डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ अंधाराची सावली… ☆ डॉ. शैलजा करोडे

“निलिमा मॅडम, 28 फेब्रुवारी विज्ञानदिन. यानिमित्ताने आपल्या शाळेत विज्ञान कथास्पर्धेचे आयोजन करुया, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळेल व त्यांच्या मनात विज्ञानाविषयी गोडीही निर्माण होईल. कथेचा विषय व इतर नियमावली तुम्ही तयार करुन नोटीस बोर्डवर लावायला द्या. कथांचं परीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून काही बक्षीसंही देऊयात “. ” होय मॅडम, मी करते सगळं आयोजन. स्पर्धा यशस्वी होईल मॅडम ” “दॅट्स गुड. किप इट अप. शुभस्य शीघ्रम मॅडम. कारण वेळ फार कमी आहे. आज 21फेब्रुवारी, आपल्या हातात फक्त चार/पाच दिवस आहेत.

मी स्टाफ रूममध्ये आले. पुढचा पिरेड मला आँफ होता. चला विज्ञान कथेचा विषय ठरवायला वेळ मिळाला. काय बरं विषय ठरवावा. होय सुचला कि विषय ” कृष्णविवरातील अंधाराचा भेद “होय हाच विषय ठेवूया. मुलांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळेल. छान छान काल्पनिक विज्ञान कथा तयार होतील. येस, वाॅव, माझ्या चेहर्‍यावर स्मित झळकलं. काय निलिमा मॅडम खुश आहात “, माझी सहकारी अपर्णा पोतनीस स्टाफ रूममध्ये प्रवेश करीत बोलत होती. “काही नाही गं, असंच ‘. ‘असंच कसं, काहीतरी तर कारण असेल ना ‘ ” काही विशेष नाही ग अपर्णा ‘ ‘ नसेल सांगायचं तर नको सांगूस निलिमा. पण आनंद वाटून घेतल्याने द्विगुणित होतो म्हणतात ” मी माझी कल्पना अपर्णा बरोबर शेअर केली. ‘ अरे वाह, किती छान विषय आहे ग. मुलांनाही आवडेल आणि स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल बघ. खूप खूप शुभेच्छा. ‘ धन्यवाद अपर्णा ‘ तास संपल्याची घंटा वाजली आणि आमचा संवाद थांबला. मी खडू, डस्टर घेऊन वर्गात जाण्यासाठी निघाले.

स्पर्धेला खरंच भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ चाळीस मुलांनी कथा लिहिल्या होत्या.

कृष्णविवर, महा भयंकर अंधार, प्रकाशालाही गिळंकृत करणारा, अभेद्य, पण या अंधाराचाही शोध वैज्ञानिकांनी घेण्याचा प्रयत्न केलाय. मी कथांचं परीक्षण करीत होते.

इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (EHT): जगभरातील रेडिओ टेलिस्कोप एकत्र करून तयार केलेल्या या आभासी टेलिस्कोपमुळे मानवाला इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये ‘M87*’ आणि २०२२ मध्ये आपल्या आकाशगंगेतील ‘Sgr A*’ या कृष्णविवराची थेट छायाचित्रे घेणे शक्य झाले.

हॉकिंग रेडिएशन सिद्धांत: महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध केले की कृष्णविवरे पूर्णपणे काळी नसतात;

त्यातून पुंज भौतिकशास्त्राच्या (Quantum Mechanics) नियमांनुसार सूक्ष्म किरणोत्सर्ग बाहेर पडतो, ज्यामुळे ती हळूहळू नाहीशी होऊ शकतात.

गुरुत्वीय लहरी (Gravitational Waves): २०१५ मध्ये ‘LIGO’ वेधशाळेने दोन कृष्णविवरांच्या टक्करीतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला, ज्यामुळे कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी विज्ञानाला ‘नवे डोळे’ मिळाले.

अॅक्रेशन डिस्कचा प्रकाश: कृष्णविवराच्या भोवती फिरणारा वायू आणि धूळ तीव्र वेगाने फिरताना प्रचंड घर्षणामुळे चमकू लागतात, या प्रकाशाच्या मदतीने कृष्णविवराच्या सीमांची (Event Horizon) अचूक रचना समजते.

कृष्णविवराचे मुख्य भाग

सिंग्युलॅरिटी (Singularity): कृष्णविवराचा केंद्रबिंदू जेथे संपूर्ण वस्तुमान एका अनंत सूक्ष्म बिंदूत एकवटलेले असते तेथे भौतिकशास्त्राचे नियम कोलमडतात.

इव्हेंट होरायझन (Event Horizon): कृष्णविवराची ती अंतिम सीमा ज्याच्या आत गेलेली कोणतीही वस्तू किंवा प्रकाश कधीही परत येऊ शकत नाही.

विज्ञानाने अत्यंत प्रगत टेलिस्कोप, गणिताची सूत्रे आणि भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांच्या जोरावर कृष्णविवराच्या अंधाराचा भेद करून त्याची छायाचित्रे आणि अस्तित्व जगासमोर आणले आहे.

बाप रे बाप, मुलांनी काय अभ्यास केलाय. किती सविस्तर आणि सखोलात जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केलाय. खरंच मानलं पाहिजे आजच्या पिढीला. माहिती तंत्रज्ञान, सगळी इलेक्ट्रानिक माध्यमं आणि AI ची होणारी मदत, जणू ज्ञानगंगा दारी आलीय आजच्या युगात.

आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात कृष्णविवराचा शोध घेऊन त्या अंधाराला भेदण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

असाच, असाच अंधार वारंवार जीवनातही येतो, माझ्याही जीवनात अनेकदा आला. म्हणतात ना जेव्हा अंधार येतो ना तेव्हा आपली सावलीही सोबत सोडते म्हणतात. पण, पण, सावली आपल्या सोबतच असते. कारण आपण तिथे असतो, फरक एवढाच कि आपल्याला ती दिसत नाही. जेव्हा संकटे येतात, वादळे येतात, परीक्षेचे क्षण येतात तेव्हा या अंधाराला भेदते आपली सावली, होय सावलीच, मग ती आपला आत्मविश्वास जागवते, मनाला खंबीरता देते, संकटांशी झुंजण्याची शक्ती देते तर चोहीकडे पसरलेल्या अंधारातही प्रकाशकिरण शोधण्याची हिंमत देते.

सात आठ वर्षाची असेन मी, घरात आई कॅन्सरशी झुंज देत होती, दोन लहान भावंडे, सगळी जवाबदारी माझ्यावर, जमेल तसा कच्चा पक्का स्वयंपाक मी करायची, आईची सेवा करुन शाळेत जात होती. आणि तो काळा दिवसही आला, आईने जगाचा निरोप घेतला.

आम्हां भावंडासाठी बाबांनी पुन्हा संसाराची घडी बसविली. सावत्र आई, तिला कसलं प्रेम माया, सातत्याने मला कामाला जुंपायची, जेमतेम 13 वर्षाची असेल मी. बाबांना माझे हात पिवळे करायला लावले. माझे शिक्षण सातव्या इयत्तेतच थांबले.

लहान लहान भावंडे सोडून मी सासरी आले. माझं लक्ष भावंडांकडे लागायचं.

“लग्न झालंय तुझं आता, विसर सगळं माहेर आणि लाग संसाराला ” सासूबाईंची टोचणी. नणंदेचा तोरा होताच. पतीराजही बायकोला नेहमी धाकात ठेवले पाहिजे या विचारसरणीचे. घरात कोणाला उलटून बोलण्याची हिंमत नाही. काही चुकल्यास, मनाविरूद्ध घडल्यास मारहाणही व्हायची मला. जीवनाची गाडी अशी चालू असतांनाच मातृत्वाचं ओझंही माझ्यावर लादलं गेलं केवळ सतराव्या वर्षीच. गोंडस, गोड गोजिरं बाळ कुशीत आलं आणि या प्रकाशाने माझ्या जीवनातील अंधाराचा भेद केला. बाळाला कुशीत घेतांना ब्रम्हांड सुखाचा अनुभव मी घेत होते.

आणि एक दिवस कोसळणार्‍या पाऊसधारा, दाटलेला अंधार, विजेच्या कडकडाटासह, घोंघावणारा वारा, जणू प्रलयाची नांदी देणारा, पतीराज अजून घरी आले नव्हते. माझी अस्वस्थता वाढलेली. दरवाज्यातून, खिडकीतून यांची वाट पाहात होते. हळूहळू पाऊस थांबला पण माझ्यासाठी धरणी दुभंगणारी बातमी घेऊन आला. वादळी पावसात घरी येतांना रस्त्याच्या कडेला असलेला वृक्ष उन्मळून पडला होता, तो नेमका माझे पती अशोकच्या अंगावरच, सोबत वीजेच्या तारा. तत्क्षणीच त्यांचा मृत्यू झालेला.

कुशीत सहा महिन्याचा माझा गौरव व मी पुन्हा अंधाराने वेढले गेलो. सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. पण बाळासाठी मला पुन्हा मला उभं राहाणं भाग होतं. शिवणकला मी शिकलेली होती. शहरातीलच सुधर्मा फाऊंडेशन विद्यार्थ्यांना गणवेष, पुस्तकं, जलमंदिर अर्थात पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच अपंगाना सायकल व निराधार भगिनींना शिवणयंत्राचे वाटप करायचे. माझा आर्थिक प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी तो पुरेसा नव्हता. मला पुढील शिक्षण घेणं भाग होतं. मी बहिःस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली, उत्तीर्ण झाले. डी. एड. साठी अर्ज केला, प्रवेशही मिळाला. प्रश्न होता गौरवला सांभाळण्याचा. यावेळी मात्र बाबांनी सगळा विरोध पत्करून गौरवला सांभाळण्याची जवाबदारी घेऊन माझा मार्ग सुकर केला.

यथावकाश माझे शिक्षण पूर्ण होऊन मला शाळेत नोकरीही मिळाली. आर्थिक स्वावलंबनाने माझ्या जीवनातील अंधार कमी झाला होता. आता मी पदवी परिक्षेचाही अभ्यास सुरू केला होता. यशाची दालनं हळूहळू उघडत गेली आणि मी आज ज्युनियर काॅलेजमध्ये प्राध्यापिका होते.

माझा गौरवही एमबीबीएस च्या शेवटच्या वर्षाला होता. अंधाराचा भेद झाला होता.

अंधारातील माझ्या आत्मविश्वासरूपी सावलीनेच मला प्रकाशाचा मार्ग दाखविला होता.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted