प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १६ ☆ प्रा.भारती जोगी ☆
ईव्हा ईव्हॉन ऊर्फ सावित्रीबाई विक्रम खानोलकर
जिनेव्हाचा समुद्रकिनारा… छात्र सैनिकांच्या गटा बरोबर विक्रम खानोलकर सुट्टी घालवायला आलेले. नियतीने काहीतरी योजले असावे, म्हणूनच स्वित्झर्लंड निवासी ईव्हा ईव्हॉन ची आणि विक्रम जीं ची भेट होते.
भारताचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती याचं प्रचंड आकर्षण असलेली ईव्हा, पहिल्याच भेटीत आणि दोघांत झालेल्या संवादामुळे विक्रम जीं च्या प्रेमात पडते. जणू काही हा भविष्यात घडणाऱ्या एका ऐतिहासिक प्रक्रियेच्या रूजवातीचा संकेतच होता.
ईव्हाचे वडील, जे समाजशास्त्राचे प्राध्यापक होते… त्यांना हे प्रेम मान्य नव्हते. पण तरीही ईव्हाने त्यांच्या मनाविरुद्ध तिच्या पेक्षा ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर ईव्हाने हिंदू धर्म स्वीकारला. तिचं विक्रम इतकंच प्रेम भारतीय संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान, हिंदू धर्मग्रंथ यांच्यावरही होतं.
ईव्हाने लग्नानंतर स्वतः चे नाव बदलून सावित्रीबाई करून घेतले, आणि भारतीयत्व स्वीकारले. हे नाव जणू काही एक प्रतीकात्मक संकेत होता… एक आपलेपणाची घोषणा होती… भारतभूमी आणि आत्मा यां प्रती, भविष्यातील केल्या जाणाऱ्या समर्पणाचं वचन होतं.
भारतीय आत्मा असलेली युरोपीय… असंच म्हणावं लागेल त्यांच्या विषयी. कारण लग्नानंतर नावानेच नाही तर कामाने ही हळूहळू भारतीय संस्कृती शी समरस होत एकरूप झाल्या सावित्रीबाई! त्यांना आत्म्याने ही भारतीय व्हायचे होते, म्हणूनच पतीवरील प्रेम, निष्ठा आणि त्यागाचा आदर्श असलेले नाव त्यांनी निवडले.
सावित्रीबाई या नावाने हा फक्त ईव्हा चाच पुनर्जन्म नव्हता तर… त्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जन्माची सुरूवात होती ती!!
साधी सुती साडी, कपाळावर मोठे कुंकू, आणि पायात कोल्हापुरी चपला… असा अस्सल भारतीय पेहराव असलेल्या सावित्रीबाई खरंच बाहेरूनच नाही तर आतून ही… अंतर्बाह्य भारतीय रंगात रंगून गेल्या. भारतीय संस्कृती चा सखोल अभ्यास करून, नालंदा विद्यापीठातून पदवी मिळवली.
इतकंच नाही तर हिंदू परंपरा आणि आदर्श यांच्या प्रेमात आकंठ बुडून, अगदी दुधात साखर विरघळावी तशा विरघळून एकरूप झाल्या. अवघा रंग एक झाला!!!
त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा अवगत केल्या. इतकंच नाही तर… भारतीय संगीत, नृत्य, चित्रकलेचा ही अभ्यास केला. नृत्याचा अभ्यास पं उदयशंकर यांना गुरू मानून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केला. अनेक पौराणिक कथा आणि त्याचा इतिहास याचा ही सखोल अभ्यास केला. यावरून लक्षात येतं ते त्याचं भारतीय संस्कृती वरचं प्रचंड प्रेम, आस्था आणि आकर्षण! यासाठी भारतीय संस्कृती शी जुळलेल्या प्रत्येकच गोष्टीशी अद्वैत साधण्यासाठी ही समिधा आपल्या ज्ञान लालसेच्या तृप्ती साठी, आपल्या अथक, अविरत मेहनतीत… अगदी अभिराम रूपात चैतन्य मयी राहून, चेतलेली राहिली. महाराष्ट्रातील संत हे पुस्तक आणि संस्कृत भाषेतील नावांचा एक शब्दकोश ही तयार केला त्यांनी.
त्या म्हणत… ” माझा जन्म चुकून युरोपात झालेला आहे. “
अशा या बहुमुखी प्रतिभा असलेल्या, बहुपेडी व्यक्तीवर, पारखी नजर पडली ती… मेजर जनरल हिरालाल अटल यांची! त्यांच्या समोर इंग्लंड मधील… ‘ व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च शौर्य पुरस्काराच्या तोडीचा पुरस्कार बनविण्याचे आव्हान होते. सावित्रीबाईंचा वेदांचा अभ्यास बघून त्यांनी त्यांची मदत घेण्याचे ठरविले आणि भारतातील सर्वोच्च शौर्याचा सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या परमवीरचक्र च्या पदकाची निर्मिती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
आणि बघता-बघता स्विस वंशाच्या सावित्रीबाई भारतीय इतिहासातील एका अविस्मरणीय प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग बनल्या.
सावित्रीबाईंनी हे पदक बनविण्यासाठी पुराण कथांचा आधार घेतला.
वाईटावर चांगुलपणाचा विजय…
दुष्टांवर सुष्टांचा विजय… हे दाखविणारं प्रतीक म्हणून त्यांनी, इंद्राचे शस्त्र असलेल्या वज्राची प्रेरणा घेतली. कास्य धातूचं एक गोलाकार पदक बनवलं… आणि त्यावर… ऋषी दधिचींच्या आत्मबलिदानाचं, त्यागाचं सर्वोच्च उदाहरण वज्र प्रतिकात्मक रूपात घेतल. या वज्राच्या ४ प्रतिकृती, चार ही बाजूंना घेतल्या. मध्यभागी अशोकस्तंभ! पदकावर शिवरायांची भवानी तलवार ही आहे.
आत्मबलिदानाचं प्रतीक असलेलं वज्र जणू त्या शौर्य पदकाचा, परमवीरचक्राचा आत्मा बनलं आणि दधिचींची कथा सुद्धा प्रेरणा स्थानचा आत्मा झाली. असं म्हंटलं जातं की,…
“सावित्रीबाईंनी फक्त प्रतीक नाही बनवलं तर… एक नैतिक आव्हान केलं ब्रह्मांडाला. जिथे साहस, बलिदान हे ब्रह्मांडीय कर्तव्य आहे. या पदकात आध्यात्मिक प्रतिध्वनी सुद्धा ध्वनीत होतोय.
यानंतर सावित्रीबाईंनी… अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र,… अशा अनेक प्रमुख शौर्य पदकांची रचना केली.
“सावित्रीबाईंनी केवळ पदकाचीच रचना नाही केली तर… भारताच्या प्राचीन त्याग आणि पराक्रमाच्या परंपरेला आधुनिक सैनिकांच्या छातीवर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचे हे पदकावरचे डिझाइन म्हणजे… राष्ट्रभक्ती आणि कलेचा सर्वोच्च संगम आहे. “
स्वित्झर्लंड ची ईव्हा जेव्हा भारताची सावित्री झाली, तेव्हा तिने देशाच्या वीर पुत्रांना त्यांच्या शौर्याचा सर्वात मोठा बहुमान मिळवून दिला.
लष्करी वर्तुळात आणि इतिहास लेखनात सावित्रीबाईंचा उल्लेख एक *मराठमोळी विदुषी* असा केला जातो. ही विदुषी परमवीर चक्राच्या रूपात अमर झाली.
सावित्रीबाईंनी पती निधनानंतर रामकृष्ण मठात आपलं उर्वरित आयुष्य घालवल. शहिदांच्या कुटुंबियांना, निर्वासित झालेल्या कुटुंबांना मदत करत राहिल्या. वाहून घेतलं त्यांनी समाजकार्यात स्वतःला!! लष्करी रूग्णालयात जाऊन जखमी सैनिकांची शुश्रूषा ही करत असत त्या फावल्या वेळात. शेवटी सतत कार्यमग्न राहणारी, कर्तव्य निष्ठ, भारतीय संस्कृतीत तद्रूप झालेली ही… तेजस्वी समिधा… ही ज्ञान तपस्विनी… ही… कर्मयोगिनी २६ नोव्हेंबर १९९० या दिवशी… हळुवार… जणू… कृतकृत्य झाल्यासारखी… विझली. निमाली.!!
– लेख क्र. १६ .
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





