शालिनी जोशी

? जीवनरंग 🌸

☆ झेप.. ☆ शालिनी जोशी

 (मारुती चितमपल्ली यांच्या ‘पक्षी जाय दिगंतरा ‘ या कथेवर आधारित)

निळा विशाल सागर. बाजूला एक कडा आणि त्याच्या शेजारी एक डोंगर. कड्याला एक कपार. एक छोटेसे पिल्लू त्या कपारीत येरझाऱ्या करीत होते. बरोबर कोणीच नाही. खायला काही नाही. रोज मासे आणून प्रेमाने भरवणारी आई, प्रेमाने पाठीवरून चोच फिरवणारे वडील, मजेत खेळणारी तीन भावंडे सर्व कालच त्याला सगळे सोडून गेले.

… समोर डोंगरावर ती सगळी विहरताना दिसत होती. पण पिल्लू तिथे पोहोचू शकत नव्हतं. कडेला येऊन समुद्राकडे लक्ष दिले की त्याच्या पोटात गोळा येई. पाय लटपटू लागत. समोर मासा तोंडात घेतलेली आई दिसे. ती प्रेमाने आपल्याला पहाते आहे. हे कळे पण–

काल जाताना सर्वांनी त्याला बरोबर येण्याचा खूप आग्रह केला. पण भीतीने देह हवेत सोडून देण्याचा धीर पिल्लूला झाला नाही. वडील शेवटी रागावते, असे केलेस तर उपाशी मरशील. बहीणही ओढत होती. शेवटी नाईलाजाने सर्व सोडून गेले. तो पिल्लू विचार करून थकला. भूक भागवण्यासाठी घरट्यातील अंड्याची टरफले चाटण्याचा प्रयत्न केला. जणूं स्वतः स्वतःला खाल्ले. शेवटी निराशेने बाहेर बघू लागला.

वडील हवेत गिरक्या घेत होते. तीनही भावंडे खालीवर करीत होती. कधी पाण्याकडे झेपावत होती. इतक्यात आई तोंडात मासा घेऊन त्याच्याकडे येताना दिसली. खूप आनंदाने तो चोच उघडूनच बसला. पण आई जवळ आली नाही. लांबूनच खाली वर उडत मासा दाखवत होती. कधी मासा तोंडात जातो असे त्याला झाले होते. आईचा त्याला राग आला. त्या भरात त्याने डोळे मिटले, तो पुढे सरकला. आणि काय झाले त्याचे त्यालाच कळले नाही. खूप हलके हलके वाटत होते. त्याचे पंख उघडले होते आणि तो वरवर जात होता. नकळत तो खाली झेपावला. समुद्राच्या पाण्यातल्या माशांकडे लक्ष वेधले. पाण्याचा पायाला स्पर्श झाला. पण तो पाण्यात खाली गेला नाही. अलगत त्याने माशाला चोचीत धरले. वरवर जाऊ लागला. उडण्याची कला त्याला साधली.

सर्वांना आनंद झाला. भावंड आजूबाजूला, वडील वरती, आई खालती. सर्व कुटुंबाने सुखाने हवेत रिंगण घेतलं. पिल्लूचा पराक्रम सर्व साजरा करत होते. आईच्या नजरेत वेगळच समाधान होतं. पिल्लू स्वावलंबी झालं. वडिलांना कृतार्थ वाटलं. जगाच्या पसाऱ्यात वावरण्यास ते लायक झालं. आनंदाने वर निळ्या आकाशात, खाली निळ्या सागरात विहरू लागलं. आई-वडिलांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. भित्र्या मुलाला पंख फुटले. अनंत आकाश त्याचं घर झालं.

अशी ही छोट्या समुद्रपक्षाची कथा. मुलासाठी आई-वडील काहीही करायला तयार असतात. त्यांचे हित हाच हेतू असतो. जगात त्याला ताठ मानेने स्वकर्तुत्वावर जगता यावे हीच इच्छा असते. त्यासाठी रागालोभाचे मार्ग आचरावे लागतात.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted