सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ प्रवासातील सहप्रवासी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
माझे पती केंद्रीय पोलीस सेवेत असल्यामुळे त्यांच्यासोबत पुर्ण देशभर प्रवासाचा योग येत असतो. हा प्रवास कधी ट्रेनचा, कधी बसचा तरकधी ट्रॅव्हल्सचा सुरू असतो. आता अगदी अलिकडे तर कर्नाटकमधून कारवार-पिंपरी बस तर माझ्या प्रवासाची चांगलीच सोबत झाली आहे. असो. खरे सांगायचे तर या प्रवासातील सहप्रवासी ते मात्र कधी कधी खूपच गमतीदार असतात. अगदी दिर्घकाळ लक्षात राहणारे म्हणा. हा प्रवास पण फार गमतीशीर असतो बघा. प्रवासात देखील आपल्या बर्याच ओळखी होतात. अगदी गावगल्ली पासून ते पै-पाहूण्यांचा माग काढला जातो. इतके आपण आपल्या सोबतच्या शीटवर बसलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत गप्पांत रंगून जातो.
आता ट्रेनच्या प्रवासाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर ट्रेनमध्ये आरक्षण न झालेल्या प्रवाशांची लुडबुड फारच असते पहा. अगदी लग्नात मिरवणाऱ्या बिनकामाच्या करवल्या आणि करवले असतात ना नेमकी तशीच पहा! उगी आपले इथून उठ तिथे बस पुन्हा तिथून उठायचे दुसर्या शिटवर बस. शीट रिकामी दिसली की आपलं टेकायचं लगेच. असे संपूर्ण प्रवासभर आपल्या सोबतच्या बॅगचे हाल करत त्याचा प्रवास चालू असतो. शेवटी पक्के आरक्षण असणाऱ्या प्रवाशास विनंती करून ते आपल्या बॅगपुरती तरी जागा मिळवतातच. स्वतः मात्र असेच फिरत रहातात नशीबाने मिळाली जागा की लगेच आपलं टेकायचं. असे सहप्रवाशी ट्रेनच्या नेहमीच्याच प्रवासात भेटत गेले. असो. काहीजण आठवणी राहिले नंतर विसरले.
एकदा मी कल्याण ते संभाजीनगर रेल्वेनी प्रवास करत होते मी माझा दहा वर्षाचा मुलगा आणि माझी लहान मुलगी असे तिघेजण आम्ही प्रवास करत होतो.
आमचे दोन शीटचे आरक्षण होते. मुलगी लहान होती त्यामुळे तिचे तिकीट नव्हते. बाजूला एकजण असे चौघेजण एका बर्थवर होतो. मी एकदम अलिकडे बसले होते. ट्रेन नाशिकरोडला थांबली आणि आमच्या डब्यात खूपच गर्दी झाली. कदाचित संध्याकाळी पाचसहा दरम्यान ऑफीस सुटण्याची वेळ त्यामुळे असेल. रेल्वेचा डबा अगदी खचाखच भरून गेला. डब्यात आल्यावर प्रत्येकजण थोडं टेकायला जागा मिळेल का ?असे प्रश्नचिन्ह चेहर्यावर ठेवून ठेवून ऊभे होते. माझ्या बाजुलाच एक बाई उभी होती. ती उभी असल्यापासून मला सारख्या ढोसण्या द्यायची. तिला कदाचित तिला वाटत होते मी जरा सरकून तिला बसायला द्यावे. तिच्या चेहर्यावर हावभाव पण तसेच दिसत होते. आम्ही आमच्या दोन शीटच्या आरक्षण मध्ये तिघे बसलो होतो. आणि आता या बाईला कुठे जागा देणार ? नंतर त्या बाईने मला थोडे सरकायला सांगितले, ते बघा एका वेगळ्याच अविर्भावात. मी काही तिला बसायला दिले नाही तेंव्हा ती अहो!चक्क मला ती म्हणाली, “काय माणूसकी हाय का नाय !”. नंतर पुर्ण प्रवासात ती माझ्याकडे अशी पहात होती की, तिच्याच रिजर्व आसनावर जणू मी बसले होते. ती उतरेपर्यंत माझ्याकडे रागाने पहात होती अगदीच साता जन्माचं वैर असल्या सारखे पहा. असो असतात असे ही काही प्रवासी समजा.
अशा या प्रवासात बरेच विचित्र प्रवासी भेटत असतात. गर्दीत कोणी ढोसण्या देणारे असते. कोणी उगी स्वत:चा तोल न आवरल्याने दुसर्याच्या अंगावर कोलमडणारे असते. कोणी आरामात खिडकीजवळची जागा भेटली की मस्त झोप काढणारे असतात. कोणी शेजारी बसलेलेल्या व्यक्तीबरोबर गप्पात रंगलेले असतात. कोणी पुर्ण प्रवास झोपेतच पुर्ण करणारे असतात. काही प्रवाशी तर इतके झोपाळू असतात बघा त्यांना त्यांचे उरण्याचे ठिकाण येऊन गेलेले माहीत नसते. प्रवासातील सहप्रवाशांसोबत असा गमतीशीर प्रवास सुरू असतो.
बसच्या प्रवासात प्रवाशांना घाई असते ती खिडकीच्या बाजूची शीट पकडण्याची. बस स्टॅडवर बस लागली रे लागली की, लगेच कोणी खिडकीतून आत रूमाल फेकतात, कोणी बॅग फेकतात. बापरे बॅग फेकताना तर बॅगचा चेंडू करून खिडकीतून आत बॅग कोंबली जाते. बसमधून प्रवासात या खिडकीचे मात्र खुपच किस्से पहायला मिळतात. अहो! त्या खिडकीसाठी चक्क भांडणे होतात. खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचे एकमात्र असते त्यांना बसमधील इतर प्रवाशांसी काही घेणेदेणे नसते. खिडकी मिळाल्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहर्यावर झळकत असतो. खिडकीतून बाहेर पहात आपल्याच विचारात त्यांचा प्रवास चालू असतो. कधीकधी काही प्रवासी आपल्यातच इतके दंग असतात की, बस वाहकाला (कंडक्टरला) ओरडून सांगावे लागते. झोपाळू प्रवाशांची तर गोष्टच न्यारी बघा!शेजारी बसलेल्या प्रवाशाला सांगून झोपतात, “ माझा स्टाॅप आला की, सांगा बरं !”असो
काही प्रवाशांना उगाच सवय असते, “काय कुठे चाललाय?, गाव कोणते ? “ अशा नसत्या चौकशा करायची पहा. मग समोरच्याला आवडेल न आवडेल असे काय नसतेच पहा! एकदा मी ‘ कारवार – पुणे ‘ बसने गावी इस्लामपूरला जात होते. मी खिडकीच्या बाजूला बसले होते. मला सुध्दा प्रवासात खिडकी खुप आवडते. माझ्या बाजूला एक बाई बसली होती. ती इतकी बडबडी होती की, काय बोलायचे कामच नाही. उगी स्वतः बद्दल न विचारता माहिती देत होती रस्त्यात येणाऱ्या गावांची नावे सांगत होती. काही गरज नसताना ज्यादा माहिती म्हणजे या गावात माझी मावशी, कुठे मामा, कुठे मुलगी रहाते. असे तिने गरज नसतानाची माहिती देऊन मला नुसते बेजार केले होते. एकतर ती कर्नाटकमधून असल्यामुळे तिचे बोलणे काही समजत नव्हतेच. तिला हिंदी निट बोलता येत नव्हते. मध्येच मराठी शब्द आला की, थोडेफार चेहर्यावर हासू आणून मी तिला इच्छा नसताना खोटानाटा प्रतिसाद देत होते. एकदाचे बेळगाव आले आणि ती उतरली आणि मी सुटकेचा नि:स्वास टाकला.
अजून एकदा कारवार-पुणे बसमधून मी गावी येत होते. बसमध्ये फार गर्दी नव्हती त्यामुळे मला खिडकी जवळ ऐसपैस जागा मिळाली. मला खिडकी मिळाली याचा फार आनंद झाला. माझा गावी जाण्याचा प्रवास चालू झाला. माझ्या बाजूच्याच शीटवरती एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी बसली होती. अहो!काय सांगायचे तुम्हाला तिने नुसता माझ्या नाकात दम भरून सोडला. काय माहित सकाळी प्रातःविधि उरकून आली होती का नाही. एकदा तिला विचारले बाळा तू कुठे उतरणार आहेस. तिने सांगितले, “ पुणे “.
ती असे बोलताच मी माझी बॅग उचलून मागे दोन शीट सोडून बसले. वाचक हो ! हे असे ही प्रवासी भेटतात बरं.
बेळगाव नंतर एक सद्गृहस्थ बसमध्ये चढले. त्यांची पत्नीसुद्धा सोबत होती. त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते ती त्यांची पत्नी असावी. त्यांची वेशभूषा पाहून तर ते चांगले सुशिक्षित वाटत होते. दोन आसनाची शीट असलेल्या प्रत्येकाला ते विचारत होते, ” तुम्ही जरा उठता का आम्हा दोघांना(ते आणि त्यांची बायको)येथे एकत्र बसता येईल “. आता बघा बसमध्ये आटापिटा करून मिळवलेली खिडकीजवळची जागा कोण बरे सोडेल? नंतर अजून दोघा- तिघांना विचारत
ते माझ्या शिटजवळ येऊन म्हणाले, “वो ताई तुम्ही दुसरीकडे बसता का ? “ मी तर आजपर्यंत कधीच लांबचा प्रवास खिडकी वाचून केला नव्हताच. मी सरळ नाही म्हणताच त्यांना इतका राग आला की, ते मला “ ही बॅग उचला येथून तिकडे सरकून ठेवा. पर्स तिकडे ठेवा बसमध्ये सगळेच सोयीचे कुठून आणायचे. “ असे ओरडून बोलू लागले. अहो!आधी विनंतीच्या सुरात शीट मागणारे गृहस्थ, आता एकदम तापलेच बघा!
आणि सोयीचे कोणाला पाहिजे पहा, हे ऐंशी ओलांडलेले गृहस्थ यांना बसमध्ये सुध्दा बायकोच्या बाजूलाच बसून प्रवास करायचा आहे. आता वाचक हो! “तुम्हीच सांगा सोयीचे कोण पहात आहे ते “ नंतर त्याची बायको माझ्या बाजूला बसली आणि ते गृहस्थ पुढील शीटवरती बसले. पण सारखे बेचैन होऊन मागे वळून पहायचे आणि नंतर दोन-तिन स्टाॅप गेल्यावर त्या दोघात मिळून एक शीट मिळाली. क्षणात त्या गृहस्थांच्या चेहर्यावर हासू फुलले. पुढे प्रवास चालू झाला. प्रवासात सुध्दा आपल्या जीवनसंगीनी, तिची घेतलेली काळजी मात्र यातून दिसून आली.
एकदा इस्लामपूर वरून सांगलीला जात होते. त्या दिवशी बहुतेक एमपीएससी ची परिक्षा होती त्यामुळे एसटीमध्ये इतकी गर्दी होती की, सरळ ऊभे सुध्दा रहाता येत नव्हते. जास्त करून मुलींची गर्दी होती. गर्दीत मी इकडे तिकडे कोलमडलेली पाहून एका भल्या मुलीने स्वतः उठून मला बसण्यास जागा दिली. त्यापण दोन आसनाच्या शीटवर तिघीजनी बसल्या होत्या. मला थोडे बसायला मिळाले याचे समाधान वाटले. पण अहो! काय सांगयचे बाजूला बसलेल्या मुलीने मला सांगली पर्यंत नुसते जेरीस आणले बघा शेतावर बांधाची हद्द असावी तसे ती बसली होती. जराही इकडे तिकडे सरकून नाही. तिने मला कोपरखळीने बेजार केले. कितीतरी वेळा मी विनंती केली की,
“जरा आत सरकून बस “पण तिने ऐकले नाहीच. शेवटी मला वाटले ऊभी होते तेच बरे होते. मी मनाची समजूत घातली असेल हिच्याशी, कोणत्या तरी जन्माचे हद्दीपायीचे वैर …. असो
इतर प्रवाशांसारखी मला सुध्दा प्रवासात खिडकी हवी असते. मग काही प्रवाशी खिडकीतून बाहेर पाहण्यात दंग होतात तर काही खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यात मस्त डुलकी काढतात. खिडकीतून बाहेरचा निसर्ग पाहण्यात माझा मात्र प्रवास पाहण्यात नेहमीच आनंददायक असतो. मी निसर्गाशी इतकी एकरूप होते की, प्रवास कधी संपतो याचे भान उरत नाही. आपल्या प्रवासा बरोबर धावणारी झाडे जणू प्रवासातील सहप्रवासीच असतात.
आजकाल प्रवासात लोक मोबाईल चाळण्यात खुपच व्यस्त असतात. त्यांना बसमध्ये कोणी आले, कोणी उतरले याचे भानच नसते. काही प्रवासी मस्त गाणी ऐकण्यात धुंद असतात. दुसरे म्हणजे प्रवास आणि किटकिट नाही असे नाहीच! अहो!चक्क एक-दोन रूपये करिता सुध्दा कंडक्टर सोबत भांडणारे लोक असतात बसमध्ये. कुणी कुणाचा धक्का लागला म्हणून किटकिट करते. तर कधी सामान ठेवण्यावरून भांडण होते. एखांदा प्रवासी असा भेटतो की, ओळखी काढून गावापर्य॔त जाऊन पोहचतो. जास्त करून बाईमाणूस असेल तर खुपच खोलाची विचारपूस चालू असते. कारण बाई माणूस गप्प बसणारे नसतात. कुठून ? कशा ? ओळखी काढून गप्पा-टप्पा करत प्रवासात वेळ घालवतात. सागळ्या नात्या-गोत्याची कुस उसवून काढतात. असो.
अशा काही विनोदी, काही भांडखोर, काही त्रासदायी, काही बडबडे तर काही गुपचुप असे अनेक प्रवासी माझ्या प्रवासात भेटत गेले. . काही प्रवासी पहिल्याच वेळेस पाहिले तरी फार पुर्वीची ओळख असल्याचे भासमान होते.
खात्री आहे येथून पुढेसुध्दा नक्कीच असे गमतीशीर, मजेदार, विनोदी असे प्रवासी मला प्रवासातील सहप्रवासी म्हणून भेटत रहातील अशी आशा आहेच. त्यांच्यासोबतच्या प्रवासातील अनुभव आणि आठवणी मनाला सुखद करून स्मरणीय रहातील. माझ्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या प्रवासात भरपूर प्रवासी भेटले. काही चांगले काही त्रासदायी, काही आठवणींतून राहिले. काहींना प्रवास संपताच विसरून गेले.
असे हे सगळ्या प्रकारचे, आपापल्या विविध स्वभावगुणांचे प्रवासी माझ्या प्रवासातील सहप्रवासी झाल्याबद्दल त्यांचे खुप खुप धन्यवाद
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक- 9327282419
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





