श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विवेकीयांची संगती” – लेखिका : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : विवेकीयांची संगती

– “वो सुबह हमी से आयेगी…”

लेखक : अतुल देऊळगावकर

प्रकाशक : रोहन प्रकाशन 

पृष्ठः २४७

मूल्य: ३९५₹ 

एप्रिल १९५०. कंपनीच्या कामासाठी राय यांना पाच महिने लंडनला पाठवायचं ठरलं. राय दाम्पत्य कोलंबोहून जहाजानं लंडनकडे निघालं. राय सोळा दिवसांच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ संबंधी सुचणाऱ्या कल्पना लिहू लागले. त्यासोबत रेखाचित्रं होतीच. रेन्वा, व्हिक्टोरिया डा’ सिका आणि आयझेंस्टाइन यांच्या पावलांवर पाऊल टाकायचं, हे त्यांनी ठरवलंच होतं. वेशभूषा नाही. स्टुडिओ वा सेट नाही. गाणी नाही. प्रत्यक्ष गावात, साध्या माणसांना घेऊन चित्रपट करायचा. कथेतलं वास्तव थेट भिडवण्यासाठी त्यांचे विचार सतत चालू होते. ते लंडनमध्ये सहा महिन्यांत शंभर सिनेमे पाहून परत भारताकडे निघाले. परतीच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ कागदावर पूर्णपणे उतरला होता. ते परत आले तेव्हा भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जाणार होता. त्यात अकिरा कुरोसावा, रोझेलिनी, डी’ सिका यांसारख्यांचे चित्रपट होते. ‘राशोमान’ पाहताच त्याच्या प्रेमात पडलेले राय म्हणतात, ‘ती अस्सल जपानी कलाकृती होती. त्यामुळेच ‘पाथेर पांचाली’तील अस्सलपणाची खात्री पटली आणि ठरवलं की, हे करायलाच पाहिजे. ‘

‘पाथेर पांचाली’ ही हरिहर, त्यांची पत्नी सर्वजया, वृद्ध चुलत बहीण इंदिरा ठाकुरन, मुलं अपू-दुर्गा आणि अनेक छोट्या पात्रांची आहे. पूजापाठ करणाऱ्या दरिद्री हरिहरला दोन वेळचं जेवण मिळवणंसुद्धा कठीण आहे. त्यात या कुटुंबातील व्यवहाराचं चित्रण आहे. माणुसकी, लबाडी, ओलावा आणि निरागस बालपण… सगळं काही त्यात आहे. कादंबरीने कमीत कमी शब्दांत सूक्ष्म तपशील पकडल्यानं कवितेची उंची गाठली होती. राय पटकथा लिहून मोकळे झाले. दरम्यान, विभूतिभूषण वारल्यानं त्यांच्या पत्नी रमाबाईंकडून परवानगी घेतली आणि भांडवल गोळा करायची तयारी सुरू झाली. त्यांनी कल्पना मुव्हीजच्या भट्टाचार्यना गाठलं. त्यांनी शांतपणे कथा ऐकली. रेखाचित्रं पाहिली. दहा दिवसांची मुदत मागितली. चौथ्या दिवशी रमाबाईंचा भाऊ धावत राय यांच्याकडे आला. ‘कल्पना मुव्हीज हक्क मागतेय. प्रसिद्ध दिग्दर्शक देवकी बोस यांना घेऊन ‘पाथेर पांचाली’ करणार, म्हणताहेत. ‘…

डॉ. नॉर्मन बोरलॉग, डॉ. अमर्त्य सेन, मृणाल सेन, डॉ. सुधीर कक्कर, अनिल अग्रवाल, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, भागवत धोंडे, जयंत वैद्य आणि इतर अनेक विचारवंतांच्या कार्याचा प्रेरणादायी वेध या पुस्तकातून उलगडतो.

विचारांना समृद्ध करणाऱ्या आणि परिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात घेऊन जाणारे हे पुस्तक प्रत्येक जिज्ञासू वाचकासाठी अनमोल ठरते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted