श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्तिसूत्रे ५०
स तरति स तरति स लोकान्स्तारयति ॥ ५० ॥
अर्थ : जो या भवसागरातून(आपण माया नदी असेही म्हणू शकतो) तरून जातो, तो आपल्या सोबत इतरांना ही तारतो.
विवेचन : सेहेचाळिसाव्या सूत्रात आरंभी ‘कस्तरति माया’ मायेतून कोण तरून जातो असा प्रश्न उपस्थित करून एकोणपन्नासाव्या सूत्रापर्यंत माया तरून जाणार्या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. “जो संगत्याग करतो, महानुभवांची सेवा करतो, निर्मम होतो, एकांतवासाचा आश्रय करतो, लोकबंधाचे उन्मूलन करतो, निस्त्रैगुण्य होतो, योगक्षेमाचाही त्याग करतो, तसेच कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचाही त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, जास्त काय वेदांचाही त्याग करतो, तो या दैवी दुरत्यया गुणमयी मायेतून तरून जातो हे निश्चयपूर्वक द्विरुक्तीने या सूत्रात सांगतात. मायातारण म्हणजेच मोक्ष, उद्धार, कैवल्य इत्यादी होय हे मागील सूत्रात सांगितलेच आहे.
आसक्तीचा त्याग, सत्पुरुषांची सेवा, ममत्त्वाचा त्याग, एकांत सेवन, लौकिक गोष्टीचा त्याग, त्रिगुणातीत होणे, योगक्षेमाचा त्याग, कर्मफळाचा त्याग, कर्म संन्यास, द्वंद्वाच्या पलिकडे जाणे, तसेच वेदांचा साक्षेपाने अभ्यास
करून ज्याला भगवंता विषयी निरतिशय प्रेम प्राप्त होते, तो साधक स्वतः या मायनदीतून तरून जातोच, तसेच स्वतः सोबत अनेकांचे कल्याण करतो, त्यांनाही तारुन नेतो असे नारद महर्षी आपल्याला सांगतात.
भक्त स्वतः भक्ती करतात व लोकाना भगवद्भक्तीचे, भगवन्नामाचे महात्म्य अट्टाहासाने पटवून अनेकांना या भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करतात. श्री देवर्षी नारदाचे सर्व जीवन अनंत जीवांना मायानदीतून तारून नेण्यातच गेले नाही काय? ‘यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कवणाची ॥’ हे तुकाराममहाराजांचे उद्गारही लोकतरणच दर्शवितात. ते लोकांना का तारून नेतात? याचे उत्तर भक्ताच्या अंतःकरणातील करुणावृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. *”बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि॥’* हे उद्गार याचीच साक्ष देतात. त्याच्या अवतारकार्याचे प्रयोजनच हे सांगितले जाते. ‘अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जडजीव ॥’ चंदन हा जसा समीपवर्ती वृक्षांना आपला सुगंध प्रदान करतो त्यामुळे त्या सर्व वृक्षांचेही महत्त्व वाढते, त्याचा उद्धार होतो त्याप्रमाणेच भक्तिमान पुरुष हा अनेक लोकांचा उद्धार करतो. गंगा आपल्या सामर्थ्याने ओहोळास पावन करते, परिस आपल्या सामर्थ्याने लोहास सुवर्ण बनवितो, कस्तुरी आपल्या गुणाने मातीस मुल्यवान बनविते त्याप्रमाणे हा भक्तिमान पुरुष आपल्या सामर्थ्याने अनेकाना या मायानदीतून तारून नेतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥ आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥ आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥ शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥”
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
नारद भक्तिसूत्र ५१
अनिर्वचनीयम् प्रेमस्वरूपम्
अर्थ: प्रेमाच्या स्वरूपाचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे.
विवेचन: भक्तीची व्याख्या करताना ती परम प्रेम रुपा आहे असे आधी सांगितले आहे. त्यानंतर ती अमृत स्वरूपा आहे असे सांगितले आहे. रूप आणि स्वरूप यात फरक आहे. रूपात वस्तूचा आकार, रंग, बाजनझ आवरण आदी बाह्य गुणधर्माचा समावेश होतो. स्वरूप वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे लक्षण सांगते. नट वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळा दिसतो पण प्रत्यक्षात मात्र त्याचा विशिष्ट असलेला स्थायीभाव जे त्याचे स्वरूप असते ते मात्र वेगळे असते.
प्रेम हा शब्द प्री या धातूपासून तयार होतो. संतोष पावणे, तृप्त होणे. प्रेम हा मनाचा असा अनुभव अथवा अवस्था आहे की ज्यामुळे मनुष्य समाधानी होत असतो.
प्रेम फक्त अनुभवता येते. जशी हवा दाखवता येत नाही, आकाशाची उंची मोजता येत नाही तसे प्रेम मोजून दाखवता येत नाही. प्रेम असते तरी नसते. असे कोणी म्हणू शकत नाही की मी अमक्या वर पाच रुपयांचे प्रेम करतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकदा मनुष्य नवनवीन क्लुप्त्या शोधून काढेल. चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे चंद्र सूर्य आणून देतो अशा थापा मारू शकेल. अर्थात हे सारे वर्णन असेल किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेली कृति असू शकेल…! याला फारतर प्रेमाचा आविष्कार म्हणता येईल…
पण प्रेम म्हणता येईल का? तर नाही…
प्रेम हे अदृष्ट, अदृष्य असल्याने ते पाहता येत नाही. ज्याला अशा प्रेमाचा लाभ होतो, अनुभूति मिळते, तो एका विलक्षण आनंदात असतो. त्या आनंदाचा तो आस्वाद घेऊ शकतो, पण सर्वार्थाने त्याचे वर्णन करू शकत नाही..
संत तुकाराम महाराज प्रेमाबद्दल म्हणतात,
“प्रेम नये सांगता बोलता दाविता। अनुभव चित्ता चित्त जाणे ।।”
(अभंग क्रमांक २७२९, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
महाराज म्हणतात, प्रेम ही काही प्रदर्शन करायची भावना नाही. प्रेम ही मनापासून ते मनापर्यंत पोहचणे आवश्यक असते. हल्लीच्या काळात खरे प्रेम मिळणे तसे खुप अवघड आहे. कारण प्रेम हा काय प्रकार आहे. ही भावना काय आहे. हे किती जनांना माहीत आहे. हाच खुप मोठा प्रश्न आहे असे मला वाटते. कारण सद्यपरिस्थितीत आकर्षणाला व वासनेलाच प्रेम म्हटले जाते.
आपण इथे भगवंतावर अकारण केल्या जाणाऱ्या प्रेमाबद्दल चर्चा करीत आहोत. पण समाजाची, समाजातील सद्यस्थिती लक्षात यावी म्हणून त्याचा वरती उल्लेख आला आहे.
प्रेम म्हणजे देव
प्रेम म्हणजे भक्ती,
प्रेम म्हणजे साधना
प्रेम म्हणजे शक्ति।।
प्रेम, त्यातून मिळणारा आनंद याचे अचूक वर्णन करणे अशक्य आहे, पण सर्व संतांना सामान्य मनुष्याबद्दल कळवळा असल्याने ते या प्रेमाचे वर्णन करतात, अर्थात ते सुद्धा चपखल वर्णन करू शकत नाहीत असे नारद महाराज आपल्याला सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
नारद भक्तिसूत्र ५२
मूकास्वादनवत्
अर्थ : प्रेमाचा अनुभव हा मुक्या माणसाने घेतलेल्या रसास्वादाप्रमाणे असतों. (… त्यामुळे त्याला तो शब्दाने सांगता येत नाही.)
विवेचन : मुका मनुष्य बोलू शकत नाही. त्याला झालेल्या, होत असलेल्या वेदना तो सांगू शकत नाही. इथे नारद मुनी आपल्याला मूक्याचे उदाहरण देऊन साधक अनुभूतीच्या विशिष्ट टप्प्यावर मौन होऊन जातो. बाह्यांगावरून तो मूक झाला, अबोल झाला असे आपण म्हणू शकतो. परंतु त्या पातळीवर पोचलेल्या साधकाला जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे भगवतांची लिला आहे, याची अनुभूती आलेली असते. त्याच्या आयुष्यात तसेच त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याला भगवंताचे अस्तित्व जाणवत असते. सर्व जाणल्यावर बोलायचे काही शिल्लक रहात नाही.
एक छान वाक्य आहे.
“वेदना जास्त बोलते आणि सुख कमी बोलते. “
भक्तिमार्गात या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर साधक मौन न झाला तर नवल…! साखर दुधात पूर्णपणे मिसळून गेली की त्यातून स्वतः साखरेला तिचे वेगळेपण दाखवता येत नाही आणि आपण ते वेगळे करून पाहू शकत नाही.
समर्थ दासबोधात याचे वर्णन करतात…
“मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥”
(दास. ०६. १०. ०२)
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
नारद भक्तिसूत्र ५३
“प्रकाशते क्वापि पात्रे”
अर्थ: त्या परम प्रेमाचा प्रकाश क्वचितच, कधीतरी एखाद्या अधिकारी व्यक्तीत पाहायला मिळतो.
विवेचन : भगवंतावरील प्रेम हेच खरे प्रेम आहे, असे सर्व संत सांगतात. पण हे प्रेम वेगळे काढून दाखवता येत नाही, त्याची फक्त अनुभूती घेता येते. ज्याप्रमाणे नदी सागराला जाऊन मिळण्यासाठी धडपड करीत असते. ती सागराला जाऊन मिळाली की नदीचे अस्तित्व संपुष्टात येते. नदी पुन्हा बाहेर सांगू शकत नाही की मी नदी आहे. तसे खरा ज्ञानी मनुष्य कधीही सांगत फिरत नाही की मी ज्ञानी आहे. तर, त्याच्या चित्तात प्रकट झालेला ज्ञानाचा प्रकाश आपसूक सर्वदूर पसरतो. साखर सांडली की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही, त्या आपसूक येत असतात.
संतांचे अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्याच्याकडे अकारण शांतता लाभते, ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाही, तरी त्याच्याकडे पुन्हा जावेसे वाटते, अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ज्याच्याकडे गेल्यावर परत येऊ नये असे वाटते, (अर्थात माहेरी गेल्यासारखे वाटते) त्याला संत अर्थात ज्ञानी म्हणता येईल.
एक व्यवहारातील उदाहरण पाहू. अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देत असतात, पण त्यातील फार कमी लोक त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात.
खरंतर जीव हा मुळात ज्ञानी आहे, पण त्याच्यावर असलेला मायेचा पडदा ज्याला काढता येतो, तो ज्ञानी होतो. वाचायला /लिहायला एकदम सोपे आहे, पण ही माया जाणणे फार अवघड.
“लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी|
झटणाऱ्यात एखादा तत्त्वतां जाणतो मज||”
(गीताई ०७. ०३)
एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो, अर्थात प्रेम व्यक्त करतो तेव्हा त्या व्यक्तीला जे आवडते ते करतो. त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी त्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने बनवलेल्या, आणलेल्या, भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा आदर करतो, त्यांना अत्यंतिक प्रेमाने सांभाळतो. याच अनुषंगाने जेव्हा साधक भगवंतावर प्रेम करू लागतो, त्याचवेळी त्याने भगवंताने निर्माण केलेल्या चराचर सृष्टीवर प्रेम करणे अपेक्षित आहे, नव्हे अनिवार्य आहे. असे प्रेम करणारा मनुष्य विरळाच असतो. पण त्याच्या या निःस्वार्थ प्रेमाचा प्रकाश पडल्या शिवाय रहात नाही.
साधकाने साधना करीत रहावी, दयासिंधु आसलेल्या सद्गुरूंना त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. अर्थात त्याचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. पुढील सूत्रात आपण परमप्रेम कसे असते, ते शब्दाने सांगण्याचा प्रयत्न नारद महर्षींनी केला आहे त्याचा अभ्यास आपण करू.
जय जय रघुवीर समर्थ!!
नारद महाराज की जय!!!
– भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





