श्री जगदीश काबरे
विविधा
☆ “जिथे भीती जन्म घेते…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
भीती ही सजीवांच्या उत्क्रांतीतील अत्यंत मूलभूत आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. चार्ल्स डार्विन यांनी ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांतात दाखवून दिले आहे की, ज्या प्राण्यांमध्ये धोक्याच्या जाणीवेनंतर त्वरेने प्रतिक्रिया देण्याची क्षमता होती, तेच अधिक काळ टिकले. भीती ही म्हणूनच कधीकधी नकारात्मक नसून जीवनरक्षक ठरली आहे. जंगलात अचानक साप दिसल्यावर पाय मागे घेणे, आगीपासून दूर पळणे किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनापासून बाजूला होणे, या सर्व क्रिया भीतीमुळेच घडतात. मेंदूमधील अमिग्डाला हा भाग संभाव्य धोक्याचे संकेत ओळखून शरीरात ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो आणि क्षणार्धात निर्णय घेतला जातो. म्हणून भीती ही कमकुवतपणाची नव्हे, तर सजगतेची खूण आहे.
परंतु माणूस केवळ जैविक प्राणी नाही; तो सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतो. लहानपणापासून मिळालेले संस्कार, पालकांची वागणूक, शाळेतील अनुभव, समाजातील मूल्यव्यवस्था, या सर्व गोष्टी मिळून भीतीचा स्वभाव ठरवतात. ज्या व्यक्तीला सतत दडपण, शिक्षा, अपमान किंवा चुकलास तर संपलास, अशी भीती दाखवली जाते, तिच्या मनात असुरक्षिततेची पायाभरणी होते. अशावेळी त्या व्यक्तीला प्रसंगासमोर ठामपणे उभे राहण्याऐवजी मागे हटण्याची सवय लागते. तिचा स्वभाव ऐन मोक्याच्या वेळी कचखाऊ होतो. उलट ज्या व्यक्तीला चुका करण्याची मुभा, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयत्नांचे कौतुक केले जाते, तिच्यात आत्मविश्वासाची बीजे रुजतात. त्यामुळे एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न असतात—एक घाबरते, दुसरी धैर्याने उभी राहते. पण कधीकधी समाज ‘शूर’ म्हणून ज्या व्यक्तीला ओळखतो, तीही विशिष्ट प्रसंगी घाबरते. कारण धैर्य हा गुण कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारे मानसिक स्थित्यंतर असते. एखादा सैनिक रणांगणात निडर असू शकतो, पण कुटुंबीयांच्या आजारपणासमोर असहाय्य वाटू शकतो. एखादा वक्ता मंचावर प्रभावी बोलू शकतो, पण अन्यायाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घ्यायची वेळ आली की सामाजिक बहिष्काराच्या भीतीने गप्प बसू शकतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांनी विलायतेतून परत आल्यानंतर हिंदू शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले होते. कारण येथे भीती ही केवळ शारीरिक धोक्याची नसते; ती सामाजिक प्रतिमेची, नातेसंबंधांची, आर्थिक सुरक्षिततेची किंवा सत्तेच्या दबावाची असते. म्हणूनच सत्य आपल्या बाजूला असले तरी त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य सर्वांकडे असतेच असे नाही. समाजात अनेकदा ‘शूर’ आणि ‘भ्याड’ अशी द्वैती विभागणी केली जाते. पण प्रत्यक्षात धैर्य आणि भीती हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. भीती नसलेला माणूस बेजबाबदार ठरू शकतो; तर भीतीच्या अतिरेकाने माणूस निष्क्रिय होतो. खरे धैर्य म्हणजे भीतीची जाणीव असूनही योग्य कृती करणे होय.
सामाजिक संरचना भीतीला अनेकदा साधन म्हणून वापरते. कुटुंब, धर्म, राजकारण, कार्यालयीन व्यवस्थापन या सर्वच ठिकाणी ‘भीती’ ही नियंत्रणाची पद्धत म्हणून कार्यरत असते. लोक काय म्हणतील? , नोकरी जाईल, देव रागावेल, समाजातून बहिष्कृत केले जाईल, या मानसिकतेपोटी भीतीची संस्कृती रुजवली जाते. भीतीत वाढलेला माणूस प्रश्न विचारणे टाळतो, अन्याय सहन करतो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या आक्रमणाला बळी पडतो. येथे मानसशास्त्रीय दृष्टीने सामाजिक असहाय्यता दिसते. वारंवार पराभव किंवा दडपशाही अनुभवल्यानंतर माणूस प्रतिकार करण्याची इच्छा गमावतो. याच्या उलट, भीतीवर मात करणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, कारण ती कृतीशील असते. काही व्यक्तींच्या बाबतीत भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही; परंतु ती स्वीकारूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित केली जाते. मानसशास्त्र सांगते की, धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही योग्य कृती करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते, तेव्हा बाह्य दबावांची तीव्रता कमी होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात की, भीतीवर मात केलेल्या व्यक्तींनीच अन्यायाला आव्हान दिले आणि समाजात बदल घडवले. जसे महात्मा गांधी न्यायालयासमोर सत्य सांगण्यास कधीही कचरले नाहीत आणि मिळेल ती शिक्षा आनंदाने भोगली. याचा अर्थ त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे नव्हे तर त्यांच्याकडे होते ते आत्मभान, तर्कशक्ती आणि परिणामांची जाणीव असतानाही उभे राहण्याचे साहस.
मानसिकदृष्ट्या भीतीवर मात करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे ठरतात. पहिला घटक म्हणजे आत्मजागरूकता. ही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे ओळखायला शिकवते. दुसरा, अनुभवांची पुनर्रचना करणे. म्हणजे असे की, एखादा प्रसंग अपयशाचा नसून शिकण्याची संधी आहे, असा दृष्टिकोन स्वीकारणे. तिसरा, सामाजिक पाठबळ मिळणे. मित्र, कुटुंब किंवा सहकारी यांचे समर्थन व्यक्तीला स्थैर्य देते. चौथा, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी तयार होणे. स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याची तयारी. या प्रक्रियेत व्यक्ती हळूहळू भीतीला शत्रू न मानता मार्गदर्शक म्हणून पाहू लागते.
थोडक्यात, भीती ही मानवी स्वभावाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रेरणा आहे. ती आपल्याला धोक्याची जाणीव करून देते, पण तिच्या अधीन राहणे किंवा तिला नियंत्रित करणे हे आपल्या सामाजिक संस्कारांवर, मानसिक प्रशिक्षणावर आणि मूल्यव्यवस्थेवर अवलंबून असते. जो माणूस भीतीच्या छायेतून बाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, तो केवळ वैयक्तिक यशाकडेच वाटचाल करत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचाही वाहक ठरतो. भीती, चिंता, काळजी, या भावना आपल्या जगण्याचा भाग असतातच. कारण आपण सगळेच जगण्यातल्या अशाश्वतेला घाबरत असतो. तरी कधी कधी काही गोष्टींना सामोरं जाण्याची मानसिक तयारीही आपण करत असतो आणि म्हणूनच या भावना आपल्या नियंत्रणात कशा ठेवायच्या याचा आपण विचार करायला हवा. पण तसं झालं नाही आणि या भावना सातत्यानं आपल्या मनात राहिल्या तर गडबड होतेच. आपल्याला जर सतत कशाची ना कशाची भीती वाटत राहिली तर समोर असणार्या समस्येला तोंड देण्यापेक्षा तिला टाळण्याची प्रवृत्ती वाटते. त्या परिस्थितीचे खोटंखोटं सर्मथनही करण्याची प्रवृत्ती वाढते. अशावेळी तारतम्यानं विचार करण्याची आपली क्षमता कमी होते. समस्येचं योग्य स्वरूपात आकलन होण्याऐवजी तिच्याकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गच दिसत नाहीत. बर्याचदा असे घाबरून रहाण्याच्या स्वभावामुळे आपण आपल्या जगण्यातला आनंदही गमावून बसतो. आपल्या मनात सतत ‘असं होईल का? ‘ ‘तसं होईल का? ‘ ‘असं झालं तर काय..? ‘ ‘तसं झालं तर काय? ‘ असे विचार येत राहतात. मनातल्या मनात आपण अनेक कल्पना करत राहतो. पण त्यातल्या एकाही कल्पनेचं आजतागायत वास्तवात रूपांतर झालेलं नसतं. पण त्या कल्पना मात्र सतत आपल्या मनात भीतीचं वातावरण तयार करतात. आणि आपण जगण्यापेक्षा जर-तर म्हणत फक्त घाबरत राहतो. उदाहरणार्थ भुताची कल्पना.
या भीतीतून बाहेर पडायचं कसं? यावर खालील उपाय करून बघण्यासारखे आहेत.
१) ज्या गोष्टीची भीती मला वाटते आहे त्यात खरंच काही घाबरण्यासारखं आहे का याचा विचार करा. का घाबरतेय मी आता? कशाची भीती वाटतेय मला? हे प्रश्न स्वत:ला शांतपणे विचारा. या प्रश्नाचा विचार केला तर आपण बर्याच गोष्टींना विनाकारणच घाबरतो, असं तुमच्या लक्षात येईल.
२) ‘राईचा पर्वत बनवणं’ ही तुमच्या विचाराची पद्धत आहे का याचा विचार करा. असे विचार नेहमीच भीती निर्माण करणारे आणि भीतीला खतपाणी घालणारे असतात.
३) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर तुमच्या या भीती वाटण्याच्या भावनेविषयी बोला किंवा डायरीत तुमचे विचार लिहून काढा. मनातले विचार-भावना व्यक्त केल्यानं त्यांचं आकलन व्हायला मदत होते. आपली विचार करण्याची पद्धत त्यातून समजते व त्याची भीतीचे विचार हाताळायला मदत होते. मनात उमेद निर्माण करतील, स्वत:वरचा विश्वास कायम ठेवतील अशी वाक्यं तयार करा. भीतीच्या प्रसंगात या वाक्याचा वापर करा. सांगा स्वत:ला, ‘I CAN DO IT, YES, I CAN DO IT. ‘
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com, मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





