सौ शालिनी जोशी
विविधा
☆ चंद्र महिमा… ☆ सौ शालिनी जोशी ☆
“चांदोमामा चांदोमामा भागलास का?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?”
आकाशातील चंद्र, पृथ्वीचा उपग्रह. पण तोच बालकांचा चंदामामा. ढगामागुन डोकावणारा आणि झाडामागे लपून बालकांशी लपाछपी खेळणारा. कधी त्याच्यावरील डागात मुलं सशाची जोडी पाहतात, तर कधी वहिनीला आणायला चांदोबाची गाडी पाठवायची तयारी करतात. असा हा मुलांचा जानी दोस्त. प्रियकराला मात्र तो प्रियेच्या मुखात भासतो आणि ते मुख चंद्रमुख होते. बंधू नसलेल्या स्त्रीचा भाऊ होऊन तिच्याकडून ओवाळण्याचा मान तो मिळवितो. गरोदर स्त्रीला आपले डोहाळे पुरविण्यासाठी चंद्रकोरीवर बसावे वाटते व चांदणी भोजनाची हौसही पुरवावी वाटते.
लक्ष्मीलाही त्याची प्रभा मोहित करते. तसे वस्त्र व कांती ती धारण करते. गणेशही या खट्याळ चंद्राला शिक्षा देतो. (गणेश उंदरावर बसून निघाला असला त्याचा तोल जातो म्हणून चंद्र त्याला हसतो. म्हणून गणेश त्याला शाप देतो. अशी कथा आहे). म्हणून आपले रूप कमी जास्त करण्याची व पूर्ण नाहीसे करण्याची लीला त्याला करावी लागते आणि गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करणाऱ्यांवर चोरीचा आळ येतो, हा कलंक ही चंद्राला सहन करावा लागतो. अशा चंद्राला भगवंत मात्र आपली विभुती मानतात. ते म्हणतात, ‘नक्षत्राणामहं शशी’. चंद्र शीतल, थंड, शांत म्हणून विषप्राशनाने झालेला दाह कमी करण्यासाठी भगवान शंकर त्याला आपल्या भाळी स्थान देतात. म्हणून भगवान शंकर चंद्रमौळी नावाने ओळखले जातात.
रामाला तर बालपणी तो चेंडू वाटला. तो मिळावा असा बालहट्ट तो करतो व पुढे चंद्रासारख्या शांत स्वभावाचा म्हणून रामचंद्र होतो. समुद्रमंथनातून याचा जन्म झाला असे सांगितले जाते. चंद्र ही मनाची देवता. म्हणून ‘चंद्रमामनसोजातः’ असा पुरुषसुक्तात त्याचा उल्लेख आहे. गोपी कृष्णाच्या रासक्रीडेचा साक्षीदारही तोच. आणि कृष्णाचा वंश ही चंद्रवंश. अशाप्रकारे पुराणकालापासून असलेले आपले महत्व तो आजही टिकवून आहे.
खगोलशास्त्रीय दृष्टीने पृथ्वीचा उपग्रह, म्हणणून त्याला पृथ्वीपुत्र म्हटले जाते. लाडक्या बालकाप्रमाणे अखडं पृथ्वीभोवती गोल गोल तो फिरतो व पृथ्वीच्या मदतीने सूर्याला झाकायचे धाडस करतो (यालाच ग्रहण म्हणतात). चंद्र आपल्या पूर्णत्वाने पृथ्वीवरील सममुद्राला आकर्षित करतो. (भरती, ओहोटी होतात).
आपल्या उगवण्याने चंद्रविकासी कमळाला (कुमुदिनी) उमलवितो. सोमकांत मण्याला पाझरायला भाग पडतो. आपल्या अमतृमय किरणांनी चकोराला तृप्त करतो. संत ज्ञानेश्वरांनाही मोहात पाडतो. त्यामुळे वेळोवेळी चन्द्राच्या दृष्टांतांची आपल्या ग्रंथात ते रेलचेल करतात. अनेक कवींच्या कवितांचा विषय होण्याचे भाग्य या चंद्राला लाभले. तो चिरंतन आहे म्हणून ‘आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ अशा स्वातंत्र्यगीतात त्याला स्थान आहे. आपली शीतलता व मंद प्रकाश कोणताही भेद न करता सर्वांना मुक्त हस्ताने वाटणारा संत ही तोच. आजारी दमेकऱ्याला पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशातील औषध मानवते. वनस्पतीतील औषधी गुणधर्म ही त्याचीच किमया. विवाह यशस्वी होण्यासाठी लग्नापूर्वी पत्रिका बघताना आधी चंद्रबळ बघीतले जाते. असे याचे बळ!
स्त्रियांचा तर लाडका, म्हणून त्यांच्या रांगोळीत याला मानाचे स्थान असते. तसेच आपल्या भाळी कुंकवाची चंद्रकोर काढून त्या त्याला मिरवतात आणि गळ्यात चंद्रहार नावाचा दागिनाही घालतात. चंद्राच्या कलेप्रमाणे रोज एक एक घास वाढविणे व कमी करणे असे ‘चांद्रायणी’ नावाचे व्रतही स्त्रिया करीत. बालपणीचा मामा, बहिणीचा भाऊ, प्रेमाचा साक्षीदार, म्हातारपणी वयाची ऎंशी वर्षे झाल्यावरही सोबतीला असतो. ८१ वर्षांत १००० पौर्णिमा येतात. म्हणन ८१ वर्षे पूर्ण झाल्यावर सहस्रचंद्रदर्शन सोहळा केला जातो.
हे सर्व झाले लांबून केलेले कौतुक. पण आपले शास्त्रज्ञ मात्र या लांबच्या अनुभवावर तृप्त नाहीत. त्यांना तेथे वस्ती करायचा आनंद उपभोगायचा आहे. त्यासाठी तेथील माती, हवामान, पाणी, गुरुत्वाकर्षण या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. त्यादृष्टीने आपले चांद्रवीर चंद्रावर जाऊनही आले आहेत. (नील आर्मस्ट्रॉंग आणि एडवर्ड ऑल्ड्रिन आता ही संख्या बारा झाली आहे.) इस्रोने सोडलेल्या यानाचा ऑरबिटर अभ्यासासाठी त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालून आला. तर चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली.
अशाप्रकारे आपल्या विविधांगी व्यक्तीमत्वाने सर्वांना भुरळ पाडणारा, पुराणकालापासून सर्वांचे आकर्षण ठरलेला चंद्र विविध नावांनी मिरवतो यात नवल नाही. उदा. सोम, शशी, नील, सुधाकर, भौमिक, विकेश इ.
आपले पंचांगही चंद्राच्या फिरण्यावर आधारीत आहे. आपले विविध सणही आपण पौर्णिमेला साजरे करतो. जसे गुरुपौर्णिमा, राखीपौर्णिमा, वटपौर्णिमा. यातून गुरु-शिष्य, बहीण-भाऊ, पती-पत्नी यांच्या नात्याचा दुवा तो होतो. या शिवाय त्रिपुरीपौर्णिमा, नव्याचीपोर्णिमा, होळीपौर्णिमा इ. सणही पौर्णिमेलाच असतात. प्रत्येक पौर्णिमेची नवलाई वेगळी. याशिवाय अश्विनपौर्णिमा किंवा शरदपौर्णिमा हिला कोजागिरीपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी रात्री चंद्राच्या अमतृवर्षावाने सुगंधीत व रसमय झालेले दूध पिऊन लोक नीरामय आयुष्याची इच्छा करतात. चंद्र पूजन करतात. आनंदाने एकमेकांच्या सहवासाचे सुख उपभोगतात. या रात्री लक्ष्मी ‘को जागराति?’ (कोण जागे आहे?) असे विचारत सर्वत्र संचार करते. अर्थात ही जागृती साधीसुधी नाही तर ही ज्ञानदृष्टीची जागृती आहे. आणि अशी जागृती झालेला साहजिकच परमसुखरूपी धनाचा आधिकारी होतो. या पौर्णिमेचे वैशिष्टय म्हणजे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो व आपल्या अमतृधारा पृथ्वीरूप प्रियेच्या हिरवळीत मिसळून टाकतो.. अशी कवी कल्पना. आणि मग श्रीनिवास खळेंसारख्या कवीना काव्य स्फुरते, ‘उगवला चंद्र पुनवेचा, मज हृदयी दरिया उसळला प्रीतीचा’.
चंद्राचे रोज निराळे लावण्य. आजची कला उद्या नाही. शंकराच्या भालप्रदेशावर प्रकट होते ती द्वितीयेची चंद्रशोभा. तर प्रतिपदेची अगदी कळत नकळत दिसणारी, शाखाचद्रंन्यासाने दाखविली जाणारी. अष्टमीच्या चंद्राचे सौंदर्य विशेष असते. पौर्णिमेला चंद्राच्या तेजापुढे तारका लोपतात. तर अष्टमीला वेचक तारकच दिसतात. अमावास्येचा आनंद तर फारच गंभीर. त्या दिवशी निस्तब्ध शांतता असते. चंद्राचा जुलमी प्रकाश नसल्याने लहान मोठे अगणित तारे पूर्णपणे चमचम करीत असतात. त्या दिवशी चंद्र सूर्याशी एकरूप होतो.
असा हा चंद्र आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनला आहे. इतर कोणत्याही ग्रहाला मिळाले नाही ते स्थान चंद्राला मिळाले आहे.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






