श्री जगदीश काबरे
पुस्तकावर बोलू काही
☆ “प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा” – लेखक : श्री वैभव सुरेश मोरे ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा
लेखक : वैभव सुरेश मोरे
पुस्तकासाठी संपर्क : ७०५७५६७२५२
एकूण पृष्ठे : ८०
किंमत : ₹१५०
‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ हे वैभव मोरे यांचे छोटेखानी पुस्तक वाचायला हातात घेतले आणि ते संपल्यावरच खाली ठेवले; एवढे या पुस्तकाने मला गुंतवून टाकले. ‘पृष्ठ संख्या लहान, पण विचारांची समृद्धी महान’ असलेल्या या पुस्तकातील एकेक वाक्य हे एकेका सुविचारासारखे लाख मोलाचे आहे, हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. त्यातील काही वाक्ये वाचल्यावर वाचकहो, तुम्हीही अंतर्मुख होऊन विचार करायला लागाल, याची मला खात्री आहे.
१) एखादा भ्रष्ट अधिकारी जेव्हा लाच घेऊन आपले काम करून देतो, तेव्हा आपण त्याच्या त्या ‘सोयीस्कर’ प्रामाणिकपणाला दाद देतो. पैसे खाऊ दे, पण काम तरी करून देतो, अशी आपली धारणा होते. आजच्या काळात जर कोणी प्रामाणिकपणे सेवा दिली, तर आपल्यालाच आश्चर्य वाटते आणि आपला विश्वास बसत नाही. इतका शुद्ध प्रामाणिकपणा पचवण्याची ताकद आता आपल्या पचनशक्तीत उरलेली नाही, कारण चांगले काही पचवण्याची सवयच आपल्याला राहिलेली नाही.
२) दारूच्या बाटलीवरील, सिगारेटच्या पाकिटावरील किंवा शेअर मार्केटच्या जोखमीवरील वैधनिक इशारे ग्राहकाला सावध करण्यासाठी नसून, उद्या जर कोणी आजारी पडले किंवा कोणाचा मृत्यू झाला किंवा आर्थिक नुकसान झाले तर कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठीची एक ढाल आहे. ‘आम्ही तर आधीच सांगितले होते’, असे म्हणून स्वतःला निर्दोष सिद्ध करणे, हा या व्यवसायातील सर्वात मोठा ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ आहे.
३) कायद्याचा धाक हा शिस्तीसाठी असावा, पण जेव्हा तो दडपशाहीसाठी वापरला जातो तेव्हा तो लोकशाही विरोधी ठरतो. नियमांचा धाक दाखवून मिळालेली शांतता ही खरी शिस्त नसते खरी शिस्त ही परस्परांच्या आदरातून येते.
४) एखादा रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा तो केवळ शरीर घेऊन जात नाही, तर एक विश्वास घेऊन जात असतो. पण जेव्हा हा विश्वास विशिष्ट मेडिकल स्टोअर आणि अनाकलनीय लिपीतील प्रिस्क्रिप्शनच्या आड गहाण ठेवला जातो तेव्हा खरं ‘वैद्यकीय प्रदूषण’ सुरू होतं.
५) आज तंत्रज्ञान प्रगत झाले आहे, पण मानवी नियत मात्र आजही त्याच स्वार्थाच्या अंधारात चाचपडत आहे.
६) ‘बाईला काय कळतंय?’ हा अट्टाहास इतका खोलवर रुजला आहे की, एखादी महिला जर स्वतःहून निर्णय घेऊ लागली तर तिला सहकार्य करण्याच्या ऐवजी पुरुषसत्तेकडून तिची कोंडी केली जाते.
७) आजची प्रशासकीय यंत्रणा ही भीतीवर आधारलेली आहे. या भीतीमुळे माणूस आपली सद्विवेकबुद्धी गमावून बसतो. तो फक्त एक आज्ञाधारक यंत्र बनतो. यंत्राला संवेदना नसतात, त्याला फक्त इनपुट आणि आउटपुट माहीत असते. जेव्हा नियमांची भीती माणुसकीपेक्षा मोठी होते तेव्हा एक जिवंत माणूस केवळ एका मृतयंत्रणेसारखा वागू लागतो.
८) एक मोठा विरोधाभास असा आहे की, आपण निसर्गाने शरीरावर उमटवलेल्या खुणांपेक्षा हाताने बनवलेल्या कागदावर जास्त विश्वास ठेवतो. मानवनिर्मित मतदान कार्डाने नैसर्गिक पुराव्याला हरवणे हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. कारण आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या सत्यापेक्षा कागदावर लिहिलेल्या अक्षरांना जास्त महत्त्व देतो.
९) जिथे नियमामुळे माणुसकीचा गळा घोटला जातो तिथे तो नियम पाळणारा माणूस प्रामाणिक असला तरी तो नैतिकदृष्ट्या अप्रामाणिकच असतो. खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा कागदाच्या तुकड्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील सत्य आणि वेदना ओळखण्याची ताकद व्यवस्थेत येईल.
१०) शिक्षणात आपण विद्यार्थ्यांवर केवळ गुणांची उधळण केली, पण ज्ञानाची पेरणी मात्र शून्यावर राहिली. हाच तो प्रामाणिक व्यवस्थेतील सर्वात मोठा अप्रमाणिकपणा आहे.
११) तुम्ही बाहेरून खूप प्रामाणिक असल्याचा दिखावा आणता, अहवाल चकाचक बनवता. पण आतून त्या उपक्रमाचा आत्माच मेलेला असतो. जेव्हा एखाद्या संस्थेचे यश हे विद्यार्थ्यांच्या परिवर्तनावर नाही तर अल्बममधील फोटोवर मोजले जाते तेव्हा शिक्षण पद्धतीतला प्रामाणिकपणा संपलेला असतो. ही कागदी प्रगती समाजाला पुढे नेण्याऐवजी फक्त फाइल्सची जाडी वाढवत राहते.
१२) ईश्वराच्या दरबारात जिथे माणुसकी आणि समानता शिकवली जाते, तिथेच आता मंदिरातील व्हीआयपी पासमुळे श्रीमंत आणि गरीब अशा दोन रांगा तयार झालेल्या आहेत. ज्या देवाला भक्ती हवी तिथे आज शक्ती आणि पैसा चालतो. हाच तो प्रामाणिक भक्तीतील अप्रामाणिक व्यवहार आहे.
१३) आपण स्वतःला प्रामाणिक म्हणवतो, पण उघड्या डोळ्यांनी अन्याय होत असताना आपण गप्प बसतो, हाच आपला सर्वात मोठा अप्रामाणिकपणा आहे.
१४) जिवंतपणी ज्याला अन्नाच्या एका एका घासासाठी तडफडावं लागतं आणि मेल्यावर मात्र त्याच्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी धडपड केली जाते. हा आपल्या समाजातील सर्वात मोठा आणि क्लेशकारक विरोधाभास आहे. जिवंतपणी ज्याच्या मुखात पाण्याचा थेंब दिला नाही त्याच्यासाठी गंगेच्या काठी पिंडदानाचा सोहळा मांडणारी ही पिढी खरच त्याच्याप्रती कृतज्ञ आहे का?
१५) भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवाचे स्थान दिले आहे. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकतो; पण आजच्या आधुनिक जगात हा मंत्र भिंतीवरच्या फोटो पुरताच उरला आहे की काय अशी शंका येते.
१६) जिवंत माणसाची सेवा करण्यापेक्षा मेलेल्या माणसाच्या नावाने दान करणे सोपे असते. कारण तिथे संवाद नसतो, फक्त दिखावा असतो. थोडक्यात हे वर्षश्राद्ध म्हणजे मृत व्यक्तींबद्दलचे प्रेम नसून समाजासमोर स्वतःची धार्मिक आणि प्रामाणिक प्रतिमा टिकवून ठेवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे.
१७) खरा धर्म कर्मकांडात नसून प्रामाणिकपणे केलेल्या कर्मात आहे.
१८) आपण उत्सवापुरते प्रामाणिक असतो, पण कर्तव्याच्या वेळी अप्रामाणिक होतो.
१९) प्रतीके ही प्रदर्शनासाठी नसून प्रेरणेसाठी असतात.
२०) जोपर्यंत सामान्य माणसाला आपल्या पदाचे कार्ड न दाखवता न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला समाज खऱ्या अर्थाने प्रामाणिक होऊ शकणार नाही.
२१) आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिलं
पण आम्ही त्यांना नागरिक म्हणून घडवू शकलो का?
२२) संविधान केवळ शाळेतील पुस्तकांच्या मुखपृष्ठावर किंवा न्यायालयाच्या भिंतीवर असून चालणार नाही. ते रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकाच्या वागण्यात उतरले पाहिजे.
२३) व्यवस्था म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. आपण बदललो की व्यवस्था बदलते.
२४) भ्रष्टाचाराच्या अंधारावर ओरडण्यापेक्षा स्वच्छ आणि पारदर्शक समाज निर्मितीसाठी स्वतःच्या वाटणीचा एक छोटा दिवा लावणे केव्हाही श्रेष्ठ असते.
२५) ज्या दिवशी आपण आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकू की, आज मी माझं कर्तव्य चोख बजावलं त्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा संपायला सुरुवात होईल.
पुस्तकातील ही वाक्ये वाचल्यावर आपण अस्वस्थच होतो असे नाही तर या अस्वस्थतेतून आपला एक नवा जन्म होत आहे असे आपल्याला वाटते. लेखकाने प्रामाणिकपणे स्वतःबद्दल तसेच जगात वावरताना डोळे उघडे ठेवून केलेल्या निरीक्षणांची मांडणी एवढी प्रभावी केलेली आहे की प्रत्येक वाचकाला हा लेखक आपल्या मनातलेच बोलतो आहे असे वाटते. पण आपण असे वागायला कचरलो, हेही मनातल्या मनात तो कबूल करतो.
मग आपण खरोखर प्रामाणिक आहोत का? हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. आपल्याला वाटतं आपण खूप प्रामाणिक आहोत, पण व्यवस्थेच्या गुंतागुंतीत वावरताना आपण नकळतपणे भ्रष्टाचाराचे छोटे छोटे भाग कसे बनतो? शाळेच्या डोनेशनपासून ते हॉस्पिटलच्या बिलापर्यंत आणि ट्रॅफिक सिग्नलपासून ते व्ही. आय. पी. ट्रीटमेंटच्या मोहापर्यंत… आपण प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणा जपतो आहोत का? हे पुस्तक म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर आपल्या चेहऱ्यावरील ‘प्रामाणिकपणाचा मुखवटा’ सोलून काढणारा एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. म्हणूनच संवेदनाशील माणसाला हे पुस्तक हालवून सोडते, त्याच्या हृदयाला हात घालते आणि त्याच्या बुद्धीला झंझोडते. ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ हे पुस्तकाचे शीर्षक अशाच असंख्य प्रश्नातून जन्माला आले आहे. पण जिथे अंधारच प्रकाशाचा मुखवटा घालून फिरतो तिथे प्रामाणिकपणापेक्षा अप्रामाणिकपणालाच उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही तरच नवल!
आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो की, जग भारताकडे एका वेगळ्या आकांक्षेने पाहत आहे. आपली भारतीय संस्कृती ही उच्च आहे. पण आपण या भारतीय संस्कृतीला आपल्या दुटप्पी वागण्याने काळीमा फासत आहोत, हे आपल्या कसे लक्षात येत नाही? हे पुस्तक आजच्या राज्यकर्त्यांपासून सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाचा दांभिक मुखवटा टराटरा फाडत आरशासमोर त्याला नागडेउघडे करते. या नागडेउघडेपणाला जेव्हा आपण धाडसाने सामोरे जाऊ तेव्हाच आपल्या समाजात परिवर्तनाला सुरुवात होईल. तसे जेव्हा होईल तेव्हाच या पुस्तकाच्या लेखकाच्या लेखणीचे सार्थक होईल. एवंच हे पुस्तक प्रत्येकाने डोके ताळ्यावर ठेवून वाचलेच पाहिजे अशी मी शिफारस करत आहे.
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





