जस्मिन शेख

🌸 जीवनरंग 🌸

☆ ५ अनुवादित लघुकथा – आणखीन एक वीरगती / विश – नवीन वर्षाची / वारसा / भीती / नात्यांचा अंत – मूळ हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी अनुवाद – जस्मिन शेख ☆

☆ १. आणखीन एक वीरगती ☆

आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर लांब सियाचीनच्या बर्फाच्छादित दऱ्याखोऱ्यांमध्ये देशाची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक सैनिकांसोबत हनमन थप्पा आपल्या धरती मातेच्या सेवेत हजर होता. काही क्षणातच डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बर्फाच्या एका प्रचंड वादळाने काही सैनिकांना आपल्या मिठीत कवटाळले. तेव्हा बर्फच त्यांचे कफन बनले, बर्फातच त्यांचे दहन झाले आणि बर्फच त्यांची कबर बनली. मग सुरू झाले ‘सर्च अभियान’! 

साऱ्या जगाने तर त्यांना मृत घोषित केले होते. परंतु हनमन थप्पा यांची पत्नी महादेवी आणि कन्या नेत्रा यांच्या डोळ्यात मात्र अजूनही आशेची किरणे चमकत होती. भारतीय नारीच्या दृढ विश्वासाने प्रेरित झालेली होती ना!

शेवटी एका पत्नीच्या अचल श्रद्धेने चमत्कार घडवला. प्रचंड बर्फाच्या खाली घुसमटून गेलेला, दबून गेलेला हनमन थप्पा जिवंत सापडला. त्याच्या पत्नीचा विश्वास बहरून आला. ती हनमन थप्पाच्या सुरक्षेसाठी देवाला साकडे घालू लागली. मग काय! पूर्ण देशात प्रार्थनेचे वादळ वाहू लागले. मंदिरातील घंटा रात्रंदिवस निनाद करू लागली. मशिदीमध्ये नमाजचे पठण होऊ लागले. चर्चमध्ये प्रार्थनांचा गजर चालू झाला. तर गुरुद्वारा मधून ग्रंथं वाचनाचा आवाज घुमू लागला. भारतीयांची ही अनोखी राष्ट्रभावना बघून अख्खे विश्व विस्मयचकित झाले. ‘मेरा भारत महान’ ही भावना सर्वांच्या मनावर विराजमान झाली. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोधैर्यही वाढू लागले.

पण म्हणतात ना ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’. शेवटी करोडोंना दुःखाच्या अंधारात लोटून एका सैनिकाला वीरगती प्राप्त झाली आणि तेव्हा भारत मातेला सुद्धा अश्रू अनावर झाले.

मूळ हिंदी कथा : सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद : जस्मिन शेख

२. विश… नवीन वर्षाची !

वर्षाची शेवटची रात्र. शर्मा साहेब कुटुंबासह हॉल मध्ये विराजमान! रात्री १२वाजण्याची उत्सुकता!आज घड्याळात बघण्याची गरजच काय? फटाक्यांचा आवाज आणि आतषबाजीनेच कळून चुकेल की गतवर्षाचे बारा वाजलेत आणि नवीन वर्षाचे आगमन झाले आहे.

शर्मा साहेब म्हणाले, ” नेहमीप्रमाणे आज सगळ्यांनी आपापली एक विश सांगायची आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी वर्षभर कटिबद्ध रहायचे आहे. ” 

शर्मा वहिनींनी सुरुवात केली, ” माझी तर अशी इच्छा आहे की माझा मुलगा शिकून डॉक्टर बनावा आणि मुलीला सुखी सासर मिळावे. “

यावर नीताने लगेच आपली इच्छा प्रकट केली, ” मी माझं शिक्षण पूर्ण करून आधी नोकरी करणार नंतर लग्न, जेणेकरून जीवनात कोणती कमतरता भासू नये. “

शर्मा साहेब आणि अखिल शांत राहीले. शेवटी एका बापाने आपली इच्छा व्यक्त केली, “माझी केवळ इतकीच मागणी आहे की, माझ्या मुलाची आणि मुलीची इच्छा पूर्ण होवो आणि माझं म्हातारपण सुखात जावो. “

आता सगळ्यांच्या नजरा अखिलकडे वळल्या. फटाके फुटू लागले, रोषणाईचे नृत्य सुरू झाले. त्यातच अखिलने धमाका फोडला, ” बाबा, मला नेता बनायचे आहे. ” बाबांना धक्का बसला. मग समजावण्याच्या सुरात म्हणाले, “बाळा, नेत्याचं जीवन विवादातच अडकलेलं असतं. न पटणा-या मूल्यांशी गाठ बांधावी लागते. आणि अनिश्चित कार्यकाळ असतो. नेता केवळ लेखक आणि मिडियातील एक व्यंगचित्रं बनून राहतं. “

– – पण अखिल आपला दृढविश्वास कायम ठेवत म्हणाला, ” नाही बाबा, या देशाला आता योग्य नेत्याची गरज आहे. जर देशच विस्कटलेला असेल तर डॉक्टर, इंजिनिअर कसे टिकतील देशात? “

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जास्मिन शेख

☆ ३. वारसा ☆

रोगशय्येवर पडून शेवटच्या घटका मोजणारा बाप आणि समोर त्याचा स्नेहकांक्षी ! बाप मनातलं बोलायला व्याकूळ आणि मुलाची ऐकण्याची तेवढीच अतुरता ! बापाने स्पष्ट शब्दात मन मोकळं केलं, “बाळा, माझ्याकडे या घराशिवाय आता काहीच शिल्लक उरलं नाही. जे काही होतं ते सगळ तुझ्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालं. आज मला अभिमान आहे की माझा मुलगा विदेशात एका मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे. बस जे काही आहे ते या कपाटात बंद आहे. “

मुलाला आश्चर्य वाटलं. लोकं मौल्यवान वस्तू एकतर बँकेतील लॉकर मध्ये ठेवतात किंवा तिजोरीत! मुलाच्या मनातील गोंधळ अचूक ओळखून त्या लेखक बाप ख-या परिस्थितीवरून पर्दा उठवत म्हणाला, “मुला, या कपाटात माझी प्रकाशित पुस्तके, अप्रकाशित साहित्य-लेखन‌, वाचक आणि लेखक मित्रांनी पाठवलेले प्रशंसापत्र आहेत. हीच माझी आयुष्यभराची पुंजी आहे. जी मी तुझ्या हाती सुपूर्द करतो. “

मुलाला माहित होते की वडिलांनी अखंड आयुष्य साहित्य सेवा केली होती. शेवटी मुलगा अभिमानाने बोलला, “बाबा, या घराला मी साहित्य संग्रहालय बनवेन, अप्रकाशित लेखन‌ साहित्य प्रकाशकाकडे पाठवेन, सर्व प्रशंसापत्रांचा एक सुंदर अल्बम बनवेन आणि तुमचे स्मृतीचिन्ह आपल्या कुटुंबाची परंपरागत संपत्ती म्हणून कायम जतन करेन. हाच माझा अनमोल वारसा आहे. “

– – – असहनीय वेदनेने त्रस्त असून ही बाबांचे डोळे आनंदाने चमकू लागले.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ४. भीती ☆

विधवा आईच्या मृत्यूनंतर शालिनीने एक खूप मोठा निर्णय घेतला की ती तिच्या लहान बहिणीला एकटी सोडू शकत नाही. तिला सोबत ठेवल्याने तिची काळजीपण राहणार नाही आणि मोहिनीला एकटेपणा छळणार नाही. पतीच्या सहमतीने तिला आणखीन बळ दिलं.

मोहिनी, ताईच्या या निर्णयाने आपले सर्व दु:ख विसरून गेली. विचार केला, ताई आणि भावजींच्या आधाराने ती तिचे भविष्य उभारण्याचा प्रयत्न करेल. शहरातील प्रत्येक दिवशी घडणा-या वाईट घटनांमुळे तिच्या मनात भयंकर भिती घर बनवत होती. तिच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. अशात ताईचे संरक्षण एक शक्ती बनून तिच्यातील भीती कमी करत होती. ती आता आनंदात होती. मनापासून ताई-भावजींची काळजी घेऊ लागली.

अचानक पोटदुखीमुळे शालिनीला दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. थोड्या वेळाने ताईच्या कुशलतेचा समाचार ऐकून तिला बरे वाटले. भावजी दवाखान्यातून कधी परत येतील कोणास ठावूक? त्यांना पण पत्नीच्या तब्बेतीची काळजी आहेच की! त्यांच्याकडे डुप्लिकेट चावी आहेच. नाहीतर सकाळी दवाखान्यात जावून भावजींना घरी पाठवते. या विचारातच शेवटी ती झोपायला गेली.

अर्ध्या रात्री कोणाच्यातरी स्पर्शाने मोहिनीला जाग आली. समोर भावजींना पाहून चाट पडली. जी भिती मरून गेली होती ती पुन्हा जिवंत होऊ लागली. घृणा अन् क्रोधाच्या आवेशाने भावजींचा चेहरा नखांनी रक्ताने माखून टाकला. जुन्या भितीने पुन्हा डोके वर काढले. ती रात्र खूप जड गेली. आता केवळ घरातील नव्हे तर अखंड जगातील भितीशी संघर्ष करण्यासाठी ती कटिबद्ध झाली. पहाटेच तिच्या पायांनी वाट धरली… गर्ल्स होस्टेलची!

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ५. नात्यांचा अंत ☆

खुशहाल वृद्धाश्रमाचा रौप्यमहोत्सवी समारंभ ! समारंभाचे प्रमुख अतिथी अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. आलोककुमार यांचे आगमन! आलोककुमार याच शहराचे रहिवासी होते. याच शहरातील गल्ली-बोळात त्यांचे बालपण व्यतीत झाले होते. त्यांना माहित होते की भारतात अनुदान देऊन सन्मान मिळवण्याची प्रथा आहे. या शहरातील एक ही वृद्ध व्यक्ती निराधार राहू नये यासाठी त्यांनी खुशहाल वृद्धाश्रमला ५० लाखांची देणगी दिली.

आता मुख्य अतिथींचे गुणगान करणे, जोरदार स्वागत करणे तसेच त्यांच्या उदारतेची प्रशंसा करणे हे तर कमिटी सदस्यांची नैतिक जबाबदारी बनते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षांनी वृद्धाश्रमातील वरिष्ठ वृद्धाच्या हस्ते श्री. आलोककुमार यांचा सत्कार करण्याचे ठरवले. जेव्हा एक वृद्ध व्यक्ती कांप-या हातात फुलांचा हार घेऊन मंचावर आली. तेव्हा आलोककुमार यांच्या चेह-याचा रंग उडाला. पण गतकाळातील सर्व दु:खांवर मौनाचे पांघरूण घालून एका बापाने आपल्या मुलाच्या इभ्रतीत मोरपीस खोवले. श्री आलोककुमार यांची मान लाजेने झुकली पण लोकांना वाटले त्यांनी सत्कारासाठी मान झुकवली.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

मिरज जि. सांगली मो 9881584475

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted