प्रतिभा संतोष पोरे 

 

☆ योगाभ्यास : एक मानसोपचार…  ☆ प्रतिभा संतोष पोरे ☆

भारत देशास सुवर्णभूमी असे म्हणत याचे कारण म्हणजे देशातील सोन्याच्या खाणी नव्हेत तर भारतात असणारी नराला नारायण बनवणारी ग्रंथसंपदा होय. न्याय, मीमांसा, सांख्य, योग यासारखी शास्त्र किंवा दर्शन होय. भारताचे मानव जातीला सर्वात मोठे कोणते योगदान

असेल तर ते म्हणजे योगशास्त्र होय. योगशास्त्र म्हणजे जीवन- विज्ञान. जीवन जगण्याचे शास्त्र. ५००० वर्षापूर्वी ऋषीमुनींनी आपल्या दिव्य आकलन शक्ती, बुद्धीमत्ता, दूरदृष्टी आणि तपश्चर्येने विकसित केलेले योगशास्त्र आजच्या ताणतणावांच्या, संघर्षमय जीवनातही अत्यंत उपयोगी ठरत आहे. आज संपूर्ण जगात भारताकडे आदराने बघण्याचा दृष्टीकोन दिसत आहे हीच गोष्ट योगाची क्षमता योग्यता सिद्ध होण्यास पुरेशी आहे.

आजकाल हार्ट अ‍ॅटॅकने जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बीपी, शुगरचे पेशंट घरोघरी आहेत. या शारीरिक आजारांवर नियंत्रण करायचे असेल किंवा होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय करायचे असतील तर योगाशिवाय दुसरा पर्याय नाही. योगासन, प्राणायाम यांच्या नियमित अभ्यासाने आपणास निरामय आरोग्य निश्चितच लाभते. आपला आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमतादेखील वाढते.

आज काल चंगळवादी जीवनशैलीत माणसाकडे कितीही वस्तू असल्या तरी तो असमाधानी व अशांत आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही पातळींचा समतोल बिघडल्यामुळे तो अनेक मनोविकारांना बळी पडत आहे. मानसिक विकारांचा विळखा जगभरातील सर्वच लोकांभोवती पडत आहे. विकसित देशांमध्ये मानसिक विकार आणि पीडित लोकांचे प्रमाण भयावह आहे. सर्व भौतिक सुखं प्राप्त झाली म्हणजे मला आनंद व शांती मिळेल हा केवळ भ्रम आहे, हे आज लोकांना पटू लागले आहे. दरवर्षी जगभरातील आठ दशलक्ष मृत्यू मानसिक विकारांमुळे होतात. कॅलिफोर्निया ३९६००० तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे. भारतात १९. ७% म्हणजेच वीस कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. त्यापैकी ४. ६ कोटी लोक नैराश्याने (डिप्रेशन) तर ४. ५ कोटी लोक अँक्झायटीने ग्रासले आहेत असा निष्कर्ष इंडिया स्टेट लेवल डिसीज बर्डन इनिशिएटिव्हने काढला आहे. जर तुम्ही तुमच्या शारीरिक फिटनेस बाबत जागरूक असाल आणि मानसिक आरोग्याचा विचार जराही करत नसाल तर आता तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हे सुचित करण्याचे कारण म्हणजे भारतात दर सात व्यक्तींमागे एक व्यक्ती मानसिक आजाराने ग्रासली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती ‘लॅन्सेट सायकॅट्री’ नावाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झाली आहे. जगातील निम्मी लोकसंख्या मानसिक विकार अनुभवेल असे भाकीत हार्वर्ड मेडिकल स्कूल ने केले आहे.

मानसिक विकारांची यादीही भरपूर मोठी आहे. भिती वाटणे(फोबिया), अँक्झायटी डिसऑर्डर, बाॅडी डिसमार्फिक डिसऑर्डर, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, व्यसनाधीनता, डिप्रेशन इ. यामध्ये रुग्ण मनोरंजन, छंद, सामाजिक संवादामध्ये सारस्य किंवा आनंद गमावतो. भूक, झोप खूपच जास्त लागते किंवा फारच कमी होते. लक्ष केंद्रित करणे किंवा एखादा निर्णय घेता येत नाही. संवाद टाळणे, कुटुंबापासून स्वतःला वेगळे करणे, उदासीनता येते त्यामुळे डोकेदुखी पोटदुखी हे आजार बळावतात. मृत्यूचे किंवा आत्महत्येचे विचार सतत मनात येतात.

हे मनोविकार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये आढळत आहेत. मनोविकारांवर वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. आपल्या मनातील चिंता, दुःख, राग या भावना आपल्या मेंदूतील लिम्बिक सिस्टीम मधल्या मज्जापेशींच्या उत्तेजित अवस्थेमुळे तयार होतात. याला मेंदूतील संदेश वाहक रसायने कारणीभूत असतात. सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाईन आणि गॅमा अमिनो ब्यूट्रिक ऍसिड (गाबा) ही मुख्य चार संदेश वाहक रसायने आहेत. ही रसायनं तयार होण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले की भूक न लागणे, झोप न येणे, नकारात्मक विचार वाढणे, चिडचिड वाढणे, इत्यादी अनेक दुष्परिणाम होतात आणि यामुळे मानसिक विकार बळावतात. यावर उपाय म्हणून डॉक्टर या रसायनांची पातळी वाढवणारी किंवा कमी करणारी व्हॅलियम, ऍटिव्हॅन वगैरे औषधे देतात. इतर काही मनोविकारांवर अँटिसायकॅटिक, अँन्टीडिप्रेसंट्स, अँन्टीअँक्झायटी अशी औषधे दिली जातात. या औषधांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. हे साईड इफेक्ट फार भयानकही असतात. औषधांबरोबरच डॉक्टर वेगवेगळ्या उपचार पद्धती सायकोथेरपी, बिहेवियरल थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, (सीबीटी), इलेक्ट्रोकन्व्हलसिव्ह थेरपी वापरतात. पण सर्वात महत्त्वाची परिणामकारक थेरपी म्हणजे योग थेरपी होय.

अजिंक्य आणि बलवान धनुर्धारी अर्जुन समोरील आप्तस्वकीयांना कसे मारू या चिंतेने अस्वस्थ झाला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी समुपदेशन करून श्रीमद्भगवद्गीता सांगून अर्जुनाला भयमुक्त व चिंतामुक्त केले आहे.

योगो भवती दुःखहा म्हणजे योगामुळे सर्व दुःखांचा नाश होऊ शकतो. असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की योग हा फक्त शारीरिक व्याधी निवारण्यासाठी किंवा स्थूलता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु तसे नाही. योग हा मनाच्या क्रियेशी संबंधित आहे. योगामुळे मनाची एकाग्रता तर वाढतेच पण मनाचे संतुलन आणि मनःशांती यांचा लाभ होऊन आरोग्यही चांगले राहते. योग साधला तर माणसात शारीरिक व मानसिक कार्यक्षमता निर्माण होते. योगाभ्यासामुळे चिरंतन आनंद, परिपूर्णता व शांती यांचा लाभ होतो. मन ही आत्मशक्ती असून या मनातूनच परमेश्वर विश्व आकारतो. मन अत्यंत सूक्ष्म शक्तीतून बनले आहे. प्राणाची कंपने या मनावर उमटतात आणि विचारांची निर्मिती होते. अशा विचारांचे ठसे मनावर उमटत राहतात. मनावरील राग, लोभ, द्वेष, अहंकार, लालसा या तरंगांमुळेच मन कायम अशांत असते. ज्याचा आपण अतिशय विचार करतो त्याचेच रूप मन धारण करते हा मानसशास्त्रीय नियम आहे. सर्व इंद्रिये ही सैनिक असून त्यांच्यावर नियंत्रण करणारा सेनापती हे मन आहे. मनोविकार झालेल्या रुग्णांचे मन अतिशय दुर्बल झालेले असते. बुद्धीचा त्यावर ताबा रहात नाही म्हणूनच मनावर ताबा मिळवणे गरजेचे असते.

शरीर व मन यांना जोडणारा धागा म्हणजे प्राण होय. म्हणूनच प्राणावर ताबा मिळवला तर मनावर ताबा मिळवणे शक्य होते. जीवनाचे तत्व ऊर्जा शक्ती म्हणजेच प्राण होय. डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ या ज्ञानेन्द्रियांचे काम, शरीरातील पचन, रक्ताभिसरण, पोषण, श्वासोच्छ्वास ही सर्व कार्ये प्राण शक्तीमुळेच चालतात. चेहऱ्यावरील हसू, संगीतातील माधुर्य, बोलण्यातील गोडवा, डोळ्यातील चमक हे सर्व प्राणशक्तीनेच होते म्हणूनच जर प्राणावर काबू मिळवला तर सहजपणे मनावर ताबा मिळवता येऊ शकतो. ज्ञानतंतूतील प्रवाह व विचारशक्ती हे देखील प्राणाचे प्रकटीकरण आहे. श्वास हे प्राणाचे बाह्यरूप आहे. म्हणून श्वासावर नियंत्रण ठेवले की प्राणावर ताबा मिळवता येतो व प्राणावर ताबा मिळवला तर मनावर ताबा मिळवता येतो. म्हणून श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. प्राणायामाच्या सरावाने मनाचा समतोल ठेवण्यास मदत होते.

योग सायकॉलॉजी ही एक शाखा आता जोर धरायला लागली आहे. या शाखेतल्या विषयाची मुळं प्राचीन भारतातल्या ज्ञानावर आधारित आहेत. योगाचे वर्णन ऋग्वेदात व अथर्ववेदात केलेले आहे. मात्र योगाचे सर्वात शिस्तबद्ध संकलन महर्षी पतंजलीच्या योगसूत्रात आहे. मानसशास्त्रीय थेरपीज मध्ये योग सूत्रांचा वापर होऊ शकतो का? यावर सध्या संशोधन सुरू झाले आहे. काही मनोविकारांवर योगशास्त्रांचा हमखास उपयोग होतो.

आपल्या मनातील चिंता, दुःख, राग या भावना मेंदूतील रसायन सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाईन आणि गाबा यांच्याशी निगडित असतात. योगासन व प्राणायाम करण्याने या रसायनांचा समतोल राखला जातो रुग्ण पूर्ववत आनंदी व प्रसन्न होऊन सामान्य जीवन जगू शकतो.

मनोविकार असणारा रुग्ण जर स्वतःची दैनंदिन कामे करीत असेल आणि त्याने औषधांसोबत योगाभ्यास केला तर तो निश्चितच लवकर बरा होऊ शकतो. प्राणधारणा, कपालभाती, उज्जायी, अनुलोम विलोम आणि ओंकार इत्यादी प्राणायाम नियमितपणे केल्यास फायदा होतो. त्याचबरोबर रुग्णांनी शक्य असेल तर त्याच्या क्षमतेनुसार शवासन, मकरासन, कटिवक्रासन, भुजंगासन, नौकासन, ताडासन, पवन मुक्तासन, पर्वतासन इत्यादी असने करावयास हरकत नाही परंतु हा सर्व अभ्यास योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. काही मनोविकारांमध्ये योगनिद्रा ही फार महत्त्वाची ठरते. धारणा, ध्यान याही गोष्टींचा मनोविकारांमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.

मनोविकार न झालेल्या व्यक्तींना ते होऊ नयेत व आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा तसेच शारीरिक आजारांवर नियंत्रण ठेवून निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे. नव्हे ही तर सध्याच्या काळाची नितांत गरज आहे. म्हणूनच चला, योगाकडे वळूया, योगाभ्यास करूया.

सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः।

सर्वे भद्राणि पश्यंतु, माकश्चिद् दुःखभागभवेत्।।

© प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted