श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

* ‘राष्ट्रीय युवा दिन‘ – – *स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिनम्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

*”उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन तर द्वेष म्हणजे मृत्यू. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. तुम्ही जसा विचार कराल तसे व्हाल. दुर्बल समजलात तर दुर्बल व्हाल. तेव्हा, उठा जागृत व्हा. तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला घडविण्यात एवढे व्यस्त रहा की इतरांचे दोष काढण्यासाठी वेळच मिळणार नाही.”*

*इति.. स्वामी विवेकानंद*

*भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.. अलीकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद. तर सुभाषचंद्र बोस म्हणतात.. आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे ‘आध्यात्मिक पिता’ म्हणतो.*

*सन १८९३.. शिकागोतील जागतिक सर्वधर्म परिषदेतील पहिल्याच वाक्याला सतत दोन मिनिटं टाळ्या वाजत होत्या. प्रथमच समस्त जगाला एकसूत्रात जोडले गेले. “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो”.. या भगवाधारीने पहिल्याच वाक्याने जग जिकंले. या वाक्यातील हिंदू संस्कृतीचा उदात्त भाव जगाला लक्षात आला. जगात प्रथमच कुणीतरी जगाशी भावाबहिणीचे पवित्र नाते जोडले होते.*

*आज १२ जानेवारी. याच दिवशी जगाला प्रत्येक ‘जीव हा शिव आहे’ हे हिंदू धर्म सहिष्णूतेचे अव्दैत वैदिक तत्त्वज्ञान.. भारतीय योगदर्शन जगाला सांगणाऱ्या या एका तेजस्वी संन्यासाचा जन्म झाला.. नरेंद्रनाथ दत्त. १८६३ साली जन्म कलकत्ता. वडील तत्कालीन वकील. आई भुवनेश्वरी धार्मिक प्रवृतीची. जगात ओळख निर्माण झाली स्वामी विवेकानंद.*

*जनतेच्या उद्धारासाठी त्यांना गुरुमंत्र देणारे दैवी पुरुष जगविख्यात गुरू लाभले रामकृष्ण परमहंस. त्यांचे कार्य पूढे नेण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. सर्वप्रथम भारत भ्रमण करुन जनतेची दुःख बघितली. माणसातील सुप्त मनुष्यत्व जागविण्यासाठी.. वेदान्त विचार जगाला पटविण्यासाठी सर्वधर्म परिषदेत मातृभूमीचा सेवक म्हणून भाग घेतला.*

*अमेरिका.. इंग्लंड.. युरोप दौऱ्यात त्यांच्या मानवतावादी तेजस्वी व्यक्तीमत्वाचा.. वाणीचा.. मानवतावादी विचारांचा एवढा प्रभाव पडला की जगाला उर्जा देणारे युगपुरुष ख्याती झाली. स्वामी विवेकानंदामुळे जगाची भारताकडे बघण्याची दृष्टीच बदलली. जगात भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटले. स्वामी विवेकानंद म्हणजे जीवनात उर्जा देणारे.. गीता सांगणारे आधुनिक श्रीकृष्णच.*

*विवेकानंदांची अचाट बुद्धिमत्ता.. स्मरणशक्ती.. ज्ञानार्जनाची क्षमता सारेच विस्मयकारी.. अविश्वसनीय पण सत्य आहे. प्रत्येक विचार जीवनात प्रेरणादायी आहेत. यामुळेच आज बेलूरचा मठ असो वा कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंद स्मारक ही आमच्या साठी ऊर्जा स्थाने आहेत.*

*स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

*स्वामी विवेकानंदांनी आम्हाला धीरता.. शूरता.. वीरता आणि विद्येसह नम्रता.. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शासन हा गुरु मंत्र दिलाय. हा गुरुंचा वारसा आपण चालवू या. अशा या युगपुरुषाला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*

*एक सुराने गाऊ आम्ही*

*स्वामीजींची गाथा*

*स्वामीजींच्या पदरेणूने*

*पावन भारतमाता*

*भारतभूचे दैन्य बघोनी*

*अवतरले जगतात*

*दया, क्षमा, करुणा अन साहस*

*वसे सदा हृदयात*

 *

*निर्भयता, सामर्थ्याचा संदेश*

*दिला जगतास*

*ज्ञानरवीचा उदय जाहला*

*तम गेला अस्तास*

 *

*देश-विदेशी गमन करोनी*

*सांगितला वेदांत*

*सर्व जगाला मंत्र दिला हो,*

*उत्तिष्ठत जाग्रत*

 *

*त्याग, विवेक नी वैराग्याला*

*बाणविले अंगात*

*अवघे जीवन अर्पित केले*

*देशाच्या सेवेत*

 *

*ध्यानधारणा आणि तपस्या*

*असा घेतला ध्यास*

*रामकृष्ण गुरु आशिष देती*

*अपुल्या प्रिय शिष्यास*

 *

*सार्थक केले दीक्षा घेऊन*

*नाम विवेकानंद*

*ब्रह्मपरायण नरनारायण*

*अनुभवती स्वानंद*

 *

*वंदन करितो तुमच्या चरणी*

*आम्ही स्वामीराया*

*नरनारायण सेवेसाठी*

*झिजो आमुची काया*

 *

*गीत : स्वामी श्रीकांतानंद* 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
ज्योती कुळकर्णी अकोला

खूपच सुंदर लेखाची प्रस्तुती सुहास पंडित सर!