श्री सुनील देशपांडे
विविधा
☆ ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या… – भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
पूर्व परंपरेत ब्रह्माला चार मस्तके आहेत. म्हणजेच चार प्रज्ञा. चार वेगवेगळ्या पद्धतीने सत्यान्वेशी प्रगती करण्याचे मार्ग दाखवणारी चार मस्तके.
पहिले मस्तक : विचारशक्ती. प्रगतीसाठी स्वतःची विचारशक्ती वापरण्याची प्रज्ञा. ब्रह्ममार्गाकडे जायचे असेल तर ती असणे आवश्यक आहे. त्या मार्गावरील शेवटचे स्थान म्हणजे ब्रह्म. म्हणजेच विचारशक्तीचे अनंतत्व म्हणजे ब्रह्माचे पहिले मस्तक.
दुसरे मस्तक : बुद्धीप्रामाण्य. एकदा विचारशक्तीने पुढे जायचे ठरवल्यानंतर त्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून बुद्धीच्या कसोटीवर जे पटेल त्यालाच सत्य मानण्याची प्रज्ञा म्हणजेच बुद्धीप्रामाण्य. त्या बुद्धीप्रामाण्याचे अनंतत्व म्हणजे ब्रह्माचे दुसरे मस्तक.
तिसरे मस्तक : संशोधन. विचार आणि बुद्धी यांच्या समन्वयाने पुढे जात असताना प्रत्यक्ष प्रमाण ताडून पाहणारी प्रज्ञा म्हणजेच संशोधन. या संशोधन वृत्तीचे अनंतत्व म्हणजे तिसरे मस्तक.
चौथे मस्तक : विवेकबुद्धी. या तीनही मार्गातून सिद्ध झालेली गोष्ट योग्य त्या पद्धतीने वापरण्याचा सम्यक व सुयोग्य विचार करणे व तशी पात्रता निर्माण करणारी प्रज्ञा म्हणजे विवेक बुद्धी. या विवेक बुद्धीचे अनंतत्व म्हणजे चौथे मस्तक.
ब्रह्माची ही चार मस्तके म्हणजे या चार प्रज्ञा या असल्याशिवाय सत्याच्या मार्गावरून म्हणजेच ब्रह्म मार्गावरून पुढे जाताच येत नाही. एकदा या ब्रह्म मार्गावरून पुढे जात राहिले की त्या मार्गाचे अनंतत्व म्हणजे ब्रह्मा.
यात पुन्हा प्रश्न येईलच की प्रज्ञा म्हणजे काय?
त्याचे उत्तर पाहिजे असेल तर सरस्वतीला समर्पित असे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र याकडे पहावे. या स्तोत्रातून मिळणारी फलश्रुती म्हणजे बुद्धी, ज्ञान आणि स्मरणशक्ती. (Thought process, knowledge and memory) याचाच अर्थ बुद्धिमत्ता आणि मिळवलेले ज्ञान हे स्मरणशक्ती मध्ये साठवून ठेवून त्याचा योग्य वेळी उपयोग करता येण्याची क्षमता म्हणजे प्रज्ञा.
याचाच अर्थ या चार प्रज्ञांच्या सहाय्याने किंवा एकत्रित प्रयत्नाने किंवा एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगल्भ होत प्रवास करणे म्हणजे सत्याचा शोध. परंतु हा शोध हा आपल्याला अनंताकडे नेतो याचाच अर्थ या शोधाचा अंत कधीच होत नाही. म्हणूनच कोणत्याही क्षणी कोणत्याही पद्धतीने पूर्ण सत्य किंवा अंतिम सत्य समजले आहे असा दावा करणारा अस्तित्वात असूच शकणार नाही. म्हणजेच आत्तापर्यंत जे ज्ञात झाले आहे त्याच्या पलीकडे काहीतरी आहेच. म्हणूनच आत्तापर्यंत जे समजले आहे ते अंतिम सत्य आहे असा दावा कोणीही करू शकणार नाही. याचाच श्लोकमय अविष्कार म्हणजे ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या!
म्हणूनच विज्ञान किंवा वैज्ञानिक विचारसरणी, वैज्ञानिक संशोधन पद्धती या सर्वांचा विचार केल्यास या सगळ्या गोष्टींना ब्रह्मा चे तत्व पूर्णपणे लागू पडते. कोणतेही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय संशोधन हे अंतिम सत्य नसतेच. प्रत्येक वेळी शास्त्रज्ञ फक्त एवढेच म्हणू शकतो की हे आत्तापर्यंत सापडलेलं सत्य. किंवा ज्ञात सत्य. म्हणजेच सत्याच्या मार्गावरील आजचा मुक्काम. कधी कधी असेही होते की सत्याच्या मार्गावरून भरकटलेपणा सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे असत्यालाही सत्य समजण्याची चूक होऊ शकते. म्हणूनच शास्त्रीय संशोधनात किंवा वैज्ञानिक संशोधनात कोणतीही गोष्ट शंभर टक्के बरोबर असा दावा करता येत नाही. आत्तापर्यंत झालेल्या प्रायोगिक परिस्थितीमधून द्रृग्गोचर झालेले अलीकडचे सत्य. एवढेच शास्त्रज्ञ म्हणू शकतो आणि एवढेच म्हटले जाते. तेव्हाच ते खरे वैज्ञानिक संशोधन ठरते.
ब्रम्हाला चार मस्तकांबरोबरच चार हातही आहेत. दोन हात हे संशोधनकार्यात गुंतलेले आहेत असे आपण म्हणू शकतो किंवा गुंतवण्यासाठी असले पाहिजेत असेही म्हणता येईल. दुसरे दोन हात हे लेखन कार्यामध्ये गुंतलेले आहेत. याचाच अर्थ ब्रम्हाकडे प्रवास करणाऱ्याने आत्तापर्यंत आपल्याला लाभलेले ज्ञान, वैचारिक पद्धत आणि त्यातून सापडलेले संशोधित ज्ञान या सर्वांच्या योग्य त्या नोंदी ठेऊन पुढील संशोधनासाठी उपलब्ध करून ठेवणे हे सुद्धा अपेक्षित आहे. असे केले तरच या मार्गावरील प्रवास पुढे पुढे सरकेल आणि सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न मानवाला करता येईल. मिथ्या जगाकडून ब्रह्म सत्याकडे जाणारा प्रवास हा असाच असला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे.
© श्री सुनील देशपांडे
पुणे, मो – 9657709640 ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





