सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
परमेश्वराची भक्ती करताना प्रथम आवश्यक गोष्ट कोणती असेल तर मनाची शांतता. चित्त शांत असल्याशिवाय परमेश्वराच्या चरणाशी ते लीन होणे कदापि शक्य नाही असे तुकाराम महाराज साधकांना त्यांच्या अभंगांतून वारंवार सांगतात.
शांती परते नाही सुख। येर अवघेची दुःख।।
म्हणून शांती धरा। उतराल पैलतीरा।।
खवळलीया काम क्रोधी। अंगी भरती आधी व्याधी।।
तुका म्हणे त्रिविध ताप। मग जाती आपोआप।।
चित्ताची शांती ही फार मोठी सिद्धी आहे असे तुकाराम महाराजांचे म्हणणे आहे. सर्व सुखे तेथेच आहेत, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून शांती धराल तरच संसार सागर पार कराल असे ते साधकांना सांगतात. एकदा का देहात, मनात, शांती स्थिर झाली की त्रिविध ताप (अध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक) या देहातून निघून जातील.
भक्त आणि परमेश्वर या दोघांचे नाते निव्वळ प्रेमाचे असते. त्यावेळी भक्ताचे कुळ किंवा त्यातील दोषांकडे देव कधीच पाहत नाही. देव आणि भक्त यांच्यातील प्रेम भाव महाराज सामान्य जनांना उदाहरणे देऊन सांगतात.
गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी।
कोठे चराचरी त्याग केला त्याग केला।।
गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ।
मिळाल्या वोहोळ गंगा ओघ।।
कागाचिया विष्ठे जन्म पिंपळासी।
पांडव कुळासी पाहता दोष।।
शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास।।
यांच्या नामे नाश पातकांसी।।
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर।।
पहा पहा विचार पिंगळेचा
वाल्हा विश्वामित्र वशिष्ठ नारद।।
यांचे पर्व शुद्ध काय आहे।।
न व्हावी ती करमे झाली नरनारी।।
अनुतापे हरी स्मरता मुक्त।।
शुद्ध अशुद्धतेबद्दल किती गैरसमज आहेत ते निदर्शनास आणून देताना तुकाराम महाराज म्हणतात की शास्त्रामध्ये आठ वर्षांची मुलगी लग्नाला योग्य असते. पण त्या मर्यादेपर्यंत तिला दोन वर्षे गंधर्व, दोन वर्षे अग्नी, दोन वर्षे सूर्य व दोन वर्षे चंद्र भोगतो. अशी आठ वर्षे झाल्यावर तिची लग्नाची तयारी होते. त्यावेळी तिने आधी चार देवांशी व्यभिचार केला आहे, म्हणून तिला वरणाऱ्याने त्यागले काय?
गाय आपल्या तोंडाने विष्ठा खाते, गंगेला मिळण्यापूर्वी ओढे मलीन असतात, वड आणि पिंपळ कावळ्याच्या विष्ठेतून रुजतात, पांडवांचे कुळ पाहिले तर ते पाच देवांपासून जन्मले आणि त्या पाचांची एकच पत्नी होती. विश्वामित्र मेनकेच्या व्यभिचारातून शकुंतले चा जन्म झाला. शृंगऋषी हरिणीपासून व व्यास ऋषी कोळणी पासून जन्मले. असे जरी असले तरी एका हरीच्या नामाने सर्व पातकांचा नाश होतो. या स्त्री-पुरुषांना जरी कुलदोष चिकटलेले असले तरी त्यांनी अनुतापाने हरीचे स्मरण केले म्हणून ते शुद्ध मानले गेले. यांचे पूर्वकूळ देव सुद्धा मनात आणित नाहीत.
क्रमशः… २
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈






