श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘चिरयौवना रसना’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
रसना, जिह्वा जीभ, एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय. ज्या इंद्रियाने पदार्थाची रुची कळते ती रसना. जे इंद्रिय विविध रसांचा आस्वाद घेते ती रसना. काही भावना, संवेदनांचा प्रत्यक्ष जिभेशी संपर्क झाला नाही तरी त्यात एखादा रस असतो आणि तो आपण ‘चाखतो’, मग ते अक्षरवाङ्मय असो, संगित असो, गंध असो, शिल्प आणि चित्र असो. थोडक्यात या ‘रस’ग्रहण’ करणाऱ्या रसनेलाच जिव्हा किंवा जीभ म्हणतात.
आपण एखाद्या कलाकृतीचा ‘रस’स्वाद’ घेतो, ज्ञानेश्वरी ‘रसाळ’ आहे, लता दिदींची सगळीच गाणी ‘मधाळ’, ‘रसाळ’ आहेत, मला त्याच्याशी बोलण्यात अजिबात ‘रस’ नाही, निजामपुरकर, कोपरकर, कळवणकर बुवांची कीर्तने ‘रसाळ’ असायची, बालगंधर्वांच्या नाटकांवर ‘रसिकां’च्या उड्या पडायच्या, श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्मकथनात ‘वात्सल्यरस’ अगदी दुथडी भरून वहातो, कांदा भज्यांचा वास आला आणि माझी जीभ ‘चाळवली’, ‘खवळली’, ‘तोंडाला पाणी सुटले’ इ इ. या सगळ्या वाक्यात कोणता ना कोणता ‘रस’ आहे आणि रसाचा संबंध रसनेशी असतो हे आपल्याला चांगले ठाऊक आहे!
जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. माणसाच्या सुमारे दहा सेंटीमीटर लांब आसलेल्या या मांसल अवयवावर सुमारे १०, ००० रुचिकलिका असतात. त्यामुळे आपणास पदार्थाची चव कळते. जिभेच्या विशिष्ट भागावर असणाऱ्या रुचिकालिका वेगेवेगळ्या चवीची जाणीव करून देतात अशी वैज्ञानिकांची समजूत होती. त्यानुसार जिभेच्या टोकाकडे गोड, मागील बाजूस कडवट, दोन्ही बाजूस आंबट व खारट चव समजते असे वाटत होते. परंतु आता संशोधनाने सर्व चवींची जाणीव जिभेच्या पृष्ठभागावर सगळीकडेच होते असे सिद्ध झाले आहे. जीभ या अवयवाचे वजन सामान्यतः ५५-५६ ग्रँम असते.
बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी सहाय्य करते. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य मुखाने निरनिराळे ध्वनी काढू शकतो.
सर्व स्वर आणि व्यंजनांचे उगमस्थान म्हणजे माणसाचे मुख. मुखातून ध्वनीरुपाने प्रकट होणारी ती ‘वाणी’. परा, पष्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार. आपण ज्या वाणीने बोलतो ती ‘वैखरी’ वाणी. कुणाच्या वैखरी वाणीतून आशीर्वचने बाहेर पडतात तर कुणाच्या तळतळाट, शिव्याशाप. ‘जी दुसऱ्यास दुःख करी, ती अपवित्र वैखरी’ असे समर्थ दासबोधात सांगतात. वैखरीचा उपयोग कसा करायचा हे उपयोग करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते.
निसर्गाने सर्व प्राणिमात्रात पूर्ण विकसित कंठ केवळ मानवालाच प्रदान केला आहे. त्याच्या बळावर, आपल्या प्रतिभेची जोड देऊन माणसाने अगणित भाषा आणि संगीत विकसित केले.
रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग, स्वरूप आणि ओलसरपणा या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
जीभ या अवयवावरून मराठीत किती तरी म्हणी आणि वाक्प्रचार प्रचलित आहेत. उदा. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, ‘तुझ्या जीभेला काही हाड आहे की नाही?’, ‘लांब जीभ करून बोलू नकोस’, ‘हे म्हणायला माझी जीभ रेटली गेली नाही’. ‘जिभेला लगाम घाल’, ‘जीभ हासडून टाकीन’, ‘जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा’, ‘जिभेचे फार चोचले नकोत’, ‘जगामध्ये जगमित्र, जिह्वेपाशी आहे सूत्र’ (दासबोध) जेव्हा ‘जीभ घसरते’ तेव्हा अनर्थ होतो. (जीभ घसरल्यामुळेच तपस्वी कुंभकर्णाला इंद्रासनाऐवजी मरेपर्यंत निद्रासनावर पडावे लागले!) जीभ सैल सुटणे, इ. इ. इ. वाचकांना या यादीत खूप भर घालता येईल.
जिह्वाग्री भगवती सरस्वतीचा वास असतो. बुद्धीची देवता श्री गणेश असली तरी वाणीची देवता सरस्वती आहे. साक्षात श्रीमद्शंकराचार्यांनीही या जिह्वेची स्तुती केली आहे. त्यांचे एक अपरिचित ‘जिह्वास्तुतिस्तोत्र’ उपलब्ध आहे. ते असे….
श्रीमत् शंकराचार्यविरचित ‘जिह्वा प्रार्थना’
मत्प्रियसखिमज्जिह्वे मय्यनुकभ्यां कुरुष्व नौमि त्वाम्l
अन्यापवादरहिता भज सततोंम नमः शिवायेति ll१ll
*
वाणीगुणानुनिलये त्वां वन्दे मा कुरुष्व परनिन्दाम् l
त्यजसकललोकवार्तां भज सतततों नमः शिवायेति ll२ll
*
कट्वम्ललवणातिक्त स्वादुकषायादिसर्वरसवाञ्छाम् l
जिह्वे विहाय भक्त्या भज सतततों नमः शिवायेति ll३ll
*
रसने रचितोयञ्जलिस्ते परनिन्दापरुषैरलं वचोभिः l
दुरितापहं नमः शिवायेत्यमुभादिप्रणमं भजस्व मंत्रम् ll४ll
*
(श्री.गोस्वामी संपादित ‘शंकराचार्यांची स्तोत्रे’ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात ते वाचकांना पहायला मिळेल. )
*
हठयोग आणि राजयोगात ‘खेचरी’ ही एक महत्वाची मुद्रा’ आहे. या मुद्रेत जिभेचे कार्य अनन्यसाधारण आहे. यात साधक आपली जीभ टाळूला समांतर उलटी वळवून टाळूकडून घशात उघडणाऱ्या ब्रह्मरंध्रातून झिरपणाऱ्या अमृत बिंदूंचे प्राशन करतो. ही मुद्रा सिद्ध झाल्यावर साधक क्षुधा, तृष्णा, विष, रोग, मूर्च्छा, वार्धक्य, अकाल मृत्यू इत्यादींपासून मुक्त होतो, असे ‘हठयोगप्रदीपिका’ म्हणते. (३. ३७-३८).
रसनेला चिरयौवन प्राप्त झालेले आहे. माणूस कितीही वृध्द होवो, त्याच्या देहावर हव्या तेवढ्या सुरकुत्या पडोत, डोळ्यांना अंधत्व येवो, शरीराची शक्ती आणि ऊर्जा क्षीण होवो, पण जिव्हा कधीच थकत नाही, वृद्ध होत नाही. तिचा ‘वळवळ’ आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तशीच चालू राहते. इतर अवयवांच्या तुलनेत जीभेचे रूप बरेच लहान आहे, पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणे कठीणातले कठीण काम आहे!
मुखरूपी म्यानात राहणारी जीभ हे दुधारी खड्ग आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस सशस्त्र सैनिकांचे कडे तिच्याभोवती उभारले आहे, पण जीभ अशी चंचल, नाठाळ आहे की, कालांतराने ती त्या दातांना देखील उखडून टाकते. आपल्या बोलण्याने दुसऱ्याकडून स्वतःच्या तोंडातले हे दात तोडूनही घेऊ शकते!
जीभ कुणाला घायाळ करते, तर कुणाच्या मनावरचे दुखरे व्रण बुजवू शकते. तिच्यातून अमृत झरते तसेच हलाहल देखील पाझरते. जीभरूपी भूमी अशी विचित्र आहे की, तिथे फुले उमलतात, तसेच काटेही उगवतात.
वार्धक्यात अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात, मेंदू थकतो पण जिभेला असे यौवनाचे वरदान प्राप्त झालेले आहे की, तिला थकवा असा कधीच जाणवत नाही. अनेक ‘शक्ती आणि सिद्धी’ प्राप्त झालेल्या ह्या इवल्याशा पण शक्तिशाली जिभेवर ताबा मिळविणे हे अत्यंत दुष्कर कर्म आहे. जे लोक जिभेवर ताबा (खाणे आणि बोलणे या दोन्हीवर) मिळवू शकतात ते खरंच धन्य धन्य होत!
🙏🏻🙏🏻🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





