श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “फोन आणि माणूस…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

हि काही दोघांच्या मधली तुलना नाही. पण फोन आणि वयानुसार माणसाचं वागणं यात काही साम्य आहे का असा विचार.

फोनचे वेगवेगळे, बदलत जाणारे लँँडलाईन, काॅर्डलेस, मोबाईल असे प्रकार आपण पाहिले, कदाचित अजून काही बघायला मिळतील. याच पध्दतीने आपणसुध्दा बालपण, तारुण्य, म्हातारपण अशा माणसाच्या अवस्था पाहिल्या आहेत. आणि आपल्याच बाबतीत अनुभवल्या आहेत. आपलंंच म्हातारपण अनुभवणार आहोत.

फोन ज्या पध्दतीने आणि क्रमाने बदलत गेले अगदी त्याच क्रमाने नाही, पण त्यांचा वापर होतो त्या पध्दतीने वयानुुसार माणसाच्या वागण्यात बदल होतो असं वाटलं.

काॅर्डलेस फोन. हा चालता फिरता वापरता येतो. पण त्याची एक मर्यादा असते. एका ठराविक मर्यादेच्या बाहेर आपण त्याला नेत नाही. आपलं बालपण असं काॅर्डलेस फोन सारखं असतं. घरातले, शेजारचे हे हौसेने कडेवर, छोटी छोटी पावलं टाकत त्यांच्यासोबत नेतात.

किंवा शाळेत जायला लागल्यावर घराबाहेर पण हाकेच्या अंतरावर असतो. एका मर्यादेत असतो. म्हणून बालपण हे काॅर्डलेस फोन सारखं असतं.

हा फोन चार्ज करावा लागतो. लहानपणी आपण इतरांच्या कडेवर जरी असलो तरी काहीवेळानंतर आई जवळ जाण्याची धडपड करतो. ते एक प्रकारचं चार्जींगच असतं.

मोबाईल फोन, म्हणजे आपलं तारुण्य. हा कसा केव्हा, कुठेही, कधीही नेता येतो. तसंच तारुण्यात आपण मनसोक्त फिरत असतो. अगदी गावाच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत. वेळेची पर्वा न करता.

आणि आता लँडलाईन. म्हणजे उतारवय. आपण अजून या अवस्थेत गेलो नाही. पण घरात आपण हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. लँडलाईन कसा एकाच जागेवर असतो. हलवला तरी जास्त लांब जात नाही. तसंच हे आयुष्य असतं. बसण्या उठण्याच्या, फिरण्याच्या जागा ठरलेल्या असतात. हाॅल, बेडरूम आणि गॅलरी. किंवा घरापुढची मोकळी जागा. तीसुद्धा असेल तरच. आणि वेळ सुध्दा ठराविक, किंवा ठरवून दिलेली.

बोलायचं असेल तर या फोन जवळच जावं लागतं. लांबून बोलता येत नाही. कधी कधी तर थोडं वरच्या आवाजात बोलावं लागतं. तो वाजला तर बोलणं ऐकायलाही त्याच्या जवळ जावं लागतं. अगदी सगळ तसंच उतारवयात असतं.

अगदि सुरुवातीला जेेव्हा लँडलाईन आले तेव्हा डायल करुन फोन लावता येत नव्हता. तर आपल्याला कोणता नंबर लावायचा आहे हे ऑपरेटरला सांगायला लागायचं. म्हणजेच संभाषणासाठी गरज असायची ती एका मधायस्थाची. उतारवयात कमी ऐकायला येेत त्यामुुळे तिथेही समोरचा काय म्हणतोय, आणि आपल्याला काय सांगायचं आहे. यासाठी कधीकधी अशा मध्यस्थाची गरज वाटते.

लँडलाईनवर फोन करतांना किंवा आल्यावर काहीवेळा आपल्याला दुसर्‍याच दोन जणांत संभाषण सुरु असल्याच असंच लक्षात यायचं. क्राॅस कनेक्शन असं याला म्हणायचो. हे क्राॅस कनेक्शन उतारवयात सुध्दा अनुभवायला येतं. आपण यांना सांगत काही असतो. आणि वेगळाच विचार किंवा तर्क करत ते काही वेगळच विचारतात नाहीतर ऊत्तर देतात. परत बरोबर आहे नं. असं समोरचा आणि आपण दोघांनाही एकदम विचारतात. यावर आपल्याकडे ऊत्तर नसतं. असं सगळंकाही उतार वयात होतं. म्हणून उतारवय हे लँडलाईन सारखं वाटतं.

खरखर हा लँडलाईन वर बोलतांना कायम येणारा अनुभव. तो अनुभव सुुध्दा उतारवयात येतो. फक्त लँडलाईन वरची खरखर ही फोनमधली असायची. उतारवयातली बोलण्यातच असते.

अशा पध्दतीने फोनचे बदलत गेलेले प्रकार आणि वयानुसार बदलत जाणाऱ्या आपल्या आयुष्यात काही साम्य आहे का. असा विचार करत होतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments