सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ हीच शिक्षा… ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

झुंजूमुंजू झालं होतं. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. श्रीकृष्णांना हलकेच जाग आली होती. प्रसन्न मनाने ते उठले. नित्याप्रमाणे सगळी आन्हिकं आवरली. कपिलेचं धारोष्ण दूध पिऊन ते ताजेतवाने झाले. कालच स्वर्गात सगळ्या देवांनी अगदी प्रेमाने त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या आठवून त्यांना आजही अगदी छान वाटत होतं. त्यांनी आपली लाडकी बासरी घेतली आणि ते महालाबाहेरच्या बगिच्यात जायला निघाले. मग तिथे मोरांचा थवा जमणार … पाखरं अवतीभोवती चिवचिव करत फिरत राहाणार.. फुलांचा मंद गंध कवेत घेऊन गार वारा अवतीभोवती फेर धरणार.. झाडं आनंदाने डोलू लागणार.. हे सगळं अगदी नित्याचंच होतं. खरंतर या सगळ्यांसाठीच श्रीकृष्ण रोज सकाळी बगिच्यात जाऊन बासरी वाजवायचे.

आजही ते त्यांचा आवडता शेला अंगावर घेऊन निघणार इतक्यात बाहेर कुणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिलं तर चित्रगुप्त आणि त्यांचे सेवक महालाच्या बाहेर त्यांची वाट पाहत उभे होते. त्यांना आश्चर्य वाटलं खरं.. पण त्यांनी चित्रगुप्ताला आत बोलावलं … “ अरे आज इतक्या सकाळीच अचानक आलास भेटायला.. काही विशेष? “

कसं सांगावं याचा क्षणभर विचार करून चित्रगुप्त सांगू लागला – – “ देवा आज स्वर्गाच्या दाराशी भूतलावरच्या बऱ्याच लोकांनी गर्दी केली आहे. ”

“ पण तू न बोलावताच आपणहून थेट स्वर्गात येण्याची हिम्मत कशी काय झाली त्यांची? “ श्रीकृष्णाचा आवाज चढला होता.

“ देवा ते म्हणताहेत की तुमचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीत जी चेंगराचेंगरी झाली त्यात त्यांचा मृत्यू झालाय.. म्हणजे त्यांना स्वर्गातच जागा मिळणार अशी त्यांना खात्री वाटत होती, म्हणून थेट इथेच आलेत ते. देवा, फार दु:खी दिसताहेत सगळे. त्यांचं म्हणणं आहे की काल पृथ्वीतलावर त्यांनी आपला वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला आणि त्यात तुमची आवडती दहीहंडी रचण्यासाठी वेगवेगळ्या गटांची अगदी चुरस लागली होती. जास्तीत जास्त उंच हंडी रचण्याचा प्रत्येक गटाचा अगदी हिरीरीने प्रयत्न चालला होता …. बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. कुठे दहा थर.. कुठे बारा.. तर कुठे पंधरा थर. जोरदार पडणारा पाऊसही थांबायला तयार नव्हता. प्रत्येकाचीच ईर्षा वाढतच होती … आणि त्या नादात कितीतरी तरुण मुलं तोल जाऊन खाली कोसळली…. एकमेकांच्या अंगावर पडली.. आणि त्यामुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागेल अशी लक्षणं दिसताहेत देवा. बाहेर जमलेली गर्दी तुम्हाला अशी कळकळीची विनवणी करायला आली आहे की आता आपणच त्या सगळ्यांवर कृपा करावीत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभेल असा आशीर्वाद द्यावा. त्यांची ही प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे आलो आहे. मला तर काहीच सुचत नाहीये… “

श्रीकृष्णाच्या कपाळावर नकळत आठी पडली. मनाचा निर्धार करून ते चित्रगुप्ताला म्हणाले … …

“ जा त्यांना जाऊन सांग की आजपर्यंत केवळ भूतदयेपोटी या मानवांच्या असंख्य चुका मी माफ करत आलोय.. पण देवाच्या नावाखाली आपण अक्षम्य चुका करतोय हे त्यांना समजूनच घ्यायचं नसेल तर आता मीही त्यांच्यासाठी काहीही करू इच्छित नाही. मी दहीहंडी का रचत होतो हे सांग त्यांना.. तुलाही त्याचं कारण माहिती नसेल तर तूही ऐक…. समाजात सगळेच काही एका स्तरावर राहात नाहीत ना? माझे सवंगडीही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले होते, पण म्हणून मी कधीच त्यांच्याबाबतीत भेदभाव केला नाही. वर मडक्यात टांगलेले दही – लोणी अगदी तळातल्या मित्रांपर्यंत पोहोचावे यासाठी तळमळ असायची माझी. त्या दृष्टीनेच फक्त चार थर रचायचो मी. सगळ्यात वर मी उभा असायचो.. आणि हंडी फोडल्यावर त्यातले सात्विक आणि पौष्टिक लोणी – दही अगदी खालच्या थरातल्या मित्रांपर्यंत पोहोचेल याची विशेष दक्षता घ्यायचो….. पण आता … “.. श्रीकृष्णांचा कंठ क्षणभर दाटून आला.. पण स्वतःला सावरून ते दृढ आवाजात म्हणाले.. “ आता त्यातला कुठलाच विचार कुणालाच नकोय. हंडीतल्या स्निग्ध पदार्थांची जागा आता पैशांनी घेतली आहे, आणि ते खालपर्यंत आपोआप झिरपू नयेत यासाठीच वरच्या थरातले लोक आटापिटा करताहेत … हे मी कधीच शिकवलेलं नाहीये.. कुणालाच.. मग याला मी माझ्यासारखी दहीहंडी म्हणूच शकत नाही.. माझ्या नावाखाली स्वतःचे दुष्ट हेतू झाकू पाहणाऱ्यांना मी कधीच माफ करू शकत नाही … मग आशीर्वाद देणं तर अशक्यच … जा चित्रगुप्त.. जाऊन सांग त्यांना … की या जीवघेण्या अपराधाला क्षमा नाही … आत्ताही नाही आणि यापुढेही कधीच नाही. “

……. आणि श्रीकृष्णांनी महालाचा दरवाजा स्वतःच बंद करून घेतला …. कदाचित कायमचा????

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
मंजिरी येडूरकर
0

व्वा! अगदी योग्य. गेलं तर — डोळ्यात अंजन घालणारा !

सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

मंजुषाताई ‘हीच शिक्षा’ तुमच्या मन मंजुषेतून उघडलेले खूपच सुंदर विचार आहेत .