राधिका माजगावकर पंडित
इंद्रधनुष्य
☆ सायकलींचे शहर… ☆ राधिका माजगावकर पंडित ☆
50,60 वर्षांपूर्वी पुण्याच्या चार लाखाच्या वस्तीत एक लाखाच्या वर नुसत्या सायकलीच होत्या. प्रत्येक घरांत दोन तरी सायकली असायच्या. मुला मुलींचा कॉलेज प्रवेश, प्रवास सुरू झाला तो सायकली वरूनच. तेव्हा नव्या सायकलीला 110 ते 140 रुपये किंमत असायची, पण अहो!सर्वसामान्यांसाठी ही पण किंमत खूप होती. कशीतरी जोडाजोडी करून, काही वडिलांच्या पगारातून, थोडे हिंगाच्या डबीतून आईच्या साठवलेले पैसे तर थोडे स्वकष्टाचे, दूध, पेपर टाकून मिळवलेल्या पैशांची जोडणी करून रु.50, 60 उभे करायचे आणि वापरलेली (सेकंड हॅन्ड) सायकल दारात यायची. त्याच्यातही समाधान मानणारी ती पिढी होती.
लेखक डॉ. एच वाय कुलकर्णी त्यांच्या लेखात गमतीदार किस्सा लिहितात. ‘1955 साली श्री. अंतरकरांकडून मी सायकल घेतली, ती तब्बल 30 वर्ष वापरलेली होती. त्यानंतर मी ती 1960 सालापर्यंत वापरली. त्यावेळी कॉर्पोरेशनला वार्षिक टॅक्स अडीच रुपये असायचा. मग पत्र्याच्या बिल्ला मिळायचा. तो सायकलला लावला नाही तर कॉर्पोरेशनच्या लोकांच्या तावडीत सायकल स्वार सहज पकडला जायचा. दिवसाची ही कथा तर रात्रीची वेगळीच कहाणी, रात्री रॉकेलचा दिवा सायकलला हवाच. तो दिवा सायकल खड्ड्यात गेली की गपकन डोळे मिटत असे. मग काय सगळाच अंधार. आणि मग पोलिसांनी अडवल्यावर कष्टाने साठवलेले रु.25 रडकुंडीला येऊन पोलिसांच्या स्वाधीन करावे लागायचे.’
मोहिमेवर जाणारी पेशवाई कारकीर्द संपून पुण्याच्या परिसरातली त्यांची घोडदौड संपली आणि पुण्याच्या रस्त्यावर टांग्यांच्या घोड्याच्या टापा सुरू झाल्या. प्रवासाचं प्रमुख साधन म्हणून हजारभर टांगे पुण्यात फिरू लागले. विश्रामबाग वाडा आणि सदाशिव पेठ हौद चौकात दत्त उपहारगृहाजवळ टांगा स्टॅन्ड असायचा, बाजीराव रोड वरून नू.म.वि. पर्यन्त आल्यावर आनंदाश्रम ते आप्पा बळवंत चौक हा रस्ता इतका अरुंद आणि गर्दीचा होता की समोरून बस आली तर येणाऱ्या सायकल स्वाराला उडी मारून बाजूलाच व्हावं लागायचं.
1953 पासून टांग्यांचा आकडा घसरला आणि रिक्षाचा भाव वधारला. 1960 नंतर आली बजाजची व्हेस्पा स्कूटर, मग स्कूटरची संख्या वाढून सायकलचा दिमाख आटोपला. त्यात पीएमटी बसने भर टाकली. बस भाडं कमी, पुन्हा सुरक्षित, आरामात प्रवास, मग पुण्याच्या रस्त्यावरून लाल पऱ्या, पीएमटी धावू लागल्या. टांगेवाल्यांना टांग मिळून सायकल स्वारही तुरळक झाले.
जोगेश्वरी जवळच ठामपणे उभं राह्यलेलं, अजूनही उत्तम चाललेलं 98 वर्षे पूर्ण झालेलं ‘कुलकर्णी अन्ड सन्स’ यांचे दुकान वडिलांच्या कारकिर्दीपासून ठामपणे उभं राह्यले आहे. लवकरच शंभरीत दुकानाचे पदार्पण होईल.
श्री. बाबासाहेब कुलकर्णी आता 82 वर्षाचे आहेत, पण त्या काळी त्यांनी जोपासलेलं आरोग्य अजूनही कौतुक करावं इतकं उत्तम आहे. दांडगी स्मरणशक्ती, खणखणीत आवाज, देवाधर्माची आवड, धार्मिक सामाजिक कार्यातला त्यांचा पुढाकार, तरुणांनाही लाजवील असा आहे. बाबासाहेब आणि त्यांचे बंधू श्री. श्रीनिवास ह्यांनी वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आपल्या आई-वडिलांबद्दल त्यांना अतिशय आदर आहे. त्यांनी बहुमजली शंकर हाईट्स इमारत उभी केलीय ‘मातृदेवो भव’ ही उक्ती स्मरून त्यांनी ‘मनोरमा अपार्टमेन्ट’ ही वास्तू उभी केली.
श्री. बाबासाहेब अभिमानाने सांगतात, “आयुष्याच्या या वाटचालीत धर्मपत्नीने मला उत्तम साथ दिली आहे.” वडिलांबद्दल आदराने बोलताना बाबासाहेब सांगत होते, “ति. नानासाहेब (वडील )तळेगाव पासून पायी नू.म.वि. त यायचे. माधुकरी मागून ते मॅट्रिक झाले. मनासारखा कामधंदा नोकरी मिळेना. तेव्हां रस्त्याच्या कडेला सायकल दुरुस्तीचं दुकान त्यांनी टाकलं. घराबाहेर पडलेला हा जिद्दी तरुण कुणाची सायकल रिपेअर कर, कुणाचा स्टो तर कुणाच्या गॅस बत्या दुरुस्त करून पैसे मिळवत होता. पोटापाण्यासाठी पायपीट करतांना अतिशय कष्टातले दिवस कठीण जात होते. एकदा तर एक आण्याचे फुटाणे घेऊन ते आठ दिवस त्यांनी पुरवले होते.
कामाचा शोध घ्यायला ते डेक्कन पर्यंत पोहोचले. कॉलेजमधल्या मूठभर विद्यार्थ्यांकडे तेव्हा सायकली होत्या. त्यांना सायकल रिपेअर करायला खूप लांब जावं लागायचं. श्री. कुलकर्णींनी डोकं लढवलं. शुक्रवारी रात्री बिघडलेल्या सायकली ते ट्रक मधून घेऊन जायचे. दिवस रात्र एक करून दुरुस्त करायचे अगदी मस्त, ओक्के करून विद्यार्थ्यांच्या ताब्यात रविवारी आणून द्यायचे. मग काय!वेळ आणि पायपीट वाचली म्हणून विद्यार्थी मंडळ पण कमालीचे खुश व्हायचे. असे त्यांना तब्बल शंभर रुपये मिळायचे. एक आण्याचे फुटाणे आठ दिवस पुरवणारे हे सद्गृहस्थ महिना शंभर रुपये मिळवू लागले. अर्थात त्यामागे त्यांची दांडगी चिकाटी आणि अपार मेहनतही होती.”
श्री. शंकरराव कुलकर्णी प्रगतीपथाकडे वळत होते. जोगेश्वरी म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हा अजिबातच नव्हता, तो नागमोडी आणि कच्चा रस्ता होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्री जोगेश्वरी रस्त्यावरूनच जायची. अशी ही मोक्याची जागा हेरून जोगेश्वरी जवळच त्यांनी गाळा विकत घेतला. वडिलांनी सुरू केलेला श्री गणेशा श्री. बाबासाहेब व श्रीनिवास बंधू वडिलांच्याच जुन्या खुर्चीवर जुन्या टेबलावर बसून पुढे चालवत आहेत. अजूनही जोगेश्वरी जवळ गेलात की ‘कुलकर्णी अँड सन्स’ दिमाखाने झळकत असलेली वास्तू तुमच्या नजरेस पडेल. 98 वर्षे पूर्ण झालेल्या ह्या वास्तूला माझा मनापासून सलाम.
☆☆
© राधिका माजगावकर पंडित
सन सॅटॅलाइट, पुणे – 51
मो. 8451027554
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






