श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “.. परंपरेच्या गर्भात वसें समृद्धीचा वारसा..” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

संस्कृती, परंपरा आणि वारसा या तीनही खरंतर वेगवेगळ्या संकल्पना आहेत. बरेच जाणते लोक सुद्धा हे तीनही शब्द एकाच अर्थानं वापरत असतात. पण खरोखरच तीनही गोष्टींची त्यांची त्यांची विशेष अशी आभा आहे, प्रतिष्ठा आहे.

दिवाळीतलं लक्ष्मीपूजन हा आम्हां डंके कुटुंबियांचा कुळधर्मातला सण. जगाच्या पाठीवर जिथं जिथं डंके मंडळी आहेत, तिथं तिथं घरी लक्ष्मीपूजन होतंच. विशेष म्हणजे, लक्ष्मीची प्रतिमा किंवा विग्रह न मांडता पूजन होतं. भौतिक संपत्ती आणि समृद्धी यातला फरक आमच्या घराण्याच्या मूळ पुरुषानं कुळधर्मात इतका सुरेख बसवलेला आहे की, याबद्दल आम्हीच काय, आमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा कायम त्यांच्या ऋणात राहतील.

पैसा हे साधनच जेव्हा अस्तित्वात नव्हतं, तेव्हापासून आपल्या संस्कृतीत लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे. आजही अनेकजण अष्टलक्ष्मींचा उल्लेख केलेले दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठवतात ना, त्यातला आशय समजून घेण्यासारखा आहे. हिंदू परंपरेत, संपत्ती (लक्ष्मी) केवळ पैशापुरती मर्यादित नाही. खऱ्या समृद्धीमध्ये ज्ञान, शक्ती, चांगले आरोग्य, उत्तम संतती, आंतरिक शांती आणि यश यांचा समावेश होतो.

आपल्या संस्कृतीत लक्ष्मीचं वर्णन काय केलं आहे, तिचा निवास आपल्या घरी असावा म्हणजे नेमकं काय, हे नीट उमगलंच नाही तर लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ भौतिक संपत्तीची पूजा एवढंच मर्यादित राहील आणि त्याचा जो खरा लाभ व्हायला हवा, तो होणारच नाही.

आदिलक्ष्मी: देवी लक्ष्मीचे मूळ रूप. आध्यात्मिक संपत्ती, जीवनाच्या उद्देशाची स्पष्टता आणि त्यांच्या जीवन कर्तव्याचं निर्वहन करण्याची शक्ती देणारी.

धनलक्ष्मी: धन आणि संपत्ती प्रदान करणारी. आर्थिक विपुलता, सौभाग्य आणि सांसारिक जीवनात यश देणारी. नैतिक मार्गानं केलेल्या कठोर परिश्रमांनी मिळवलेली आणि योग्यरित्या वापरली जाणारी संपत्तीच्या स्थानी तिचा निवास असतो.

धान्यलक्ष्मी: पोषण, आरोग्य आणि कृषी समृद्धीची दात्री. दैनंदिन जीवनातील अन्नमय सुदृढता, सक्षमता, स्वयंपूर्णता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची देवता. सुजल सुफळ समृद्धता प्रदान करणारी.

गजलक्ष्मी: शक्ती, आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारी.

सन्तानलक्ष्मी: उत्तम संतती आणि वारसांसाठी आशीर्वाद देणारी.

वीरलक्ष्मी (धैर्यलक्ष्मी): आंतरिक धैर्य आणि शौर्य देणारी.

विजयलक्ष्मी: विजयाचे प्रतीक असलेली आणि भौतिक किंवा आध्यात्मिक अडथळ्यांवर विजय मिळवणारी.

विद्यालक्ष्मी: बौद्धिक व आध्यात्मिक ज्ञान आणि शिक्षणाशी संबंधित. शैक्षणिक यश, विचारांची स्पष्टता आणि निर्णय घेण्याची शक्ती देणारी.

हे सगळं लक्ष्मीचं वर्णन आपल्याकडं हजारो वर्षांपूर्वीच करुन ठेवलेलं आहे आणि ते अजिबात लपवून-बिपवून ठेवलेलं नाही. लक्ष्मीचा आणि समृद्धीचा इतका व्यापक आणि आयुष्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, ध्येयं सुस्पष्ट करणारा अर्थ जगातल्या दुसऱ्या कुठल्याच संस्कृतीत आपल्याला शोधून मिळणार नाही. अशी अत्यंत सखोल चिंतनाची आणि वैचारिक मांडणीची परंपरा आपल्याकडं असल्यामुळं टोमॅटिनो फेस्टीव्हल किंवा हॉलोविन फेस्टीव्हल सारख्या कार्यक्रमांची योजना आपल्या संस्कृतीत नाही.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आई लक्ष्मीच्या या सगळ्याच रूपांच्या प्रतीकांची पूजा केली पाहिजे आणि तीही अगदी कृतज्ञभावानं.. रोजच्या रोज नियमित व्यायाम करणं हीसुद्धा धैर्यलक्ष्मीची साधना आहे. अन्न, पाणी, इंधन, वीज यांचा कणभर सुद्धा अपव्यय होऊ न देणं हीसुद्धा धान्यलक्ष्मीची साधना आहे. नियमित अभ्यास, नियमित वाचन, नियमित लेखन, नियमित परिश्रम, नियमित नैतिकता, नियमित उपासना यासुद्धा आई लक्ष्मीच्या साधनाच आहेत. या अर्थानं पहायला गेलं तर, आपण सगळ्यांनीच रोजच्या रोज लक्ष्मीसाधना केली पाहिजे.

लक्ष्मीपूजन मोठं दणक्यात केलं अन् तोंडी रोज आई बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या ओसंडून वाहत असतील तर काय उपयोग? आपण धनलक्ष्मीचं पूजन मोठ्या थाटात केलं आणि प्रदूषण करणारे फटाके उडवले तर तो आदीलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मीचा अपमानच आहे. देशाच्या सैन्यदलांवर शंका घेणं हा शौर्यलक्ष्मीचा अपमान आहे. पैसे घेऊन अजेंडा पत्रकारिता करणं हा विद्यालक्ष्मीचा अपमान आहे. म्हणूनच, लक्ष्मीपूजनाकडे केवळ रित म्हणून न पाहता, अर्थ समजून घेऊन पाहिलं पाहिजे.

ज्यांचं हातावर पोट आहे अशा रस्त्यावरच्या हंगामी विक्रेत्यांशी ताणून घासाघीस करुन फुलं, पूजा साहित्य किंवा आकाशदिवे, पणत्या आणल्या आणि आपल्या घरी पूजा केली तर त्या विक्रेत्याच्या घरी धनलक्ष्मी कशी जाईल, याचा विचार आपण करतो का? असा विचार करायला आपल्या मुलांना आपण शिकवतो का? जी घासाघीस आपण लाखो रुपयांचे दागिने, महागडे कपडे, वाहनं, हॉटेलमधली जेवणं अशा ठिकाणी करण्याचं धाडस करत नाही, ती घासाघीस आपण अत्यंत सामान्य विक्रेत्यांसोबत करुन त्यांची धनसंपदा अडवतो आहोत, हे उघड आहे. आपल्याला ज्यातलं काहीही माहिती नाही, अशा विषयात अत्यंत विखारी वक्तव्य करणं हा आपल्या वाणीवर वसलेल्या सरस्वतीचा अपमानच असतो. केवळ राजकीय स्वार्थापोटी किंवा पोकळ प्रसिद्धी मिळवण्यापोटी वाट्टेल तशी जाहीर वक्तव्यं करणं हा सुद्धा सरस्वतीचा अपमानच असतो. जिथं सरस्वतीचा अपमान होतो तिथं लक्ष्मी कशी थांबेल? गरिबी, उपासमारी, बेरोजगारी यांची मुळं आपण रोज नित्यनेमानं करत असलेल्या लक्ष्मीच्या अपमानात आहेत, हे ज्या दिवशी कळेल तो सुदिन.

दारी आलेल्या वासुदेवाच्या झोळीत तांदळाचं एक माप ओतणं ही जशी लक्ष्मीची साधना आहे तशीच आपल्या शिक्षकांविषयी, पालकांविषयी आदरानं बोलणं हीसुद्धा लक्ष्मीची साधनाच आहे. एखाद्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणं हीसुद्धा लक्ष्मीची साधनाच आहे. भुकेल्या माणसाला अन्न देणं, तहानलेल्या माणसाला पाणी देणं, निरक्षराला साक्षर करणं, सामाजिक कार्यात सहभागी होणं ही सगळी लक्ष्मीसाधनेची रूपं आहेत. कृतज्ञता, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, स्वच्छ निर्मळ चारित्र्य, पर्यावरणाविषयीची आस्था या सगळ्यांचा लक्ष्मीच्या साधनेशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे.

मला जशी माझ्या पोटाची, चरितार्थाची, संसाराची, बायकापोरांची, त्यांच्या भवितव्याची काळजी आहे, तशीच ती काळजी प्रत्येकालाच असणार. मग दहा रुपयांचा अळू असो किंवा दहा हजाराचा शालू असो, बाजारात खरेदी करताना आपण समोरच्याच्या पोटाची, चरितार्थाची, संसाराची, बायकापोरांची, त्यांच्या भवितव्याची काळजी समजून घेतली तर आपल्या प्रत्येक कृतीतून घरोघरी लक्ष्मीचा निवास होऊ लागेल. आपण प्रत्येकानं सहृदयतेनं आणि आपुलकीनं सहकार्यासाठी एक पाऊल पुढं टाकायचं ठरवलं तर या अष्टलक्ष्मी प्रत्येकाच्या घरी नांदतील. सरळ मार्गानं आलेली सुबत्ता, समृद्धी मनाला आणि वृत्तीला विशाल करते. सरळ मार्गानं आणि प्रामाणिक कष्टानं मोठी झालेली माणसं सहसा कद्रू किंवा टाळूवरचं लोणी खाणारी नसतात. त्यांना “देण्यातली” लक्ष्मीची साधना पुरती उमगलेली असते. त्यामुळंच, ती करत राहतात, केलेलं बोलून दाखवत नाहीत. अशा माणसांकडून कुणीही विन्मुख जात नाही.

श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्त अत्यंत उत्तम, निर्दोष उच्चारांसह, स्वच्छ स्पष्ट स्वरांत म्हणता आलंच पाहिजे. यथासांग पूजा करता आलीच पाहिजे. कारण, तो आपल्या धार्मिक संस्कृतीचा भाग आहे. पण आपली परंपरा कुणाची आहे, हेही ध्यानी घेतलं पाहिजे ना. शिबी राजा, हरिश्चंद्र, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेतले आपण.. डॉ. द्वारकानाथ कोटणीस, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, डॉ. जगदीशचंद्र बसू, डॉ. चंद्रशेखर रामन, खाशाबा जाधव, मेजर ध्यानचंद, फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्या देशात आपला जन्म झालेला.. ही परंपरा विसरावी तर कृतघ्नपणाच आहे. अन् कृतघ्नपणाचा नुसता वारा जरी लागला तरी लक्ष्मी आपल्यापासून दूर निघून गेली असं गृहीत धरावं.

हे सगळं आपल्या मूळ संस्कृतीच्या गर्भात वसलेलं चिंतन कळायला लागलं की, दृष्टिकोन बदलतोच. मग मोदक तळणीचा की उकडीचा, अनारसा गुळाचा की साखरेचा, असले निरर्थक प्रश्न पडत नाहीत. त्याउलट आपलं मन प्रत्येक परंपरेच्या मूळ ध्येयाचा वेध घ्यायला लागतं. “जो जे वांछील तो ते लाहो” असं ज्ञानेश्वर महाराज का म्हणतात, ते कळायला लागतं. इच्छा, भावना, कामना, वासना, अभिलाषा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा यांच्यातले फरक लक्षात यायला लागतात. मग आयुष्याची दिशा, मार्ग, धोरणं सहसा चुकत नाहीत. माणसं भरकटत नाहीत.

आपण जे काही करतोय, त्यामागचा प्रामाणिक उद्देश कोणता आहे, हे आपण स्वतःच स्वतःला जरी ठणकावून विचारू शकलो आणि उद्देश चुकीचा असल्याचं जाणवल्यावर तो बदलण्याचं धाडस करु शकत असू, तर आजचं लक्ष्मीपूजन आपल्याला नक्की लाभणारच..! आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा ते लाभावं असं वाटत असेल तर त्यांनाही लक्ष्मीपूजनाचं हे खरं स्वरुप आपण समजावून सांगायला हवं.. नाही का?

(हा जो सोबत जोडलेला फोटो आहे, त्यात लक्ष्मी आणि सरस्वतीची चित्रं आहेत. जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनी केलेली मूळ तैलचित्रं नंतर मुंबई आणि मळवली इथं लिथोग्राफिक प्रेस मध्ये छापली गेली. त्याकाळी ही भारतातली एकमेव लिथोग्राफिक प्रेस होती. साधारण १९०१ मध्ये मुंबई मधून मळवली इथं हा छापखाना स्थलांतरित झाला. राजा रविवर्मा यांचं निधन १९०६ मध्ये झालं.

राजा रविवर्मा यांनी १८९४ मध्ये लक्ष्मीचे प्रसिद्ध चित्र काढलं. या चित्रातील लक्ष्मीसाठी मुंबईच्या राजीबाई मुळगावकर यांनी मॉडेल म्हणून काम केलं. नंतर या चित्राचे ओलियोग्राफ (lithograph) बनवण्यात आले आणि ते देशभरात कॅलेंडर, फटाक्यांसारख्या अनेक वस्तूंवर छापले गेले. राजा रविवर्मांनी १८८६ साली काढलेलं सरस्वतीचं चित्र हे त्यांच्या अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर चित्रांपैकी एक आहे. हे चित्र अग्नि पुराणातील एका वर्णनावर आधारित आहे, ज्यात देवी सरस्वती एका लाकडी आसनावर बसून वीणा वाजवताना दाखवल्या आहेत.

ही दोन्ही ओरिजनल लिथोग्राफिक चित्रं आमच्या घरी साधारण १९०५ ते १९०६ च्या दरम्यान ली. पूर्वी ती वर्षभर भिंतीवर लावलेली असत. मात्र, नंतर वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी व्यवस्थित जपण्याच्या दृष्टीनं आम्ही ती काढून ठेवली. काळाच्या नियमानुसार दोन तीन वेळा त्यांच्या फ्रेम्स, काचा बदलल्या. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ती बाहेर काढली जातात आणि नंतर पुन्हा सुरक्षित ठेवली जातात. आज या चित्रांचं वय जवळपास १३० वर्षांचं आहे. आज माझी चौथी पिढी हा अत्यंत दुर्मिळ वारसा जपते आहे आणि पाचवी पिढी हीच संस्कृती, परंपरा आणि वारसा जपण्याच्या मानसिकतेनं घडतेय.. आणखी काय हवं?)

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments