श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ महावस्त्राचे पदर – भाग १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
महावस्त्र नात्यांचं
‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे,
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे..’
अतिशय अर्थपूर्ण असं हे गाणं. आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू पडणारं. क्षणभर त्यातील सुखदुःखाचा विषय आपण बाजूला ठेवू, पण आपलं आयुष्य हे एक सुंदर असं जरतारी वस्त्र आहे. जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो, तेव्हा हे एका ‘महावस्त्राचं’ रूप घेतं.
आपण ज्या घरात जन्म घेतो, त्या घरापासून आणि जन्मापासून काही नाती आपल्याला उपजतच मिळतात. आई, वडील, बहीण, भाऊ यासारखी अनेक नाती रक्ताची असतात. पण आपण समाजात जसजसे मोठे होत जातो, तशी आणखीही अनेक नाती आपल्याशी जोडली जातात. मग ती नाती बऱ्याच वेळा रक्तापलीकडची असतात. अशी बिनरक्ताची नाती कित्येकदा रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतात. अशी सगळी नाती मिळून तयार होतं ते भरजरी महावस्त्र ! यातील मधले एकमेकात गुंफलेले घट्ट धागे असतात रक्ताच्या नात्यांचे; बाजूची रुपेरी किनार असते समाज नावाच्या नात्याची; आणि पदरावर जी मोरपंखी नक्षी असते ना, ती असते जिवलग मित्रांची! त्यांच्यामुळेच ही भरजरी पैठणी शोभून दिसते. वस्त्राला ‘पट’ असाही एक सुंदर शब्द आहे. आपल्या आयुष्याचा पट अशा अनेक रंगीबेरंगी धाग्यांनी विणला गेलेला असतो.
पण… पण… असा भरजरी पट प्रत्येकाच्याच नशिबी येतो का? कदाचित नाही. कुणाच्या वाट्याला महावस्त्र येतं, तर कुणाच्या वाट्याला जाडंभरडं वस्त्र. कुठे या महावस्त्राचे इंद्रधनुषी रंग शोभून दिसतात, तर कुठे ते फिकट झालेले असतात. पण जे वस्त्र आणि जसं वस्त्र तुमच्या वाट्याला आलं असेल, ते तुम्हाला स्वीकारावंच लागतं. काही जण आपल्या कर्तृत्वाने या वस्त्रात इतके सुंदर रंग भरतात की साध्या वस्त्राचंही महावस्त्र होतं; आणि दुर्दैवाने एखादी व्यक्ती आपल्याला मिळालेलं भरजरी वस्त्रही मातीमोल करते.
महाभारतातल्या कर्णाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर तो ज्येष्ठ कुंतीपुत्र आणि अत्यंत तेजस्वी असा सूर्यपुत्र. राज्यावर पहिला हक्क त्याचा. पण जन्म होतो आणि त्याचा त्याग त्याच्या आईलाच करावा लागतो. तरीही, आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने आपल्याला मिळालेल्या या जाड्याभरड्या वस्त्राचं रूपांतर तो महावस्त्रात करतो. तो अभिमानाने सांगतो:
सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्।
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्॥
(मी विणकर वा विणकर पुत्र जे काही असेल ते दैवामुळे आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही, पण माझ्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने मोठे व्हायचे की नाही ही गोष्ट नक्कीच माझ्या हातात आहे.)
याउलट रावणाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर असं दिसतं की रावण ऐश्वर्यसंपन्न होता, शक्तिमान होता, विद्वान होता, शंकराचा परमभक्त होता, लंकेसारख्या सुवर्णनगरीचा राजा झाला होता. एका अर्थाने त्याच्या पदरात पडलेले हे महावस्त्रच होते. पण आपल्या नैतिक अध:पतनाने आणि अहंकारामुळे त्याने या वस्त्राचे पार पोतेरे केले.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण म्हणतो, पण माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचं बळ देणारी खरी शक्ती नात्यांमध्ये असते. जन्माला आल्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण अनेक नात्यांच्या धाग्यांनी वेढलेले असतो. काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती प्रेमाची, विश्वासाची आणि कर्तव्याची असतात. ही नात्यांची वीण जेवढी घट्ट, तेवढं कुटुंब निकोप; आणि कुटुंब जेवढं निकोप, तेवढा समाज आणि देश सुदृढ. नाती ही केवळ आपणा सर्वांना एकमेकांशी जोडणारी साखळी नसून, ती संपूर्ण समाजाला अंतर्गत ऊर्जा देणारी एक जिवंत व्यवस्था आहे. म्हणूनच, मिळालेली नाती जपायला हवीत, वाढवायला हवीत.
नात्यांमध्ये एक अद्भूत सामर्थ्य असतं. ती जशी कुटुंब आणि समाजाला एकत्र बांधून ठेवतात, जोडतात; तशीच जर ती कमकुवत झाली, तर संपूर्ण व्यवस्था तोडण्याची विनाशकारी ताकदही त्यांच्यात असते. एका सुताचा धागा कमकुवत झाला की अख्खं वस्त्र विस्कळीत व्हावं, तसंच एखाद्या नात्यात वितुष्ट आलं की संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं. म्हणूनच, निकोप नात्यांमधून निकोप कुटुंब आणि निकोप कुटुंबांमधून एका निकोप, बलशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. देश जोडायचा असेल, तर आधी घराघरातील नात्यांचा सांधा भक्कम असावा लागतो.
आपल्या भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि अध्यात्मिक परंपरांचा या नात्यांवर असलेला गहिरा प्रभाव. आपल्याकडे नात्यांकडे केवळ एक ‘करार’ (Contract) म्हणून पाहिले गेले नाही, तर ती एक साधना मानली गेली आहे. आपल्या परंपरा जेवढ्या उज्वल, तेवढाच आपल्या नात्यांचा दर्जाही उच्च आणि उदात्त राहिला आहे.
याचा सर्वात मोठा आणि आदर्श वस्तुपाठ आपल्याला ‘रामायण’ काळात पाहायला मिळतो. रामायणाने मानवी नात्यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही मानवी संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत. पित्याचे वचन पाळणारा पुत्र, पुत्रासाठी प्राण त्यागणारा पिता; वशिष्ठांसारखे ऋषितुल्य गुरु आणि त्यांच्या चरणी लीन होणारा शिष्य; राम-लक्ष्मण-भरत यांच्यातील नि:स्वार्थ बंधुप्रेम; सुग्रीव आणि बिभीषणासारखे मित्र; हनुमंतासारखा परमभक्त आणि सेवक; आणि सुख-दुःखात सावलीसारखी पाठीशी राहणारी पत्नी… रामायणातील प्रत्येक नातं कर्तव्याच्या आणि त्यागाच्या एका अत्युच्च पातळीवर विणलं गेलं होतं. तिथे स्वार्थाला जागा नव्हती, म्हणूनच तो रामराज्य नावाचा एक सुवर्णकाळ ठरला.
परंतु, काळाचे चक्र फिरले आणि ‘महाभारत’ काळात ही परंपरा काहीशी खंडित झाली, नव्हे ती कलंकित झाली. महाभारताचा पट हा मानवी नात्यांच्या विस्कळीतपणाचा आणि मर्यादांचा पट आहे. तिथे सत्तेचा लोभ, अहंकार आणि महत्त्वाकांक्षा एवढीणी टोकाला गेली की, रक्ताची नाती एकमेकांच्या रक्ताची तहानलेली झाली. गुरु-शिष्याचे नाते, बंधुत्वाचे नाते, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे मान-सन्मान सत्तेच्या सारीपाटावर पणाला लावले गेले. जेव्हा नात्यांमध्ये कर्तव्याऐवजी स्वार्थ आणि प्रेमाऐवजी मत्सर जागा होतो, तेव्हा महाभारतासारखा विनाश अटळ असतो, हाच धडा आपल्याला इतिहासाने दिला.
आज आपण एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे वर्तमान परिस्थितीत जगत आहोत. आजची कुटुंब व्यवस्था एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. काळाने आणि आधुनिकतेने आपल्यासमोर अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. तंत्रज्ञानाच्या जाळ्याने आपल्याला जगभरातल्या लोकांशी जोडले असले, तरी शेजारी बसलेल्या आपल्या माणसापासून आपण दुरावत चाललो आहोत की काय, अशी भीती वाटू लागली आहे. एकत्र कुटुंब पद्धती मागे पडून विभक्त कुटुंबे आली आणि आता तर ‘फ्लॅट संस्कृती’मध्ये माणसे अधिक आत्मकेंद्रित होऊ लागली आहेत. नात्यांची वीण उसवू लागली आहे. नात्यांच्या या महावस्त्राचं रूपांतर एखाद्या टॉवेलमध्ये होतं की काय, अशी भीती वाटू लागली आहे. टॉवेलला आपण गरजेपुर्ते हात पुसतो आणि बाजूला ठेवतो. नाती अशी असतात का ?
आजच्या या गतिमान, यांत्रिक युगात संवाद हरवत चालला आहे आणि जिथे संवाद संपतो, तिथे नात्यांची वीण सैल होऊ लागते. संवाद नसलेली नाती म्हणजे केवळ नावापुरती उरलेली नात्यांची एक चौकट. आजच्या तरुण पिढीसमोर आणि आपल्या सर्वांसमोरच हे मोठे आव्हान आहे की, या बदलत्या काळात नात्यांमधील पूर्वीचा तो ओलावा, तो जिव्हाळा आणि ती विश्वासाची ऊब कशी टिकवून ठेवायची? एक गोष्ट मात्र नक्की की स्नेहजलाचं सिंचन झालं की नाती उमलून येतात. स्नेह जाऊन त्याची जागा स्वार्थाने घेतली की नाती कोमेजतात. म्हणूनच जिथे अकृत्रिम प्रेम असते आणि केवळ स्वार्थाला थारा नसतो तिथले नात्यांचे रंग कधीही फिके होत नाहीत.
याच सगळ्या गदारोळात, मनात एका नव्या सृजनाचा अंकुर फुटला. मनात आले, काळाच्या प्रवाहात आपण जे मागे सोडत चाललो आहोत, याची पुनश्च एकदा जाणीव करून द्यायला हवी. वस्त्रातील उभे-आडवे धागे जसे प्रेमाने एकत्र येतात आणि एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, तसाच हा दिशाहीन होत चाललेला समाज पुन्हा एकदा नात्यांच्या सूत्रात गुंफायला हवा. या विचारातूनच ‘नात्यांचं महावस्त्र’ या लेखमालेचा जन्म होतोय.
महावस्त्र हे वेगवेगळ्या रंगांच्या, रेशमी मुलायम पण बळकट अशा धाग्यांच्या एकत्र विणण्यातून तयार होतं. या लेखमालेच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील अशाच काही अमूल्य, रेशमी नात्यांचे पदर उलगडणार आहोत. आईचे नि:स्वार्थ वात्सल्य, बाबांचे आकाशाएवढे छत्र, आजी-आजोबांच्या संस्कारांची शिदोरी, भाऊ-बहिणीचे निखळ प्रेम, मावशी आणि काकांचा मायेचा आधार, सुख-दुःखात पाठीशी राहणारा मित्र आणि आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा गुरु… या सर्व नात्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
या महावस्त्राचा एक-एक धागा आपण अत्यंत मायेने आणि जिव्हाळ्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हे महावस्त्र जितकं सुंदर विणलं जाईल, तेवढं आपलं घर, आपला समाज आणि आपले जगणं अधिक सुकर आणि आनंदी होईल. या वैचारिक आणि भावनिक प्रवासात आपण माझ्या सोबत नक्कीच असाल, ही खात्री आहे.
(पुढील भाग दर रविवारी)
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






