श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२५
☆ शेतकऱ्यांचे प्रश्न… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
वावरात या इतके कांदे पिकले होते
जागोजागी त्यांचे डोंगर रचले होते
*
उठाव नाही या कांद्याला काय करावे
कवडीच्या भावातच सारे विकले होते
*
भाग भांडवल सुद्धा वसूल झाले नाही
कास्तकार तर सारे येथे खचले होते
*
डोळ्यांचा हा पहा कालवा झाला त्याच्या
काळजात त्या सारे पाणी मुरले होते
*
अंधाराशी रोज लढाई करता करता
कोसळणारे तारे दिवसा दिसले होते
*
सटवाईने कायम केली त्याची थट्टा
त्याचमुळे का नशीब त्याचे रुसले होते
*
लग्न ठरेना म्हणून त्याने फास घेतला
शेतकऱ्यांचे प्रश्न कधी का सुटले होते
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






