श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(“नाही गं बाई! मी तुझ्या संसारात अजिबात ढवळाढवळ करणार नाही.तू आणि तुझ्या सासरचे काय ठरवायचं ते ठरवा.तुमच्या घरात भांडणं लावायची माझी अजिबात इच्छा नाही “

“बरं “) 

इथून पुढे – –

एक महिन्याने विनायक घरी आला तर माधवी त्याला उत्साहाने म्हणाली

“अहो आनंदाची बातमी आहे.नयनाला नोकरी लागली “

” अरे वा! कोणत्या कंपनीत आणि किती पॅकेज आहे? “

कंपनीचं नाव सांगून माधवी म्हणाली

” सध्या सहा लाखाचं पॅकेज आहे आणि पुढे वाढेल असं ती म्हणत होती “

” वा छानच! पण आता कशी लागली नोकरी? काही ओळखबिळख होती का? “

” नाही हो.कसली ओळख आणि कसलं काय! इंटरव्ह्यूच्या अगोदर सहासात दिवसापासून ती अभ्यास करत होती.जावईबापूंनी तिच्या मागे लागून तिची छान तयारी करुन घेतली होती म्हणे “

“आपण हेच तर सांगत होतो तिला की इंटरव्ह्यूला जातांना थोडी तरी तयारी करुन जा.पण आपलं तिनं कधी ऐकलं नाही “

” जाऊ द्या.आता सासरी तिला अभिमानाने रहाता येईल.पैशासाठी कुणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही “

“ते ठिक आहे माधवी पण आपण दिलेल्या शिक्षणाचा तिनं आपल्याला नाही सासरच्यांना फायदा करुन दिला याची मला खंत वाटते “

” तेही खरंच पण तिनं जी थोडीफार नोकरी केली तेव्हाही आपण तिचा पगार कधी मागितला नाही. आपल्याला कधी तशी गरजच भासली नाही “

“तिच्या सासरच्यांनाही कुठे तिच्या पैशाची गरज आहे? नवऱ्याला चांगला पगार आहे शिवाय सासूसासऱ्यांनाही चांगलं पेंशन आहे.जाऊ दे.जे आहे त्यात आपण आनंद मानायचा.ती खुश, तिच्या सासरचे खुश.अजून आपल्याला काय पाहिजे? “

” खरंय “

एक महिन्यानंतर एक दिवस अचानक विनायकच्या मोबाईलवर खात्यात वीस हजार जमा झाल्याचा मेसेज आला.मेसेजवर नयनाचा नंबर पाहून विनायक चांगलाच चक्रावला.त्यानं लगेच तिला फोन लावला.

“बेटा हे कसले पैसे तू मला पाठवले आहेत? “

“बाबा मी आता मी मिटिंगला चाललेय.त्यामुळे आता बोलता येणार नाही. पण मी तुम्हांला सविस्तर मेसेज व्हाॅटस्अपवर पाठवलाय.तो वाचल्यानंतर कदाचित तुम्हांला बोलायची गरज भासणार नाही. वाचून घ्या.ठेवू मी फोन? ” आणि फोन कट झाला.

विनायकनं उत्सुकतेने व्हाॅटस्अप उघडलं.तिथे खरोखरच नयनाचा भला मोठा मेसेज होता.

“प्रिय आदरणीय बाबा,

मी तुम्हांला पैसे पाठवलेत याचं तुम्हांला आश्चर्य वाटलं असेल.तीनचार दिवसांपूर्वीच माझा पहिला पगार झाला.कापूनकुपून चाळीस हजार हातात पडला. बऱ्याच वर्षांनी इतके स्वकमाईचे पैसे हातात आल्यावर खुप आनंद झाला.बाबा मी इथे नोकरीत लागल्यावर एक अशी घटना घडली की जिच्यामुळे मी आरपार बदलून गेले आहे.त्या घटनेमुळे लग्नापूर्वी मी माहेरी असतांना तुम्हांला खरंच खुप त्रास दिला याची मला जाणीव आणि पश्चाताप होऊ लागलाय.झालं असं की माझी काॅलेजची एक पुजा परदेशी नावाची मैत्रीण मला इथे कंपनीत भेटली.हो ही तीच पुजा जिचे वडील सायकलवर भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे.खुप गरीब मुलगी पण अतिशय हुशार. ती इथे गेल्या तीन वर्षांपासून काम करतेय आणि सध्या तिला अठरा लाखाचं पॅकेज आहे.ती मला सांगत होती की माझ्यासोबत इंजीनियरींग सुटल्यावर ती एकही दिवस रिकामी बसली नाही. इंजीनियरींग झाल्यावर तिनं लगेच शाळेतल्या मुलांच्या ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली.एका महिन्यातच तिला एका छोट्या एजन्सीजमध्ये जाॅब लागला.खरं तर त्या जाॅबचा इंजिनिअरिंगशी काहिही संबंध नव्हता.पण घरची परिस्थिती वाईट म्हणून कशाही मार्गाने आलेले पैसे तिला चालणार होते.एक वर्षाने तिला पुण्यातल्या एका कंपनीत जाॅब लागला.पॅकेज कमीच होतं पण त्या अनुभवावर तिला पुण्यातल्या पुण्यात तीनचार ठिकाणी जाॅब बदलता आले.दोन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं.लग्नाआधी तिनं नवऱ्याला अट टाकली की ‘ आईवडिलांनी पोटाला चिमटे घेऊन दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर मला नोकरी मिळालीये.माझ्या पगारावर खरा हक्क त्यांचा आहे.आज ते दोघंही थकलेत.त्यांच्याकडून आता भाजीविक्रीचा व्यवसाय पुर्वीसारखा होत नाही. माझ्या भावाचं शिक्षण सुरु आहे.तर जोपर्यंत माझा भाऊ शिकून कमवायला लागत नाही तोपर्यंत मी माझ्या पगारातला अर्धा पगार माझ्या आईवडिलांना पाठवणार ‘ तिचा नवरा आणि सासूसासरेही समजदार निघाले.त्यांनी कोणतीही आडकाठी घेतली नाही. मागच्याच वर्षी तिला इथे आमच्या कंपनीत जाॅब मिळाला.आणि अजूनही ती आईवडिलांना अर्धा पगार पाठवते.तिची कहाणी ऐकून मी खुप भारावून गेले.माझ्या वागण्याची मला लाज वाटू लागली.तुम्ही म्हणायचा की ‘अगं बेटा आम्हांला तुझ्या पैशांची गरज नाहिये.पण तू कुठेतरी, कशाततरी गुंतलेली आहे याचंच आम्हांला समाधान हवंय ‘तुमचंही बरोबरच होतं, तुमच्या सगळ्या मित्रांची माझ्या बरोबरची मुलं नोकरीला लागली होती किंवा काही व्यवसाय करत होती.मीच एकटी रिकामी बसले होते.मित्र, नातेवाईक तुम्हांला माझ्याबद्दल विचारत असतील तेव्हा तुमची परिस्थिती किती ऑकवर्ड होत असेल या कल्पनेनेच मला कसंतरी होतंय.आपल्या सर्व गरजा, इच्छा आईवडिलांनी पुर्ण कराव्यात अशी मुलांची अपेक्षा असते तशीच मुलांनी शिकून कुठंतरी कामधंद्याला लागावं अशी आईवडिलांचीही अपेक्षा असते ती मी पुर्ण करु शकले नाही याची रुखरुख मला वाटू लागलीये.मी खरंच बाबा तुम्हां दोघांना खुप त्रास दिला. गेलेल्या काळाची भरपाई तर मी करु शकणार नाही पण तुम्ही माझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला त्याची भरपाई तर नक्कीच करु शकते.मी ठरवलंय की कमीतकमी पाच वर्ष तरी अर्धा पगार तुम्हांला पाठवायचा.मला कल्पना आहे की तुम्हांला ते आवडणार नाही.”तुला शिकवणं माझं कर्तव्यच होतं “असं तुम्ही म्हणाल.तुमचं कर्तव्य तुम्ही व्यवस्थित पार पाडलं बाबा.आता माझं कर्तव्य मला पार पाडू द्या.प्लीज नाही म्हणू नका आणि मी पाठवलेला अर्धा पगार मला परत पाठवू नका.मला ही सुद्धा कल्पना आहे की माझ्या पैशांची तुम्हांला काहिच गरज नाहीये आणि मुलीकडून पैसे घेणं तुम्हांला आवडणारही नाही.पण असं समजा की मी माझ्यावरचं कर्ज फेडतेय.या पैशांचा उपयोग सहलींसाठी करा, समाजसेवेसाठी करा किंवा कशासाठीही करा मी तुम्हांला एका शब्दानेही विचारणार नाही. पण प्लीज नाही म्हणू नका.तुम्ही नाही म्हंटलात तर मी असं समजेन की तुमचं माझ्यावर प्रेमच नाहिये “

तो मेसेज वाचून विनायकला गहिवरून आलं.उशीरा का होईना आपल्या मुलीला जाणीव झाली याचं त्याला समाधान वाटलं.

घरी येऊन त्यानं नयनाचा मेसेज माधवीला वाचून दाखवला.तो वाचून माधवी म्हणाली

” हो.आज सकाळीच मला तिचा फोन आला होता.खुप इमोशनल झाली होती.मला म्हणत होती की बाबांना सांग पाठवलेले पैसे परत नका करु म्हणून “

“पण तिच्या नवऱ्याला आणि सासूसासऱ्यांना आवडेल का असा तिनं अर्धा पगार पाठवला तर? “

” हो तिचा नवरा आणि सासू दोघंही माझ्याशी बोलले.त्यांना उलट तिचा हा निर्णय खुप आवडलाय “

” वा मग तर काही प्राॅब्लेमच नाही.माझ्या डोक्यात एक कल्पना आलीये.अशीही आपल्याला तिच्या पैशांची गरज नाहीये.तर आपण आता असं करु तिनं पाठवलेल्या पैशात आपले थोडे पैसे टाकून गरीब, पैशाअभावी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलींसाठी नयनाच्याच नावाची एक स्काॅलरशिप सुरु करुया.म्हणजे तिचा पैसा योग्य कारणासाठी वापरला जाईल “

” वा खुपच छान आयडिया आहे.तिला कळवून टाका तसं.तिलाही खुप आनंद होईल “

” नको.तिला जरी आनंद झाला तरी तिच्या सासरच्यांना ते आवडेल की नाही ते सांगता येत नाही.आता नवीनच तिचं लग्न झालंय.आतापासून तिच्या संसारात गैरसमज नकोत.योग्य वेळ आली की आपण ते उघड करु “

“चालेल “

विनायकनं मोबाईल उचलला आणि तो नयनासाठी मेसेज टाईप करु लागला.

“बेटा उशीरा का होईना तुला जाणीव झाली.याचा आम्हां दोघांनाही खुप आनंद होतोय.

तुझा निर्णय आवडला.विशेष म्हणजे तुझ्या निर्णयाला सासूसासरे आणि जावईबापूंचा पाठींबा आहे याचा जास्तच आनंद होतोय.माणसं चांगली आहेत.पुढेही त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नकोस.तुझ्या आग्रहास्तव तू पाठवलेले पैसे ठेवून घेत आहोत.ते पैसे चांगल्या कारणासाठीच वापरले जातील हा माझा शब्द आहे.तू आमच्या भावना जाणून घेतल्यास त्याबद्दल आम्हांला तुझा अभिमान वाटतो.आईवडिलांना दुसरं तरी काय हवं असतं? त्यांना मुलांचा पैसा नको असतो मात्र मुलांनी काहितरी अभिमानास्पद कार्य करावं, चारचौघात मुलांविषयी बोलतांना मान ताठ व्हावी असं मुलांचं कर्तृत्व असावं एवढीच त्यांची अपेक्षा असते.आज ती अपेक्षा पुर्ण केलीस याचा आनंद होतोय “

थोड्या वेळाने तिचा मेसेज आला

“आय लव्ह यू बाबा “

तो मेसेज पाहून विनायकचे डोळे अश्रूंनी भरुन आले.

समाप्त —  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted