सुश्री शीला पतकी
🌸 विविधा 🌸
☆ “रस्ते आणि वाटा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
काल एक मुलाखत पाहत होते त्यात एक वाक्य सुंदर होत.. ” रस्ते गंभीर असतात आणि वाटा खट्याळ” ते वाक्य माझ्या मनामध्ये दिवसभर रेंगाळत राहिल, पुन्हा पुन्हा मनात ते मी वाक्य घोळवत राहिले. खरंच रस्ते गंभीर आणि वाटा खट्याळ…. किती सुंदर कल्पना.. !
माझ्या डोळ्यापुढे छान डांबरी सडक आली म्हणजे महामार्गावरील रस्ता… हे रस्ते कागदावर आम्ही आखून घेतलेले असतात. लोकांची सोय गाड्याचं जळणार कमी लागणारे पेट्रोल, भूमी संपादन करायला लागणारे पैसे, वाचणाऱा वेळ.. या सगळ्यांचे गणित मांडून बनवलेले असतात. आजूबाजूची झाडं झुडपं कापली जातात.. मध्ये डिव्हायडर टाकून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी दोन मार्ग बनवले जातात. का तर अपघात होऊ नयेत… डिव्हायडरवर रंगीबेरंगी दिसतील अशी फुलंझाड लावली जातात… रस्ता मजबूत कसा बनेल ह्याच इंजिनिअरिंग ठरलेलं असतं.. म्हणून रस्ता अतिशय गुळगुळीत सुंदर देखणा दिसतो. डांबराचा रंग त्यांना अगदी शोभून दिसतो. आमचे आफळे बुवा पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या रस्त्याचे वर्णन करताना म्हणायचे तूप सांडल तर भरून घ्यावं नव्हे तर चाटून खावं इतके ते रस्ते स्वच्छ आणि गुळगुळीत. आपल्याकडचे रस्ते आता तसेच झाले आहेत. निदान नवीन असताना तरी तसं वाटायचं !
वाटा या मातीतून फुफाट्यातून एखादं ठिकाण शोधत निघालेल्या वाटसरूंच्या पाऊलखुणानी तयार झालेले असतात त्याला कुठलेही बांधिव पण नसते, दिशाही नसते, तिथे असतो तो फक्त शोध. आपल्या ठिकाणाला पोहोचण्याचा जवळचा मार्ग शोधणे हा त्याचा उद्देश असतो मग अनेक जण त्याच मार्गावर चालत राहतात आणि तयार होते वाट! ती खट्याळ का असते तर दर वेळेस तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल असं नाही ती कुठेतरी मध्येच आडरानात गडप होते व तिथून तुम्हाला दुसरी पायवाट शोधावी लागते…
ही दुसरी पायवाट.. कधी ती वळणावळणाची असते कधी खबदाडीतन जाते, कधी पुढे नाले नद्यातून जाते, झाडीच्या जंगलातूनही जाते, काट्याकुट्यातून जाते म्हणून ती अवघड आहे तिला सरळ पण मान्यच नसतं.. !तिच्या वाटेवर आजूबाजूला नैसर्गिक रित्या तयार झालेली हिरवी रानं असतात त्या गवताच्या पात्या मधून रान फुले डोकावत असतात.. पिवळी, लाल, गुलबक्षी, जांभळी अनेक रंग छटातली.. कुठेतरी मध्येच वेली वाढलेल्या असतात.. एखाद सुंदर झाड असतं कधी वठलेलं तर कधी डवरलेलं… भरलेल्या झाडाखाली वाटसरुने खुशाल विसावा घ्यावा आणि पुढच्या मार्गाला निघावे. रस्त्यावर एखादा वेल सापडतो ज्याला एखादा फळ लागलेल असतं शेंगा लागलेल्या असतात चिंचेचा झाडावर चिंचा लटकत असतात. आंब्यावर कैऱ्या लटकत असतात दोन दगड मारले की दोन घोस हातात पडावेत.. ती आंबट गोड चव चाखत माखत पुढला प्रवास करावा. थंडगार वारा अंगावर घ्याव अंगाशी लगट करणाऱ्या वेलींनाअलगद बाजूला सरकवावं.. चालता चालता खसकन मोडलेल्या काट्याला अलगद बाजूला करावा आणि पुढे निघावं. हे सगळे ही वाट करत असते म्हणून तर ती अवखळ आहे.. खट्याळ आहे. तिचं सौंदर्य हे जातिवंत आहे ब्युटी पार्लरवालं नाही. नैसर्गिक देखणेपण, निसर्गाचे साज अंगावर चढवल्यासारखं!
पण रस्त्याचा तसं नाही. रस्ता मला नेहमी आयटी क्षेत्रात कार्य करणाऱ्या थ्री पीस घातलेल्या टाय वगैरे लावलेल्या सुटा बुटातल्या माणसासारखा वाटतो. तो आपला वाटत नाही, तो फॉरेनर वाटतो. त्याच्याबद्दल दबदबा वाटतो कदाचित आदरही वाटतो पण आपलेपण वाटावं तसं नाही… वाट आपली वाटते अगदी आईसारखे हात धरून पुढे नेणारी… रस्त्याचं कसं आहे त्याचा थांबा ठरलेला आहे, जागोजागी दिशा दाखवणारे बाण आहेत, पांढऱ्या पिवळ्या दगडांवर किती अंतर राहिले हे सांगणारे आकडे आहेत, प्रवासाच्या काम काळाचे आणि वेगाचेही गणित आहे ते वाटाना नाही. त्या खटाळ आहेत नक्की कुठे नेते सांगता येत नाही पण त्यावरचा प्रवास आनंददायी आहे. तिथे खरच आपण आनंद यात्री असतो आणि रस्त्यावर आपण प्रवासी असतो. रस्त्यावर सोयी आहेत खाण्यापिण्याच्या, टॉयलेट, बाथरूमच्या, पेट्रोल भरण्याच्या आणि खरेदी करण्याच्याही.. तसं वाटेवर नाही रस्त्याला गुगल लावलेला असतो पण वाटेवर मात्र आपण आपल्या कौशल्याचा गुलाल उधळत जायचे असते. अहो कौशल्य म्हणजे वाट ओळखण्याचे.. वाट शोधून दाखवणाऱ्याला वाटाड्या उगीच म्हणत नाहीत. कधी या वाटा धुक्यात हरवतात कधी झाडात लपतात कधी पाण्यात गडप होतात… त्याचा बरोबर शोध घेणे म्हणजे पराक्रमच असतो. असला चकवा चकवीचा खट्याळपणा वाटा खूप करतात बर का…
रस्त्याच कसं आहे.. गर्दीची साथ असते. कधी ती गर्दी इतकी होते तिच्या गर्दीत तुम्ही गुदमरूनही जाता तसं वाटेचं नाही. वाटेवरून चालणारे चार दोन जण असतात. या प्रवासात भेटलाच कोणी तर तो सखा होतो आणि वाट लवकर सरते असं म्हणतात. हरवण्याचा खटाळपणा करणं हे वाटेच्या स्वभावातच आहे तसं रस्ते जबाबदार माणसासारखे असतात ते हरवू देत नाहीत. पण खरं सांगू मंडळी कुणीतरी आपल्याबरोबर खट्याळपणा करतोय आणि आपण त्यात हरवून जातोय यासारखा शृंगार नाही.. म्हणून वाटा चांगल्या अर्थाने शृंगारिक आहेत.
वाटा हुडकत निघालेल्या कोलंबसला अमेरिका सापडली हे उदाहरण माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही पण एक पाच सात वर्षाचा पोर आपल्या गावाला शाळा नाही म्हणून शेजारच्या गावात तीन चार किलोमीटर अंतरावर शाळेत पोहोचण्यासाठी स्मशानातल्या पायवाटेतून जातं.. रोज खूप घाबरत.. मनात नेहमी भीती असते.. स्मशान आलं की धडधड व्हायला लागते.. अशा मनाच्या रोजच्या अवस्थेत ते पोर शिकतं आणि राजकारणात पतंगराव कदम या नावाने उदयाला येतं आणि हा वाटेचा अनुभव लक्षात घेऊन बिनवाटेच्या गावासाठी शाळांचं जाळ पसरवतं भारती विद्यापीठ स्थापन करतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करत हे उदाहरण शिक्षणाची वाट प्रशस्त करणाऱ्या एका शिक्षणप्रेमी मंत्र्याच आहे. लहान पोराला त्या स्मशानातून घाबरून सोडण्याचा खट्याळपणा करणाऱ्या त्या वाटेमुळेच ही वाट सापडली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.
एकूण काय मंडळी वाटा खट्याळ आहेत आणि रस्ते गंभीर आहेत ते गंभीरपणे ठिकाणी पोहोचवतात आणि खट्याळवाट जीवनाची मजा घेत आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवते, किंबहुना आपण ते स्थळ हुडकून काढतो. त्या डांबरी वाटांचं सरकारी दरबारी नामकरण होतं.. महामार्ग क्रमांक नऊ 11, 17, 12.. तसं वाटाना अजिबात नाव नाही त्या बेनाम असतात. जो यावरून चालत जातो त्याच्या मागून येणाऱ्याला त्या वाट दाखवतात आणि मग ती वाट वहीवाट होते. कधीकधी ती बिकटही असते. याच्यावरून जे प्रवास करून येतात ना ते खरा पराक्रमांचा झेंडा लावतात!
…. मुलाखतीत ऐकलेल्या या वाक्याने मला दोन दिवस विचार करायला भाग पाडला आणि रस्ते आणि वाटा यातला फरक जाणवला. खरंच रस्ते गंभीर असतात आणि वाटा खट्याळ… ! आता त्या गंभीर रस्त्यांशी खट्याळपणा करणारे महाभाग आपल्याकडे आहेतच की जे म्हणतात बेसन भाकरी लेके डांबरी डांबरी से जायेंगे.. मला सांगा डांबरी से कोई बेसन भाकरी लेके जाता है क्या?
…. असो पण सध्या महाराष्ट्रात काहीही चालतं.. आपण त्यात पडू नये. उगीच कशाला खट्याळपणा करायचा? नाही का? …… !
वाट आवडली असेल तर अनेक ठिकाणी पाठवून ती प्रशस्त करा माझी परवानगी आहे शक्यतो माझं नाव खोडू नका मला माहिती हा खाट्याळपणा तुम्ही करणार नाहीत.
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





