श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘कुणाच्या खाद्यावरी संस्कारांचे ओझे’ ☆ श्री दिवाकर बुरसे

पालकांनी लहानपणापासूनच आपल्या पाल्यांवर उत्तम संस्कार करून त्यांना कर्तृत्ववान, सुशिक्षित, सज्जन, शक्तिशाली आदर्श नागरिक करावे – असे नागरिक जे समाजात, व्यवसायात, आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम योगदान देऊ शकतील. कुटुंबाचा, गावचा, देशाचा लौकिक वाढतील. आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्यात निःसंशय पालकांचे व नंतर शाळेचे दायित्व सर्वाधिक असते.

तत्वतः हे मान्यच आहे की पालकांनी मुलांवर घरातच उत्तम संस्कार करावेत. शाळेने सुद्धा मुलांवर उत्तम संस्कार करावेत. त्यातून जर एखादे मूल बिघडले तर त्याला पालक व शाळा जबाबदार आहेत असे सहज म्हणून आपण मोकळे होतो. आपल्या या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे कधी आपण तपासलं आहे का हो?

मूल मुळात घरी आपल्या आई-वडील-आजी-आजोबा-भावंडे (सध्या घरात आजी- आजोबा, भावंडे असणे तसे दुर्मिळच झाले आहे) यांच्या सहवासात खरंच किती वयापर्यंत आणि किती वेळ असते? घराबाहेर किती वेळ असते? मुलावर संस्कार केवळ घरातूनच होतात की बाहेरील जगाकडून? त्यावर घरच्यांचे संस्कार अधिक होतात की घराबाहेरच्या समाजाचे?

घरात आजोबा-आजी बाळाची मनापासून काळजी घेतात. त्याच्याशी त्याच्या वयाचं होऊन खेळतात, काऊ-चिऊच्या, साळू-ससुल्याच्या, भीमा-बलभीमाच्या, राम-कृष्णाच्या गोष्टी सांगत घास भरवतात, आंगाई गाऊन निजवतात. असे भाग्य काहींच्याच वाट्याला येते. आजी-आजोबांच्या सुखद सहवाच्या स्मृतींची शिदोरी बालकाला जन्मभर पुरते.

घरात कोणी जेष्ठ व्यक्ती नसतील आणि आई-वडील नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर जाणारे असतील तर त्या ३-४-५ महिन्यापासूनच बाळाला पाळणाघरात रहावे लागते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते लेकरू पाळणाघराच्या संचालिकेच्या ताब्यात असते. तिथे बाळाच्या घरचे, मायेचे, परिचयाचे असे कोsणी नसते.

ती संचालिका सुसंस्कृत सुशिक्षित असल्यास उत्तम पण त्या सहसा तशा नसतात आणि प्रशिक्षित तर नक्कीच नसतात. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्या हा व्यवसाय पत्करतात येवढेच. समाजालाही या सेवेची गरज असते. संचालिकेकडे वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या संस्कृतीत जन्माला आलेली, भिन्न भिन्न आर्थिक स्थिती असलेली, अनेक प्रदेशातून आलेली, बहुभाषी अशी १०-१२ मुले तरी येतात. त्यांचा वयोगट कदाचित वय पाच-सहा महिने ते आठ-दहा वर्षेही असू शकतो.
लहान बालकाला ६ महिन्यापासून घरच्यांपेक्षा अधिक काळ त्या संचालिकेच्या आणि वैविध्य असलेल्या लोकांच्या सहवासात रहावे लागते. ते मूल त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, वेषभूषा पहात पहात मोठे होत असते. तिथेच त्याचा अनुभवसंग्रह, स्मृतिसंग्रह, दृष्यसंग्रह व शब्दसंग्रह विकसित होत असतो. इतरांच्या डब्यातल्या पदार्थांच्या विविध चवी चाखत ते वाढत असते. अशा पाळणाघरात मुलावर घरच्यासारखे संस्कार कसे व्हावेत? संस्कार होतात ते समाजातील विविध व्यक्तींचे, लोकांचे, घटनांचे आणि संचालिकेचे.

पाळणाघरातले मूल असो की घरी कुणाच्या निगराणीत वाढलेले असो, वयाच्या दोन-तीन वर्षापासून त्याच्या शालेय शिक्षण व जीवन प्रवासास आरंभ होतो. प्ले ग्रुप, ज्युनियर के जी, सिनियर के जी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी……!
बाळ वाढत असते. त्याला घरून न्यायला आणि परत घरी सोडायला रिक्षा किंवा स्कूल व्हँन किंवा स्कूल बस येते. या वाहनातून जाता-येतानाच्या रोजच्या प्रवासात एक नवीन पात्र त्याच्या आयुष्यात येते, ते म्हणजे रिक्षावाले किंवा व्हँनवाले काका. त्यांचे बोलणे, वागणे, सूचना देणे, त्यांच्या सवयी, असतील तर व्यसने ते मूल बारकाईने पहाते.

हे बाळ आता घराबाहेरील समाजात मिसळत असते, प्रवासात विविध शब्द, स्वर, चित्रे, बोली, विविध पोषाखातील माणसे, स्त्री-पुरुष, मुले-मुली, सजवलेली दुकाने, माँल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, राजकीय पक्षांची अवाढव्य बँनर्स, कटाऊटस्, भडक आकर्षक, उन्मत्त जाहिराती, रस्त्यावरील वाहने, गर्दी, आपघात, बाचाबाची, भांडणे, सिग्नलपाशी होणारी पुढे जाणाऱ्यांची धडपड इ. ते विस्फारलेल्या नेत्रांनी पहात राहते. हे गतिमान विश्व नुकतेच घराबाहेर पडलेल्या बालकाला विस्मयकारक, कदाचित अंगावर आल्यासारखे भयावह वाटते. त्यातून तो टिपकागदाप्रमाणे अनेक संस्कार मनात साठवत असतो, त्यांचे अर्थ लावीत असतो. त्यातले काही प्रसंग त्याला रिझवतात, हवेहवेशे वाटतात तर काही नकोसे वाटतात. बालक हे सारे संस्कार घरातून नाही, समाजाकडून घेत असतो. त्याच्यावर होणारे संस्कार समाजाकडून घडत आसतात.
शाळेतून घरी आल्यावर त्याला हायसे वाटते. आई – बाबाही दमूनभागून घरी येतात. जुजबी बोलणे होते. जरा विसावल्यावर बाबा टीव्ही लावतो. ती बातम्यांची वेळ असते. वार्ताहार कडकडत बातम्या सांगत असतो. अमक्याने तोफ डागली, तमक्याने पलटवार केला, ढमक्याला अटक केली इ. इ. दुसरा चँनेल लावला तरी तिथेही तेच चालू असते. मग बाळाची आई एखादी मराठी सिरियल लावते. त्यात दोन बाया एक तर भांडत असतात, एकमेकांवर काही खुनशी कुरघोड्या करीत असतात किंवा टोमणे मारताना दिसतात. आई पुन्हा चँनेल बदलते. कुठे तरी सिनेमा, कुठे बेछुट गोळिबार, कुठे प्रणय तर कुठे राजकीय चर्चा. असं कुठे काही अन् कुठे काही चालू असतं. एकमागे एक चँनेल्स बदलत असलेले पाहून बाळ गोंधळून जाते. कशाचा कशाला मेळ नसतो. टीव्हीवर चालू असतो, बाळाला दिसत असतो आणि त्याच्या इवल्याश्या डोक्यात उडालेला असतो केवळ ताणयुक्त गोंधळ!

शेवटी टीव्ही बंद करून आई बाळाच्या जवळ बसते. दिवसभरचा वृत्तांत विचारते. थोड्या गप्पा गोष्टी, हास्यविनोद होतात. बाबा मोबाईलवर कुणाशी बोलत असतो. बाळाला भूक लागल्याचे तिच्या लक्षात येते. ती त्याला जेऊ घालते. बाळ थोड्याच वेळात झोपी जाते. बालकाला आई-वडिलांचा सहवास आणि त्यांच्याकडून होणाऱ्या संस्कारांना अशा मर्यादा असतात.

असे दिवस जात असतात. बाळ वाढत असते. सातवी-आठवीतले बाळ आता मित्रांबरोबर सायकलने शाळेत जा-ये करू लागते. त्याच्या जीवनातील एक नवा थरार ते अनुभवू लागते. शाळेनंतर ट्यूशन, नंतर एखादा कोचिंग क्लास, असा दिनक्रम सुरू होतो. आईबाबापाशी बसून बोलायलाही वेळ नसतो त्याला. इथे कसे आणि कसले होणार घरचे संस्कार!

बाळ मोठा होतो. काँलेजला जाण्यासाठी त्याला कौतुकाने मोटरबाईक घेऊन दिली जाते. वर खर्चासाठी बाळाला दरमहा पाँकेट मनी मिळू लागतो, बरोबरच्या इतर मित्रांनाही अशी पाँकेटमनी त्यांचे पालक देत असतात. बाळ खूष असतो!

नवे मित्र-मैत्रिणी, नवे सवंगडी, नवे छंद, सुरु होतात. काँलेजच्या निवडणुका, गँदरिंग्ज, ट्रिपा, पिकनिक्स, कुणाच्या बर्थडे पार्ट्या, फ्रेंडशिप डे, व्हँलेंटाईन डे, यात वर्षे कापरासारखी उडून जातात. बाहेरच्या जगातली अनेक प्रलोभने त्याला आकर्षित करीत असतात. युवावस्था प्राप्त झालेला बाळ आता घरी कमी बाहेर समाजात अधिक काळ आसतो. घरी वेळी अवेळी, रात्री-अपरात्री येऊ लागतो. विचारले तर आई-बाबाला उडवाउडवीची उत्तरे मिळतात. मुलाची पावले वाकड्या वाटेवर पडू लागतात. बाळ भरकटू लागतो. नको त्या वयात नको ते करू लागतो. परीक्षेत नापास होतो. एखाद्या मुलीच्या प्रेमात किंवा व्यसनात अडकतो. बघता बघता पोर अखेर वाया जाते. पालकांना हा मोठा धक्का असतो. लोक म्हणतात आईबापाने मुलावर नीट लक्ष दिले नाही, संस्कार केले नाहीत तर मग दुसरं काय होणार!

हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. तपशीलात फरक असेल पण साधारणपणे मूल बिघडण्याचा घटनाक्रम हा असाच असतो.
अशी भरकटलेली अनेक मुले-मुली घरोघर दिसतील. त्या साऱ्यांचे पालक खरंच त्याच्या भरकटण्याला, अधःपतनाला उत्तरदायी आहेत का हो? कुठल्या पालकांना वाटते की आपले मूल वाया जावे, गुंड, मवाली, व्यसनी व्हावे! तरीही अशी पिढी घडतेय, असा समाज निर्माण होतोय हे वास्तव आहे. निरुपयोगी, उपद्रवी, उनाड, अवैध व्यवसाय करणारी, व्यसनी, मादक पदार्थ सेवन करणारी, त्यांची खरेदी-विक्री विकणारी, अनैतिक व्यवहार करणारी, दंगेधोपे घडवणारी, तरूण मुले समाजात वाढत आहेत.

हे असले नको ते उद्योग मुले का करतात? कुठे शिकतात? घरी की समाजात? यावर गंभीर चिंतन व्हायला हवे. शीघ्रगतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. शासनाच्यावर हे प्रश्न सोडून आपण हतबल होऊन बसू शकत नाही, यातून सुटू शकत नाही. नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.

परवा मी दुपारी तीनच्या सुमारास आमच्या सोसायटीच्या लिफ्टमधून बाहेर पडलो. पार्किंगमधे पाच-सहा अलिशान गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या जरा बाजूला पार्क केलेल्या एका कारकडे माझे सहज लक्ष गेले. कारमधे दोन-तीन शाळकरी (१०-१२ वी तली) मुले कारचे दार बंद करून आत बसून तन्मयतेने मोबाईलवर काही बघत बसली होती. माझ्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. आतून कारचा ए सी चालू होता.

कुतुहल म्हणून मी वाट वाकडी करून कारपाशी गेलो. मुलांचे माझ्या येण्याकडे लक्ष नव्हतेच. मी हातातल्या किल्लीने कारच्या काचेवर टकटक केले. चपापून मोबाईलधारक मुलाने हातातला मोबाईल बंद केला आणि चमकून माझ्याकडे पाहिले. मी त्याला कारचे दार उघडायला खुणावले. दार उघडून तिघेही कारबाहेर आले. माझ्या अचानक येण्याने ते जरा घाबरलेलेच दिसले. मी चौकशी केली. तर त्यातला एक मुलगा सोसायटीत राहणारा आणि इतर दोन दुसरीकडे राहणारे त्याचे वर्गमित्र होते. चौकशीत समजले की ते आज शाळत न जाता घरीच थांबले आहेत. त्याचे पालक आँफीसला गेले होते. त्यांची कार सर्व्हिसिंगला द्यायची होती. मेकँनिक घरी येऊन कार नेऊन सर्व्हिसिंग करून परत आणून देणार होता. म्हणूनच कारची किल्ली घरी मुलाजवळ दिली होती. मुलाने या संधीचा फायदा उठवून मित्रांबरोबर ए सी कारमधे बसून पिक्चर पहायचा घाट घातला होता.

मी त्यांना जरा समजावले. वाँचमनला बोलावून त्याच्या समोरच त्यांना त्वरित घरी जायला सांगितले. मुले चडफडत तिथून निघून गेली. मी वाँचमनलाही समज दिली आणि आजची घटना मुलाच्या पालकाच्या कानावर घालायला सांगितली. पुढे काय झाले मला समजले नाही. कारण काय घडले हे सांगायला ना वाँचमन माझ्याकडे आला ना मुलाचे पालक आले. विषय तिथेच थांभला. मी हे योग्य केले की अयोग्य हे आपण ठरवा पण मी जेष्ठ नागरिकाचे माझे कर्तव्य केले होते असे मला तरी वाटते!

माझ्या लहानपणी पुण्यात शाळेच्या वेळात एखादे मूल चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेले दिसल्यास चित्रपटगृहाचे व्यवस्थापक स्वतः जातीने त्याची चौकशी करीत. त्याचे नाव, शाळा, इयत्ता विचारीत. काही संशयास्पद आढळल्यास त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करून त्यांना ही माहिती देत. शाळातून आलेल्या शिपायाच्या ताब्यात त्या मुलाला सुपूर्त करेपर्यंत त्याला स्वतः कार्यालयात, स्वतःच्या निगराणीखाली ठेवीत. सध्या असे कोणी दक्षतेने वागताना दिसते का आपल्याला? हाँटेलमधे मुलं आली तर त्यांना सेवा मिळे पण बिलाचे पैसे देताना काऊंटरवरचा मालक त्या मुलांची अवश्य चौकशी करीत. पैसे कुणी दिले, कुठून आणले असे प्रश्न विचारले जात. त्याला काही संशयास्पद वाटले तर तो वाट वाकडी करून ही गोष्ट मुलांच्या पालक-शिक्षकांच्या कानावर अवश्य घाली. गारुड्याचा खेळ पहाणाऱ्या मुलांना तिथला एखादा नागरिक अवश्य विचारी, ‘काय रे बाळांनो, शाळेत जायला निघालात ना? मग इथं का टाईमपास करताय. पळा, निघा, शाळेत जा’.

आमच्या गल्लीत रिकामटेकडी मुले रस्त्यावर वेळी-अवेळी भोवरे, पतंग, सिगरेटची रिकामी चपटी केलेली पाकिटं, गोट्या, लगोऱ्या इ खेळ खेळत खेळत वेळ घालवीत, उडाणटप्पूपणा करीत फिरत. दिवसभर त्यांना आवरणारं कोणी नसायचं. ‘बांदल’ नावाचा एका माणसाला मात्र ती मुले जाम टरकायची. ‘बांदल आला’ असं कुणी म्हटलं तरी पोरं खेळ सोडून धूम ठोकायची. येता-जाता उनाड, भटकणाऱ्या मुलांना, तो आवर्जून हटकायचा. त्यांची चौकशी करायचा. वेळप्रसंगी त्यांना तंबी द्यायचा. बुधवार चौक, प्रभात टाँकीज, दक्षिणमुखी मारूती, शनिवारातला मनपाचा दवाखाना, नवापूल, घारपुरे हाँस्पिटल (आताचे सूर्या)सात तोटी चौक, कसबा गणपती, जिजामाता बाग हे त्याचे कार्यक्षेत्र होते. या भागातील मुलांवर बांदलचं बारीक लक्ष असायचं. मुलांचे पालकही कधी त्या बांदलशी भांडायला आल्याचे पाहण्यात नाही. असा एखादा जागरुक बांदल आता कुठे दिसतो का तुम्हाला? परिसरात सोडा, आपल्या सोसायटीमधे तरी अशी एखादी व्यक्ती आपल्याला दिसते का? ‘बांदल’ नावाचा हा पायजमा शर्टातला अतिसामान्य माणूस हे काम सामाजिक जाणिवेतून, एक जागरूक नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तीने करीत होता.

पुस्तके, वह्या, वर्तमानपत्रे यांची रद्दी विकायला एखादा विद्यार्थी रद्दीच्या दुकानात आला तर तो रद्दीवाला सुद्धा त्याची सखोल चौकशी करून, योग्य वाटले तर त्याने आणलेली रद्दी खरेदी करीत असे. त्यालाही मुलांची काळजी वाटत असे. असे गावातले सामान्य पण जागरुक नागरिक मुलांवर उच्च संस्कार करीत असत. आता कुणीच कुणाला विचारी नाही. एकेकाळी प्रामाणिकपणाचे संस्कार समाजाकडून मुलांना मिळत, पालकांना न विचारता, सांगता समाजातील जागरुक नागरिक हे सहज करीत. ही सामाजिक व्यवस्था मुलांची काळजी घेई.

थोडक्यात काय तर सध्याच्या या अधुनिक गतिमान जगात मुले घरी कमी वेळ असतात. घरच्या तुलनेत समाजात अधिक वावरत असतात, वाढत असतात, समाजाकडूनच घडत असतात, संस्कारित होत आसतात.

म्हणून मुलांवर उत्तम संस्कार करण्याचे दायित्व केवळ त्याच्या पालकांचे किंवा शाळेतील शिक्षकांचे आहे असे म्हणून समाजाने त्रयस्थपणे, तटस्थपणे गंम्मत पहात बसू नये. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपल्या वर्तणुकीतून आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुलांवर सुसंस्कार करावेत. ‘मी आणि माझा परिवार’ ही संकुचित वृत्ती सोडून गावातली मुलंही आपली आहेत या भावनेने त्यांच्याशी वागावे.

इथे मला, आँर्थर मिलर’ याचे एक नाटक आठवते. नाटकाचे नाव आहे, ‘आँल माय सन्स’. त्या नाटकात लेखकाने हाच संदेश दिलाय. जगातली सर्व बालके ही माझीच मुले आहेत असे समजून जेष्ठांनी स्वार्थ दूर सारून त्यांच्या हिताचा विचार करावा. आपल्या व्यवहारातून, वागण्यातून, त्यांच्यावर सुसंस्कार करावेत.

विचार करा आणि ठरवा की मुलांवर सुसंस्कार करणे ही केवळ पालकांची व शाळांची जबाबदारी आहे की समाज म्हणून आपलीही आहे. एखाद्याचे मूल पालकांच्या दुर्लक्षामुळे बिघडले की समाज म्हणून आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून बिघडले? मुले घडवण्यात केवळ शिक्षक, पालक कमी पडतायत की आपण, आपला सारा समाजच कमी पडतोय?

ही वेळ समाजातील प्रत्येक घटकाने कठोर आत्मपरीक्षण करण्याची आहे. भावी पिढी चारित्र्यवान, कर्तृत्ववान, गुणसंपन्न व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने प्रत्येक मुलांचे पालकत्व स्वयं स्वीकारून त्याच्यावर घरी-दारी, शाळेत-समाजात, जिथे संबंध येईल तिथे उत्तम संस्कार होतील असे बघावे, स्वतः तसे वागावे.

त्यासठी प्रथम आपण स्वतः सुसंस्कृत व्हावे. प्रत्येक व्यवहारात जबाबदारीने वागावे. आपल्या वर्तनातून आणि कृतीतून पुढील पिढ्यांसमोर आदर्श नागरिकत्वाचे दर्शन घडवावे. लक्षात ठेवा, मुले सदैव जेष्ठांचेच अनुकरण करत घडत असतात, वाढत असतात. त्यांचे यशापयश हे समाज म्हणून आपलेच यशापयश आहे असे मला ठामपणे म्हणावेसे वाटते!

सारांश, सुसंस्कृत मुले घडविण्यात पालकांचा व शाळांचा वाटा महत्वाचा असला तरी समाजाचा अधिक मोठा वाटा असतो. जसा समाज तशीच त्याची पुढची पिढी निपजते.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

डोळे उघडणारा लेख