सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पारिजातक… ☆ सौ शालिनी जोशी

सुगंधी फुलांबरोबर पौराणिक, धार्मिक, औषधिक महत्त्व असलेला वृक्ष म्हणजे पारिजातक. याच्या जन्माची कथा अगदी आगळी वेगळी. देवदानवानी केलेल्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्न काढली, त्यातले एक म्हणजे पारिजातक. इंद्राने हा वृक्ष आपल्या बागेत म्हणजे नंदनवनात लावला. अशा प्रकारे स्वर्गीय सौंदर्य असलेला हा पारिजातक. या वृक्षाला स्पर्श करताच देव, नर्तकी, उर्वशीचा थकवा दूर होत असे. सत्ययुगात समुद्रातून स्वर्गात केलेला हा वृक्ष, द्वापार युगात स्त्री हट्ट पुरवण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणला.

नारदांचा संचार सर्वत्र. एकदा त्यांनी पारिजातकाची फुले स्वर्गातून आणून श्रीकृष्णाला दिली. श्रीकृष्णाने ती आपली पत्नी रुक्मिणीला दिली. ती सुंदर फुले पाहून सत्यभामा ही मोहात पडली. पण ती रुक्मिणीला दिलेले पाहून क्रोधित झाली. तेव्हा श्रीकृष्णाने तो वृक्ष पृथ्वीवर आणला. सत्यभामेच्या बागेत लावला. इंद्राला श्रीकृष्णाने वृक्ष स्वर्गातून हलवला हे आवडले नाही. त्यांनी शाप दिला, ही फुले दिवसा उमलणार नाहीत आणि उमललेली थोड्याच अवधीत कोमेजून जातील. श्रीकृष्णाने वृक्ष जरी सत्यभामेच्या बागेत लावला, तरी त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडत. म्हणून गाणं ‘बहरला पारिजात दारीl फुले का पडती शेजारीl’ सत्यभामा आपली व्यथा सांगते. असा हा पारिजातक यांच्या जन्माबद्दल बऱ्याच कथा पुराणात सांगितल्या जातात.

मला मात्र लहानपणापासून अगदी आत्ता ७५ वर्षापर्यंत या झाडाचा व त्याच्या फुलांचा सहवास अखंड लाभला. बालपण कोकणात गेले. तेथे तर मागे पुढे पारिजातक. तुळशी वृंदावनाची जागा ही बहुतेक पारिजातकाच्या जवळ असते. नंतर मी मिरज, मुंबई, पुणे येथे राहिले. तेथे पारिजातक होताच. लग्न झाल्यावरही दारात पारिजातक आणि तुळशी वृंदावन. त्यामुळे पारिजातकाच्या फुलांची शानशी रांगोळी तुळशी समोर काढायचा छंद मला लागला. म्हणून म्हणावेसे वाटते,

माझ्या अंगणी पारिजात फुलतो

गंध केशराची पखरण तो करतो

अलवार फुले मी हळूच वेचिते

रचून सुरेख रांगोळी साकारते

मोहक रचना मन सुखावते

प्रभात सारी सुगंधित होते

पारिजातकाचे खरे सौंदर्य त्याच्या कळ्यात. रात्रीच्या वेळी अर्धोन्मिलीत कळ्यांचा अनुभव घेण्यासारखा आनंद नाही. सहा टोकदार पाकळ्यांच्या त्या कळ्या हिरव्या आकाशातील तारकांप्रमाणे झाडावर शोभतात. पण आकाशातील तारकांना सुगंध नाही. ती उणीव या झाडावरील तारका भरून काढतात. सकाळी घराबाहेर डोकवावे, तो पांढऱ्या केशरी रंगाच्या फुलांचा सडा आणि अजूनही टप टप फुले पडतच असतात. म्हणून बालगीत आठवते ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’. असे हे फुल म्हणजे सौंदर्य आणि सुवास यांचा मेळा. दिसायला अतिशय नाजूक.

 याचा रंग पांढरा शुभ्र नाही, तर थोडासा ओलावा असलेला मायेचा आणि देठाचा केशरी रंग म्हणजे त्यागाचे प्रतीक. म्हणजे आपल्याजवळ काहीही न ठेवता मुक्तपणे आपले वैभव उधळण करणारा. घेणाऱ्याने हवे तेवढे घ्यावे. परत दुसऱ्या दिवशीच्या कार्यासाठी मोकळा. पण फुलांचा सडा पाहणारा चार फुले घेऊनच पुढे जातो. याचा खरा बहर असतो श्रावण महिन्यात. औषधातील याचा उपयोगाला तोड नाही. कितीतरी जीवदान देणारे औषधी गुणधर्म आहेत. सौंदर्यप्रसाधनातही उपयोग.

पूजेतही महत्त्वाचे महत्त्वाचे स्थान. बायका हौसेने याची लाखोली देवाला वाहतात. प्राचीन ग्रंथात वेगवेगळे नावे आढळतात. हरसिंगर, शेफालीका, नालकुंकुम, रागपुष्पी, फुले गळून पडतात म्हणून ‘ट्री ऑफ साॅरो’ म्हणतात पण ते खटकते. पण एक मात्र खरे, ही फुले दिवसाचा प्रारंभ प्रसन्नतेने करुन देतात!

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
ज्योती कुळकर्णी अकोला

पारिजात वर्णन खूप छान!