श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ग्रंथराज श्रीमद् दासबोध : महात्म्य निरूपण ☆ श्री दिवाकर बुरसे

आयुर्वेद रोगनिवारण नव्हे तर रोग होऊ नयेत यासाठी मार्गदर्शन करणारी उपचारपद्धती आहे. तसाच श्रीमद् दासबोध सुद्धा अशीच _सकारात्मक जीवनदृष्टी देणारा अलौकिक ग्रंथ_ आहे. आपत्ती आल्यानंतर उपाय सांगण्याऐवजी, विवेक, चातुर्य व सजगतेने त्या टाळण्यावर समर्थ रामदासांचा भर आहे. दासबोध भक्तिमार्गाचा पुरस्कार करतो. तो माणसाला दुःख–सुखाच्या पलीकडे नेऊन आनंदरूप आत्मारामाकडे घेऊन जातो. _” भक्तिचेनि योगे देव । निश्चये पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ॥“

समर्थांनी दासबोधाचा आरंभ पारंपारिक पद्धतीने, म्हणजे गणेश वंदना, सरस्वती, सद्गुरू वंदना करून न करता अतिशय अभिनव पद्धतीने केला आहे. पहिल्या दशकाच्या पाहिल्या समासाच्या पहिल्याच ओवीत ग्रंथाचे नाव, त्याचा प्रतिपाद्य विषय सांगून हा ग्रंथ लिहिताना उपयोगात आणलेल्या अनेक संदर्भ ग्रंथाची, भगवद्वचनांची सूचीच ते सादर करतात. येवदं करूनही ते थांबलेले नाहीत, पुढे ते स्पष्ट करतात की हे सर्व संदर्भ, त्यातील सिद्धांत, तत्वे आणि सूत्रे आम्ही आत्मप्रचितीच्या निकषावर घासून, त्यांचा स्वतः अनुभव घेऊन वाचकांना सांगत आहोत. केवढा हा आत्मविश्वास!

दासबोध संसाराचा तिरस्कार करत नाही. उलट, “संसार करावा नेटका” असे सांगत, तो रामरायाचा आहे या भावनेने विवेकपूर्वक व यशस्वी करण्याचा आग्रह धरतो. संसारात राहूनही परमार्थ साधता येतो; वनवास, देहक्लेश किंवा अघोरी साधनांना येथे स्थान नाही.

समर्थांच्या मते _नरदेह अत्यंत दुर्लभ घबाड आहे. तो भगवंताचे राऊळ असून, साधना, सेवा व भक्तीसाठीच वापरायचा आहे. देह म्हणजे मी नव्हे, हे जाणून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अखेरीस देह नाश पावतो, पण “मरावे परी कीर्तिरूपी उरावे” हे जीवनधर्म आहे.

समर्थांना आळशी, बावळट, दांभिक अध्यात्म मान्य नाही.  त्यांचा आदर्श पुरुष उद्यमशील, चाणाक्ष, चिकित्सक, नम्र व गुणसंपन्न आहे. अध्यात्मिक वृत्तीच्या माणसाने दरिद्री राहावे असे त्यांना अभिप्रेत नाही. भौतिक समृद्धी आवश्यक आहे; ती सचोटी, प्रयत्न व कौशल्याने मिळवावी. मात्र ही समृद्धी आत्मारामाच्या प्राप्तीसाठी साधन असावी, अंतिम ध्येय नव्हे.

व्यक्तिमत्व विकासावर समर्थांचा ठाम विश्वास आहे.  जन्मदत्त गुण दैवाधीन असले तरी, प्रयत्नाने भाग्यरेषाही बदलता येतात हा त्यांचा सिद्धांत आहे. विविध विद्या, कला, साहित्य, संगीत, वक्तृत्व, राजकारण, अर्थकारण यांत निपुण होऊन स्वतःची आणि समाजाची उन्नती साधावी, असे दासबोध सांगतो. आत्मोन्नती आणि समाजोन्नती या दोन्हींचा येथे समतोल आहे.

औपचारिक शिक्षण न घेता समर्थांनी जीवनविश्वविद्यालयातून प्रचंड ज्ञान मिळविले आणि ते दासबोधात अनुभवसिद्ध स्वरूपात मांडले. त्यांनी देशभर मठांची स्थापना करून संघटन, जनजागृती व राष्ट्रउभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेत त्यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरले.

दासबोधात  व्यवस्थापनशास्त्रातली मूलतत्त्वे आढळतात.

संवादकौशल्य, नेतृत्व, नियोजन, मनुष्यबळ विकास, प्रेरणा, वेळेचे व्यवस्थापन, संघबांधणी इत्यादी विषयांचा सूक्ष्म विचार येथे आहे. त्यामुळे हा ग्रंथ व्यवस्थापन अभ्यासकांसाठीही मौलिक ठरतो.

ग्रंथाची मांडणी अत्यंत शास्त्रशुद्ध, स्पष्ट व आधुनिक आहे.  भाषा सुबोध, रसाळ व नादमधुर असून, समर्थ कधी प्रेमाने तर कधी कठोरपणे वाचकाला योग्य दिशा दाखवतात. राष्ट्रभक्ती, मानवप्रेम आणि ईश्वरप्रेम हे त्यांच्या काव्याचे आत्मतत्त्व आहे.

दासबोध हा अनुभवसिद्ध ग्रंथ आहे. “असे आहे” या ठाम भूमिकेतून समर्थ बोलतात. काही विचार आज कालसुसंगत नसले तरी, त्यावरून संपूर्ण ग्रंथ नाकारणे योग्य नाही.

अखेर,  दासबोध हा केवळ पारायणाचा नव्हे तर जगण्याचा ग्रंथ आहे. 

चारशे वर्षांपासून तो मानवजातीला प्रकाश देत आहे आणि पुढेही देत राहील. म्हणूनच तो प्रत्येकासाठी वाचनीय, चिंतनीय व अनुकरणीय आहे आणि त्याचा प्रसार होणे अत्यावश्यक आहे.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted