श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ९ : काका (कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(‘या लेखमालेचे आतापर्यंत आठ भाग झाले आहेत. त्यात पहिली सुरुवात अर्थातच विश्वातील सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे आईपासून झाली. नंतर क्रमाक्रमाने बाबा, आजी, आजोबा, मामा, मावशी आणि आत्या या नात्यांचा विस्तार आपण पाहिला. हे सगळे नात्यांचे एकेक रेशमी पदर आहेत. ते उलगडण्याचा आणि त्यांची झळाळी दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. असाच एक समृद्ध पदर म्हणजे काका. त्यांच्याबद्दलच आज जाणून घेऊ या.)

‘काका’ म्हटलं की वडिलांसारखीच माया करणारी एक प्रेमळ व्यक्ती डोळ्यांसमोर येते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात अनेक माणसे असत. त्यात वडील, काका आदी मायेची माणसे एकत्र असत. एकत्र शेती करणे, व्यवसाय करणे, आई-वडिलांकडे लक्ष देणे या गोष्टी ते आपुलकीने करीत असत. कधी आवश्यकतेनुसार एखादा भाऊ नोकरीनिमित्त शहरात गेला, तर दुसरा भाऊ शेती किंवा व्यवसाय सांभाळत असे; पण त्यांच्या प्रेमात कधी अंतर पडत नव्हतं. अशा वेळी काकांचं हे नातं रक्ताच्या पलीकडे जाऊन प्रेम, कर्तव्य आणि माणुसकी यांचं सुंदर प्रतीक बनतं. अशी नाती कुटुंबाला समृद्ध बनवतात.

आमची गावाकडे थोडीशी शेती होती. माझे वडील त्यांची शहरातील नोकरी सोडून शेती करण्यासाठी गावाकडे आले आणि तेथेच स्थायिक झाले. माझे दोन्ही काका नोकरीनिमित्त शहरात होते. एक काका मोठे आणि दुसरे लहान; माझे वडील मधले. काका कधी कधी सुट्टी मिळाली की गावी येत असत. काका आले की आम्हाला कोण आनंद व्हायचा! मग काकांबरोबर दोन-चार दिवस मजा असायची. कधी सुट्टीत काकांकडे राहायलाही जायचो.

काकांच्या प्रेमाचे अनेक प्रसंग आजही आठवतात. त्यांनी शहरात राहूनही खेड्यात राहणाऱ्या आणि शेतीत राबणाऱ्या माझ्या वडिलांना वेळोवेळी मदत केली. कारण शेती थोडी असल्याने फार पैसा पदरात पडत नव्हता. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ! पीक चांगले आले तर बाजारात भाव पडलेले असायचे. अशा वेळी काका पैसे पाठवून मदतीचा हात देत. एकदा तर माझे वडील खूप आजारी झाले होते. आमचं गाव म्हणजे एक छोटं खेडं असल्याने वैद्यकीय उपचारांची सोय नव्हती. तेव्हा काका गावी येऊन वडिलांना आपल्या सोबत घेऊन गेले. त्यांना चांगल्या दवाखान्यात दाखल केले, त्यांची शुश्रूषा केली. असे अनेक प्रसंग आहेत. त्यामुळे काका म्हणजे मदतीचा हात, काका म्हणजे प्रेम या गोष्टी मनात पक्क्या झाल्या. पण काकांनी प्रेम लावले तसेच संस्कारही केले, शिस्तही लावली. त्यांच्याजवळून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणून नात्यांच्या महावस्त्रातील अतिशय महत्त्वाचा असा हा पदर आहे. माझ्या वडिलांनी देखील त्यांच्या पुतण्यांवर जीवापाड प्रेम केलं. त्यांच्या आजारपणात त्यांच्या जवळ राहून सुश्रुषा केली.

मला दोन भाऊ, दोघेही माझ्यापेक्षा लहान. त्यामुळे माझ्या मुलांना लहानपणापासून त्यांचे प्रेम लाभले. त्यामुळे काका म्हणजे त्यांची अतिशय जिव्हाळ्याची व्यक्ती. घरात कुठलेही कार्य असो, काका सगळ्या प्रसंगात खंबीरपणे उभे राहायचे. एखादी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की मी निश्चिंत असायचो. सायकल शिकवणारे, पहिल्यांदा पोहायला घेऊन जाणारे, जत्रेत फिरवणारे किंवा छोटीशी चूकही समजावून सांगणारे काका माझ्या मुलांच्या बालपणाच्या आठवणींचं केंद्र आहेत. माझी मुलगी जेव्हा जीवावरच्या आजारातून उठली, तेव्हा या दोन्ही भावांच्या डोळ्यातील पाणी मी पाहिले आहे. तिच्या लग्नात माझ्यासारखेच पाणी या दोघांच्या डोळ्यांत तिला सासरी पाठवताना होते. अशा वेळी नात्याची खोली, उबदारपणा आणि महत्त्व जाणवते.

अनेक भारतीय कुटुंबांत काकाला वडिलांप्रमाणेच आदराचे स्थान दिले जाते. काका हे केवळ नातं नसतं, तर ती कुटुंबाची एक भक्कम ढाल असते. दुर्दैवाने ऐनवेळी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे मुलांचे वडील जग सोडून गेले, तर विस्कटलेल्या घराला सावरणारे आणि वडिलांची जागा घेऊन पुतण्या-पुतणीचा स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ करणारे अनेक काका आपण समाजात पाहिले आहेत. मुलांचे शिक्षण, त्यांचे संस्कार आणि त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत स्वतःचे सुख बाजूला ठेवून कर्तव्य निभावणारे काका हे ‘ पितृतुल्य ‘ असण्याचे खरेखुरे प्रमाण असतात.

आपल्या संस्कृतीत ‘काका’ हे संबोधन रक्ताच्या नात्यापलीकडेही आदराने दिलं गेलं आहे. समाजासाठी आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या थोर व्यक्तींना समाजाने प्रेमाने ‘काका’ किंवा ‘काकासाहेब’ म्हणून गौरवले आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा कुंभार यांना आपण आदराने ‘गोरोबा काका’ म्हणतो, तर संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण करून स्वदेशीचा पुरस्कार करणारे गणेश वासुदेव जोशी ‘सार्वजनिक काका’ म्हणून ओळखले जातात. थोर गांधीवादी विचारवंत व लेखक काका कालेलकर, स्वातंत्र्यलढ्यातील नेते व साहित्यिक काकासाहेब गाडगीळ, टिळकांचे विश्वासू सहकारी व झुंजार पत्रकार काकासाहेब खाडिलकर, तसेच बालकांवरील प्रेमापोटी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे ‘चाचा (काका) नेहरू’ म्हणूनच जनमानसात अमर झाले. अगदी आमच्या चाळीसगावमध्येही वैद्यकीय सेवेसोबतच शैक्षणिक कार्य करणारे, अगदी वाघ, सिंहासारख्या वन्य प्राण्यांवर जिवापाड प्रेम करत पुण्याच्या पेशवे पार्कला स्वतः पाळलेली ‘सोनाली सिंहीण’ देणारे डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनाही सर्वजण आदराने ‘काका’ म्हणूनच ओळखत असत.

इतिहासात राघोबादादांसारखी क्वचितच काही व्यक्तिमत्त्वे दिसतात ज्यांनी काकाच्या प्रेमळ नात्याला कलंक लावला आहे; पण सांस्कृतिक परंपरेत काका हे प्रेम, संरक्षण आणि कर्तव्याचं प्रतीकच आहे. आपल्या संस्कृतीत काका म्हणजे नेहमीच कुटुंबाचा आधारवड आणि समाजाचा मार्गदर्शक राहिला आहे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकत्र राहणं कमी झालं असलं, तरीही काका या नात्याबद्दलची आत्मीयता, जिव्हाळा आणि आदर तितकाच जिवंत आहे. नात्यांच्या या भरजरी महावस्त्रातील ‘काका’ नावाचा पदर कुटुंबाला सुरक्षिततेची ऊब, एकतेची ताकद आणि प्रेमाचा आधार देतो. हा पदर जेवढा जपला जाईल, तितकीच आपली नाती अधिक घट्ट, समृद्ध आणि सुंदर होत जातील.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted