श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी– भाग – १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तुम्हाला का जगायचं हे जर कळले तर कसे जगायचं या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळत जाते. आणि जीवनाचं हे ध्येय ज्याला कळलं तो आपलं जीवन समृद्ध तर करतोच, पण इतरांचंही जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावतो. अशाच एका ऋषितुल्य दाम्पत्याचा परिचय आज आपल्याला करून द्यायचा ठरवला आहे. त्यांचं नाव आहे दिलीप कुलकर्णी आणि डॉ सौ पौर्णिमा कुलकर्णी. एकमेकांना सर्वच बाबतीत अनुरूप आणि साथ देणारी ही जोडी. हे दोघंही पर्यावरणाचे सदिच्छा दूत आहेत असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे दिलीपदादा आणि पौर्णिमाताई. या दोघांची यु ट्यूबवरील वेध या सदरात डॉ आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत मी पाहिली आणि त्यांची जीवनशैली, साधेपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो. मग मी आंतरजालावरून आणखी माहिती घेतली. तीच साररूपाने तुमच्यापुढे ठेवतो आहे.

दिलीप कुलकर्णी म्हणजे एक मनमोकळा माणूस चेहऱ्यावर हास्य. मुक्तपणे वाढेल तशी वाढू दिलेली दाढी. अंगावर इस्तरी न केलेले परंतु स्वच्छ असे सुती कपडे. तेवढेच साधं स्वच्छ आणि पारदर्शक असं हे व्यक्तिमत्व? आधी ते पुण्यात टेल्कोमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपण ही नोकरी फार काळ करू शकत नाही कारण आपण जीवन जगण्यासाठी जी तत्त्वं मनाशी ठरवली आहेत, ती यामुळे साध्य करता येणार नाही. सुखवस्तू आणि आरामदायी जीवनशैली प्रदान करणाऱ्या नोकरीमुळे येणारा सुखवस्तूपणा त्यांनी येऊ दिला नाही. किंबहुना तसे जगणे त्यांना मान्यच नव्हते. म्हणून त्यांनी उत्तम पगार आणि प्रतिष्ठा देणारी ही नोकरी सोडली आणि कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद केंद्राशी स्वतःला जोडून घेतलं. काही वर्षे हे काम त्यांनी केलं. त्याबरोबरच ग्राहक चळवळ, ग्रामायन यासाठी काम करायला सुरुवात केली. काही काळ ‘ विवेक विचार ‘ या नियतकालिकाचं संपादन केलं. याच काळात त्यांची पौर्णिमाताईंशी ओळख झाली. पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर. दोघांचेही विचार आयुर्वेदाला आणि पर्यावरणाला पूरक असे होते. दोघांचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न करून एकत्र आपल्या ध्येयासाठी कार्य करायचे ठरवले.

पौर्णिमाताईंच्या संसाराच्या कल्पना चारचौघींपेक्षा वेगळ्या होत्या. गाडी, बंगला, साड्या, दागिने या गोष्टीत त्यांचं मन रमणे शक्यच नव्हते. कमीतकमी गरजा ठेवणे, उपभोगाच्या वस्तूंवर नियंत्रण आणणे, ऊर्जेचा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे ही तत्वे त्यांनी मनाशी ठरवली होती.

१९९३ मध्ये दिलीपदादा आणि पौर्णिमाताई आपल्या मुलासह कोकणातील पंचनदी या गावी राहायला आले. त्या ठिकाणी त्यांच्या काही मित्रांनी एक प्रकल्प सुरु केला होता. दिलीपजींनी चार वर्षे त्या प्रकल्पाचे काम पाहिले. पण पुढे काही कारणामुळे तो प्रकल्प बंद पडला. त्यानंतर या दोघांनी १९९७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या कुडावळे या गावी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी १० गुंठे जमीन भाडेकराराने घेतली. दिलीपदादा, पौर्णिमाताई यांचा संसार या ठिकाणी सुरु झाला. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई हे दोघंही खरे समाजशिक्षक. त्यांचं वाचन, चिंतन सतत सुरूच होतं. त्यातून त्यांच्या पर्यावरणविषयक जाणिवा अधिकाधिक समृद्ध होत होत्या. त्यातून जे विचारमंथन झालं त्यावरून दिलीपदादा आणि पौर्णिमाताई या निर्णयाला आले की लोकांना केवळ सल्ला देण्यापेक्षा आपण स्वतःच अशी पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करू या.

स्वतः पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर असल्याने आयुर्वेदिक औषधे, जीवनशैली त्यांना उत्तम प्रकारे परिचित होती. पण त्यांच्या असे लक्षात आले की लोकांना केवळ औषधे सांगण्यापेक्षा त्यांची जीवनशैली जर आयुर्वेदाच्या तत्वांशी मिळतीजुळती असेल तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. त्यांना हेही लक्षात आलं की पर्यावरणस्नेही जीवनशैली आणि आयुर्वेदाची तत्वे यात कुठेही विसंवाद नाही. ते परस्पर पूरक आहेत. त्यामुळे आधी तसे वागून दाखवायचे आणि मगच लोकांना काही सांगायचे असे दोघांनी ठरवले.

कुडावळे ठिकाणी दिलीपजींनी त्यांना हवे तसं घर बांधलं. त्यांना पर्यावरणपूरक असं मातीचच घर हवे होतं. तस त्यांनी बांधून घेतलं. जमिनीचा तळही मातीचाच. ही जमीन शेणाने सारवायची. थोडी शेती, थोडं बागकाम करायचं असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला. छोट्याशा कौलारू घरात शांत, सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा आनंद ते घेतात. पण केवळ शेती, बागकाम यातच त्यांना अडकून पडायचं नव्हतं. ‘ आधी केले मग सांगितले ‘ या उक्तीचा प्रत्यय या दोघांनी लोकांना आणून दिला. त्यांनी प्रबोधनात्मक लेखनाला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या लोकांच्या नजरा कौतुकात बदलायला सुरुवात झाली. त्यांना व्याख्यानांची निमंत्रणे यायला लागली.

त्यातूनही त्यांना जनजागृतीचा एक मार्ग गवसला. हे सगळं सुरु असताना त्यांनी ‘ गतिमान संतुलन ‘ हे मासिक सुरु केलं. त्याशिवाय हसरे पर्यावरण, दैनंदिन पर्यावरण, निसर्गायण, विकसित भारत, बदलू या जीवनशैली, अणू विवेक, सम्यक विकास, बसू चरित्र, अहेड टू नेचर, वेगळ्या विकासाचे वाटाडे आदी पुस्तके लिहिली. याच कालावधीत त्यांना ‘ निसर्गायण ‘ शिबिराची कल्पना सुचली. पर्यावरणविषयक गोष्टी जाणून घेण्याची ज्यांना उत्सुकता आहे, ज्यांना पर्यावरणासाठी काहीतरी करावेसे वाटते अशांसाठी त्यांनी निवासी आणि अनिवासी शिबिरे सुरु केली.

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई यांना असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो की तुम्ही अशा प्रकारची जीवनशैली जगण्यासाठी मोठी किंमत मोजत आहात का? तेव्हा ते म्हणतात, ‘ किंमत तर शहरी लोकांना मोजावी लागते. ट्रॅफिक जाम, प्रदूषण, निरनिराळे आजार या रूपाने शहरी लोक ही किंमत मोजतात. आजकाल आपण खूप उपभोगवादी झालो आहोत. उपभोगामुळे अधिकाधिक वस्तूंची हाव वाढत जाते. त्यामुळे उत्पादन वाढवावे लागते. उत्पादन वाढले म्हणजे विकास झाला असे आपण समजतो. पण हा विकास पर्यावरणाची म्हणजे बाह्य आणि आपली आंतरिक हानी करतो. अधिक उत्पादन यावे म्हणून रासायनिक खते, कीटकनाशके आपण वापरतो. यामुळे जमिनीची आणि पर्यावरणाची हानी तर होतेच पण अन्नधान्य, फळे, भाजीपाला, पाणी इ. च्या माध्यमातून हे घातक पदार्थ आपल्या शरीरात जातात. त्यातून अनेक नवनवीन आजारांना आमंत्रण मिळते.

मग सगळ्यांनी त्यांच्यासारखं शहर सोडून खेड्यात राहायला जावं का? याचं उत्तर त्यांच्या दृष्टीनं ‘ नाही ‘ असं आहे. आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted