श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ गाणी, अभिनय, संगीत आणि आपण… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
आज काही जुन्या हिंदी गीतांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. तशी माझी आणि माझ्या बरोबर वाढलेल्या पिढीतील लोकांची बरीच हिंदी आणि मराठी सदाबहार गाणी आवडती आहेत. साठ ते सत्तर च्या दशकातील ही गीते आहेत. त्यातील पहिले गीत आहे साथी या चित्रपटातील. हा चित्रपट १९६८ मध्ये आला होता. त्यातील हे गीत आहे. ‘ये कौन आया, रोशन हो गई महफिल किस के नाम से…’ लता मंगेशकरांनी हे गीत अत्यंत अप्रतिम गायले आहे आणि तितकाच अप्रतिम अभिनय या गीताच्या वेळी सिमी गरेवालने केला आहे. पार्टी सुरु असते. आणि सिमी गात असते. त्याचवेळी राजेंद्रकुमार येतो. आणि मग गाताना सिमीचा चेहरा बघावा. आनंद अगदी ओसंडून वाहणे म्हणजे काय हे पहायचे असेल तर तिच्या चेहऱ्याकडे बघावे. एखाद्या फुलासारखा प्रसन्न फुललेला चेहरा. हे गाणे जेव्हा आपण पाहतो किंवा ऐकतो तेव्हा पाहणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला ते अगदी प्रसन्न करून जाते. जसे फुले वाटणाऱ्याच्या हाताला फुले सुगंध देऊन जातात. हे गीत लिहिले आहे मजरूह सुलतानपुरी यांनी आणि संगीतबद्ध केले आहे नौशाद यांनी.
दुसरे गीत आहे लव्ह इन टोकियो चित्रपटातील. हे गीत लता मंगेशकरांनी अप्रतिम तर गायिलेच आहे पण तेवढाच समर्थ अभिनय केला आहे आशा पारेख यांनी. या गीतातही पार्टीत आशा पारेख गात असते. चेहरा वर जसा सिमी गरेवालचा सांगितला आहे तसाच प्रसन्न. गीताचे बोल आहेत ‘ मुझे तुम मिल गये हमदम, सहारा हो तो ऐसा हो… ’ प्रेमात अशी अवस्था होते की जिकडे तिकडे प्रिय व्यक्तीच दिसू लागते. म्हणून पुढील ओळ आहे ‘ जिधर देखू उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो तो ऐसा हो.. ’ असे सगळे आनंदाचे गीत सुरु असताना प्राण ज्याने त्या चित्रपटात खलनायकाचे काम केले आहे तो तिच्या लहान मुलाचे (की भावाचे) अपहरण करतो. त्यावेळी तिला त्याबद्दल फोन येतो. आणि एखादी हरिणी जशी पाडसाच्या ओढीने भयग्रस्त व्हावी तसे तिचे होते. काळजात धस्स होते. डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळतात. पण दुसऱ्याच क्षणी ते सगळं लपवून ती गायला लागते. एक दोन क्षणातच हे सारे पडद्यावर घडते. पण त्या तेवढ्याच एक दोन सेकंदात आशा पारेखने अभिनयाची कमाल केली आहे. सगळे भाव आनंदाचे, दुःखाचे आणि भीतीचे चेहेऱ्यावर दाखवले आहेत. गाण्याचे बोल फार सुंदर आहेत. ती म्हणते ‘मेरी आंखों में आंसू है, मगर आंसू खुशीके है, किसे छोडू किसे पा लू, ये रिश्ते जिंदगीके है ‘ अप्रतिम शब्दरचना. शैलेंद्र यांची ही गीतरचना. शंकर जयकिशन यांचे तितकेच मधुर संगीत. आणि लता दीदींचा आवाज. या चौघांपैकी कोण श्रेष्ठ? नाही ठरवता येत. बस, एकाच वाक्यात सांगायचे तर Hats off to them!
तिसरे गीत आहे आम्रपाली या चित्रपटातले. हा चित्रपट सुद्धा १९६६ मधेच आला होता. या चित्रपटातील गाणी. संगीत, आणि पात्रांचा अभिनय केवळ अप्रतिम. गाणे आहे ‘ नील गगन की छांव में… ’ शैलेन्द्र यांच्याच या गीताला संगीत दिले आहे पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांनी. आणि अभिनय केला आहे नृत्यात प्रवीण असलेली कसदार अभिनेत्री वैजयंती माला यांनी. ही जी तीनही गाणी आहेत यात नायक आहेतच. त्यांचा अभिनय आहेच. पण मुख्य अभिनय बघायचा तो नायिकेचाच. मला खात्री आहे की हा लेख वाचल्यानंतर काहींना नक्कीच ही गाणी पाहण्याची इच्छा होईल. तर जरूर बघा. ऑडीओ नको व्हिडीओ बघा. हे गीतही दरबारात मुजरा करताना वैजयंती माला म्हणते. चेहऱ्यावरून आनंद ओसंडतो आहे. गीतावर नृत्य करताना तिचे पदन्यास पाहण्यासारखे आहेत. शास्त्रीय नृत्याचा आणि गीताचा सुरेख संगम म्हणजे हे गीत. तर सांगायचे हे की जेव्हा सुनील दत्त तिथे येतो तेव्हा तिचे काही काळ थांबलेले नृत्य पुन्हा सुरु होते. आणि मग त्या नृत्यात वैजयंतीमाला जी नाचली आहे ते पाहण्यासारखे आहे. अक्षरशः त्यात तिने जान ओतली आहे. प्रचंड एनर्जी आणि उत्साह आहे. तो जो नृत्याचा छोटासा तुकडा आहे त्यात शब्द नाहीत फक्त संगीत आहे. मृदुंग, वीणा आणि तबल्याचा ठेका.
ही तीनही गाणी बघताना त्यातला काळ, अवकाश याचे जरूर निरीक्षण करा. काळ म्हणजे त्या वेळचे वातावरण या दृष्टीने ही तीनही गाणी दिग्दर्शकाने कशी चित्रित केली आहेत, ते वातावरण कसे जिवंत केले आहे हे पाहण्यासारखे आहे. ती गाणी गायिली जात असताना भोवतालची माणसे, त्यांचे हावभाव यांचे किती बारकाईने चित्रण केले आहे. आम्रपाली मधल्या गाण्यात तर हे जरूर पाहण्यासारखे आहे. आणि अवकाश म्हणजे space या अर्थाने. म्हणजे त्या दृश्याची व्यापकता, ती जागा त्याचे निरीक्षण करा. तो काळ, ते वातावरण त्या दिग्दर्शकाने, कलाकारांनी कसे जिवंत केले आहे हे पहा. आपण असे निरीक्षण फारसे करीत नाही. ती दृष्टी आपण हळूहळू विकसित केली तर आपण अशा अक्षर आणि अजरामर कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकू.
पूर्वी ही गाणी, किंवा चित्रपट तयार करताना महिनोंमहिने मेहनत घेतली जायची. रियाज केला जायचा. त्यातून अशी सदाबहार गीते जन्माला यायची. गाण्यामध्ये वाद्यांचा ढणढणाट नसायचा, मोजकीच वाद्ये असायची. गाण्याचे बोल अर्थपूर्ण असायचे. मंद संगीत, सुरेख चाल इ. मुळे गाणी श्रवणीय व्हायची. गाणी गाताना नाचणाऱ्या अनावश्यक व्यक्तींचा ताफा किंवा पलटण नसायची. या पार्श्वभूमीवर आजच्या गाण्यांची आपण तुलना करू शकता. आजही काही चांगली गाणी निर्माण होतात. नाही असे नाही पण बोटावर मोजण्याएवढीच.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




