सौ शालिनी जोशी
विविधा
☆ कोळी… ☆ सौ शालिनी जोशी ☆
कोळी घरात कोठेतरी कोपऱ्यात आढळणारा प्राणी. दिसला की गृहिणी केरसुणी आणायला पळतेच. पण परत येते तेव्हा तो कोळी कुठच्या कोठेच पळालेला असतो. सापडतच नाही. दिसते ते त्यांने कोपऱ्यात कोठे तरी केलेले जाळे. अतिशय पारदर्शक व सूक्ष्म तंतू पासून केलेली कलाकृती. खरोखरच किती अद्भुत आहे नाही! माणसाने कितीही प्रयत्न केले तरी असे नाजूक जाळे करणे शक्य नाही.
हे जाळे ज्यावेळी घराबाहेर एखाद्या झाडाला किंवा खिडकीला धरून केले जाते, तेव्हा विशेष शोभिवंत दिसते. लांबवर त्याचे हातपाय पसरलेले असतात. सकाळच्या सूर्यप्रकाशात ते चमकू लागले की त्याची रचना स्पष्ट दिसते. त्या लटकणाऱ्या झोपाळ्यात झोके घेणारा तो कोळी अगदी राजासारखा शोधतो. जणू आपले ऐश्वर्य डोळे भरून पाहत आहे, उपभोगत आहे. त्यात हिवाळा असेल तर दवबिंदूही त्याचा आधार घेतात. आणि मग तो हिरे महालच होऊन जातो. सूर्याच्या सप्तरंगात तो न्हाऊन निघतो. त्या छोट्या विश्वकर्माच्या त्या रचने पुढे नतमस्तक व्हावे वाटते. केवळ फोटोत बंदिस्त करणे आपल्या हातात असते.
असे हे जाळे नुसते शोभेचे नाही. किड्यांना पकडून आपले पोट भरण्याचे कोळ्याचे ते साधन आहे. बसल्या जागी अन्न मिळवण्याची ही त्याची अनोखी पद्धत. ‘पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी तू जगदिशा’ म्हणायची वेळ त्याचे वर कधीच येत नाही.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे घर बांधायला त्याला काही सामग्री गोळा करावी लागत नाही. घर बांधायचे म्हणजे माणसाची किती धावपळ. विटा, वाळू, सळई, पाणी, लाकूड आणि मुख्य म्हणजे जागा आणि कामगार, काय नको! पण हा बिचारा आपल्या शरीरातून एक चिवट धागा काढतो व आपल्या शरीराभोवती मोठ्या कौशल्याने गुंतवितो. अंतरिक्षात लोंबत ठेवतो. साहित्य नको, जागा नको. माणसाच्या श्रेष्ठत्वाच्या अभिमानाला तडा देतो. माझे घर म्हणणाऱ्यांना आपली जागा दाखवतो. सुखा समाधानाने जाळ्यात येणाऱ्या अन्नाचा उपभोग घेतो. गरज संपल्यावर सगळा पसारा आपल्यातच सामावून घेऊन मोकळा. मागे काही उरत नाही. सृष्टीची निर्मिती करून लिला दाखवणारा आणि परत सृष्टीला आपल्या सामावून घेणारा परमात्माच तो होतो. ज्या परमात्म्याने त्याला निर्माण केले, त्याचा आदर्श तो तंतोतंतो पाळतो. आपल्या पसारा आपणच आवरून त्या परमत्वात लीन व्हायला मोकळा. केर नाही कचरा नाही. म्हणूनच अवधुताने आपल्या २४ गुरूत त्याला स्थान दिले.
आदर्श घ्यावा तर त्याचा. स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी सारा पसारा मांडावा. पण त्याचा त्रास कुणाला होणार नाही. त्याची जबाबदारी कुणावर पडणार नाही. अशा प्रकारे तो आवरून निरोप घ्यावा. हा आदर्श देणारा एकमेव कोळी.
कोळी तसा निरुपद्रवी प्राणी, घर अस्वच्छ करतो असे वाटत असले तरी बारीक सारीक किडे खाऊन घर स्वच्छ ठेवतो. त्याचा स्पर्श झाला किंवा अंगावर चिरडला गेला तर थोडा त्रासदायक असे म्हणतात. त्याच्या पुष्कळ जाती, रंगावरून व घर बांधायच्या पद्धतीवरून ठरतात. असो आठ पायांचा हा छोटासा प्राणी सृष्टीच्या विविधतेचे एक अंग आहे एवढे मात्र नक्की.
पर्यावरण रक्षणासाठी माणसे ज्या 5R(reduce, reuse, recycle, refuse, recover) चा वारंवार गवगवा करतात, ते तर याच्या पचनीच पडलेले असतात. कारण ज्या ज्या वेळी तो नवीन जाळं तयार करतो, तेव्हा पहिले खाऊन पचवतो, शक्ती मिळवतो आणि परत शरीरातून काढलेल्या धाग्याने नवीन जाळे तयार करतो. फारतर एक तासाचा कालावधी. ही जाळ्याची तोडमोड ध्येयपूर्तीपर्यंत सुरू असते. एकदा का अंडी घातली की कार्यभाग संपला. मग पसारा आवरून रामराम. राहिलाच एखादा जाळ्याचा धागा तर तो इतर पक्षांचे आवडते खाद्य. त्यातून परोपकारही साधला. सारेच अजब!
‘एका कोळीयाने घर बांधलेले ना कळस ना पाया रे’ खरं आहे.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






