सुख, समाधान, यश आणि ऐश्वर्य प्रदान करावे अशी आपली इच्छा असते. अर्थात त्यात फार काही चुकीचे आहे अशातला भाग नाही. परमेश्वर आपल्या संकटात जर धावून आला नाही तर आपली त्याच्यावरील श्रद्धा डळमळीत होते. मी एवढे देवाचे करतो परंतु काही उपयोग होत नाही असे आपण म्हणतो. परंतु याला परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती म्हणता येणार नाही. मला इतर गोष्टी नाही मिळाल्यात तरी चालतील. मला फक्त परमेश्वर हवा आहे, त्याचे दर्शन हवे आहे अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तीव्रतेने निर्माण होईल तेव्हाच परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडू शकेल. श्रीकृष्णाचा भक्त सुदामा आणि त्याची पत्नी श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. त्यांच्यावर प्रपंचामध्ये अनेक संकटे आली, प्रचंड दारिद्र्य पाचवीला पुजले होते. मुलांना प्रसंगी उपाशी झोपावे लागत होते. परंतु परमेश्वरावरील त्यांची श्रद्धा कधीच डळमळीत झाली नाही. आपल्याला जे काही अन्न प्राप्त झाले असेल त्याच्यातीलच काही भाग बाजूला काढून ते परमेश्वराला अर्पण करत असत. आणि मगच स्वतः भोजन करीत. ही झाली अनन्यभक्ती. परमेश्वराने भलेही त्यांची परीक्षा पाहिली असेल परंतु अशा अनन्यभक्तांचे परमेश्वराने रक्षण केले आहे.
स्वसंवाद (नवीन) :
१) माझी भक्ती कोणत्या प्रकारची आहे – दास्य, सख्य, वात्सल्य की मधुरा ? माझा नैसर्गिक भाव कोणता हे मी ओळखले आहे का ?
२) “जसा भाव तसा देव. ” माझ्या मनात परमेश्वराविषयी खरोखर कोणता भाव आहे ? दृढ श्रद्धा की केवळ भीती ?
३) सुदाम्याने दारिद्र्यातही आधी परमेश्वराचा वाटा काढला. तसा माझ्या जीवनात मी परमेश्वराला आधी प्राधान्य देतो का ?
४) “अनन्य” म्हणजे एकच आधार. माझ्या संकटात परमेश्वर हाच माझा खरा आधार आहे असे मला मनापासून वाटते का ? (क्रमशः)
– – – – –
श्लोक क्र. ३६
सदा सर्वदा देव सन्निध आहे |
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे|
सुखानंद आनंद कैवल्यदानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३६|
अर्थ : परमेश्वर कायम आपल्याजवळच आहे. फक्त तो आपली परीक्षा आणि धैर्य पाहतो. सुख, आनंद आणि कैवल्य यांचा तो दाता आहे. असा हा परमेश्वर आपल्या भक्तांचा अभिमानी असून त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही.
(सन्निध – समीप/जवळ, अल्प धारिष्ट – परीक्षा/कसोटी, कैवल्य – मोक्ष.)
विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ परमेश्वर आपल्या कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते आपल्याला सांगतात. तर या श्लोकात हा परमेश्वर कोठे आहे, त्याचा वास कोठे आहे हे ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणजे जवळच आहे. व्यवहारामध्ये आपण सन्निध या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समी र असा घेतो परंतु अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. त्या परमेश्वराला शोधायला दूर कुठेही जावे लागत नाही. त्याचा वास आपल्या अंतर्यामीच असतो. आणि तिथे तो सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आणि आपण वेगळे नाहीच आहोत.
असे जर आहे तर मग आपल्याला त्याचे अस्तित्व का जाणवत नाही ? आपली देहबुद्धी एवढी प्रबळ असते की त्यामुळे हा देह म्हणजे मी नाही आणि आपल्या अंतरात्म्यात त्याचा वास आहे हे आपल्याला जाणवतच नाही. सकाळी उठल्यानंतर आपण ” कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्” हा श्लोक म्हणतो त्याचा अर्थ हाच आहे. आपल्या अंतर्यामी परमेश्वर वसतो आहे.
आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही परंतु साधकांना मात्र पदोपदी त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. आपण आपले मूळ स्वरूप विसरल्यामुळे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. परंतु तुकाराम महाराजांसारखे संत ईश्वर चिंतनातच रममाण झालेले असल्यामुळे त्यांना स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसते. परमेश्वर कायम आपल्याबरोबरच आहे याची जाणीव त्यांना होत असते. म्हणूनच ते म्हणतात, ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती |चालविशी हाती धरुनिया ||
परंतु परमेश्वराची अशी कृपा होण्याआधी तो आपली परीक्षा पाहतो. ही परीक्षा पाहण्यामागे आपल्या भक्ताला मानसिक दृष्ट्या खंबीर करावे, आपल्या कृपेसाठी पात्र करावे अशीच सध्या भगवंताची इच्छा असते. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. पण कधी कधी त्याचे धरलेले बोट सोडून देते. एखादेवेळी तो पडेल हे तिला माहिती असते. परंतु त्याला स्वतःला चालता यावे, तो स्वावलंबी व्हावा म्हणून ती हे करत असते. अनेक संतांनी सुद्धा आपल्या अनुयायांना अनुग्रह देण्यापूर्वी त्यांची परीक्षा पाहिली आहे. आपल्या कृपेसाठी आपला शिष्य पात्र आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच गुरु त्याच्यावर कृपा करतात. प्रत्यक्ष जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पण ज्याला पुढे जायचे आहे तो अशा प्रकारच्या परीक्षांना, संकटांना न डगमगता सामोरा जातो.
तसेच भगवंताच्या एकनिष्ठ भक्ताचे आहे. “देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो” अशी त्याची वृत्ती असते. खरा भक्त संकटप्रसंगी डगमगत नाही. परमेश्वरावरील त्याची श्रद्धा अविचल असते. परमेश्वराचा भक्त असलेल्या छोट्या प्रल्हादावर अनंत संकटे येतात. परंतु तरीदखील परमेश्वरावरील त्याची श्रद्धा ढळत नाही. मागील श्लोकात समर्थ आपल्याला जी अनन्यभक्ती सांगतात ती हीच !
अशी आपली त्याच्यावर संपूर्ण निष्ठा असली आणि त्याने घेतलेल्या परीक्षेत एकदा का आपण उत्तीर्ण झालो की मग त्याच्या कृपेचे जणू भांडारच खुले होते ! अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी भक्ताची अवस्था होते. सुख, समाधान, आनंद आणि कैवल्य म्हणजे मोक्षमार्गाचा दाता असलेला परमेश्वर आपल्याला या सर्व गोष्टी सहजच प्रदान करतो.
स्वसंवाद :
१) “परमेश्वर अंतर्यामी आहे” हे मी जाणतो पण माझ्या दैनंदिन जीवनात मला त्याची प्रत्यक्ष जाणीव होते का ?
२) आईने बोट सोडले तरी ती दूर नसते. माझ्या संकटकाळात परमेश्वराबद्दल अशी भावना माझी असते का ?
३) परमेश्वर परीक्षा पाहतो हे मान्य आहे. माझ्या आयुष्यातील समस्यांकडे मी त्या दृष्टीने पाहतो का ?
४) “अनंत हस्ते” देणारा भगवंत आहे. मग मी त्याच्याकडे क्षुल्लक गोष्टींचीच मागणी करत राहतो का ?
– क्रमशः श्लोक ३५ आणि ३६.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





