अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग २ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆
विवेकानंद केंद्र -एकनाथजी रानडे -ए. बालकृष्णन
– मा. श्री. ए. बालकृष्णन… विवेकानंद विचार आणि पूर्वांचलाशी आयुष्यभर नातं जोडणाऱ्या एका विलक्षण कर्मयोग्याला श्रद्धांजली… मृत्यू दि. २७/८/२
“परस्परं भावयन्तः…”
बालकृष्णनजींबरोबर प्रवास करताना त्यांनी तिनसुकियाला भगवद्गीतेतील एक श्लोक आम्हाला समजावून सांगितला—
“परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ।”
संघटनेच्या कामाचा हा किती जबरदस्त आधार आहे, हे तेव्हा जाणवलं.
एकमेकांना वाढवणं, एकमेकांना बळ देणं आणि एकमेकांच्या विकासातून मोठं कार्य उभं करणं—हा विचार बालकृष्णनजींच्या कार्यपद्धतीतच होता.
त्यांच्या पॅशनेट नेतृत्वाखाली विवेकानंद केंद्राचं पूर्वांचलातील काम अफाट वाढलं.
शेकडो मुलांशी असलेला संपर्क काही हजार मुलांपर्यंत आणि पुढे लाखो लोकांपर्यंत पोहोचला.
अनेक सेवाकार्ये उभी राहिली… अनेक शाळा उभ्या राहिल्या… अनेक प्रकल्प उभे राहिले…
या प्रकल्पांचं नियोजन, त्यांची स्थापना आणि त्यांची अंमलबजावणी—सगळंच आखीव-रेखीव आणि जबरदस्त होतं.
‘विवेकानंद केंद्र शिक्षा प्रसारक विभाग’ त्यावेळी अरुणाचल प्रदेशातील अनेक शाळांचं काम पाहत होता. त्या शिक्षण प्रसारक विभागाचा मी सदस्य झालो.
बालकृष्णनजींच्या नेतृत्वात काम करताना एक गोष्ट सतत जाणवायची—
… ते कामाला केवळ प्रकल्प म्हणून पाहत नव्हते; ते त्याला राष्ट्रकार्य म्हणून पाहत होते.
विचार जगलेला माणूस
बालकृष्णनजी फारसं वैचारिक बोलायचे नाहीत.
ते बोलायचे ते विचार जगलेलं आयुष्य.
ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली भगवद्गीता.
ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली केंद्र प्रार्थना.
ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली उपनिषदं.
म्हणूनच त्यांच्या शब्दांना वेगळी ताकद होती.
२००६मध्ये कन्याकुमारीमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम येणार होते. आम्ही काही कार्यकर्ते बालकृष्णनजींबरोबर शिलास्मारकावर होतो.
बालकृष्णनजी ज्या पद्धतीने कलामांना शिलास्मारक समजून सांगत होते, ती पद्धत मला फार अफलातून वाटली.
त्यांच्या प्रत्येक शब्दामागे अनुभव होता.
प्रत्येक गोष्टीमागे अभ्यास होता.
आणि प्रत्येक अभ्यासामागे काम होतं.
देशावरचं संकट म्हणजे स्वतःचं संकट
२००८-०९च्या सुमारास मी दिब्रुगडला गेलो होतो. त्या वेळी बालकृष्णनजी तिथे होते.
मी ‘ज्ञान प्रबोधिनी’चं काम करत होतो. विवेकानंद केंद्राचं काम तेव्हा सोडलं होतं.
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा काळ होता. अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई हादरवून सोडली होती.
बालकृष्णनजी दिवसभर त्याचे अपडेट्स घेत होते.
‘Spiritually Oriented Service Mission’ असलेल्या विवेकानंद केंद्राचा एक प्रमुख कार्यकर्ता देशावर आलेल्या संकटाचा पदोपदी, क्षणोक्षणी अभ्यास करतो, समजून घेतो—हे माझ्यासाठी नवलाचं होतं.
कारण त्यांच्यासाठी आध्यात्मिकता म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हतं.
“वो अपने भाई हैं! ”
बालकृष्णनजी आणि ज्ञान प्रबोधिनी यांचं एक वेगळंच नातं होतं.
एखादा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यात ज्ञान प्रबोधिनीचा उल्लेख आहे असं सांगितलं की ते म्हणायचे—
“अरे, वो अपने भाई हैं। उनके साथ करना ही पड़ेगा! ”
प्रबोधिनीबरोबर एखादं काम करण्याचा प्रस्ताव मी ठेवला आणि त्यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला, असं मला आठवत नाही.
क्षणाचाही विलंब न लावता ते ‘हो’ म्हणायचे.
एकदा विवेकानंद केंद्राच्या प्रमुख शिक्षकांना आणि जीवनव्रतींना इम्पॅक्ट, इम्पॅक्ट प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन यांचं प्रशिक्षण द्यावं, असा मी प्रस्ताव ठेवला.
त्यांनी विचारलं—
“वो कौन देगा रे प्रशिक्षण? ”
मी म्हणालो—
“अजितराव कानिटकर.”
क्षणात उत्तर आलं—
“अरे, वो अपना अजित है! उसको बुलाओ, कोई बात नहीं. लेकिन रेल से मत बुलाओ, प्लेन से बुलाओ. उसको सब मालूम है.”
त्यांच्या मनात माणसांबद्दल किती विश्वास होता, याची ही छोटीशी झलक.
पूर्वांचलावर प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम
पोंगसे सरांबद्दल बोलताना ते म्हणायचे—
“अरे, विवेक तो सच्चा कार्यकर्ता है रे वो! उसको नॉर्थ-ईस्ट के बारे में बहुत प्यार है.”
पूर्वांचलाबद्दल त्यांचं प्रेम अफाट होतं.
आणि पूर्वांचलावर प्रेम करणाऱ्या लोकांवरही त्यांचं तितकंच प्रेम होतं.
हीच कदाचित त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद होती.
ते प्रदेशावर प्रेम करत होते, पण त्याहून अधिक माणसांवर प्रेम करत होते.
“प्रसाद को प्रसाद दिया…”
बालकृष्णनजींबरोबरचा माझा शेवटचा अनुभव कन्याकुमारीतील विघ्नहर्ता गणेश मंदिरातला.
संध्याकाळच्या वेळी ते आरतीला प्रसाद घ्यायला यायचे. त्यांच्या द्रोणामधला थोडा प्रसाद स्वतः घ्यायचे आणि उरलेला मला द्यायचे….. आणि मग खळखळून हसायचे. ते हसायचे तेव्हा त्यांचं पूर्ण शरीर हसतंय असं वाटायचं. म्हणायचे—
“आज प्रसाद को प्रसाद दिया, मेरा काम खतम! ”
या एका वाक्यात त्यांचं प्रेम, त्यांचा विनोद आणि माझ्याशी असलेली त्यांची आत्मीयता—सगळं सामावलेलं होतं.
एका शब्दातून दिसलेली त्यांची दृष्टी
सलग दहा-बारा दिवस आम्ही कन्याकुमारीत होतो. मातृभूमी पूजनाचा कार्यक्रम निवेदिता दीदी आणि बालकृष्णनजींच्या उपस्थितीत झाला.
या संपूर्ण प्रक्रियेकडे बालकृष्णनजी किती बारकाईने पाहत होते, हे मला एका छोट्याशा प्रसंगातून जाणवलं.
त्या पोथीत एक शब्द होता—‘परराज्यातील’, ‘परभाषेतील’.
बालकृष्णनजींनी शांतपणे मला सांगितलं—
“प्रसाद, यहाँ ‘परराज्य’, ‘परभाषा’ ये शब्द युज करने से ज्यादा ‘अन्य भाषा’, ‘अन्य राज्य’ हे शब्द युज करने से बहुत अच्छा रहेगा.”
मी थक्क झालो.
एका शब्दामध्ये दडलेला भावार्थही ते इतक्या बारकाईने पाहत होते!
मग विचार आला—
जे माणूस एका शब्दाचा आयाम इतक्या बारकाईने पाहतं, ते माणूस संपूर्ण कामाचे आयाम किती बारकाईने पाहत असेल?
प्रबोधिनीतील एखादी प्रक्रिया ते शांतपणे समजून घेत असतील, तर विवेकानंद केंद्रातील—विशेषतः पूर्वांचलातील—प्रत्येक प्रक्रियेचा किती बारकाईने विचार करत असतील!
आज सकाळी…
आज सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतला.
राधा दीदींच्या पोस्टवरून बालकृष्णनजींचं निधन झाल्याचं समजलं.
क्षणभर काहीच कळलं नाही.
सुन्न झालो.
कुणीतरी आपल्या जिवाभावाचा माणूस गेल्याची जाणीव झाली.
बालकृष्णनजी,
तुम्ही आम्हाला काय दिलंय, याची गणतीच करता येणार नाही.
प्रचंड ताकदीने काम करत राहणं,
तेवढ्याच शुद्धतेने काम करत राहणं,
प्रचंड श्रद्धेने काम करत राहणं—
हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली असेल.
पदोपदी कुठेही काम करत असताना विवेकानंद विचार आणि पूर्वांचल विसरायचा नाही, हे आम्ही तुमच्या आचरणातून शिकलो.
दूर, साडेतीन-चार हजार किलोमीटरवर असलेल्या आपल्या बांधवांशी एक वेगळं नातं तुम्ही आमचं निर्माण केलंत.
हे नातं आम्ही नक्की जपू.
तुम्ही निजधामाला गेलात.
पण तुम्ही ज्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला, त्यांच्यावरचा तुमचा विश्वास आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.
पुन्हा कधीतरी तुम्हाला भेटायला आलो, तर तुम्ही उभं केलेलं कार्य आणखी मोठं झालेलं असेल.
आणखी कितीतरी कार्यकर्ते त्या कार्यात जोडले गेलेले असतील.
आणि पूर्वांचलाशी जोडलेलं ते नातं आणखी दृढ झालेलं असेल.
तुमचा कार्यकर्त्यांवर सगळ्यात जास्त विश्वास होता, बालकृष्णनजी.
तो विश्वास सार्थ ठरवणं—
हीच आमची तुम्हाला खरी श्रद्धांजली.
बालकृष्णनजी, नमस्कार!
लवकरच भेटू…
तोपर्यंत तुम्ही दाखवून दिलेल्या मार्गावर आम्ही चालत राहू.
– समाप्त –
लेखक : प्रसाद चिक्षे
ज्ञान प्रबोधिनी
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






