प्रतिभा संतोष पोरे
☆ संवाद… ☆ प्रतिभा संतोष पोरे ☆
☆
जीवनात संवाद साधणं ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.संवाद बरेचदा दोन्हीकडून व्हावा लागतो. महाभारतातील उदाहरण द्यायचे झाले तर अर्जुन फार भांबावलेल्या अवस्थेत होता. ऐन युद्धाच्या वेळी त्याने धनुष्य खाली ठेवले होते पण जेव्हा त्याने आपला प्रिय सखा श्रीकृष्णाशी संवाद साधला त्यावेळी त्याच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या व तो युद्धास तयार झाला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जी गीता सांगितली तो एक अजरामर संवादच आहे.
संवादाचे अनेक प्रकार आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. कधी हा संवाद उपदेशात्मक असतो, कधी मनातील घालमेल दूर करणारा असतो, कधी आनंदाच्या लहरी पसरवणारा असतो तर कधी क्लेशदायक सुद्धा असतो. त्याला आपण विसंवाद किंवा वाद असेही म्हणतो. संवाद अनेक जणांमध्ये, दोघांमध्ये किंवा कधी कधी तर स्वतःशीच होतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपणासी
संवाद अनेक प्रकारे साधता येतो कधी लिहून, कधी डोळ्यातून, कधी स्पर्शातून तर कधी मौनातून सुद्धा.पण वाणीने केलेला संवाद अधिक प्रभावी ठरतो.काही वेळा असे होते की नात्यातील, मैत्रीतील हा संवाद काही कारणास्तव किंवा गैरसमज झाल्याने तुटतो आणि मनाला प्रचंड वेदना होतात. समोर असणाऱ्या व्यक्तीसोबत न बोलता अबोला धरणे, संवाद न करणे हे फार क्लेशदायक होते. कधी ते नाते पतीपत्नीचे असते, पालक मुलांचे असते तर कधी भावंडांचे असते तर कधी समाजातील इतर व्यक्तींचे असते. यामुळे फार मनस्ताप होतो त्याचे परिणाम नंतर शरीरावर देखील होतात.अनेक रोग निर्माण होतात. तिथे एक अदृश्य भिंत नकळत उभी राहते.अहंकार वाढतो. मी कमीपणा घेऊन बोलणार नाही, ही वृत्ती वाढते. पण याच वेळी जर कमीपणा घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तेच नाते पुन्हा बळकट होऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर आपण समाजात कुटुंबात, सुसंवाद साधण्याचा नेहमीच प्रयत्न केला तर निश्चितच ते नाते अधिक निकोप होऊन आपण निश्चितच सुखी, आनंदी होऊ.
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
या गाण्याप्रमाणे आपल्या मनाचे आकाश पारदर्शी व मोकळे राहिल यात शंकाच नाही.
© प्रतिभा पोरे
पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

