श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ “आईपणाच्या कळा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मुलं जसजशी मोठी होत जातात तसतसा आईच्या अंगणातला किलकिलाट कमी कमी होत जातो! एक शांतता भरत भरत जाते मनाची विहीर. घर अबोल होऊ लागतं… आणि या अबोलपणाचा अदमास आईला आधी आलेलाच नसतो….काळीज मूर्ती नसलेल्या गाभा-यासारखं होतं!
मुलांना त्यांचं त्यांना सारं काही करता येऊ लागलेलं असतं…त्यामुळे त्यांनी आईला काही विचारावं अशी गरज उरलेली नसते. मुलं आईशिवाय जगू पाहत असतात आणि त्यात त्यांना सावकाश का होईना…एक गती प्राप्त होत जाते…आईचं बोट सोडलं तरी आपण भेलकांडत नाही हे त्यांना उमगत जाते.
आई हसते…कारण मुलांनी स्वतंत्र पंखांनी आभाळात विहार करावा हीच तर तिची आंतरिक इच्छा असते….पण तरीही तिच्या आत काही तरी तुटत असतं!
लहान मुलांची आणि मोठ्या मुलांची आई असणं यात खूप फरक असतो. लहानग्यांचं काही चुकलं तर आई बोलू शकते…मोठ्यांच्या चुका बघत राहाव्या लागतात… सवयीने ओठांवर आलेले सल्ल्याचे शब्द गिळून टाकावे लागतात. मुलं हाकेला सहजी ओ देत नाही हे माहीत झाल्याने त्यांना हाक मारण्याआधी दहादा विचार करावा लागतो… आता त्यांच्या आयुष्यात लुडबूड होणार नाही अशी काळजी घेत घेत प्रेम करायला शिकावं लागतं आईला! डोंबा-याची पोर अधांतरी बांधलेल्या दोरीवर तोल सावरत सावरत एक एक पाऊल टाकीत दुस-या टोकाला जात असते….डोंबारीण ढोलकी बडवत असली तरी तिचं सारं लक्ष पोरीच्या पायांकडे असते…काही झालंच तर आपण काहीही करू शकणार नाही…ही जाणीव तिचं आतडं कुरतडत असतं! पण ज्याची वाट त्यानंच चालायची असते… हेही तिला मनोमन ठाऊक असते.
मुलं आईला काही गोष्टी सांगतात कधी कधी…पण कधी कधीच. आणि त्यांचं हे असं कधीकधी व्यक्त होणं तिला टोचत असतं… पण ती ते सांगत नाही! आपण आता यांच्या आयुष्यातलं एकमेव झाड नाही आहोत सावली देणारं… ही भावना मूळ धरू लागते.
पण तरीही त्यांनी याच झाडाखाली विसाव्याला यावं… कारण झाडालाही सवयीचं झालेलं असतं. मुलांना बाहेरच्या,दुस-याच्या हातची चव माहीत झालेली किंबहुना माहीत करून घ्यावी लागलेली असते… आईचा हात काही कायमचा हात राहणार नाही… हे त्यांनी बहुदा समजून घेतलेलं असतं. तरीही आई त्यांच्या आवडीचं काहीबाही त्यांच्या पानात वाढत राहतेच. त्यांच्या लहानपणीचे फोटो उगाचच बाहेर काढून त्यांवरची धूळ झटकत राहते… तिला ती चित्रं जुनी होऊ द्यायची नसतात! पोरांना सुखाचं ठेव… अशी आर्जवं आई करीत असतेच… पोरांना त्यांची त्यांची प्रार्थना म्हणायची असतानाही! पण काळजी करायचं आईचं काळीज काही थांबवत नाही..थांबवू इच्छित नाही! फक्त ही काळजी आता स्पर्शातून नाही…तर मनातून वाहू लागलेली असते….आणि नेमका हाच प्रवाह नजरेआड होऊन जातो पोरांच्या! पण त्यांना हे ठाऊक नसतं… त्यांच्या ओढ्यांना आलेल्या वेगवान प्रवाहात याच विहिरीतलं पाणी झिरपत झिरपत उतरलेलं असतं… आणि हा अंतस्थ प्रवाह चिरंजीव असतो… ही सरस्वती गुप्त असली तरी वाहती मात्र असते!
आपण मुलांच्या केंद्रस्थानी राहिलेलो नाही आहोत…हे स्विकारून त्यांच्यावर तसंच प्रेम करीत राहणं…त्यांना आपल्या डोळ्यांच्या केंद्रस्थानी ठेवून न्याहाळत राहणं…हे आई करीत राहते…तिच्या प्रेमाला आता प्रतीक्षा करायची सवय करून घेणं अपरिहार्य झालेलं असतं.. न जाणो कधी मूल हाक देईल…ओ देण्यासाठी आपण तयार असायला पाहिजे!
(Sacred Divine Feminine वेब पेज वरील मजकुराचे स्वैर मराठी रुपांतरण. सहज वाचनात आलेले काही. – संभाजी बबन गायके.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





