श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “दिल ढूँढता है… फिर वही…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
परी…
होय तिचं नावं परी आहे असचं तर तिने मला एकट्यालाच कानात सांगितलं… त्या लग्न सोहळ्यात…
बाशिंग बळ जड असलेल्या आणि लग्नाला उतावीळ असलेला आमच्या मित्रांच्या कंपूतला तो ओपनिंग बॅटसमन शेवट पर्यंत नाॅट आऊट राहिलेला एकमेव गडी…
वयाची बत्तीस गाठली तरी बिचाऱ्याची ब्रह्मचारीपणाची खडी फोडणं चालूच होतं… अगदी मागच्या आठवड्यापर्यंत तरी… आणि आज आता या क्षणाला त्याचं शुभ लग्न सावधान होतयं या गोष्टीवर आमचा निदान माझा तरी विश्वास बसत नव्हता… पाटा विकेटवर बुमराहला झोडपून काढल्यावर विकेट मिळते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येते ना… अगदी तसंच हसू आम्हा मित्रांच्या चेहऱ्यावर… शेवटी उशीराने का होईना पण विकेट पडली एकदाची…
कुबेराला उणेपणा येईल अशी धन, कनक संपती… उच्च विद्याविभूषित आणि विचारी घराणं… मानमरातबची छत्रचामरं अख्खा कुटूंबावर असलेली… आणि आणि बरेच काही असूनही आमच्या या मित्राचं लग्न मात्र काही जुळतं नव्हतं… बरं अटी चा कोलदांडा त्याच्याकडून काही नव्हता… ओपन माईंडेड नि मिरर ट्रान्सपरंट आणि वयात आलेल्या कुठल्याही बालिकेला ह्योच नवरा हवा असा त्यांच्या टिक टिक वाजे डोक्यात… हृदयात नि मनात घंटी वाजवणारा असाच हा होता… बरं काॅलेजात असताना किंवा नोकरी असताना मनाचिये गुंती सारखी परिस्थिती औषधालासुदधा कधी याची केमेस्ट्री जमलीच नाही… सारखं आपलं भ्रमर होऊन या फुलावरून त्या फुलावर त्याचा उडता प्रवास चालूच… कुणी एखादी ने जर त्याला डेरिंग करून तसं विचारलं माझ्याशी लग्न करशील का? त्यावर हा एक मंद स्मित करून उत्तर द्यायचा… माझा सध्या तरी विचार नाही… असं उत्तर देऊन उडवून लावत असे… मग स्थळं येणार कशी नि लग्न घटिका समिप तरी कशी येणार… पठ्ठयाच्या मनाचा थांग काही लागत नव्हता… घरच्यांची चिंता वाढत चालली… आम्ही मित्रांनी त्याला सरळ सरळ तर कधी आडून त्याच्या मनात काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला… आणि तो शोध अखेर लागला… पाच सहा वर्षा मागे त्याला कुठेतरी परी दृष्टीस पडली होती नि तिने त्याचं मनं नि हृदय काबीज करून टाकले होते… त्यामुळे लग्नाच्या हंगामात त्याच्या डोळ्यासमोर ती परीच दिसायची आणि समोरची दिसणारी मुलगीत परीचा त्याला भास झाला नाही कि नापसंत असायची… खरं तर इतक्या सुंदर देखण्या मुलीं पाहण्याचा कांदेपोहे खालेल्या डिशेसनां देखील धुवून धुवून कंटाळा आला होता… नाकारण्यासारखं त्या एकाही मुलीत तसं काहीही नसताना याचा कपाळकरंटेपणा मात्र आम्हा मित्रांना प्रश्नांकीत करायचा… आम्हालाच कधी कधी असं वाटायचं की आमच्या लग्नाच्या वेळी या सुंदर देखणं सौंदर्याने कुठे दडी मारून बसले होते… नि गळ्यात आमच्या मात्र बेतासबेत लोढणे अडकवले गेले होते… सिनेमे जलन… दूसरं कायं होणार होतं म्हणा… असो आता काय त्याचं रात गई बात गई… पण आमच्या मित्राचा नकार घंटेने आमची नक्की खात्री झाली कि पाणी मुरतयं कुठेतरी… गडी नक्की कुठंतरी गुंतलाय पण तो अजूनही ओपन का होत नाहीऐ याचचं आश्चर्य वाटलं…
आणि त्या आश्चर्याचा बुरखा असा आज टराटरा फाटला… त्याच्या त्या लग्न समारंभात ती परी म्हणणारी गुलाबी रंगाचा शरारा घालून एक गोड नि सुंदर बालिका त्या हाॅल मध्ये इकडून तिकडून धावपळ करताना दिसत होती… आपल्या गोरा रंगावर नि हसऱ्या चेहऱ्यावर गालावरच्या खळीने सगळ्यांना घायाळ करून सोडले होते… तिच्या ताईचंच लग्न असल्यामुळे तिचा करवलीचा मान ती मिरवत होती… आखिर ती होणाऱ्या जीजूची छोटी नटखट जो साली थी… खरं तर मित्राची ती बायको तितकीच सुंदर होती पण ती काही परी नव्हती… तरीही त्याने तिच्याशी लग्न केले… या निमित्ताने कधी कधी त्या परीचा सहवासात राहता येईल… तिच्या त्या सात्विक सौंदर्यात त्याने स्वतःला हरवून बसला… इतके दिवसाची तपश्चर्या फळाला आली होती… विशुद्ध प्रेमाची त्याला प्रचिती आली…
अशा तऱ्हेने आमच्या मित्राचा संसार सुरु झाला आणि त्याला लवकरच त्या परी बद्दल रहस्य कळले… कि परी काही त्याच्या बायोकोची सख्खी बहीण नव्हती तर तिच्या आइबाबांनी परीला अनाथालयातून आणलेली… चिखलात फुललेल्या कमलिनीला प्रेमाच्या वाटीकेनं संरक्षण नि पालनपोषण करून विकसित केलं होतं… मुग्ध कळीचं आता नाजूक कोमल सुंगधी फुल उमलू लागलं होतं… आणि आमचा मित्र तर त्या कमलदलात कधीचा बंदिस्त झाला होता…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






