शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “मोक्षाच्या शोधात…” – मूळ मल्याळी लेखक : अज्ञात – मराठी अनुवाद : रामदास पाटील खानिवलीकर ☆ प्रस्तुती – शोभा जोशी

मी माझ्या आजारी वडिलांना काशीतील मुक्ती भवनात घेऊन चाललो होतो, या अपेक्षेने की ते तिथे लवकरच निधन पावतील.

माझी तिथे जाण्याची इच्छा होती म्हणून नव्हे. पण वडिलांचे सततचे आजारपण, त्यांची दुर्बलता आणि औषधं व उपचारांवरील न संपणारा खर्च यामुळे मी पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यांच्या देखभालीवर मी आधीच खूप खर्च केला होता, आणि आता असंच पुढे चालू ठेवणं मला शक्य नाही असं मला वाटू लागलं होतं.

तेव्हाच एका जवळच्या मित्राने मला काशीतील मुक्ती भवनाबद्दल सांगितलं.

तो म्हणाला की हिंदू श्रद्धेनुसार, काशीत मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, आणि मुक्ती भवन ही अशा सर्वात प्रसिद्ध जागांपैकी एक आहे जिथे लोक त्यांचे शेवटचे दिवस घालवतात. “तू तुझ्या वडिलांना तिथे नेलंस, तर तुला शांती मिळेल आणि तुझ्या वडिलांना मोक्ष मिळेल. “

आणि म्हणून, एके दिवशी मी वडिलांना घेऊन रेल्वेत बसलो. माझे वडील खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची चिन्हे होती, पण डोळे शांत होते.

“आपण कुठे चाललो आहोत, बाळा?” त्यांनी विचारलं.

“काशीला. “

“काशीला? अरे, माझ्या महादेवा! ही यात्रा करायची इच्छा मला कित्येक वर्षांपासून होती. “

त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद माझ्या हृदयाला भिडला. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

संपूर्ण प्रवासात माझे वडील भूतकाळाबद्दल बोलत राहिले. लहानपणी मला ताप आला होता तेव्हा ते रुग्णालयात माझ्यासोबत कसे थांबले होते. माझी शाळेची फी भरण्यासाठी माझ्या आईने तिच्या बांगड्या कशा विकल्या होत्या. मला हवी असलेली सायकल घेण्यासाठी ते रात्री उशिरापर्यंत ऑटो-रिक्षा कसे चालवायचे.

मी ऐकत होतो.

पण माझ्याकडे बोलायला फार काही नव्हतं.

खूप लांबच्या प्रवासानंतर आम्ही वाराणसीला पोहोचलो आणि मुक्ती भवनात आलो.

मला भयाण शांतता अपेक्षित होती, मृत्यूची शांतता.

पण मी जे पाहिलं ते वेगळंच होतं.

लहान खोल्या. पांढऱ्या भिंती. जुने छताचे पंखे हळू हळू फिरत होते. मृत्यूची वाट पाहणाऱ्यांसाठी प्रार्थना म्हणत साधू कॉरिडॉरमधून फिरत होते.

मी वडिलांना आम्हाला दिलेल्या खोलीत नेलं.

“मी खूप थकलोय, बाळा. मला जरा पडू दे. “

मी मान हलवली.

ते झोपलेले पाहताच, मी टेबलावरून माझी बॅग उचलली आणि बाहेर पडलो.

मागे न पाहता घाईघाईने निघालो असताना, एका खोलीचा दरवाजा थोडा उघडा दिसला आणि मी आत डोकावलं.

एक वृद्ध गृहस्थ खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होते. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता—कदाचित त्यांच्या पत्नीचा किंवा मुलाचा. अधूनमधून ते फोटोकडे पाहून हसत होते.

दुसऱ्या खोलीत, एक वृद्ध स्त्री डोळे मिटून हातात माळ घेऊन प्रार्थना करत बसली होती. तिच्या शेजारी कोणीही नव्हतं.

पण ती एकटी नव्हती.

तिच्या आठवणी तिच्यासोबत होत्या.

कॉरिडॉरच्या शेवटी, एक वृद्ध वडील बिछान्यावर पडले होते. त्यांच्या शेजारी एक तरुण त्यांचा हात धरून बसला होता.

“बाबा, मी इथेच आहे, ” तो सारखं म्हणत होता. “घाबरू नका. “

त्या वृद्धाला ते ऐकू येत होतं की नाही माहीत नाही.

पण मुलाच्या आवाजात प्रेम होतं.

तिथे प्रत्येकजण मृत्यूची वाट पाहत होता.

तरीही मला वाटलं की त्यांच्यापैकी बरेचजण दुसऱ्याच कशाची तरी वाट पाहत आहेत.

एक फोन कॉल.

एक भेट.

मुलाचे दिलासा देणारे शब्द.

मुलीची “बाबा”अशी हाक.

त्याचीच ते खरं तर वाट पाहत होते.

तिथल्या एका कर्मचाऱ्याने मला पाहिलं आणि म्हणाला:

“इथे येणारे बहुतेक लोक मृत्यूला घाबरत नाहीत, साहेब. त्यांना जास्त दुःख होतं ते या विचाराने की त्यांचे प्रियजन त्यांना विसरले आहेत. ते म्हणतात इथे मृत्यू आल्याने मोक्ष मिळतो, पण आपल्या मुलांमध्ये शांतपणे मरणं आणि इथे एकटं मरणं यात खूप मोठा फरक आहे. “

तो पुढे म्हणाला:

“इथे येणारे बरेच लोक लवकर मरतात—आजारीपणामुळे नाही, तर त्यांची मुलं त्यांना सोडून गेली आहेत हे कळल्यावर त्यांचं हृदय फाटतं म्हणून. “

त्या शब्दांनी मला हादरवून सोडलं.

मी आजूबाजूला पाहिलं.

काही डोळे दाराकडे रोखलेले होते—

कोणीतरी येण्याची वाट पाहत.

काही डोळे आकाशाकडे वळलेले होते—

कोणीतरी फोन करेल याची वाट पाहत.

आणि काही डोळ्यांत तर आशाच उरली नव्हती.

फक्त वाट पाहणं.

अचानक मला माझ्या वडिलांची आठवण झाली.

मी मागे वळलो आणि धावलो.

जेव्हा मी खोलीत शिरलो, तेव्हा माझे वडील बिछान्यावर उठून बसले होते, घामाने न्हाऊन निघाले होते, अशक्त दिसत होते.

तेही उघड्या दाराकडे पाहत होते.

मला पाहताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

आणि मी विचार केला:

जर मी आता निघून गेलो, तर उद्या माझे वडील त्या दाराशी वाट पाहणारा आणखी एक चेहरा बनणार नाहीत का?

त्या क्षणी, मुक्ती भवन मला फक्त एक इमारत वाटली नाही.

ते एक शांत जग वाटलं जिथे आयुष्यभर इतरांची काळजी घेणारी माणसं प्रेमाच्या एका शेवटच्या स्पर्शाची वाट पाहत होती.

मी या विचारांत हरवलो असताना, मला वडिलांची हाक ऐकू आली.

“बाळा… “

“हो, बाबा?”

“तू गेला नाहीस?”

“मी कुठे जाईन?”

“मला माहीत आहे तू मला इथे सोडायला आणलंस. “

ते थांबले.

“पण मी तुला दोष देत नाही. आई-वडील म्हातारे झाले की ते कधी कधी मुलांसाठी ओझं होतात. कदाचित मीही तुझ्यासाठी ओझं झालो असेन. “

मग त्यांनी माझा हात घट्ट धरला.

“पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाळा… “

“आई-वडिलांसाठी सर्वात मोठा मोक्ष काशीत मरणं हा नाही. तो मुलांच्या हृदयातून काढून टाकलं न जाणं हा आहे. “

“कृपा करून माझा तिरस्कार करू नकोस, बाळा. मी गेल्यावर माझे विधी कर. “

त्या शब्दांनी माझं हृदय विदीर्ण झालं.

“इथे जास्त वेळ थांबू नकोस, बाळा. जा. पण जाण्यापूर्वी तुझ्या वडिलांना एक मिठी मार आणि एक पापी दे. मला तुला पुन्हा एकदा जवळ घ्यावंसं वाटतंय. “

त्यांची शेवटची इच्छा.

“बाबा… “

मी ढसाढसा रडलो.

वर्षानुवर्षांचा स्वार्थ आणि हिशेब माझ्या अश्रूंमध्ये विरघळून गेले.

त्या रात्री, मी मुक्ती भवनातील खोलीत वडिलांजवळ झोपलो.

झोपलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहताना मला एक सत्य कळलं:

माझ्या आयुष्यातील सर्वात सुरक्षित जागा कधीतरी या माणसाचा खांदा होती.

मी घाबरलो तेव्हा त्यांनीच मला धरलं होतं.

मी पडलो तेव्हा त्यांनीच मला उचललं होतं.

मी अपयशी ठरलो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले होते.

मग मी त्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षांत कसं सोडून देऊ शकतो?

दुसऱ्या दिवशी सकाळी, मी घरी परतण्याची तिकिटं बुक केली.

आम्ही निघायची तयारी करत असताना, मुक्ती भवनातील कर्मचाऱ्यांनी माझ्या वडिलांच्या शांत मृत्यूसाठी प्रार्थना करण्यासाठी साधूंना बोलावलं.

मी त्यांना थांबवलं.

“आता त्याची गरज नाही, ” मी म्हणालो.

“माझ्या वडिलांना मोक्ष मिळालेला नाही.

मोक्ष मला मिळाला आहे. “

माझ्या वडिलांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं.

“तुला काय म्हणायचंय, बाळा?”

मी त्यांचा हात धरला.

“चला बाबा, घरी जाऊया. पण आधी, गंगेत डुबकी मारून प्रभूचं दर्शन घेऊ. “

“मग, मला इथे राहावं लागणार नाही?” त्यांनी विचारलं.

“का राहावं लागेल?”

“ज्याला मुक्तीची गरज होती ते तुम्ही नव्हता.

माझं मन होतं—ते मन जे स्वतःच्या वडिलांना ओझं समजलं होतं. “

माझ्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू भरून आले.

त्या क्षणी, काशीच्या मंदिरातील घंटानादापेक्षा अधिक पवित्र होता त्या वृद्धाच्या चेहऱ्यावरून ओघळणारा तो मूक अश्रू.

सर्व मुलांना आणि सर्व वडिलांना समर्पित.

 

मूळ मल्याळी कथालेखक : अज्ञात

स्वैर अनुवाद : रामदास पाटील खानिवलीकर

प्रस्तुती : शोभा जोशी 

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted