मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ तुला पावू दे.. आम्हाला खाऊ दे ☆ मंजुषा सुनीत मुळे 

“ अगं आज दिवसभरात तू सकाळची पुरवणी पाहिलेली दिसत नाहीये.. ”

“ का हो.. काही विशेष बातमी आहे का? “ 

“ हो तर.. आणि खरं तर ती तूच मला सांगशील म्हणून वाट पाहात होतो मी. हे बघ.. नेहेमी ज्या हॉलमध्ये फक्त गार्डनचा सेल लागतो, त्याच हॉलमध्ये अजून मोठा सेल लागलाय म्हणे. “

“ बघू बघू.. “ –

– – मोदकासाठी सारण करत असलेल्या सविताबाई तशाच लगेच आल्या आणि अशोकरावांच्या हातातलं पेपरचं ते पान त्यांनी पट्कन ओढून घेतलं… “ सुवर्णा गॅस बारीक कर आणि सारण सारखं हलवत रहा.. आलेच मी.. “ असं म्हणत त्यांनी शेजारच्या टेबलावर ते पान पूर्ण उघडून ठेवलं…आणि खुर्चीत टेकल्या.

खूप मोठी पानभर जाहिरात.. इतर बातम्या न वाचण्याचा option नेहेमीच असतो त्यांना, पण साड्यांच्या सेलची जाहिरात म्हटल्यावर अथपासून इतिपर्यंत वाचलीच पाहिजे असा जणू दंडकच होता त्यांच्यासाठी….. त्या सेलमध्ये भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या असणार होत्या… त्याही

‘ आकर्षक ‘ डिस्काउंटसकट.. (आणि प्रत्यक्षात त्या साड्या आकर्षक असोत वा नसोत.. डिस्काऊंटला मात्र “आकर्षक” हे विशेषण असायलाच हवं असं बहुतेक संविधानातच लिहिलंय की काय या विचाराने अशोकरावांना हसू आलं)

ती जाहिरात पूर्ण वाचून झाल्यावर त्यांनी सुवर्णाला (कधी नव्हे ती) आपुलकीने हाक मारली.. “ अगं इकडे ये पटकन.. ही जाहिरात बघ.. “ 

– आणि कधी नव्हे ती एवढी प्रेमळ हाक ऐकून ‘ गॅसवरचं सारण शिजलंय नीट ‘ असं गृहीत धरून सुवर्णाने झटदिशी गॅस बंद केला आणि ती पळतच तिथे गेली …. आणि मग घड्याळाचे काटेही जणू फिरायचं विसरले. त्या सेलमधल्या अजून पाहिलेल्याही नसलेल्या साड्यांमध्ये दोघी अगदी हरवून गेल्या. (‘ मी मज हरपून बसले sss गं ‘ हे गाणं बहुतेक यांच्यासारख्या बायकांकडे बघूनच सुचलं असावं हा विचार मनात येऊन अशोकराव स्वतःशीच हसत तिथून उठले.) आणि दोघींचं चक्क एकमत झालं.. ठरलं – – “ उद्या सकाळी पटापट कामं आवरू आणि जाऊ हे प्रदर्शन बघायला.. “ (.. हे वाक्य तर गृहीतच धरलं होतं अशोकरावांनी. आता साडी-खरेदी या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयाबाबत सासू-सुनेत खडाष्टक योग डोकावणं कधीतरी शक्य होईल का? नाहीच … असं गृहीत धरून अशोकराव निर्धास्त झाले.)

ती पानभर जाहिरात बारकाईने वाचत वाचत पानाच्या शेवटच्या टोकाशी आल्यावर दोघीही एकदम दचकल्या…. एक लहानशी चौकट.. “ आज चंद्रोदय रात्री ८ वाजून ४७ मि. “ … आणि घड्याळाची टकटक अचानक सुरू झाली. चक्क आठ वाजून गेले होते, मोदकाचं सारण सोडलं तर सगळा स्वयंपाक व्हायचा होता.

सविताबाई नाईलाजाने उठल्या. ‘ ही चतुर्थी म्हटलं ना की ‘ असं स्वतःशीच पुटपुटत त्यांनी घाईघाईने गॅसवर कुकर चढवला … आणि उशीर झाल्यामुळे, कुकरला प्रेशर येण्याआधी त्यांचं ब्लड प्रेशरच बरंच वाढलं होतं. सुवर्णा खरंतर अगदी पटापट भाजी चिरत होती, पण त्या नादात “ कान्दा राहिला हातात आणि सुरी गेली की बोटात.. ‘ आई ग्ग ‘ ती कळवळली.. आणि कुकरची शिट्टी दोन ठिकाणी वाजली … सविताबाई तिच्यावर आधी एकदा खेकसल्या होत्याच.. “ अगं किती हा संथपणा.. आवर पटकन आणि लगेच तांदळाची पिठी काढ परातीत. ”.. आणि आता परत.. “ साधी भाजी चिरायलाही शिकून आली नाहीयेस का माहेराहून “.. त्यांचा टोन ऐकून ती घाबरली आणि तिचं बी. पी. घसरायला लागलं बहुतेक.. सून म्हणून नुकतीच तर आली होती ती त्या घरात … बावरून गेली एकदम.. कुठे काय ठेवलेलं असतं हेही कळलं नव्हतं अजून तिला.. कापलेलं बोट तोंडात धरलं आणि तांदुळाची पिठी समजून चुकून तिने मैदा काढला परातीत. पटकन भाजी फोडणीला टाकून सुनीताबाईंनी गॅसवर उकडीसाठी पाणी तापत ठेवलं आणि परात पुढे घेतली.. आणि झालं … तो मैदा पाहून त्यांचा संताप उतू जाणाऱ्या दुधासारखा अनावर झाला

…तोंडाचा दांडपट्टा सुरु होताच …. “ काहीच शिकवून पाठवलेलं दिसत नाहीये आईने.. साधा मैदा आणि पिठीतला फरक कळत नाही.. त्या डिग्र्या काय चाटायच्यात? उंडगी कुठली “ … बडबड करतच त्या स्वतः कपाटातला पिढीचा डबा काढायला गेल्या.. आणि सुनेकडे रागाचे कटाक्ष टाकण्याच्या नादात त्यांच्या हातून तो डबा चक्क धारातीर्थी पडला. “ आता कसा दाखवणार आहे मी मोदकाचा नैवेद्य.. की नुसतं सारण देवापुढे ठेवून म्हणू की बाबा हेच मोदक आहेत असं समज आणि पावन करून घे म्हणून ”.. आता आवाज अगदी टिपेला पोहोचलेला.. नेहेमीसारखाच.

…… धाड्कन आवाज ऐकून अशोकराव स्वैपाकघरात आले. बायकोच्या चेहेऱ्यावरचा उकळता संताप आणि सुनेच्या डोळ्यातून घळाघळा ओघळणारं पाणी पाहून सगळी परिस्थिती त्या अनुभवी नवऱ्याच्या लगेच लक्षात आली. भेदरून उभ्या असलेल्या सुनेला त्यांनी प्रेमळ नजरेनेच दिलासा दिला, आणि बायकोला म्हणाले … “ अगं असू दे.. होतं असं कधीतरी. हे बघ बाकी सगळा स्वैपाक झालाय ना… मग यावेळी मोदक राहू देत… गूळ खोबऱ्याचं सारण तयार आहे ना… आज त्याचाच नैवेद्य दाखव. मोदक राहू देत. गणपती काही संतापणार नाही तुझ्यासारखा. आणि तू आता पूजा करायला जा बघू.. सुवर्णा पट्कन पोळ्या करेल…” सुवर्णाने लगेच मान हलवली. सविताबाईंना ऐकण्याशिवाय पर्याय नव्हताच. तोंडाने बडबड आणि डोळ्यांनी तीक्ष्ण कटाक्ष टाकतच त्या पूजेसाठी देवघरात आल्या…अर्थात पूजा यांत्रिकपणे सुरू झाली.. गणपतीला त्याचं काही वाटलं नसावं कारण हा अनुभव काही नवा नव्हता त्याच्यासाठी… हा विचार अशोकरावांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. पण आता ते एका वेगळ्याच कारणाने हळूच हसत होते.. ‘उद्याची यांची प्रदर्शन भेट मनातला राग आणि ते सारण पचेपर्यंत तरी पुढे ढकलली जाणार आणि तितके दिवस माझा खिसा सुरक्षित राहणार’या विचाराने. असो.

… देव बिचारे समजुतदार… झाली तशी पूजा करुन घेतली त्यांनी.. नेहेमीसारखीच मुकाट्याने … आणि त्या बाहेर आल्या… इतक्यात सुवर्णा सारणाची वाटी घेऊन समोर आली… ‘‘आई हाच नैवेद्य दाखवणार ना आज? कुठे ठेऊ? देवळातच नेऊन ठेवू? ” … झालं… सविताबाई पुन्हा तिच्यावर डाफरल्या…. आणि तसंही आता डाफरण्यासाठी खरं तर एखाद्या valid कारणाची गरजच नव्हती ना?

‘‘काय म्हणालीस? देवळात ठेवायला नैवेद्य? कुठल्या देवळात जायचंय? ” सुवर्णाने काही न बोलता देवघराकडे बोट दाखवलं…

‘‘बाई बाई बाई …कमाल झाली आता… अगं याला देवघर म्हणतात… देऊळ नाही… कितीदा सांगायचं तुला? ”

‘‘सॉरी आई… पण माझ्या माहेरी याला देऊळच म्हणतात… तेच आठवलं मला…”

‘‘आता विसरा माहेरची कौतुकं… देऊळ म्हणे… काय काय चुकीचं शिकवून पाठवलंय कोण जाणे आई-बापांनी…” आणि सविताचा संपत आलेला संयम आता पारच संपला… आणि बहुतेक गणपतीचाही संपलाच असावा. … 

विषय अनिर्बंध भरकटत चालला होता. एव्हाना मुलगा सुजीतही घरी आला होता. पण अशोकरावांनी लगेच त्याला बाजूला घेऊन परिस्थिती सांगितली. तो बिचारा वडलांवर गेलेला. गुपचूप खोलीत जाऊन कपडे बदलून आला आणि पानं घ्यायला लागला… सुवर्णा पुढे आली. तिला हातानेच थांबायची खूण केली. तोपर्यंत अशोकराव फक्त नैवेद्याची वाटी घेऊन देवघरात गेले आणि गणपतीची क्षमा मागत नैवेद्य दाखवून बाहेर आले. सगळ्यांनाच भूक लागली होती… सगळे गुपचुप जेवायला बसले… बाप्पालाही नक्कीच अगदी हुश्श झालं असणार.

….. आणि मी? सविताच्या घराच्या बरोब्बर समोर आमच्या घराचं दार ना! समोरच्या घरात मोठमोठ्याने बोलणं ऐकू आलं… मग मी घरात कशी बसून राहू शकते हो? मी माझ्या दारात उभी राहून कानोसा घेऊ लागले. शेजारीण म्हणून जणू आद्य कर्तव्य होतं ते माझं. पण ते भांडण एन्जॉय करण्यात माझा किती वेळ गेला कोण जाणे… आता समोर सारे कसे शांत शांत भासत होते… मग मीही नाईलाजाने घरात जायला वळले……

आणि.. आणि अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर थोपटलं… ‘‘चला… गॅसवरची भाजी करपून कोळसा झालाय तिचा आता…” मी दचकून वळून पाहिलं आणि घाबरलेच… चक्क बाप्पा उभा होता माझ्याकडे हसून बघत…

‘‘ झाली ना इतरांची भांडणं एंजॉय करुन? आणि काय गं.. इतकी मैत्री आहे ना तुझी त्या सविताशी? आणि स्वत:ला खूप प्रगल्भ विचारांची समजतेस ना? … म्हणजे अहंकारच बाळगतेस की त्यासाठी… मग जाऊन सांगायचंस ना तिला की तिच्या चिडचिडीला काहीच अर्थ नाही म्हणून. अगं मारे प्रवचने देतेस ना की… देव सर्वत्र आहे… देऊळ, देवघर, देवालय, मंदिर.. काहीही म्हटलं तरी देव तिथे असतो कुठे? ‘सर्वाभूती परमेश्वर’ असं शिकवतेस ना इतरांना…आणि देव फक्त भावभक्तीचा भुकेला असतो हेही सांगतेस की शहाजोगपणा करत.. ठेक्यावर गाणीबिणी गात. पण तुझा हा वस्तादपणा माझ्यापासून लपला नाहीये हे लक्षात ठेव कायमचं. … ‘इथे ज्ञान पाजळल्याबद्दल कुणी हार घालणार नाही… समोर तबकही नाही… मग कशाला पडायचं या भानगडीत? ’ असाच विचार केला असशील… बरोबर ना? … खोटारडी कुठली.. आता तरी सुधारा रे… देवाला काय आवडतं… मोदक… की खीर… की श्रीखंड…. हे तुम्हीच ठरवा.. तुम्हाला काय खावंसं वाटतंय त्यावरून.. भोज्याला शिवून यावं तशी नैवैद्याची वाटी देवासमोर ठेवायची आणि लगेच आणून आपल्या ताटात ठेवायची की झाली पूजा पूर्ण… असंच ना? नाही गं नाही… मनापासूनचा एक नमस्कार आणि मनातली समर्पण भावना एवढंच अगदी हवं असतं गं आम्हाला … असो… मी सांगतोय ते काहीच तुझ्या डोक्यात.. खरंतर मनात शिरत नाहिये हे कळलंय मला तुझा चेहेरा पाहून… मी तरी का तुझं भलं करायला चाललोय… जाऊ दे …. आदतसे मजबूर हेच कारण आम्हा भोळ्या भाबड्या देवांचं…. असो.. आता त्या सवितासारखा तणतणत का होईना पण करणार आहेस की नाही मला नैवेद्य दाखवण्याचा ‘उपचार’? अगं तुलाच जे्वायला उशीर झाला की चक्कर येते असं सांगून सगळ्यांच्या आधी जेवून घेतेस नेहेमी हे इतरांना नसलं तरी मला माहितीये हे विसरू नकोस. आणि हो.. नैवेद्याच्या ताटात ती करपलेली भाजी तेवढी वाढू नकोस हं प्लीज…कारण ती मला नाही तर तुलाच खावी लागेल ना मग? … नाहीतर उद्या बाईला दे…. मी त्याबद्दल काही बोलणार नाही आणि ती बाई बिचारीही काही बोलणार नाही.. माझीच मनापासून भक्ती करते ती. आणि हो… मला जेवायला घातलंस अशी भ्रामक आणि निरर्थक समजूत करून घेतांना म्हणायला अजिबात विसरू नकोस बरं …. “ देवा तुला पावू दे… आम्हाला खाऊ दे…” 

आणि बाप्पा दिसेनासा झाला…

 

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted