श्री मनोहर जांबोटकर
वाचताना वेचलेले
☆ चांगला नवरा मिळत नाही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात ?
आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं – “लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो. ” हे वाक्य ऐकलं की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो – मग बॉयफ्रेंड कसे मिळतात?
कारण कॉलेजपासून ऑफिसपर्यंत, बसस्टॉपपासून सोशल मीडियापर्यंत, मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत फक्त मित्र हा शब्द स्पेशल फ्रेंड पर्यंत पोहोचतो. तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का? याची चौकशी करत नाही. पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो, तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात.
मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू-सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बॉयफ्रेंडसाठी मन चालतं आणि नवऱ्यासाठी गणित!
दुसरीकडे मुलांचंही काही वेगळं नसतं. प्रेमात असताना ते म्हणतात, “तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणीन. ” पण लग्नाची वेळ आली की प्रश्न बदलतात. घर किती मोठं आहे, नोकरी काय आहे, अपेक्षा काय आहेत, हे सगळं महत्त्वाचं वाटू लागतं. प्रेमात भावना असतात, पण लग्नात जबाबदाऱ्या असतात.
बॉयफ्रेंड निवडताना अनेकदा वर्तमान पाहिलं जातं, तर नवरा निवडताना भविष्य पाहिलं जातं. म्हणूनच प्रेमासाठी योग्य वाटणारी व्यक्ती आयुष्यभराच्या सहजीवनासाठी योग्य वाटेलच असं नाही.
आजची खरी समस्या ‘चांगला नवरा मिळत नाही’ ही नसून ‘परिपूर्ण नवरा शोधण्याचा अट्टाहास’ ही आहे. कारण परिपूर्ण माणूस या जगात कुठेच नाही. प्रत्येकामध्ये काही गुण असतात, काही उणिवा असतात. संसार हा गुणांच्या प्रदर्शनावर चालत नाही, तर उणिवांच्या स्वीकारावर चालतो.
कधीकधी जे लोक म्हणतात की चांगले मुलगे मिळत नाहीत, त्यांनी स्वतःलाही एक प्रश्न विचारायला हवा मी ज्या गुणांचा नवरा शोधते, ते गुण माझ्यात कितपत आहेत? आणि मुलांनीही स्वतःला विचारायला हवं मी ज्या मुलीची अपेक्षा करतो, तिच्या अपेक्षांना मी पात्र आहे का? कारण नातं हे खरेदी-विक्रीचा व्यवहार नसतो. तो दोन माणसांनी एकमेकांच्या सुख-दुःखात उभं राहण्याचा करार असतो.
आजच्या काळात एक विचित्र गोष्ट दिसते. बॉयफ्रेंड शोधताना आपण हसणारा चेहरा पाहतो, पण नवरा शोधताना बँक बॅलन्स पाहतो. प्रेमात स्वभावापेक्षा आकर्षण महत्त्वाचं वाटतं, तर लग्नात माणसापेक्षा त्याची परिस्थिती. मग नंतर तक्रार केली जाते की चांगले लोक मिळत नाहीत. खरं तर चांगले लोक आजही आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
ज्याच्याकडे महागडी गाडी नाही, पण मन मोठं आहे, तो अनेकदा दुर्लक्षित राहतो. ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, पण जबाबदारीची जाणीव आहे, त्याला संधी मिळत नाही. आणि मग वर्षानुवर्षे ‘योग्य व्यक्ती’ शोधण्याचा प्रवास सुरूच राहतो.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं. बॉयफ्रेंड मिळवणं सोपं असतं, कारण तिथे स्वप्नं विकली जातात. नवरा मिळवणं कठीण वाटतं, कारण तिथे आयुष्य जगायचं असतं. स्वप्नांमध्ये चुका चालतात, पण संसारात वास्तव स्वीकारावं लागतं. म्हणून चांगला नवरा शोधण्यापेक्षा चांगला माणूस ओळखायला शिका. कारण सुखी संसार चेहऱ्याने, पगाराने किंवा गाडीने टिकत नाही; तो विश्वास, स्वभाव, समजूतदारपणा आणि परस्पर आदराने टिकतो.
आणि म्हणूनच प्रश्न “चांगला नवरा कुठे मिळेल?” हा नसून, “चांगला माणूस ओळखण्याची आपली नजर किती चांगली आहे?” हा असायला हवा. हाच प्रश्न समजला, तर कदाचित अनेकांची नवरा शोधण्याची समस्या आपोआप सुटेल.
*
लेखक:अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈



