श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🤣 हसणं ते हशा आणि टाळी ते टाळ्या!👏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

लेखाच शीर्षक जरी साधसं आणि सोपसं असलं आणि शीर्षकात हसण्यासारखं काही नसलं तरी, आधी हसावं का आधी टाळी वाजवावी या बाबतीत जर आपण संभ्रमित झाला असाल मंडळी, तर थोडं थांबा. लेख आधी पूर्ण वाचा आणि मगच ठरवा की लेख वाचून झाल्यावर हसायचं का फक्त टाळ्या वाजवायच्या आणि ह्या दोन्ही क्रिया करतांना, प्रथम टाळ्या वाजवायच्या का प्रथम हसायचं ? का हसता हसता टाळ्या वाजवायच्या ? का आधी पोटभर हसून जर तोंड दुखायला लागलं की मग टाळ्या वाजवायच्या ? का यातलं काहीच न करता, “अभिजात मराठी” फक्त त्यांच्याच घरी चोवीस तास पाणी भरत्ये, असा ज्यांनी स्वतःच स्वतःचा गैरसमज गेली शतकानुशतके करून घेतला आहे, त्या पुराणकाळातल्या विद्येच्या माहेरघरात रहात असलेल्या लोकांप्रमाणे मख्ख चेहरा ठेवून, ना हसायचं, ना टाळ्या वाजवायच्या! कारण लेखक(?) मुंबईचा म्हटला की पगडीवाल्यांचा अर्धा अधिक वाचायचा मूड, मुळा मुठेत पाणी नसलं तरी आधीच विसर्जित होतो, त्याला नां तुमचा नां माझा ईलाज!

अर्थात आपण पडलो सारे मुंबईकर, फार त फार ‘उपनगरकर’! आता नगरकर हे आडनाव आपण ऐकलं असेलच पण ‘उपनगरकर’ हे मी आत्ताच केलेलं एका नवीन आडनावाचं संशोधन आहे बरं का मंडळी! आणि त्याचं पेटंट फक्त माझ्याजवळ असल्यामुळे ते कुणीही वापरायच्या भानगडीत पडू नये, हा आपला जाता जाता दिलेला अनाहूत सल्ला! म्हणून ते कुठल्याही आडनावांच्या वंशावळीच्या जाडजूड पुस्तकात शोधायच्या भानगडीत, कुठल्याही पेठेतल्या स्वतःला विचारवंत समजणाऱ्या अभ्यासकांनी पडू नये, असा वैधनिक इशारा मी आत्ताच देऊन ठेवतो. नाहीतर काय होईल, आपण जर आपल्या तमाम महाराष्ट्रात असलेल्या अनोख्या आणि तिरपागड्या आडनावांच्या परंपरे बाबत काही संशोधन करून, PhD मिळवायच्या विचारात असाल तर ‘उपनगरकर’ हे आडनांव कसं जन्माला आलं, हे शोधता शोधता आपला अख्खा जन्म वाया जाईल, पण या आडनावाची उत्पत्ती आपल्याला मिळणार नाही याची हमी, मी एक ‘उपनगरकर’ म्हणून आपल्याला देणे हे मी न हसता माझं कर्तव्य समजतो! त्यामुळे उगाच असं संशोधन करून, आपला चितळयांच्या दुकानाबाहेर लाईन लावण्यासाठी लागणारा अमूल्य वेळ नाहक खर्च करू नये ही नम्र विनंती! आणि हॊ, आम्हां मुबंईकरांची किंवा उपनगरकरांची विनंती ही कायमच नम्र असते हे सुद्धा एक त्रिकालबाधित सत्य आहे! पण नम्र हा शब्द अजून तरी पुण्यनगरीत जन्मालाच यायचा असल्यामुळे त्यांची एखादी विनंतीवजा सूचना, जर कधी चुकून माकून त्यांच्या कायम रागीष्ट किंवा निर्वीकार तोंडातून कोणा पुण्यलोकीच्या बाहेरच्या माणसाला ऐकायला मिळाली, तर त्या माणसाने त्या दिवशी आपला जणू पुनर्जन्मच झाला, असं समजून, लोकं काय म्हणतील याचा विचार न करता स्वतःशीच हसायला किंवा हसता हसता आनंदाने टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही!

हां तर काय सांगत होतो, आपण सारे उर्वरित पडलो मुंबईकर, अथवा ‘उपनगरकर’, त्यामुळे आपलं सारच कसं गगनचुंबी! याच कारण आपल्याला ठाऊक आहेच आणि ते म्हणजे आता नवीन सरकारी GR प्रमाणे ‘सातमजली’ ही कन्सेप्ट बांधकामाच्या बाबतीत जशी कधीच जमीनदोस्त झाली आहे, तीथे ती हसण्याच्या जुन्या पुराण्या परिमाणात तरी कशी शिल्लक असणार ? या एकाच qualificationमुळे आपण लेख वाचून झाल्यावर मुंबईतून किंवा उपनगरातून, कुठूनही टाळ्या वाजवल्यात किंवा नुसतं हसलात, तरी ते मला ठाण्यासारख्या उपनगरात असलेल्या फोर्टिन फ्लोअरवरच्या माझ्या घरी नक्कीच ऐकू येईल, याची आपण खात्री बाळगा!

मला कोणी स्वतःचा चेहरा हसरा न ठेवता जर कधी विचारलं, की “तुमच्या मते हसणं कसं असावं?” तर मी त्याला लगेच उत्तर देईन, की “पाळण्यात झोपलेल्या निरागस बाळाच्या मुखावर विलसतं तसं!” मंडळी, आपण आपल्या उभ्या आयुष्यात असं झोपेत हसणाऱ्या बाळाचं मुखावलोकन एकदा तरी नक्कीच केलं असेल. बाळाच्या त्या निरागस हास्यात ते हास्य पहात असतांना, आपण त्याचा चेहरा नीट बघितलात तर त्यावर आपल्याला एक सात्विकभाव दिसतो. अर्थात तो किंवा ती मोठं झाल्यावर किंवा मोठं होता होता हळू-हळू त्यांच्या त्या निरागस हास्यातील निरागसता जिथे लोप पावत जाते, तिथे त्यातील सात्विकभाव शिल्लक असायचा प्रश्नच येत नाही! पण अशा प्रकारचे सात्विकभाव लहानपणी त्या निरागस हसण्यात कुठून किंवा कशामुळे येतात, हा विषय खरंतर एखाद्याची चेहरापट्टी पाहून त्याच्या किंवा तिच्या मनांत काय चालले आहे ते ओळखणाऱ्या, म्हणजेच फेस रिडींग करणाऱ्या लोकांसाठी संशोधनाचाच विषय ठरावा. इतकंच कशाला हा एखाद्या PhDसाठीच्या प्रबंधासाठी सुद्धा नक्कीच आगळा वेगळा विषय ठरेल, या माझ्या मताशी आपण आपला चेहरा हसरा ठेवून सहमत व्हायला हरकत नाही! पुढे जस जसं वय वाढत जातं आणि जीवनातले अनेक टक्के टोणपे खायला मिळाल्यावर, प्रत्येकजण प्रसंगानुरूप आपापल्या चेहऱ्यावरचे हास्याचे निरनिराळे भाव कसे ठेवायचे, ते कुणीही न शिकवता आपोआप शिकत जातो. जसं, खोटं कधी हसायचं ? कुत्सित कधी हसायचं ? छद्मीपणे कधी हसायचं ? अर्थात हे सारे हास्य प्रकार शिकवणारे अजून तरी आमच्या मुबंईत किंवा उपनगरात, स्वतःला “हास्य सम्राट” म्हणवणाऱ्याने कुठेही वर्ग सुरु केलेले नाहीत, हे मी तुम्हाला तुम्ही हसायच्या आत सांगू इच्छितो. पण हां, त्या ‘पुण्यश्लोकीच्या पुण्य नगरीतल्या’ एखाद्या पेठेतल्या गल्ली बोळात जरा मुबंईकरांच्या किंवा उपनगरकरांच्या उपजत चौकसबुद्धीने कोणी चौकशी केली, तर असा ‘हास्य(?) अभ्यासवर्ग’ नक्कीच सापडेल याची मी मुंबईचा एक उपनगरकर म्हणून आपल्याला खात्री देतो. कारण त्या पुण्यश्लोकीच्या रयतेच सगळंच ‘जगात भारी आणि हटके’ असतं, असा त्यांचा स्वतःच्या बाबतीतला जो पेशवेकालीन गैरसमज आहे, तो आपण उगाच कशाला खोडून काढायच्या भानगडीत पडा आणि आपला जात्याच हसरा चेहरा त्यांच्या सारखा आंबट करा?

 पु. लं. च कथाकथन ज्याने आयुष्यात कधीच ऐकलं नाही किंवा प्रत्यक्ष पाहिलं नाही, असा अस्सल मराठी माणूस शोधून सापडणार नाही! आणि जर असे काही लोकं असतील तर त्यांच आयुष्य, जरी ते त्यांच्या जीवनात इतर कारणांनी भरपूर हसले असले तरी, ती लोकं ‘मनापासून कसं हसायचं’ या बाबतीत कायमच वंचित राहिले असं मी न हसता म्हणतो. माझ्या या विचाराशी आपल्यापैकी जे अस्सल मराठी पु. ल. प्रेमी आहेत, ते न हसता सहमत होतील याची मला 100% खात्री आहे. तर पु. लं. च कथाकथन ऐकतांना प्रेक्षागृहात जो हशा उत्स्फूर्तपणे निर्माण व्हायचा त्याला या जगात तोड नाही आणि असा हशा निर्माण करायची ताकद आजकालच्या कुठल्याच रंगमंचीय कला प्रकारात मला अजून तरी आढळली नाही. इतकंच कशाला त्याच्या पुढे जाऊन मला असं देखील म्हणावंसं वाटत, की आणखी पुढील किती वर्ष आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांना, श्रोत्यांना उत्स्फूर्त असा छप्परफाड हशा पुन्हा एकदा एखाद्या सभागृहात ऐकायला मिळेल, ते तो एक नटेश्वरच जाणे!

“दे टाळी!” असं म्हणत आपल्या समोर कुणी हात पसरून टाळी मागितली तरी आपण ती बरेच वेळा नाईलाजास्तव का होईना पण देतो. नाईलाजास्तव अशासाठी की त्यांन मागितलेली टाळी ही त्यावेळी खरोखरच टाळी देण्याच्या लायकीची नसते किंवा प्रसंगी संयुक्तिक नसते. उगाच “दे टाळी” म्हणण्याची काहीजणांना सवयच असते आणि त्यातलाच तो एक असतो म्हणा नां!

टाळी हा शब्द आपल्या लहानपणापासून आपल्याला माहित असावा (असं मी मनांतल्या मनांत गृहीत धरतो) त्यामुळे त्याबाबत मी आपणाला आणखी नवीन काय सांगणार? अशी एक रास्त शंका आपल्या मनांत येवू शकते. किंवा टाळी कधी आणि कशी वाजवायची याची एखादी नवीन रीत तर मी आपल्याला शिकवणार नाही ना ? अशी दुसरी शंकासुद्धा आपल्या मनांत टाळी वाजवून जाऊ शकते. पण मंडळी, आपल्या या दोन्ही शंका कशा फोल आहेत, हे आपण माझा उर्वरित लेख वाचल्यावर आपल्याला नक्की कळेल. आणि लेख वाचून झाल्यावर आपण आपल्याच दोन्ही हातांनी नक्कीच एक तरी टाळी किंवा टाळ्या वाजवाल किंवा गेला बाजार अगदीच गडगडाटी नाही, पण मंदस तरी हसाल, याची मला एक उपनगरकर म्हणून मनोमन खात्री आहे!

टाळी किंवा टाळ्या वाजवण्याचे सुद्धा वेगवेगळे नाना प्रकार असतात, असं मी माझ्या बहात्तर वर्षाच्या आयुष्याच्या अनुभवानंतर, माझ्या दोन हातांनी टाळी किंवा टाळ्या न वाजवता बिनधास्त सांगू शकतो, कसं ते बघा!

“काकांना विठ्ठल, विठ्ठल करून दाखव!” अशी आदेशवजा प्रेमाची विनंती आपण आपल्या लहानपणी, थोडं समजायला लागल्यावर आपापल्या आईकडून किंवा वडिलांकडून नक्कीच ऐकली असेल आणि त्याबरहुकूम समोरचे काका कोणाचे कोण हे काहीच माहित नसतांना, आपल्या दोन चिमुकल्या हातांनी ‘न वाजणाऱ्या’ टाळीचे प्रात्यक्षिक हसऱ्या चेहऱ्याने नक्कीच करून दाखवले असेल. मला वाटतं, आपण कशासाठी टाळी वाजवायची, अशा त्या न-कळत्या वयात आपण माझ्या पिढीतील असाल तर, अशा टाळ्या नक्कीच वाजवल्या असतील आणि अशी टाळी आपल्या जीवनातली पाहिली ‘न वाजणारी टाळी’ असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही, हो की नाही ?

लग्नानंतर दोन अडीच महिन्यांतच नवरा बायकोमधे काही वाजलं आणि दोघांचे आवाज जर भांडण होऊन टिपेला पोचले असतील आणि ते ऐकून त्यात, संथ लयीत टाळी वाजवत सासूची एन्ट्री झाली तर… तर त्या टाळी वाजवायच्या संथ लयीत एक प्रकारचा उपहास दडलेला असतो, असं आपल्या लक्षात येईल.

आपल्या समोर असलेल्या एखाद्या व्यक्तीच नांव जर आपल्याला माहित नसेल, तर त्याच लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपण जी टाळी वाजवतो, ती तशी माझ्यामते नाजूक प्रकारात मोडणारी असते. कारण अशी “लक्षवेधी” टाळी वाजवतांना काही काही लोकांच तोंडाने एकीकडे “शू क sss शू क” पण चालू असतं! अर्थात त्या शुकशुकाटाने ती व्यक्ती सोडून बाकीचे इतर लोकंच तुमच्याकडे बघायला लागतात, हा असा अनुभव बहुतेक आपल्या सर्वांच्या गाठीशी नक्कीच असतो. असा अनुभव येऊन सुद्धा आपण तिच चूक आठवणीने पुन्हा पुन्हा करतच राहतो, हे खरं तर त्या लक्षवेधी टाळीच दुर्दैवच. आपल्या भारतीय लोकांच्या काही जन्मजात सवयी निदान आपल्या इतक्या मानगुटीवर बसल्या आहेत की त्या बदलायच्या म्हटल्या, तरी त्या प्रत्यक्ष देवाने जरी एखादी जादूची टाळी वाजवली तरी सुद्धा नक्कीच सुटणार नाहीत, खरं की नाही ? पटलं असेल तर द्या टाळी!

“अर्धनारी-नटेश्वर” या प्रकारात मोडणाऱ्या “तिने”(?) किंवा “त्याने”(?) दर शनिवारी, दोन्ही हातांची दहा बोटं फाकवून आणि हातांचे तळवे एकमेकांवर जोरात आपटून निर्माण केलेला टाळीनाद, हा या पृथ्वीतलावर एकमेवाद्वितीय असावा, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आता तर काही योग शिक्षक सुद्धा रोज प्रत्येकाने निदान ५० तरी टाळ्या, उगाचच म्हणजे कुठच्याही आनंदात न वाजवता एक व्यायाम प्रकार म्हणून वाजवाव्या असं सांगतात. अर्थात या अशा टाळी वादनाने कुणाला कसा फायदा होतो त्याबद्दल चर्चा करण्याची ही जागा नाही आणि वेळ ही नाही हे आपण मला टाळी न देताच मान्य कराल.

कुणा गायकाचा अथवा एखाद्या वादकाचा कार्यक्रम संपल्यावर, तो कार्यक्रम आवडल्याची पोच पावती म्हणून रसिक प्रेक्षक जी टाळ्या वाजवून कडकडीत दाद देतात, त्याची जातकुळीच वेगळी! पण एखाद्या राजकीय नेत्याच्या जाहीर सभेतील भाषणाला, भाड्याने आणलेल्या लोकांनी नको तिथे वाजवलेल्या टाळ्या, तुमच्या माझ्यासारख्या लोकांना हसायला भाग पाडतात, हे ही तितकंच खरं. अशावेळी त्यांच्या टाळ्या आणि आपलं हसणं यांचा एक अनोखा संगम आपण तेव्हा अनुभवतो.

नाटक किंवा सिनेमातील नायक अथवा नयिकेच्या तोंडातील एखाद पल्लेदार वाक्य किंवा दर्दभरा संवाद ऐकून, त्याला लोकांनी उत्स्फूर्तपणे वाजवलेल्या टाळ्या ऐकल्या की मंडळी मी थोडा कन्‍फ्युज्‍ड होतो! म्हणजे असं बघा, तो संवाद नायक अथवा नायिकेच्या तोंडातून ऐकल्यावर प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या, ह्या त्या नायिकेच्या अथवा नायकाच्या संवादफेकीला आहेत की लेखकाच्या संवाद लिखाणाला, अशा द्विधा मनस्थितीत मी अडकतो आणि टाळी किंवा टाळ्या वाजवायचंच विसरून जातो मंडळी!

मंडळी, अजूनही माणसाच्या हसण्याचे आणि टाळी किंवा टाळ्या वाजवायचे नानाविध प्रकार असतील, हे मी न हसता किंवा कुठल्याही प्रकारची टाळी न वाजवता अथवा मागता आणि आपण या वाक्याला हसायच्या आतच म्हणून घेतो! पण लेख विस्तारभयास्तव आणि मी लेखाच्या सुरवातीलाच म्हटल्या प्रमाणे, लेख वाचून आपण टाळी वाजवायला किंवा हसायला किंवा दोन्ही क्रिया एकदम करायला विसरण्याआधीच लेख संपवतो!

 शुभं भवतु!

 © प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

ता. क. – आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, दुसऱ्या लोकांना वारंवार हसवण्याचे आणि त्यासाठी त्यांनी दिलेली टाळी किंवा टाळ्यारुपी दाद मिळवण्याचे प्रसंग वारंवार येवोत, हीच त्या जगदीशाच्या चरणी दोन्ही हात जोडून प्रार्थना!

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments