श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “जाऊ देवाचिया गावा! शेगाव!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
रात्रीचे साडेदहा वाजलेत. आनंदविहार भक्तनिवास. परिसरातील झाडांची पानगळ सतत सुरूच असते. या पानगळीला रात्रीही आराम नसतो. इथं पानं गळून खाली पडण्याची जणू वाटच पाहिली जाते… आणि ती उचलून घेतली जातात!
कचरा साठू द्यायचा आणि मग तो उचलायचा अशी इथली रीत नाही! आज दुपारी मंदिरातल्या ओसरीवर बसलेल्या मुलीने थोडंसं पाणी सांडवलं… ज्यांची त्या ठिकाणी duty नव्हती असे एक माऊली त्या जागी त्यांच्या कामासाठी आले तेंव्हा त्यांनी ते पाणी पाहिलं आणि केवळ एकाच मिनिटात ते पाणी पुसून घेण्याची व्यवस्था केली गेली.
मंदिर प्रदक्षिणा मार्गावर फोटो काढण्याची परवानगी नाही. पण ही सूचना तोंडी न देता तसा लाकडी फलक फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या समोर धरला जातो. आणि फोटो काढण्यासाठी नेमून दिलेली जागाही दाखवली जाते.
या नियमातून पोलिसांनाही सूट नाही!
विदर्भाची भाषाही त्यात तशी मृदु आणि मावळ. त्यात ‘ माऊली ‘ हे संबोधन तर अतिशय समर्पक. त्यामुळे कुणाला ओरडण्याचा, रागावण्याचा संबंध फारसा येत नाही. ज्या लोकांना बुद्धीच्या कानांनी कमी ऐकू येते, अशांच्या कानांवर सुरक्षा रक्षक गणवेशधारी लोकांचे शब्द मात्र जातील, अशी व्यवस्था आहे.
श्री गजानन महाराज संस्थान हे स्वयंपूर्ण, स्वयंशिस्त आणि स्वयंस्फूर्त संघटन असल्याने स्वयंसेवक हा मुख्य आधार आहे. आसपासच्या तीनशे पेक्षा जास्त गावांतील हजारो तरुण या सेवाकार्यात कालबध्द सेवा करण्यास रुजू होत असतात. आणखी शंभर गांवे प्रतीक्षेत आहेत, असे समजते!
ही सेवेकऱ्यांची नवी पिढी सुशिक्षित आणि संगणक साक्षर आहे.
इथला प्रत्येक घटक भक्तांच्या संभाव्य अडचणींचा विचार करून सातत्याने सुधारणा घडवत राहतो. मंदिरात जायचे म्हणजे चपलांची काळजी सोबत नेणे, असा प्रकार इथे नाही. बूट घालायचे म्हणजे खाली बसणे आले… यासाठी आरामदायी बाक, खुर्च्या आहेत. पूर्वी चप्पल स्टँड कप्प्याचे बिल्ले दिले जात. आता मोबाईलमध्ये फोटो काढून घ्यायला सांगतात! फोटो दाखवायचा आणि चपला ताब्यात! फक्त इथं समोर म्हणजे पुढे असा अर्थ घ्यावा लागतो. माऊली, चला समोर.. म्हणजे तिथून पुढे सरकावे… थांबून राहू नये. समाधी दर्शन एकाच वेळी किमान शंभर लोकांना घडेल अशी पायऱ्यांची व्यवस्था आहे. समाधी जवळ पोहोचेपर्यंत भाविक मूर्ती पाहू शकतात… त्यात समाधान लाभते. समाधीपासून डाव्या आणि उजव्याही बाजूने जाता येते.
जेवणापूर्वी लोक हात धुणार, नळ पूर्ण सोडणार आणि सत्तर टक्के पाणी वाया घालवणार…! इथे एक सारखी नियंत्रित धार सोडणारे अनेक नळ एका रांगेत, तेही भोजन गृहात प्रवेश करण्याच्या अगदी जवळ लावले गेलेत. ते पाणी सुद्धा वाया जाऊ दिले जात नाही.
दर्शन रांगेत उभे असताना कुणाला स्वच्छतागृहात जायचे असेल तर रांग सोडून जाणे आणि पुन्हा रांगेत येणे या प्रक्रियेत लोकांचा राग, गैरसमज ठरलेला असतो. पण इथे रीतसर स्वच्छतागृह पास घेऊन जाता येते आणि अधिकृतरित्या रांगेत परतता येते. रांगेत ठेवून ताटकळत असलेल्या लोकांसाठी चहा आणि स्वच्छ पाण्याची सोय आहेच. शिवाय तान्ह्या बाळांची आणि त्यांच्या मातांची अत्यंत उत्तम व्यवस्था प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे.
मुख्य मंदिरात प्रसाद व्यवस्था दिवसभर ठरलेल्या वेळी विनामूल्य असते. भक्त निवासात सशुल्क आहे. पण रात्री उशिरा पोहोचणाऱ्या भाविकांना हाच भोजन प्रसाद विनामूल्य देण्याची व्यवस्था आहे!
भक्त निवास ते मंदिर ते रेल्वे स्टेशन अशी विनामूल्य आणि सुरक्षित बस सेवा आहे. भक्तनिवास प्रवेशद्वार ते भक्तनिवास इथपर्यंत साहित्य, माणसे नेण्यासाठी चाकांच्या खुर्च्या, ढकल गाड्या आहेत, लहान मुलांसाठी आच्छादित ढकल गाडी आहे! निवास व्यवस्था ऑनलाईन नाही. आगाऊ आरक्षण नाही. प्रथम येईल त्यास प्राधान्य अशा रीतीने खोल्या उपलब्ध करुन दिल्या जातात. निवास व्यवस्था देणगी स्वरूपात सशुल्क आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारात दर्शनास अंदाजे किती वेळ लागू शकेल याचा इलेक्ट्रॉनिक फलक आहे. त्यातही मुख दर्शनाची सोय आहे.
देणगी द्यायची असल्यास रोख आणि card swipe करून देता येते. UPI scanner उपलब्ध नाही. मात्र online पद्धतीने घरूनही देणगी पाठवता येते.
देणगी रकमेनुसार भक्तांना भेटवस्तू, प्रसाद दिला जातो. पाच हजार रुपयांच्या देणगीदारास उत्तम दर्जाचा शर्ट पॅन्ट पीस देण्याची पद्धत सुरू आहे! श्री गजानन महाराज प्रतिमा सुद्धा आहेच. पोथी आणि इतर साहित्य सुबक, सुलभ आणि अत्यल्प शुल्कात मिळते!
VIP दर्शन पद्धती नाही. अगदी नाईलाज म्हणून माननीय राष्ट्रपती महोदया यांच्या दौऱ्या दरम्यान, सुरक्षिततेचा अत्यावश्यक उपाय म्हणून अगदी अल्प काळ इतर भाविकांसाठी दर्शन स्थगित ठेवले जाईल हे जाहीर करताना संस्थान दिलगिरी व्यक्त करण्यास विसरलेले नाही!
थोडक्यात, श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र हे तीर्थक्षेत्र सतत भेट द्यावे असेच आणि इतरांना आदर्शवत आहे!
जय गजानन.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






