श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
😂 आंघोळ ! 🤠 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“मी परत बंब पेटवणार नाही, पाणी तापलंय तर पटा पटा अंघोळी उरकून घ्या! नाहीतर दिवाळीची पाहिली अंघोळ गार पाण्याने करावी लागेल, सांगून ठेवत्ये! “
मंडळी साधारण प्रत्येक वर्षी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला, आम्हां लहान मुलांना उठवतांना आमच्या आईचा हा धमकी वजा डायलॉग ठरलेला असायचा. अर्थात त्याचा फारसा परिणाम आम्हां मुलांवर त्याकाळी होत नसे हा भाग निराळा. अशावेळी फार फार तर आम्ही मुलं कूस बदलून पुन्हा डोक्यावर पांघरूण घेवून परत झोपायचा प्रयत्न करायचो इतकंच. मग आम्ही अगदीच उठत नाही म्हटल्यावर, आमच्या अंगावरची पांघरूणं काढून टाकणे, पायावर हळूच चापट्या मारणे अशा दुसऱ्या ऍकशन मोड मध्ये आमच्या आईची गाडी जायची! मग मात्र आमच्यापुढे अंथरुणातून उठण्या शिवाय पर्याय नसायचा.
धारण बहात्तर वर्षांपूर्वी प्रत्येक दिवाळीला थंडी नुसती पडायची नाही तर दातावर दात आपटेपर्यंत चक्क वाजायची. त्यावेळी थंडी पडणं आणि थंडी वाजणं या दोन्ही गोष्टीत शरीराला जाणवण्या इतका फरक नक्कीच होता. हल्लीचा पर्यावरण नामक राक्षस त्या काळापर्यंत तरी अस्तित्वात नव्हता असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे दिवाळीला भल्या पहाटे बंबातल्या गरम गरम पाण्याने अंघोळ करणं ह्या सारखं स्वर्ग सुख नव्हतं!
शिवाय तेंव्हा चाळीत दिवाळीला पाहिला ऍटोम बॉम्ब कोण फोडणार यात चाळीतल्या मुलांत जणू चुरस असायची. मग चाळीतला एखादा अत्रंगी मुलगा, पहाटे तीन साडेतीनलाच “कॅप्टन” नावाचा चौकोनी ऍटोम बॉम्ब फोडून अख्खी चाळ हादरवून लोकांना पहाटे उठवायला जणू हातभारच लावायचा म्हणा नां! पण तेंव्हाचा काळच वेगळा होता, त्यामुळे दिवाळीत पहाटे पहाटे फटाक्याच्या आवाजामुळे आपली झोपमोड झाली, असं चाळीतल्या कुठल्याच चाळकऱ्याला वाटत नसे. आजकाल लोकांना फटाके फोडायला काहीही कारण पुरत. त्या सर्व कारणांची चिकित्सा करायची म्हटली तर एक वेगळा लेखच लिहावा लागेल! शिवाय हल्लीच्या पिढीची पहाटच अनेक कारणामुळे सकाळी आठ नऊच्या आधी होत नाही, त्याला आपण मनातल्या मनांत ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणण्याशिवाय दुसरं काय करू शकतो? असो!
मंडळी, जेंव्हा अंघोळीला अंघोळच म्हणत होते, त्या काळाबद्दल मी बोलतोय. “उठा उठा, दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली! ” असं अख्ख्या चाळभर, हातातल्या मोती साबणाने लोकांची दारं वाजवत, त्यांची दिवाळीच्या गुलाबी थंडीत झोपमोड करणारे आजोबा तेंव्हा टीव्हीवर अवतारयचे होते! बरं, अशी झोपमोड करून त्या आजोबांनी घरटी एक एक मोती साबण दिवाळी भेट म्हणून दिला असता, तर एक वेळ मी समजू शकलो असतो हॊ! पण हे आजोबा (पुणेरी असल्यामुळे? ) नंतर तो हातातला साबण पुढच्या दिवाळीच्या पहाटेस, परत त्याच कामासाठी वापरायला बहुतेक स्वतःच्या घरी घेवून जात असावेत. असं काही त्या ऍड मध्ये दाखवलं नव्हतं, पण दर दिवाळीला मोती साबणाची तीच तीच ऍड बघून, मीच आपला माझा स्वतःचा असा एक अंदाज बांधला इतकंच!
दुसरं असं की त्या वेळेस “दिवाळी पहाट” सारख्या कार्यक्रमांचे गल्लो गल्ली पेव फुटलेले नव्हते. त्यामुळे अशा एखाद्या कार्यक्रमाची निवेदिका लाडे लाडे, मान थोडी तिरकी करून मधाळ आवाजात “आपण सारे रसिक अभ्यंग स्नान करून आजच्या कार्यक्रमाची रंगत वाढवायला भल्या पहाटे (तिकीट काढून) आलात त्याबद्दल प्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते! ” असं रंगात येवून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील अंघोळी सारख्या रोजच्या विधिला “अभ्यंग स्नानाचा” दर्जा देऊन त्याला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर नेवून ठेवायचा तो काळच नव्हता. तर उटणं आणि सुवासिक तेल लावून, बंबातल्या गरम गरम पाण्याने अंघोळ करून, नवीन कपडे घालून एकमेकांच्या घरी न बोलावता फराळ करायला जाऊन, दिवाळीचा उत्साह द्विगुणित करायचा तो काळ होता मंडळी! गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी! तर पुन्हा एकदा, असो!
अंघोळ! अगदी अनादी काळापासून स्नान या रोजच्या विधिला अंघोळ असा पर्यायवाचक शब्द कोणाच्या डोक्यातून आला आणि तो कधी पासून आपल्या मराठी भाषेत रूढ अर्थाने वापरायला सुरवात झाली, हा एक (नेहमी प्रमाणे) संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण ज्याने हा पर्यायवाचक शब्द शोधून काढला त्या मागे त्याचं स्वतःच असं एक तर्कशास्त्र असावं, असं मला वाटतं. मी जेंव्हा (व्याकरण दृष्ट्या नाही हे आधीच कबूल करतो) माझ्या पद्धतीने आणि अल्प बुद्धीने अंघोळ या शब्दाची फोड अं(मळ)+घोळ अशी करतो, तेंव्हा अंघोळ हा पर्यायवाचक शब्द एखाद्या नवऱ्याच्या सुपीक डोक्यातूनच आला असण्याची माझ्या डोक्यातली शंका आणखीनच बळावते! कसं ते सांगतो. जगातल्या तमाम नवरे मंडळीना, सुट्टी असो अथवा नसो मुळात अंघोळ करायचाच कंटाळा, खोटं वाटत असेल तर आपल्या धर्मपत्नीला विचारा! शिवाय घोळ या शब्दाचा आणि जगातल्या तमाम बायकांचा अत्यंत जवळचा संबंध, असं जणू प्रत्येक नवऱ्याचे ठाम मत! त्यामुळे “आज काय घोळ घालून ठेवलायस? ” हा आपापल्या बायकोला उद्देशून म्हटलेला डायलॉग दर दोन दिवसाआड प्रत्येक “सुखवस्तु” घरी ऐकायला येतोच येतो. म्हणजे एका अर्थी माझ्या शंकेला पुष्टीच मिळते, असं आपलं माझं प्रांजळ मत. आता आपण म्हणाल प्रांजळ मत म्हणजे? नेहमी तुम्ही ठाम मत असं म्हणता आणि आज एकदम प्रांजळ मत म्हणून स्वतःला मवाळ वर्गातले समजायला लागलात की काय? मंडळी उगाच गैरसमज नको, मी प्रांजळ हा शब्द मुद्दामच वापरला. म्हणजे असं बघा, या शब्दात जो “जळ” हा शब्द दडला आहे त्याचा अर्थ पाणी आणि रोज कुठलाही घोळ न घालता अंघोळ करतांना मी (निदान माझा तरी) संबंध बादलीभर जळाशी येतोच येतो, म्हणून मी आपलं प्रांजळ मत म्हटलं इतकंच!
वाचकहो, आता अंघोळ ह्या शब्दाबद्दल जास्त घोळ न घालता, हा शब्द पहिल्यांदा कुणी, कधी आणि कां वापरला या बाबतीतले माझं मत मांडणं मला यापुढे आणखी घोळात घालेल असं वाटत, म्हणून या संशोधनाचे सर्व हक्क, जे कधीच माझ्याकडे नव्हते, ते कुठलाही भाषा संशोधक घेवू शकतो असं माझं मीच जाहीर करतो आणि आणखी घोळ न घालता पुढील लेखाकडे वळतो.
हमामखाना! हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा. ही मध्यपूर्वेतील संकल्पना आणि वास्तू इस्लामी राज्यकर्त्यांनी आपल्याकडे आणली. तेंव्हा दोन प्रकारचे हमामखाने होते, एक राजघराण्यातील लोकांसाठी आणि दुसरा सामान्य लोकांसाठी. शाळेत असतांना जो थोडाफार इतिहास “कानावरून गेला” त्यातील सनावळीपेक्षा लक्षात राहिलेला हा एक शब्द. अर्थात आपल्या सगळ्यांचेच जन्म इतिहासकालीन नसल्याने, या दोहोतील कुठल्याच हमामखान्यात अंघोळ करण्याचे भाग्य आपल्यापैकी कुणालाच लाभले नाही. पण माझ्या पिढीतील ज्यांचे लहानपण माझ्या सारखे चाळीत गेले, त्या लोकांनी “सार्वजनिक नळावर” आमच्या “त्या हमामखान्यात” जरी अंघोळीला सुगंधी अत्तराचे हौद नव्हते तरी, उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ नळाखाली अंघोळ करायचा आनंद नक्कीच घेतला असेल! कारण मंडळी त्यावेळी घरातल्या नळाला तर सोडाच, पण सार्वजनिक नळाला सुद्धा चौवीसतास पाणी होतं हॊ! आजच्या सारखी पाण्याची “सिन्टेक्स” संस्कृती त्या वेळेस जन्माला यायची होती!
शिवाय हमामखाना हा शब्द तसा लक्षात राहण्याचे दुसरं कारण म्हणजे त्यावेळेस आम्ही रोज अंघोळीसाठी वापरत असलेला “हमाम” साबण. आज इतक्या वर्षांनी सुद्धा हमाम साबण बाजारात तग धरून आहे, पण त्यावेळच्या त्याच्या क्वालिटीची बातच निराळी होती, हे आपण सुद्धा तो तेंव्हा वापरला असेल तर मान्य कराल. आजच्या कलियुगात जरी हमामखाने नामशेष झाले असले तरी, कलियुगातल्या अब्जाधीशांच्या महालासमान हवेल्यातून हमामखान्याला लाजवील अशा प्रकारची न्हाणीघर असतात, हे आपण माझ्याप्रमाणे कुठल्यातरी व्हिडीओत नक्कीच बघितलं असेल!
शेवटी, अंघोळ ही कधी करावी, रोज करावी का नाही, गार पाण्याने करावी का गरम पाण्याने का कोमट पाण्याने आणि कोणी कोणाला कधी घालावी, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. त्या बाबत मी अधिकार वाणीने काही बोलावं इतका माझा अंघोळ या विषयातला अभ्यास नाही. पण जेंव्हा केव्हा तुंम्ही अंघोळ कराल ती “कावळ्यासारखी” कधीच करू नका, असं आपल्याला “मैसूर सॅंडल सोपची” शपथ घालून सांगतो आणि हे माझं अंघोळपुराण, आजचं माझं आंघोळीचं बादलीभर पाणी गार व्हायच्या आधीच संपवतो व रोजच्या अंघोळीला खरोखरचा पळतो!
मनाने आणि तनाने नेहमीच निर्मळ रहा!
शुभं भवतु!
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





