ज्योती कुळकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कण कण जीवन” (अनुवादित कथासंग्रह)  – अनुवादिका : उज्ज्वला केळकर ☆ परिचय –  सौ.ज्योती कुळकर्णी ☆

पुस्तक : कण कण जीवन (अनुवादित कथा-संग्रह) 

अनुवादिका : उज्ज्वला केळकर 

प्रकाशक : स्वरूपदीप प्रकाशन सोलापूर.

मूल्य : 250 रुपये.

आजकाल मला मोबाईल वरच्या वाचनाचा खूप त्रास होतो. त्यामुळे मी लायब्ररी लावली. मी या वेळेला पुस्तक बदलायला गेले तो उज्वलाताई केळकर यांनी अनुवाद केलेले ‘कण कण जीवन’ हे पुस्तक दिसले. दिसल्याबरोबर मी उचलले. खरोखर अप्रतिम कथांचा अनुवाद केलेला आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेखकाची प्रत्येक लघुकथा उत्तम आहे. उज्वलाताईंच्या कथा सुद्धा अतिशय उत्तम आहेत.

उज्ज्वला केळकर

वाचन सुरू असताना कामासाठी उठल्यानंतर मध्ये पुस्तक खाली ठेवून देखील वाचता येतं त्यामुळे मला कथा संग्रह नेहमीच खूप आवडतो.

या संग्रहाची सुरुवात घनश्यामजी अग्रवाल यांच्या कथांनी झालेली. खरंच प्रत्येकच कथा छानच आहे. नमुन्या दाखल एक कथा सांगते, ‘ तिचा आतला आवाज’.

– – – डॉक्टरी इलाज पूजापाठ गंडेदोरे करून थकलेलं जोडपं शेवटी अनाथालयात मुलगा दत्तक घ्यायला जाते. एक मूल ते जोडप्याला आवडतं. मॅनेजरही म्हणतो की मुलगा खूप छान आहे घ्या तुम्ही दत्तक! काही दिवसांपूर्वी एक जोडपं इथे आले होते. त्यांना पण हे बाळ खूप आवडले होतं मुलात कुठलीच खोट नव्हती त्याला घेऊन जाणारच होते परंतु त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पत्नी गर्भवती आहे त्यामुळे दत्तक घेतले नाही. दत्तक घेता घेता या जोडप्याला पण आशा वाटते टशकी कदाचित आपलं पण असंच होईल. आणि ते दत्तक घ्यायचं तात्पुरतं रहित करतात व त्या मॅनेजरला सांगतात की आम्ही पण हेच मूल घेणार. पण एक महिन्यानंतर! कारण त्यांना पण आशा वाटलेली असते की या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवल्याबरोबर आपल्याही घरात मूल येऊ शकेल याची. परंतु तसं काही घडत नाही आणि शेवटी ते त्या मुलाला दत्तक घेतात आणि त्या आईचा आतला आवाज मात्र सांगत असतो की मी याची खरी आई नाहीये कारण तसं असतं तर मी स्वतःचे मूल होण्याची आशा वाटली होती त्याही वेळेला या मुलाला दत्तक घेऊनच घेतले असते. अशा प्रत्येकच कथेतून खूप काहीतरी सांगितलेलं आहे. सगळ्याच कथा खूप छोट्या असल्या तरी देखील! त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवतात.

त्यानंतर, ‘भावना वर्मा सरकार’, ‘रामनिवास मानव’, ‘अतुल मोहन प्रसाद ‘, डॉ. राजेन्द्र साहिल, ”नज्म सुभाष, ‘ सिमर सदोष ‘, राजेंद्र परदेशी, श्रीराम ठाकूर दादा, वीरेंद्र नारायण या सर्वांच्याच कथा अतिशय उत्तम! या सर्वांच्याच कथांमधून मानवी स्वभावाचा एक एक स्वार्थी पैलू उलगडलेला आहे. कथा खूप छोटी परंतु आशय मोठा घेऊन येणारी अशी प्रत्येकच कथा आहे. या प्रत्येक कथेमधून मोठी कथा जन्माला येऊ शकेल इतकं सार त्या कथांमध्ये भरलेलं आहे. पूर्ण पुस्तक मुळातूनच वाचायला हवं. कथा कितीही सुरेख असल्या तरी प्रत्येकाचा आढावा घेणं शक्य नाही. वाचकांची उत्सुकता पण संपते त्यांनी.

शेवटी उज्वला ताईंच्या कथा आहेत. सगळ्याच कथा सुंदर आहेत. पहिलीच ‘एका स्वप्नाचा अंत’ ही तर अतिशय सुंदर आहे. आजच्या वास्तवला धरून.

दंगल घडवून आणणाऱ्याला कळतं की एक आतंकवादी मारल्या गेला आहे. त्याला हायसं यासाठी वाटतं की, ज्यांनी प्रत्यक्षपणे आतंकवादात सहभाग घेतला त्याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मग आपणच आतंकवाद घडवून आणला याचा पुरावाच मागे उरला नाही. याचा त्याला आनंद होतो आणि तो ठरवतो की आता दंगा नव्याने सुरू झाला की कम्प्युटरच्या दुकानावर आपण डल्ला मारायचा कारण त्याच्या मुलाला कम्प्युटर हवं असतं. पण थोड्याच वेळात त्याला कळतं की आपला मुलगा पण आतंकवाद्यांसोबत मारला गेलाय. हे कळल्यानंतर मात्र त्याला ऐकता ऐकताच भोवळ येते. म्हणजे आतंकवाद घडवून आणताना दुसऱ्याचं कुणी गेलं तर त्याचं काही वाटत नाही पण आपला मुलगा मारला गेला आहे म्हटल्यानंतर ते दुःख मात्र तो सहन करू शकत नाही. अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट.

त्यांचीच, ‘दुहेरी फायदा’ही गोष्ट पण खूप आवडली. भ्रष्टाचाराची लस देण्याच्या अभिनव कल्पनेतून गोष्ट सुंदर रंगवली आहे. मूळातूनच ती वाचावी.

कथासंग्रहातील आपल्याला कधी एखादी कथा आवडते तर एखादी आवडत देखील नाही. परंतु मी मनापासून सांगते, मला यातील प्रत्येक कथा सारखीच आवडली.

उज्वला ताई धन्यवाद! इतकं सुंदर पुस्तक आम्हाला तुमच्या अतिशय सुंदर अनुवादामुळे वाचायला मिळालं. तुमच्या पण कथा खूप आवडल्या.

परिचय: सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments