सौ. वंदना अशोक हुळबत्ते
विविधा
☆ मर्यादा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
मर्यादा हा शब्द एखाद्या गोष्टीची, घटनेची सीमा दर्शवतो. मर्यादा दोन प्रकारची असते. एक अदृश्य स्वरूपाची, दुसरी दृश्य स्वरूपाची.आकाश, पाणी, वायु, तेज, क्षतिज, अमर्यादीत असते ही मर्यादा अदृश्य स्वरूपाची. तर नदीला तीराची, घराला भिंतीची, गावाला वेशीची मर्यादा असते ही दृश्य स्वरूपाची मर्यादा असते.आपल्या आचरणातून आपले संस्कार दिसतात. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. त्यांची प्रत्येक गोष्ट एका मर्यादेत होती.त्यांच्या कृतीत भावने पेक्षा कर्तव्यश्रेष्ठ होते.म्हणून आज ही समाजात रामाचा आदर्श समोर ठेवला जातो.एखादी गोष्ट आपल्या आवाक्यात नसते तेव्हा आपण हे काम माझ्या मर्यादे पलिकडेचे आहे असे म्हणतो.व्यवहार करताना आपण आपल्या वागण्या बोलण्यात एक मर्यादा आखून घेतलेली असते. त्यानुसार आपण आपले आचरण ठेवतो आणि असे वागल्याने आपल्याला एक मानसिक समाधान मिळते.मर्यादा ही संकल्पना नेहमी संस्कार दर्शवणारी असते. पण जेव्हा याचे उल्लंघन होते तेव्हा बऱ्याच वेळा अनिष्ट प्रसंगांना सामोरे जावे लागते. मर्यादा ही संकल्पना बऱ्याच वेळा अनुशासन ही दर्शविते.कायदेशीर चौकटीत राहून काम करावे लागते जर चौकट मोडून काम केले तर कायद्याचे उल्लंघन होते समाजात अराजकता पसरण्याची शक्यता निर्माण होवू शकते.
अंथरूण बघून पाय पसरावे अशी मराठीत एक म्हण आहे.या म्हणीचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपण आपली मर्यादा ओळखावी आणि त्या मर्यादेतच आपले वर्तन करावे. बेडकी फुगली तर तिचा बैल होत नाही. ही म्हण ही याच अर्थानं आहे. माणसाने आपली कुवत न ओळखता दुसऱ्याची बरोबरी केली त्याचासारखं वागण्याचा प्रयत्न केला तर, यश तर येतच नाही. काही वेळेस जीव ही गमवावा लागतो. म्हणजेच काय तर आपण आपली शारीरिक, बौद्धिक, आर्थिक क्षमता ओळखावी. आपली मर्यादा ओळखून त्या प्रमाणात कार्य करावे म्हणजे यश हमखास येईल.
महिलांच्या बाबतीत मर्यादा हा शब्द जास्त संवेदनशील आहे. बालपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत कळत नकळत अनेक मर्यादांचे ओझे तिला सहन करावे लागते. काही वेळा या मर्यादेचा अतिरेकही होतो. महिलेला मर्यादा म्हणजे एक काटेरी कुंपण वाटते कारण त्यात तिचा विकास, तिची अभिव्यक्ती, तिचे स्वातंत्र्य, तिचे व्यक्तिमत्व गुरफटून जाते.
मर्यादा आणि बंधन हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. बंधन जाचक असते.पण मर्यादा स्त्रीने स्वतः ठरवून घ्यायची असते. एकदा का तिने मर्यादा ठरवून घेतली की ती घरादारात मुक्तपणे वावरू शकते.सासर माहेरच्या प्रतिष्ठेसाठी, मुला बाळांच्या भविष्यासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी, महिलेला नेहमीच स्वतःभोवती एक मर्यादा आखून घ्यावी लागते.
ही मर्यादा असणे म्हणजे तिचे पारतंत्र नव्हे. स्वातंत्र्याचा अर्थ लक्षात घेऊन आपल्या बुद्धीला जे पटेल तेच काम करावे. पण सर्व साधारण विचार करता. कुटुंबात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी, कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व उत्तम राहण्यासाठी, एक मर्यादा मनाशी असणं गरजेचं आहे. मर्यादा म्हणजे पारतंत्र नव्हे ही गोष्ट मनी ठरवणं गरजेचे आहे तरच कुटुंब व्यवस्था अबाधित राहील.
कोणत्याही विषयाला एक मर्यादा असते. मी जर मर्यादे पलीकडे लिहीत बसले तर तुम्ही वाचणार नाही. आता इथेच थांबते माझ्या लिहिण्याची मर्यादा लक्षात घेऊन.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




