श्री दिवाकर बुरसे
☆ एक इर्जिक पुन्हा इर्जिक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
‘इर्जिक’—हा शब्द मराठी ग्रामीण जीवनाच्या मुळाशी रुजलेला. शहरी रसिक वाचकांसाठी तो प्रथमच गो. नि. दांडेकरांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ या अजरामर कादंबरीतून परिचित झाला.
इर्जिक ही केवळ एक शेतीपद्धत नव्हे, तर ती ग्रामीण समाजाची सामूहिक संवेदना होती. एखाद्या शेतकऱ्याकडे नांगरणी, काढणीसारखी कामे करण्यासाठी पुरेशी साधनसामग्री, मनुष्यबळ किंवा भांडवल नसेल तेव्हा तो आपल्या स्वाभिमानाला मुरड घालून, अगतिकतेने गावकऱ्यांना हाक मारी. गावकरीही त्या हाकेला ‘ओ’ देत. कुणी मागे राहू नये, कुणी उपाशी पडू नये, या भावनेतून ते सारे मिळून त्याचे काम निःशुल्क उरकत. काम संपले की कृतज्ञतेपोटी यथाशक्ती मिष्टान्न वा सामिष भोजन देऊन श्रमपरिहार केला जाई. ह्यालाच ‘इर्जिक’ म्हणत.
शेकडो वर्षे चालत आलेली ही सहकारसंस्कृती आज मात्र काळाच्या प्रवाहात जवळजवळ लोप पावली आहे. इर्जिक मागणे किंवा करून घेणे, कोणत्याही स्वाभिमानी शेतकऱ्याला कमीपणाचे वाटे.
पवनाकाठचा धोंडी या कादंबरीचा नायक धोंडी, इर्जिक टाळण्यासाठी प्राणपणाने झुंज देतो. स्वाभिमान आणि परिस्थिती यांच्या संघर्षात अखेर त्याचा अंत होतो. धोंडी हा शतकभरापूर्वीच्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी होता. आज मात्र शेतकरी बदललाय. पत्रकारांनी, राजकारण्यांनी त्याला ‘बळिराजा’ केलं आहे. त्याच्या अपेक्षा बदलल्या, शेतीकडे पाहण्याची दृष्टी बदलली—आणि माझीही.
यंदा मी माझ्या शेतात चक्क इर्जिक करतोय.
सहा एकरांचा हा भूखंड मी मुद्दाम वेगळा राखून ठेवलेला आहे. इथे केवळ पारंपरिक पद्धतीने पिके घेतो. गेली शंभर-सव्वाशे वर्षे जतन केलेली असंकरित बियाणी पेरली जातात. रासायनिक खते, कीटकनाशके यांना इथे प्रवेश नाही. पावसाचं पाणी आणि भूमीत साठलेली नैसर्गिक आर्द्रता, हाच आमचा आधार. खरीप आणि रब्बी, दोन्ही पिके याच तत्त्वावर घेतली जातात.
‘पुरंदर जलउपसा योजने’मुळे हा परिसर सुजलाम् झाला आहे. शेततळी, विंधनविहिरी, ओलिताखाली आलेली शेती यामुळे एकेकाळचा दुष्काळी प्रदेश आज पूर्ण बदललाय. कांदा, ऊस, फुलपिके, भाजीपाला, फळबागा यांकडे सर्वांचा कल आहे.
तरीही आम्ही पारंपरिक पिकांवर ठाम आहोत. जगाच्या दृष्टीने ही शेती मागास, आतबट्ट्याची वाटेल. पण आमच्यासाठी हा पर्यावरण रक्षणाचा, जीवनसाखळी अखंड ठेवण्याचा प्रयत्न आहे. तो कदाचित केविलवाणा, हास्यास्पदही असेल—हे आम्ही जाणतो. तरीही रेटून करतोय.
गावाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, बुलेट ट्रेन यांसारखे विशाल प्रकल्प येवू घातले आहेत. विकासाच्या या रेट्यापुढे आम्ही किती काळ तग धरू, हे काळच ठरवेल.
पोटऱ्यातून कणसं डोकावू लागली की रानपाखरांचे थवे त्यावर तुटून पडतात. आम्ही त्यांना हुसकावत नाही. हरणांचे कळप शेतात धुडगूस घालतात—त्यांनाही आडवत नाही. त्यांची पोटं तट्ट फुगल्यावर त्यांच्या मुखातून जे उरेल, तेवढ्यावरच आमचा अधिकार. सगळ्यांनीच ऊस, फुले, फळे पिकवली, तर तृणधान्यांवर जगणाऱ्या पाखरांनी काय खावं, कसं जगावं?
काळ बदलतो आहे. कदाचित अशी पारंपरिक शेती करण्याची ही अखेरची संधी असेल.
आज माघ वद्य चतुर्थी. पौर्णिमेच्या तीन कला जरी क्षीण झाल्या असल्या, तरी चांदण्याचा शीतल प्रकाश अजूनही शेतावर अलगद सांडतो आहे. अशाच चांदण्यारात्री ज्वारीची काढणी इर्जिकीतून करण्याचा आम्ही निर्धार केला.
सायंकाळी पुण्याहून निघून रात्री शेताच्या बांधावर पोहोचलो. ९. ५६ ला चंद्र उगवला—गुलाबी, केशरी छटांनी न्हालेला. एका सुहासिनीने निरांजनाने चंद्राला ओवाळले. बायांनी पदर खोचले, एकमेकींना कुंकू लावलं. तरुणांनी बाह्या सरसावल्या. ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर आसमंतात घुमला आणि काढणीला सुरुवात झाली.
चार तासांत उभं पीक धराशायी झालं! घामाच्या धारा, वाढता गारवा, थकलेली शरीरे—आणि तरीही चेहऱ्यावर समाधान.
रात्री तीन वाजता काम उरकलं. श्रमपरिहार पुढे ढकलला गेला. आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. रस्ता निर्मनुष्य होता. एक तरसांची जोडी रस्ता ओलांडताना क्षणभर थांबावं लागलं—निसर्गाने जणू नमस्कार स्वीकारला.
घरी पोहोचून जरा आडवा झालो डोळा लागता, पण स्वप्नात जेसीबी, बोअरवेल जिग, ट्रक, ट्रॅक्टर यांचे गगनभेदी आवाज, भेदरून पळून जाणारी पाखरं दिसू लागती, छाती धडधडू लागली—आणि डोळे टक्क उघडले.
मनात विचार चमकून गेला—आज आपण स्वतःसाठी इर्जिक केली, पण जर पुन्हा एकदा, गावासाठी, गावाच्या भविष्यासाठी इर्जिक करता आली तर?
चावडीवर उभं राहून गावक-यांना आवाहन करता आलं तर—
“बाबांनो, माझ्यासाठी नव्हे, साऱ्या गावासाठी इर्जिक करूया.
प्रत्येक शेताच्या बांधा-बांधावर, मोकळ्या जागांवर, माळणानांवर झाडं लावूया, प्रयत्नपूर्वक ती शिंपून, जगवूया… पाखरांसाठी, निसर्गासाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. ”
हे शक्य आहे का?
हे स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरेल?
उत्तर काळ देईल!
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




