प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १३. ☆ प्रा.भारती जोगी ☆
मृणालिनीदेवी रविंद्रनाथ टागोर
☆
ज्या सौंदर्याला मी फक्त माझ्या घरात पहायचो,
ते आज मला चांदण्यांत, फुलांत आणि नभात दिसते.
तू आता फक्त माझी राहिली नाहीस
तू या संपूर्ण सृष्टीचा एक भाग झालीस.
हा वेदनेचा स्पर्श होत प्रकटलेला भावनांचा आवेगी ओघ आहे; जो…
विश्व कवी, कवी गुरू, गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी, आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानंतर स्मरण या काव्यसंग्रहात प्रसृत करत ; प्रवाहित केला… स्मृती सुमन रुपात!!
रवींद्रनाथांच्या वडिलांच्या टागोर इस्टेट मध्ये व्यवस्थापक असलेल्या बेनीमाधव यांची कन्या… भवतारिणी रविंद्रनाथांची पत्नी म्हणून आली त्यावेळी तिचं वय होतं ९ वर्षे… आणि रविंद्रनाथांचं वय होतं २२. लग्नानंतर तिचं नाव बदलून मृणालिनी ठेवण्यात आलं. अतिशय साध्या, ग्रामीण भागातून आलेली ही निरक्षर बालिका! एक नाजूक वेल… जी एका विराट वृक्षाच्या छायेत… त्याच्या आधारावर जगू पहाणारी.
पण तिचं भाग्य थोर की, विवाहानंतर घरचीच कामं केली पाहिजेत अशी कुणीही जबरदस्ती नाही केली. स्वतः रवींद्रनाथांनी तिला लोरे टे हाऊस या शाळेत इंग्रजी भाषा शिकायला पाठवले. पाटी-पुस्तक, गणवेश ते दाखला काढणे, हे सगळं केलं. संस्कृत भाषा शिकवायला, गृह-शिक्षक नेमला. आणि बघता-बघता… मुळातच प्रतिभावंत असलेली ही मृणालिनी… पाकळी-पाकळीने उमलंत… फुलू लागली… संपूर्ण उन्मिलित होण्यासाठी, सर्वांगाने उमलंत फुलवण्यासाठी, सुरू झालं तिचं उन्मिलन!! आणि बघता-बघता ही मृणालिनी इंग्रजी, संस्कृत, बंगाली या तिन्ही भाषांवर प्रभुत्व प्राप्त करत, पारंगत झाली. ही वेल त्या विराट वृक्षाच्या आधाराने, गगनावरी जाण्यास उत्सुक झाली.
आणि मग सुरू झाला एक अनोखा प्रवास… एका मुलीचा… अशिक्षित ते अनुवादक होण्याचा!
लग्नाच्या वेळी निरक्षर असलेल्या मृणालिनी देवी भाषांतरकार म्हणून नावारूपाला आल्या.
प्राचीन भारतीय ग्रंथांचा सखोल अभ्यास करताना, त्यांना वाटले की, हे ज्ञान बंगाली वाचकांना ही मिळावे. म्हणून मृणालिनी देवींनी…
महाभारतातील अत्यंत क्लिष्ट आणि तत्वज्ञानाने भरलेल्या शांती पर्वाचा बंगालीत अत्यंत सोपा अनुवाद केला. अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या… ऐसी अक्षरे रसिके मेळविन… ची च आठवण आली.
इतकंच नाही तर कठोपनिषद याचे केलेले भाषांतर त्यांच्या भाषिक आणि वैचारिक प्रगती चे उत्तम उदाहरण म्हणावे!! त्यांनी अनुवादकाच्या भूमिकेतून या ग्रंथांचे सांस्कृतिक, आणि दार्शनिक महत्त्व दाखवून दिले.
मृणालिनी देवींची आपल्या पतीची ख-या अर्थानं सहचरी होण्याची ही तळमळ थेट पोहोचते आपल्या अंतरंगात!! टागोर घराण्याचा वारसा असलेल्या साहित्य, नाट्य या दोन कलांवर मृणालिनी देवींनी ही आपला स्वतः चा असा एक वेगळा ठसा उमटवला. नाटकांतून ही प्रमुख नायिकेची भूमिका केली. याशिवाय बालसाहित्य, कथा लेखन, बोधकथा लेखन ही केले.
टागोरांच्या वाड्याचा उंबरठा ओलांडून आल्यापासूनच… त्या घराण्याच्या साहित्यिक वारसा जपंत, पुढे पाऊल टाकत निघालेल्या मृणालिनी देवी जणू त्या वाटेवर मोठ्या आत्मविश्वासाने चालत राहिल्या याच विश्वासाने…
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका…
आणि खरंच रवींद्रनाथांच्या खंबीर साथीने… आधी वयातील अंतरामुळे औपचारिक असलेलं नातं, हळूहळू एक नितांत सुंदर असं बौद्धिक, भावनिक साहचर्याचं नातं झालं! टागोरांच्या परिवरातही त्या समरस झाल्या होत्या. आपल्या अनुवादाच्या आनंदात त्या आपल्या सासुबाईंनाही सामावून घेत. म्हणुनच की काय त्याची छोटी मुलगी मीरा आपल्या डायरीत लिहिती झाली…
” शांतिनिकेतन च्या दुस-या मजल्यावरील व्हरांड्यात एक टेबललॅंम्प जळतोयं. माझ्या आईच्या हातात एक इंग्रजी कादंबरी आहे. ती वाचतीये आणि माझ्या आजी साठी अनुवाद करतीये. “
फक्त मृणालिनी देवींच्या या बौद्धिक पैलूंची इतिहासात म्हणावी तशी नोंद नाही घेतली गेली… हे जाणवतं!
वयात खूप अंतर असुनही टागोरांच्या जीवनावर आणि कलेवर मृणालिनी देवींचा खूप प्रभाव दिसून येतो.
रविंद्रनाथ जेव्हा कामानिमित्त, प्रवासासाठी घराबाहेर असायचे तेव्हा ते मृणालिनी देवींना आवर्जून पत्रे पाठवीत. त्या दोघांतील सुसंवाद आणि प्रेमच तर दिसून येतयं ना यांतून! पत्नी कडून उत्तर यायला उशीर झाला तर नाराजी ही व्यक्त करत. ही पत्रे… हा प्रेमाचा ठेवा… विसा भारती द्वारे प्रकाशित Letters by टैगोर (Volume 1) मध्ये संग्रहित करण्यात आली आहेत.
मृणालिनी देवींचं आणखी एक परिपक्व, प्रगल्भ असं रूप बघायला मिळालं ते रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन मध्ये सुरू केलेल्या ब्रह्मचर्य आश्रम या शाळेच्या प्रारंभिक अवस्थेत! त्यावेळी पैशाच्या अडचणीमुळे रविंद्रनाथ खूप चिंतेत होते. त्यावेळी त्यांची ही सहधर्मचारिणी ख-या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने आपले लग्नातील सगळे दागिने विकून पैसा उभा केला. आणि, साकार झाली रवींद्रनाथांच्या कल्पनेतील ती शाळा!
स्वतः मृणालिनी देवी कलकत्त्यातलं ऐश्वर्य सोडून आश्रमात रहायला आल्या. आणि विद्यार्थ्यांच्या रहाण्याची, जेवणाची, आरोग्याची काळजी घेऊ लागल्या. मुळातच सुगरण असलेल्या मृणालिनी देवी, स्वतः च्या हाताने सात्त्विक, पौष्टिक आणि चवदार स्वयंपाक बनवत आणि मायेनं जेवू घालंत. शाळेला कुटुंब रूप देऊन, त्या स्वतः आई झाल्या त्या सगळ्या मुलांची! टागोर घराण्याची स्वयंपाकाचे नवनवे प्रयोग करण्याची परंपरा येथे ही सांभाळली आणि आश्रमातील जेवणाची चव समृद्ध केली या अन्नपूर्णेनं!!
आणि आपल्या पूर्वाश्रमीचं नाव भवतारिणी सार्थ करत… रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतन चा भव… संसार तारिणी सिद्ध झाली.
मृणालिनी देवींचं मोठं दुर्दैव की त्या अल्पायुषी ठरल्या. फक्त २८ वर्षे आयुष्य लाभलं त्यांना. पण तरीही रविंद्रनाथांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पडद्यामागून मोठीच भूमिका बजावली. इच्छा असूनही आपल्या पतीला खूप वर्षे साथ मात्र नाही देऊ शकल्या त्या.
अचानकच मृणालिनी देवींना एका अज्ञात आजाराने ग्रासलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत गेली. रविंद्रनाथ त्यांना इलाजासाठी आपल्या जोरासांको ठाकुर बारी येथे घेऊन गेले. तेव्हा गाडी ६ तास लेट असल्याने त्यांना विलासपूर येथील स्टेशन च्या वेटिंग रूममध्ये थांबावे लागले. त्यावेळी त्या वेळेत ही त्यांनी फांकी नावाची एक कविता रचली. ती आजही बिलासपूर च्या प्लॅटफॉर्म वरील एका भिंतीवर शिलालेखाच्या रूपात आहे. रविंद्रनाथांनी शिलालेखात अक्षर रूपात… अ क्षर केले… आपल्या वेदनेला!
शांतिनिकेतनला युनेस्को जागतिक वारसा… स्थळाचा दर्जा मिळवून देणा-या वटवृक्षाचे पहिले बीज ठरला… मृणालिनी देवींचा… आर्थिक आणि नैतिक पाठिंबा! तिथे त्यांच्यातील समिधा समर्पणात कुठेही कमी पडली नाही.
मृणालिनी देवींच्या निधनानंतर रविंद्रनाथांनी मृणालिनी आनंद नावाचा बगिचा तयार केला. तिथं अनेक प्रकारची फुलझाडे लावली. आपल्या ख-या अर्थाने सहचरी ठरलेल्या, प्रेरणा आणि समर्थनाचा अखंड स्त्रोत बनून राहिलेल्या पत्नीच्या निधनानंतर ही… तिची उपस्थिती… तिचं नाव टागोरांच्या कवितेत आणि संगीतात निरंतर गुंजत राहिलं. त्यांच्यातील नातं एक वारसा म्हणून टागोरांच्या काव्यरचनांमधील प्रेम, विरह, औदासीन्य यांत बघायला मिळतं…
तू जिथे गेली आहेस, तिथे माझे डोळे पोहोचू शकत नाहीत
पण तरीही, तू माझ्या मनात एक शांत प्रकाशासारखी जिवंत आहेस…
– रविंद्रनाथ टागोर
— लेख क्र. १३
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





