श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “कब है छब्बीस जनवरी? कब?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण अनुक्रमे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी असतात. आणि या तारखा केवळ तारखा न राहता आपल्या राष्ट्रीय मानसिकतेच्या प्रतिक बनल्या आहेत.
पण यामुळेच कधी कधी ‘सव्वीस जानेवारी किती तारखेला आहे? ’ असा गंमतीदार प्रश्नही अनवधानाने विचारला जातो! त्याशिवाय कितवा प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य दिन हा प्रश्नही दरवर्षी उपस्थित होतोच! काही जणांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक (गणतंत्र) दिन यांमधील फरक लवकर सांगता येत नाही… असे पाहिले गेले आहे! ऑगस्ट महिन्यात बहुदा पाऊस असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम सव्वीस जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात आयोजित होतात. शालेय जीवनातील हे दोन राष्ट्रीय सण आपल्या चांगलेच लक्षात असतात. विशेषत: सुमारे ३० वर्षांपूर्वी घरोघरी इस्त्री नसण्याच्या काळात, किंवा कपड्यांना इस्त्री करायची आवश्यकता न वाटण्याच्या काळात गावातल्या इस्त्रीवाल्यांकडे शालेय गणवेश मोठ्या संख्येने इस्त्रीसाठी येत असत. ज्यांना हे शक्य नसे ते विद्यार्थी पाणी पिण्याच्या लोटीमध्ये/तांब्यामध्ये कोळशाचे निखारे घालून ते तापलेले भांडे इस्त्रीसारखे वापरत… आणि या प्रयत्नात काहींनी टेरीकॉटचे शर्टस जाळूनही ठेवलेले आहेत. प्रभातफेरी खरोखरीच प्रभातीच काढली जायची आणि त्यानंतर मिळणारा खरोखरीचा अल्प खाऊ हे सुद्धा एक आकर्षण असायचे. त्यावेळी सुट्टी आहे म्हणून मुलांना घेऊन बाहेर फिरायला जायचे म्हणून शाळेला दांडी मारण्याची परंपरा सुरु झालेली नव्हती. असो.
तर विषय असा आहे… एका शिक्षकांनी आपल्या मुलाचे नाव चक्क सव्वीस जानेवारी ठेवल्याचे वाचनात आले. झाले असे होते, की शिक्षक महोदय त्यांच्या शाळेच्या प्रजासत्ताक, उत्तरेत असल्याने गणतंत्र दिवस च्या कार्यक्रमात व्यस्त म्हणजे व्यग्र होते… (मराठीत व्यस्तचा अर्थ वेगळा आहे! ) तेवढ्यात त्यांच्या पत्नीने घरी पुत्ररत्न प्रसवले. ही बातमी गुरुजींच्या पर्यंत अत्यंत तातडीने पोहोचवण्यात आली. नावे ठेवण्याची पद्धत त्याहीवेळी होतीच. शिवाय आपल्या अपत्यांची नांवे इतरांच्या अपत्यांपेक्षा जरा हट के असावी असा हट्टही काही लोक बाळगीत. (श्रीमंती नांवे पूर्वी वर्तमानपत्रांच्या शेवटच्या, खेळांच्या पानांवर आढळून येत… विशेषत: टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग यांसारख्या खेळांतल्या मुला-मुलींची नांवे वेगळीच असत… मात्र बळेबळेच जुळवलेली नसत! )
तर गुरुजींनी त्याच वेळी तिथेच जाहीर केला… हमारा बेटा छब्बीस जनवरी के नाम से जाना जायेगा! आणि त्या बालकाचे नांव चक्क छब्बीस जनवरी असे नोंदवलेही गेले. या नावामुळे या बालकास आपली प्रजा आणि तिचे तंत्र यांमुळे बराच मनस्ताप भोगावा लागला, ही बात अलग! आपल्या या प्रजासत्ताक चिरंजीवाच्या नावाचे आधार कार्ड बनवून घेताना मात्र गुरुजींनी विशेष काळजी घेतली नाही. आधार कार्डची माहिती data enter करताना संबंधित ऑपरेटर त्याच्या ‘उत्तरी’य अंग्रेजीला जागला आहे… त्याच्यासाठी जानेवारी म्हणजे इंग्लिश लेटर्समध्ये Jawvaary…साधारण जवारी (ज्वारी) सारखी. निर्वाचन वाल्यांनी janvary हे स्पेलिंग बिनविरोध निवडून दिले आहे… AB फॉर्म बहुदा संपले असतील किंवा कुणी पळवले किंवा गिळून टाकले असतील! शिवाय बहुदा या गुरुजींचे कुलनाम दर्जी (कपडे शिवून देण्याचा व्यवसाय करणारे) असावे… आता हे इंग्रजीत असावे असे त्यांना वाटणे साहजिकच.. त्यामुळे आडनाव टेलर असे केले गेले असावे. एलिझाबेथ टेलर सुद्धा त्यांना माहीत असावी! फक्त तारीख ट्वेंटी सिक्स जरा अति झाले असते, म्हणून त्यांनी ते तसेच राहू दिले!
January या इंग्रजी शब्दाचा सर्वाधिक अचूक उच्चार हिंदीत आहे… जनवरी. आपण तो अधिक उंचीवर नेत जानेवारी असा निवांत लांबलेला केलेला आहे.
गेल्या वर्षात अशी नांवे प्रकाशात येताना दिसतात. कोरोना, रेल्वे, एक्स्प्रेस अशीही नावे त्या त्या बालकांच्या जन्मकाळानुसार, स्थळानुसार पाडली गेली असावीत. पण छब्बीस जनवरी हे नांव मात्र आहे भारी!
संबंधित व्यक्तीची त्याकाळी खूप चेष्टा (हिंदीत चेष्टा म्हणजे प्रयत्न) झाली. पण आता त्यांना त्याच नावाचा अभिमान वाटतो. असो. सर्वांना ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या belated शुभेच्छा! जय हिंद! जय भारत!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





